पंतप्रधान कार्यालय

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2023 च्या महाअंतिम फेरीतील सहभागींसोबत झालेल्या संवादात पंतप्रधानांनी केलेले मार्गदर्शन

Posted On: 19 DEC 2023 11:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 डिसेंबर 2023 

 

मित्रांनो,

खरेच  तुम्हा सगळ्यांशी बोलून खूप छान वाटले . देशासमोरील सध्याच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी देशातील तरुण पिढी अहोरात्र काम करत आहे ,याचा मला आनंद आहे. आधीच्या हॅकॅथॉनमधून मिळालेले उपाय खूप प्रभावी ठरले आहेत. हॅकॅथॉनमध्ये सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वत:चे स्टार्टअपही सुरू केले आहेत. हे स्टार्टअप्स, हे उपाय सरकार आणि समाज दोघांनाही मदत करत आहेत. आज या हॅकॅथॉनमध्ये सहभागी झालेल्या संघांसाठी आणि हजारो विद्यार्थ्यांसाठी ही मोठी प्रेरणा आहे.

मित्रांनो,

21 व्या शतकातील भारत आज ‘जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान’  या मंत्रानुसार  वाटचाल करत आहे. आता काहीही होऊ शकत नाही, हे बदलू शकत नाही या विचारातून प्रत्येक भारतीय बाहेर पडला आहे. या नव्या विचारामुळे  गेल्या 10 वर्षात भारत 10व्या क्रमांकावरून  5व्या क्रमांकाची  अर्थव्यवस्था बनला आहे. आज भारताच्या यूपीआयचा आवाज जगभर घुमत आहे.  कोरोना संकटाच्या काळात भारताने ‘मेड इन इंडिया’  म्हणजेच स्वदेशी उत्पादित  लस बनवली. भारताने आपल्या नागरिकांना मोफत लसीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि जगातील डझनभर देशांमध्ये ही लस दिली.

मित्रांनो,

आज विविध क्षेत्रांतील तरुण नवोन्मेषक  आणि व्यावसायिक येथे उपस्थित आहेत.  तुम्हा सर्वांना वेळेचे महत्त्व कळते, निर्धारित वेळेत ध्येय गाठण्याचा अर्थ समजतो. आज आपण काळाच्या अशा एका वळणावर आहोत, जिथे आपला प्रत्येक प्रयत्न पुढील हजार वर्षांच्या भारताचा पाया मजबूत करेल. तुम्ही हा अपूर्व  काळ समजून घ्या. हा काळ अनन्यसाधारण आहे कारण अनेक घटक एकत्र आले आहेत. आज भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक आहे.  आज भारतात जगातील सर्वात मोठा प्रतिभांचा पूल आहे. आज भारतात स्थिर आणि मजबूत सरकार आहे. आज भारताची अर्थव्यवस्था विक्रमी वेगाने वाढत आहे. आज भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानावर अभूतपूर्व भर दिला जात आहे.

मित्रांनो,

हा तो काळ आहे जेव्हा तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा एक मोठा भाग बनले आहे. आज आपल्या जीवनात तंत्रज्ञानाचा जो  प्रभाव आहे, तसा यापूर्वी कधीच नव्हता. आज परिस्थिती अशी आहे की, आपल्याला  एखादे तंत्रज्ञान  वापरण्यास्नेही होईपर्यंत  , त्याची अपग्रेड केलेली आवृत्ती येते.त्यामुळे तुमच्यासारख्या तरुण नवोन्मेषकांची  भूमिका खूप महत्त्वाची आहे.

मित्रांनो,

स्वातंत्र्याचा अमृत काळ म्हणजे पुढील 25 वर्षे देशासोबतच तुमच्या आयुष्यातही  हा काळ ,एकीकडे 2047 चा प्रवास आणि दुसरीकडे तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या वर्षांचा प्रवास, दोन्ही एकत्र होणार आहेत.  भारताला विकसित करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. आणि यामध्ये तुम्हा सर्वांचे सर्वात मोठे ध्येय असले पाहिजे – भारताची आत्मनिर्भरता.  आपला भारत आत्मनिर्भर  कसा होईल? भारताला कोणतेही तंत्रज्ञान आयात करावे लागू नये, कोणत्याही तंत्रज्ञानासाठी इतरांवर अवलंबून राहावे लागू नये, हे तुमचे उद्दिष्ट असायला हवे. आता जसे संरक्षण क्षेत्र आहे. आज भारत संरक्षण तंत्रज्ञानात आत्मनिर्भर   होण्यासाठी काम करत आहे. पण तरीही संरक्षण तंत्रज्ञानाशी संबंधित अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला आयात कराव्या लागतात. त्याचप्रमाणे, आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सेमीकंडक्टर आणि चिप तंत्रज्ञानामध्ये देखील आपल्यालाआत्मनिर्भर  व्हावे लागेल.क्वांटम तंत्रज्ञान  आणि हायड्रोजन ऊर्जा  यांसारख्या क्षेत्रातही भारताच्या आकांक्षा मोठ्या  आहेत. 21 व्या शतकातील आधुनिक व्यवस्था  निर्माण करतानाच  सरकार अशा सर्व क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करत आहे. पण त्याचे यश तुमच्या तरुणांच्या यशावर अवलंबून आहे.

मित्रांनो,

आज संपूर्ण जगाच्या नजरा तुमच्यासारख्या तरुण मनावर आहेत. भारतात जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी किफायतशीर, दर्जेदार, शाश्वत आणि प्रमाणबद्ध उपाय सापडतील, असा जगाला विश्वास आहे . आपल्या चांद्रयान मोहिमेने जगाच्या अपेक्षा अनेक पटींनी वाढवल्या आहेत. या अपेक्षा लक्षात घेऊन तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणावे लागेल. देशाच्या आधुनिक गरजा लक्षात घेऊन तुम्हाला तुमची दिशा ठरवायची आहे.

मित्रांनो,

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनचे उद्दिष्ट, देशाच्या समस्या सोडवणे आणि उपायांमधून रोजगार निर्माण करणे, ही अशी साखळी आहे. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या माध्यमातून देशातील युवा शक्ती विकसित भारतासाठी उपायांचे अमृत शोधत  आहे. माझा तुम्हा सर्वांवर, देशाच्या युवाशक्तीवर अतूट विश्वास आहे. तुम्ही कोणतीही समस्या पाहा, कोणताही उपाय शोधा, कोणताही नवोन्मेष  करा, तुम्हाला विकसित भारताचा संकल्प, आत्मनिर्भर भारताचा संकल्प नेहमी लक्षात ठेवावा लागेल.तुम्ही जे काही कराल ते सर्वोत्कृष्ट असले पाहिजे. तुम्हाला असे काम करावे लागेल की,  जग तुमच्या मागे येईल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप अभिनंदन!

खूप खूप धन्यवाद!

 

* * *

S.Bedekar/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1988666) Visitor Counter : 115