युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते 12 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे होणार उद्घाटन


या मोहिमेत 88,000 हून अधिक स्वयंसेवक होणार सहभागी

स्वयंसेवकांमार्फत होणार सरकारी योजनांच्या माहितीचा प्रचार

Posted On: 10 JAN 2024 5:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 10 जानेवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करतील आणि देशातील तरुणांना संबोधित करतील.

यावर्षी, राष्ट्रीय युवा दिन विविध सरकारी विभागांच्या सहकार्याने भारतभरातील जिल्ह्यांमध्ये युवा व्यवहार विभागाच्या सर्व क्षेत्रीय संघटनांद्वारे साजरा केला जाईल. एनएसएस युनिट्स, एनवायकेएस आणि अनेक शैक्षणिक संस्थांच्या पाठिंब्याने देशभरातील ‘माय भारत’ स्वयंसेवक भारतासाठी स्वयंसेवक म्हणून उपक्रम राबविण्यासाठी त्यांची ऊर्जा एकवटतील. युथ क्लब देखील या सोहळ्यात उत्साहाने सहभागी होऊन सर्वसमावेशक वातावरण सुनिश्चित करतील. या मोहिमेत 88,000 हून अधिक स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

माय भारत डिजिटल प्लॅटफॉर्म (https://mybharat.gov.in) द्वारे या कार्यक्रमांसाठी स्वयंसेवकांची नोंदणी केली जाते. 12 जानेवारी रोजी देशातील प्रमुख शहरे आणि 750 जिल्हा मुख्यालयांमध्ये रस्ते सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित केले जातील. प्रशिक्षित रस्ता सुरक्षा स्वयंसेवकांना केंद्र/राज्य मंत्री, स्थानिक खासदार किंवा आमदार यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवून, व्यापक  मोहिमेद्वारे उद्याची सुरक्षितता निर्माण करण्याची वचनबद्धता दर्शविली जाईल. हे स्वयंसेवक वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक हाताळण्यात मदत करण्यासाठी आणि रस्ता सुरक्षा जागरूकता उपक्रम राबवण्यासाठी तैनात केले जातील.

स्वयंसेवक मुलांसाठी कथाकथन सत्रासाठी अंगणवाडी केंद्रांनाही भेट देतील आणि सरकारी योजनांच्या माहितीचा प्रसार करतील.

12 जानेवारी या दिवशी स्वामी विवेकानंद यांची जयंती असून, हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो.

देशाच्या युवा लोकसंख्येच्या प्रत्येक घटकाला समाविष्ट करून सक्षम बनवण्याच्या आगळ्या आणि विशाल दृष्टिकोनासह, युवा व्यवहार विभाग राष्ट्रीय युवा दिनाची जय्यत तयारी करत आहे. देशभरातील 763 जिल्ह्यांमध्ये, स्वामी विवेकानंद यांना पुष्पांजली अर्पण करून, जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा दिन 2024 च्या भव्य कार्यक्रमाची सुरुवात होईल.

यावेळी जिल्ह्याचा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा आणि तरुणांचे कलागुण प्रदर्शित करणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात युवा उत्सवाचे विजेते तसेच यजमान संस्थांमधील संघ/व्यक्तींचा सहभाग राहील.

कार्यक्रमाची भागीदार  मंत्रालये आणि त्यांची जिल्हास्तरीय कार्यालये 12 जानेवारी 2024 रोजी विविध प्रदर्शने/उपक्रम/नोंदणी/जागरूकता मोहिमेसाठी स्टॉल्स उभारतील. तसेच वाहतूक जागरूकता, पोषण आणि आहार, केव्हीआयसी स्टार्टअप्सची उत्पादने, पीएमईजीपी  लाभार्थी इ. मुद्द्यांवर यावेळी भर दिला जाईल. वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन डिजीटल माय भारत व्यासपीठावर जिल्हा स्तरावर तयार केले जात आहे, जेणेकरुन जास्तीतजास्त युवकांपर्यंत पोहोचता येईल. प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य आणि युवा आकांक्षा व्यापक स्तरावरील उपक्रमांमधून प्रतिबिंबित व्हावेत, या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. भारतभरातील तरुण त्यांच्या जवळच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतील. माय भारत व्यासपीठावर ते आपल्या सहभागाची छायाचित्र आणि ध्वनी-चित्र फिती देखील अपलोड करू शकतील.


S.Kane/Vasanti/Rajashree/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1994890) Visitor Counter : 139