पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उत्तर प्रदेशात वाराणसी येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रा (शहरी)’ च्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 17 DEC 2023 9:37PM by PIB Mumbai

सरकारशी संबंधित आणि राजकीय, सामाजिक कार्याशी निगडित देशातील सर्व लोक विकसित भारत संकल्प यात्रा यशस्वी करण्यासाठी  आपला वेळ देत आहेत, त्यामुळे येथील खासदार या नात्याने माझी देखील ही जबाबदारी आहे की, त्यात सहभागी होण्यासाठी मी या कार्यक्रमाला वेळ दिला पाहिजे. त्यामुळेच एक खासदार म्हणून, तुमचा सेवक या नात्याने मी आज तुमच्याप्रमाणेच यात सहभागी होण्यासाठी आलो आहे.
आपल्या देशात  सरकारे तर अनेक आली, अनेक योजना देखील बनल्या, अनेक चर्चा देखील झाल्या, मोठमोठ्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि त्या सर्वांचा अनुभव आणि सारांश हा होता, जे मला वाटले ते म्हणजे देशातील सर्वात जास्त लक्ष देण्याजोगे जे काम आहे ते म्हणजे सरकार ज्या काही योजना बनवते, ज्यांच्यासाठी बनवते, ज्या कामासाठी बनवल्या जातात, त्या योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. जर प्रधानमंत्री आवास योजना असेल तर ज्याचे बकाल वस्तीतले घर, झोपडी किंवा कच्चे घर आहे, त्याचे घर तयार झाले पाहिजे. आणि त्याला सरकार दरबारी  फेऱ्या मारण्याची गरज नाही, सरकारने पुढाकार घेऊन काम केले पाहिजे आणि जेव्हापासून तुम्ही मला हे काम दिलं आहे तेव्हापासून आतापर्यंत  सुमारे 4 कोटी कुटुंबांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत.
पण आताही अशी बातमी येते की तिथे कोणी तरी उरले आहे, त्या गावात कोणीतरी बाकी राहिले आहे. तेव्हा मग आम्ही ठरवले की पुन्हा एकदा देशभरात जाऊया, सरकारच्या ज्या योजना आहेत त्या ज्यांना मिळाल्या आहेत, त्यांच्याकडून ऐकायचं की बाबांनो तुम्हाला काय काय मिळाले, तुम्हाला ते कसे मिळाले? ते मिळवण्यात कोणतीही अडचण आली नाही ना, लाच द्यावी लागली नाही ना, तुम्हाला जेवढे ठरले होते तेवढे मिळाले किंवा कमी मिळाले. एकदा गेलो की त्याचा देखील सगळा हिशोब होऊन जाईल. तर ही जी विकसित भारत संकल्प यात्रा आहे ना ती एका प्रकारे माझी देखील कसोटी आहे, माझी देखील परीक्षा आहे की मी जे बोललो होतो आणि जे काम मी करत आहे, मला तुमच्या तोंडून ऐकायचे आहे आणि देशभरातून ऐकायचे आहे की जशी माझी इच्छा होती, तसे झाले आहे की नाही?
ज्यांच्यासाठी व्हायला हवे होते त्यांच्यासाठी झाले आहे की नाही, जे काम व्हायला हवे होते, ते झाले आहे की नाही झाले आहे. आताच माझी काही सहकाऱ्यांसोबत भेट झाली ज्यांनी आयुष्मान कार्डाचा लाभ घेत जास्तीत जास्त गंभीर आजारांमध्ये उपचार घेतले आहेत. त्यांचे अपघात झाले होते, हात-पाय मोडले तर रुग्णालयात जाऊन, त्यांना मी विचारले तर ते म्हणाले की साहेब इतका खर्च आम्ही कसा काय करणार होतो, आहे तसेच जगलो असतो, पण जेव्हा आयुष्मान कार्ड आले तर धीर मिळाला, शस्त्रक्रिया केली तर आता शरीर काम करत आहे. आता यामुळे मला तर आशीर्वादच मिळतो. पण सरकारमध्ये जे बाबू लोक आहेत, अधिकारी वर्ग आहे, जे फाईलींवर योजना पुढे नेतात, चांगल्या योजना देखील तयार करतात, पैसे देखील पाठवून देतात. पण तिथे त्यांचे काम पूर्ण होते की चला बाबा 50 लोकांना मिळायचे होते, मिळाले, 100 लोकांना मिळायला हवे होते, मिळाले, एक हजार गावांमध्ये जायचे होते, गेले. पण ज्यावेळी त्या अधिकाऱ्याला हे ऐकू येते की त्याने कधी फाईलवर काम केले होते, त्याच्यामुळे काशीच्या अमुक अमुक गल्लीत राहणाऱ्या अमुक अमुक व्यक्तीचा जीव वाचला तर हा जो अधिकारी असतो ना त्याचा काम करण्याचा उत्साह देखील कैक पटींनी वाढतो. त्याला समाधान मिळते. ज्यावेळी तो कागदावर काम करत असतो त्यावेळी त्याला वाटते की मी सरकारी काम करत आहे. पण ज्यावेळी त्या कामाचा फायदा एखाद्याला मिळतो, जे तो स्वतःच्या डोळ्यांनी पाहतो, स्वतःच्या कानांनी ऐकतो, तेव्हा त्याचा काम करण्याचा उत्साह वाढतो आणि म्हणूनच मी असे पाहिले आहे की विकसित भारत संकल्प यात्रा ज्या ज्या ठिकाणी गेली आहे तिथे सरकारी अधिकाऱ्यांवर इतका सकारात्मक परिणाम झाला आहे, त्यांना आपल्या कामाचे समाधान मिळू लागले आहे. बरं बुवा ही योजना बनली, मी तर फाईल तयार केली होती, पण एका गरीब विधवा महिलेच्या घरी जीवन ज्योती विवाहाचे पैसे पोहोचले का, अडचणीत असलेल्या एका आयुष्यात तिला इतकी मोठी मदत मिळाली. तेव्हा त्याला वाटते की अरे मी तर किती मोठे काम केले आहे. एक सरकारी कर्मचारी जेव्हा हे ऐकतो तेव्हा त्याला आयुष्यातील एक नवा आनंद प्राप्त होतो.
अतिशय कमी लोक आहेत ज्यांना याचे सामर्थ्य लक्षात येते की विकसित भारत संकल्प यात्रेने हे काय होत आहे. जो अधिकारी वर्ग या कामासोबत जोडलेला आहे, ते जेव्हा ऐकतात, जेव्हा मी देखील येथे बसलो आहे, ऐकत आहे मोदीजी मला खूप चांगले वाटले, माझ्या पतीचे निधन झाले होते, अचानक मला बातमी मिळाली की 2 लाख रुपये मिळाले आहेत. एखादी भगिनी सांगते की बालपणी आमचे आयुष्य आम्ही धुरामध्ये घालवत होतो, गॅस आला आयुष्य बदलले. यापेक्षा मोठी गोष्ट त्या एका भगिनीने सांगितली ती म्हणजे माझ्या घरात गॅसची शेगडी आल्याबरोबरच श्रीमंत आणि गरिबी यांच्यातील तफावत संपुष्टात आली. गरीबी हटाओचा नारा देणे ही एक बाब आहे पण एक गरीब सांगतो की माझ्या घरी गॅसची शेगडी आल्यामुळे गरीब-श्रीमंत हा भेदभावच उरला नाही.
जेव्हा तो सांगतो की मी पक्क्या घरात राहायलो गेलो तेव्हा माझा आत्मविश्वास इतका वाढला की माझी मुले सन्मानाने शाळा, महाविद्यालयांमध्ये आपल्या मित्रांसोबत उभी राहू लागली. झोपडीत राहायचो तेव्हा मुलांना लाज वाटायची, कच्च्या घरात राहात होतो तेव्हा मुलांना लाजीरवाणे वाटायचे, दबून राहायचे, आत्मविश्वासच नव्हता, पक्के घर मिळताच भिंती नव्हे, पक्के छत नव्हे तर आयुष्यात आत्मविश्वास भरून राहिला. लांबून हे घर पाहिले तर कळत नाही, बँकेतून चेक गेला म्हणूनही लक्षात येत नाही, पण ज्यावेळी त्या लाभार्थ्याच्या तोंडून ऐकतो त्यावेळी कळते की चला बुवा जीवन धन्य झाले, कोणाच्या तरी आयुष्यात बदल झाला.

मी निरीक्षण करत होतो कि, आपले गुप्ताजी भरभरून बोलत आहेत, थांबतच नाहीत असे का? अनेक योजनांचा लाभ मिळाल्याने ते खूप उल्हसित झाले होते. सावकाराकडून पैसे घेताना देखील नाकीनऊ येते आणि इथे समोरून कोणाला बँकेतून 10 हजार रुपये मिळतात, या बँकांनी स्वतःहून पैसे दिले तर मग समोरच्याचा विश्वास वाढतो कि हा माझा देश आहे, ही बँक माझी आहे. आणि माझी अशी इच्छा आहे कि भारतातील प्रत्येक माणसाला वाटावे की ही रेल्वे माझी आहे, हे रुग्णालय माझे आहे, हे अधिकारी, हे कार्यालय माझे आहे, हा देश माझा आहे. ही भावना जागृत झाली की देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही जागृत होते. आणि म्हणूनच हा जो प्रयत्न आहे तो बीज पेरतोय. आपल्या आई-वडिलांना हालअपेष्टा सोसाव्या लागल्या, आपल्यालाही जीवनात संकटांना सामोरे जावे लागले, पण आपण आपल्या मुलांना संकटे झेलण्यास भाग पाडू नये, हे बीज पेरले जात आहे. आपण ज्या यातना सोसल्या त्या आपल्या मुलांनीही सोसाव्या असे कोणत्याही पालकांना वाटत नाही. स्वत: शिक्षण घेऊ शकले नाहीत, अशिक्षित राहिले, तरी कोणत्याही पालकांना त्यांच्या पाल्यांनी अशिक्षित राहावे असे वाटत नाही. आणि जेव्हा त्यांना या योजनांची सर्व माहिती मिळते तेव्हा त्याला वाटते की हीच वेळ आहे, हीच ती वेळ, जेव्हा आपणही काहीतरी केले पाहिजे. आणि जेव्हा 140 कोटी लोकांना वाटेल की हीच वेळ आहे, तेव्हाच देश प्रगती करेल. 
देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले, संपूर्ण देशात एक वातावरणनिर्मिती झाली होती, कोणी चरखा कातायचे, कोणी विचारायचे, तुम्ही चरखा का चालवता? तर ते सांगायचे स्वातंत्र्यासाठी, स्वातंत्र्यासाठी कोणीतरी अभ्यास सोडून 'भारत माते'चा जयजयकार करत पोलिसांची मारहाण सोसत वावरायचे, तेव्हा लोक विचारायचे, 'मित्रा, तू का मार खातोय?' तेव्हा उत्तर यायचे देशाच्या स्वातंत्र्यासाठी. कोणी वयोवृद्धांची सेवा करायचा, तर विचारणा व्हायची कि अरे काय करतोस भाऊ? तेव्हा ते सांगत, स्वातंत्र्यासाठी करतोय, खादी परिधान करणाऱ्याला असे का करतो म्हणून विचारले तर उत्तर यायचे स्वातंत्र्यासाठी. हिंदुस्थान चा प्रत्येक व्यक्ती म्हणू लागला की मी स्वातंत्र्यासाठी हे काम करत आहे, मी उपोषण केले तरी स्वातंत्र्यासाठी आहे, मी कष्ट केले तरी स्वातंत्र्यासाठी आहे, मुलांना शिकवले तरी स्वातंत्र्यासाठी आहे, स्वच्छता केली तरी स्वातंत्र्यासाठी आहे. सूतकताई केली तरी ती स्वातंत्र्यासाठी, असा स्वातंत्र्याचा ध्यास प्रत्येकाला लागला, प्रत्येकाच्या मनात विश्वास निर्माण झाला, इंग्रजांना सत्ता सोडावी लागली. 
देशाने एकजूट दाखवली. जर आपण, 140 कोटी देशवासी या भावनेने प्रेरित झालो कि आता, आपल्याला देशाची प्रगती करायची आहे, इथेच सीमित राहायचे नाही, प्रत्येकाचे आयुष्य बदलायचे आहे, प्रत्येकाच्या सामर्थ्याचा आदर केला पाहिजे, ताकदीचा सदुपयोग केला पाहिजे, तरच देश पुढे जाईल. हे बीज त्यांनी मनात पेरलं की आगामी 25 वर्षात त्याचा वटवृक्ष तयार होईल आणि 2047 मध्ये भारत विकसित होईल आणि मुलांना त्याची फळे मिळू लागतील. तुमच्या मुलांनाच या वटवृक्षाची सावली मिळणार आहे आणि म्हणूनच विकसित भारत घडवायचा असेल तर प्रत्येक नागरिकाची भावना, कणखर मन, दृढ संकल्प असला पाहिजे आणि एकदा मनाने घेतले कि संकल्पपूर्ती होतेच. आणि ही विकसित भारत संकल्प यात्रा, हे एक प्रकारे देशाचे काम आहे, हे कोणत्याही राजकीय पक्षाचे काम नाही आणि जो हे काम करतो तो खूप पवित्र कार्य करतो असे माझे मत आहे, जो लांबून अलिप्तपणे पाहतोय, वर्तमानपत्रात फक्त वाचतोय, त्याने समजून घ्यावे की मी माझी गाडी चुकवतोय, मी संधी व्यर्थ दवडतोय. मी भले देशाचा पंतप्रधान असलो तरी आज तुमच्यामध्ये असण्याचा मला खूप आनंद आहे, मला खूप संतोष वाटतोय की आज मी विकसित भारत संकल्प यात्रेचा एक भाग आहे. मलाही समाधान मिळेल की हो भाऊ, मीही हे काम केले आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने ते केले पाहिजे. पुढच्या गावात जिथे कुठे यात्रा जाणार आहे, शहरातील कोणत्याही प्रभागात जल्लोषात स्वागत व्हायला हवे, प्रत्येकानेच सहभागी व्हावे, प्रत्येकाने माहिती घ्यावी, योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे आणि ज्यांना या योजनांचा लाभ प्राप्त झाला आहे त्यांनी तो आत्मविश्वासाने सांगायला हवा. चांगल्या गोष्टी सांगण्यानेही चांगुलपणाचे वातावरण निर्माण होते. आणि म्हणूनच मला वाटते की विकसित भारत यात्रा हे एक मोठे स्वप्न आहे, एक मोठा संकल्प आहे आणि हा संकल्प आपण स्वतःच्या प्रयत्नांनी पूर्ण केला पाहिजे. मला खूप छान वाटले, सगळ्यांना भेटण्याची संधी मिळाली, तुमच्याकडूनही ऐकण्याची संधी मिळाली, मात्र ही यात्रा अधिक यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. देशवासीयांच्या मनात भावना निर्माण करा, आत्मविश्वास जागृत करा. आणि आपण अनुभवले आहे की घरात पैसे नसताना, संकटांना तोंड देताना आपण अनेक गोष्टी करू शकत नाही, इच्छा असूनही करू शकत नाही, मुलांसाठी चांगला शर्ट खरेदी करण्याची इच्छा झाली तरी ती पूर्ण करू शकत नाही, का तर पैशांची चणचण. घराप्रमाणेच देशाचीही तीच गत असते. देशातही पैसा असला पाहिजे, पैसा असेल तर प्रत्येक नागरिकाची इच्छा पूर्ण होईल. आज 4 कोटी गरीबांना घरे मिळाली, जे उरले आहेत त्यांनाही घरे देण्याची मोदी हमी देत आहेत. ज्याला आयुष्मान कार्ड मिळाले त्याला मोफत औषध मिळाले. ज्यांना गॅस शेगडीची गरज होती त्यांना सरकार अनुदान देऊनही गॅस शेगडी देत आहे, का ? सरकारकडे देण्याइतकी कुवत आहे. 25 वर्षात भारताचा विकास होईल, मग या संकटांचा मागमूसही राहणार नाही, त्यांचा मागमूसही राहणार नाही, आपण संकटमुक्त होऊ. 
आणि विकसित भारताचा संकल्प पूर्ण करणे हा संकटमुक्तीचा मार्ग आहे. आणि म्हणूनच मी माझ्या काशीवासीयांना खात्री देतो की, तुमचा सेवक, तुमचा खासदार म्हणून मी काम करेन, पण तुम्ही मला देशाचीही धुरा दिली आहे, तीदेखील महादेवाच्या आशीर्वादाने मी समर्थपणे पेलेन. महादेवाची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहो आणि आपल्या काशीत ही यात्रा खूपच यशस्वी होवो, कोणतीही उदासीनता नको. कार्यक्रमात जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावे, कुटुंबातील एकही व्यक्ती अशी असू नये जी यात्रेला गेली नाही. एक तास, दोन तास जा, त्या कार्यक्रमाचा भाग व्हा, यासाठी तुम्ही सर्वांनी मदत करा आणि विकसित भारताचा संकल्प आणखी दृढ करा, तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार.

नमस्कार.

***

SonalT/ShaileshP/VasantiJ/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1988069) Visitor Counter : 130