युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

खेलो इंडिया पॅरा क्रीडास्पर्धा 2023 मध्ये पॅरा खेळाडूंच्या सुविधेसाठी खेलो इंडिया आणि स्वयम् यांचे परस्परांना सहकार्य

Posted On: 19 DEC 2023 4:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 डिसेंबर 2023 

 

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाचा प्रमुख कार्यक्रम 'खेलो इंडिया' आणि भारतातील अग्रगण्य सुलभता सेवा संस्था 'स्वयम्' 'खेलो इंडिया पॅरा क्रीडास्पर्धे' दरम्यान नवी दिल्लीत वाहतूक आणि पायाभूत सुविधा सुलभता सुनिश्चित करण्यासाठी एकत्र आले.

सहभागी झालेल्या 1400 हून अधिक पॅरा-खेळाडूंसाठी सुलभ वाहतूक सेवा पुरविल्या गेल्या. या 8 दिवसीय कार्यक्रमाच्या सुरुवातीला 300 हून अधिक स्वयंसेवक आणि खेळांशी संबंधित अधिकाऱ्यांना जागरूक करण्यात आले. सर्व पॅरा-ऍथलीट्स, पॅरा-अधिकारी आणि पॅरा-प्रशिक्षकांसाठी रेल्वे स्थानके, बस स्थानके आणि विमानतळासह शहरात येण्यापासून ते त्यांच्या प्रस्थानापर्यंत सोयीच्या बस आणि मिनीवॅन तयार ठेवण्यात आल्या होत्या. शिवाय, व्यवस्था करताना निवास (हॉटेल/वसतिगृहे) आणि संबंधित क्रीडांगण संबंधित वाहतुकीचाही विचार करण्यात आला.

खेलो इंडिया पॅरा क्रीडास्पर्धा 2023 मध्ये, व्हीलचेअरचा वापर करणारे 500 हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. त्यामुळे, त्यांना सुलभ पायाभूत सुविधा पुरविणे हे सर्वोच्च प्राधान्य होते, ज्यामध्ये जिन्यातील कठड्यासह रॅम्पच नव्हे तर सुलभ शौचालये, सुलभ आसन आणि पॅरा खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी सुलभ वाहनतळ देखील समाविष्ट आहे.

सर्वसमावेशक पायाभूत सुविधा आणि सुलभ वाहतूक प्रणाली म्हणजे पॅरा-खेळाडूसाठी रॅम्प आणि उपलब्ध केलेल्या जागांपेक्षा अधिक असून ती आपल्याला समान संधी देते असे पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेती भाविना पटेल म्हणाली. बऱ्याच लोकांना सुलभ वाहतुकीचे महत्त्व समजणार नाही, परंतु पॅरा-खेळाडू म्हणून, क्रीडा स्पर्धांदरम्यान सुलभ व्हॅन किंवा बस दिली जाते तेव्हा आपल्याला किती सन्माननीय आणि सुरक्षित वाटते हे आपण प्रत्यक्ष अनुभवले आहे. त्याचप्रमाणे, खेळांमध्ये ज्या प्रकारे सुलभ शौचालये उपलब्ध करून दिली जातात, ती सर्व सुविधांचा अविभाज्य भाग बनवली पाहिजेत. ही जबाबदारी स्वीकारल्याबद्दल आणि प्रत्यक्षात ती आणल्याबद्दल मी खेलो इंडिया आणि स्वयंमची खरोखर प्रशंसा करते.

संपूर्ण स्पर्धेदरम्यान प्रत्येक पॅरा-खेळाडूला पाठिंबा देण्याबाबत अधिकारी आणि स्वयंसेवकांना संवेदनशील बनवण्यासाठी स्पर्धेपूर्वी अनेक कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्वयंमद्वारे आयोजित केलेल्या संवादाच्या प्रशिक्षणाने स्पर्धेतील सर्वसमावेशकता आणि आदर वाढवला आहे आणि प्रत्येकासाठी त्यांच्या शारीरिक क्षमतांची पर्वा न करता, सर्व व्यक्तींमध्ये सहानुभूती आणि समजूतदारपणाला चालना देणारे, स्वागतार्ह वातावरण सुनिश्चित केले आहे.

खेलो इंडिया आणि स्वयंम यांच्यातील सहकार्य हे भारतात अधिक समावेशक आणि सुलभ क्रीडा वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल राहिले आहे. प्रत्येकजण, शारीरिक क्षमतेची पर्वा न करता, सहभागी होऊ शकेल, स्पर्धेत भाग घेऊ शकेल आणि देशाला एकत्र आणणाऱ्या खेळांच्या उत्साहाचे साक्षीदार होऊ शकेल हे सुनिश्चित करण्यासाठीचे समर्पण हे संघटनेचे प्रतिबिंब आहे.

 

* * *

N.Chitale/V.Ghode/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1988206) Visitor Counter : 84