पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी केले अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकाचे उद्घाटन


पंतप्रधानांनी दोन नव्या ‘अमृत भारत’ रेल्वे गाड्यांना झेंडा दाखवून रवाना केल्यानंतर ‘अमृत भारत’ रेल्वे गाड्यांच्या परिचालनाला सुरुवात

पंतप्रधानांनी केले सहा नव्या वंदे भारत रेल्वेगाड्यांना रवाना

Posted On: 30 DEC 2023 4:47PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले आणि नव्या अमृत भारत रेल्वे गाड्या आणि वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. त्यांनी इतर अनेक रेल्वे प्रकल्पांचे देखील लोकार्पण केले. त्यानंतर एका सार्वजनिक कार्यक्रमात पंतप्रधान म्हणाले की अयोध्या धाम रेल्वे स्थानक दररोज 10 हजार लोकांची हाताळणी करू शकते आणि त्याचा पुनर्विकास पूर्ण झाल्यावर त्याची क्षमता आता 60,000 पर्यंत पोहोचणार आहे. यावेळी पंतप्रधानांनी वंदे भारत आणि नमो भारत या रेल्वेगाड्यांनंतर सुरू होत असलेल्या अमृत भारतया नव्या रेल्वे गाड्यांच्या मालिकेबद्दल माहिती दिली आणि आणि पहिली अमृत भारत रेल्वे गाडी अयोध्येमधून जात असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी उत्तर प्रदेश दिल्ली, बिहार पश्चिम बंगाल आणि कर्नाटकच्या जनतेचे या रेल्वे गाड्या मिळत असल्याबद्दल अभिनंदन केले.

पंतप्रधानांनी आधुनिक अमृत भारत रेल्वे गाड्यांमधून गरिबांच्या सेवेचा भाव निर्माण होत असल्याचे अधोरेखित करत सांगितले की ज्या लोकांना बऱ्याचदा आपल्या कामानिमित्त लांबचा प्रवास करावा लागतो आणि ज्या लोकांचे तितक्या प्रमाणात उत्पन्न नसते अशा लोकांना देखील आधुनिक सुविधा आणि आरामदायी प्रवासाची सोय उपलब्ध होणार आहे. गरिबांच्या जीवनात त्यांचा सन्मान विचारात घेऊन या गाड्यांची रचना करण्यात आली आहे, असे त्यांनी नमूद केले. वारसा स्थळांच्या विकासामध्ये वंदे भारत ट्रेन बजावत असलेली भूमिका देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केली. देशाची पहिली वंदे भारत ट्रेन काशीमधून धावली. आज वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेगाड्या देशातील 34 मार्गांवर धावत आहेत. वंदे भारत काशी, उज्जैन, कट्रा, पुष्कर, तिरुपती, शिर्डी, अमृतसर, मदुराई अशा भाविकांच्या प्रत्येक मोठ्या तीर्थस्थानाला जोडत आहेत, असे ते म्हणाले. या मालिकेत आज अयोध्येला देखील वंदे भारत ट्रेनची भेट मिळाली आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.

अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानक म्हणून ओळखला जाणारा अयोध्या रेल्वे स्थानकाचा पहिला टप्पा 240 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आला आहे. या तीन मजली आधुनिक रेल्वे स्थानकात लिफ्ट, सरकते जिने, फूड प्लाझा, पूजा सामग्रीची दुकाने, स्वच्छता गृहे, बालकांची काळजी घेण्यासाठी कक्ष, प्रतीक्षालय यांसारख्या आधुनिक सुविधा आहेत.  या रेल्वे स्थानकाची इमारत सर्वांना वापरण्यासाठी उपलब्ध आहे आणि आयजीबीसी प्रमाणित हरित स्थानक इमारत आहे. 

अयोध्या धाम जंक्शन रेल्वे स्थानकावरील कार्यक्रमात पंतप्रधानांनी नव्या प्रकारची सुपरफास्ट पॅसेंजर रेल्वे गाडी अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. अमृत भारत रेल्वे गाडी ही एलएचबी पुश-पुल तंत्रज्ञानावर आधारित असलेली बिगर वातानुकूलित डबे असलेली गाडी आहे. या गाडीमध्ये दोन्ही बाजूला इंजिन असून त्यामुळे तिला अधिक गती प्राप्त होते. रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय आकर्षक आणि सुंदर रचना करण्यात आलेली आसने, सामानाचे चांगले रॅक, मोबाईल होल्डरसह मोबाईल चार्जिंग पॉइंट, एलईडी दिवे, पब्लिक इन्फर्मेशन सिस्टिम अशा सुविधा या गाडीमध्ये आहेत.

पंतप्रधानांनी यावेळी सहा नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांना देखील रवाना केले.

दरभंगा-अयोध्या-आनंद विहार टर्मिनल अमृत भारत एक्स्प्रेस आणि मालदा टाऊन- सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनस (बंगळूरु) अमृत भारत एक्स्प्रेस या दोन नव्या अमृत भारत रेल्वेगाड्यांना पंतप्रधानांनी रवाना केले. यावेळी पंतप्रधानांनी अमृत ट्रेनच्या उद्घाटनाच्या प्रवासात शालेय विद्यार्थ्यांसोबतही संवाद साधला. पंतप्रधानांनी सहा नव्या वंदे भारत ट्रेननाही रवाना केले. यामध्ये  माता वैष्णो देवी कट्रा- न्यू दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस, अमृतसर दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस, कोईंबतूर बंगळूरू कॅन्ट वंदे भारत एक्स्प्रेस, मंगलोर-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस, जालना-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस आणि अयोध्या आनंद विहार टर्मिनल वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

पंतप्रधानांनी यावेळी या भागातील रेल्वे पायाभूत सुविधांना बळकटी देणाऱ्या 2300 कोटी रुपयांच्या तीन रेल्वे प्रकल्पांचे लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये रुमा चाकेरी- चंदेरी तिसरी मार्गिका, जौनपूर-तुलसी नगर, अकबरपूर अयोध्या, सोहावाल-पतरंगा आणि जौनपूर बाराबंकी दुहेरीकरण प्रकल्पाचा सफदरजंग-रसौली विभाग आणि मलहौर-दालिगंज रेल्वे सेक्शन प्रकल्पाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण यांचा समावेश आहे.

***

M.Pange/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1991818) Visitor Counter : 78