पंतप्रधान कार्यालय

देहराडून इथे उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स शिखर परिषद 2023 च्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

Posted On: 08 DEC 2023 3:34PM by PIB Mumbai
उत्तराखंड चे गव्हर्नर श्री गुरमीत सिंह जी, इथले लोकप्रिय आणि युवा मुख्यमंत्री श्री पुष्कर सिंह धायमी, सरकारमधील मंत्री, विविध देशांचे प्रतिनिधी, उद्योग जगतातील मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, देवभूमी उत्तराखंड इथे येऊन मनाला धन्यता वाटते. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी गेलो होतो, तेव्हा अचानक माझ्या तोंडातून निघालं होतं, की एकविसाव्या शतकातील हे तिसरं दशक, उत्तराखंडचे दशक आहे. आणि मला आनंद आहे, की माझ्या ह्या नळकत बोललेल्या शब्दांना प्रत्यक्षात साकार होतांना मी सातत्याने बघतो आहे. उत्तराखंडच्या या गौरवाशी आपण सगळे ही जोडले जात आहात, उत्तराखंडच्या विकासाच्या यात्रेचा भाग होण्याची एक खूप मोठी संधी आपल्याला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तरकाशी इथे बोगद्यात अडकलेल्या आमच्या श्रमिक बांधवांना सुरक्षित काढण्यासाठी जे यशस्वी अभियान चालवले गेले, त्यासाठी मी राज्य सरकार सहित, सर्वांचे विशेष अभिनंदन करतो.
मित्रांनो,
उत्तराखंड असे राज्य आहे, जिथे आपल्याला अध्यात्म आणि विकास या दोन्हीचा अनुभव एकाचवेळी घेता येईल. आणि मी तर उत्तराखंडच्या भावना आणि इथे असणारी संधी दोन्ही जवळून पाहिले आहेत, मी त्यांना अनुभवले आहे. एक कविता मला आता आठवते आहे, जी मी उत्तराखंडसाठी लिहिली आहे--
 
जहाँ अंजुली में गंगा जल हो, 
 
जहाँ हर एक मन बस निश्छल हो, 
 
जहाँ गाँव-गाँव में देशभक्त हो, 
 
जहाँ नारी में सच्चा बल हो, 
 
उस देवभूमि का आशीर्वाद लिए मैं चलता जाता हूं!
 
इस देव भूमि के ध्यान से ही, मैं सदा धन्य हो जाता हूँ। 
 
है भाग्य मेरा, सौभाग्य मेरा, मैं तुमको शीश नवाता हूँ"।
 
मित्रांनो, 
सामर्थ्ययुक्त अशी ही देवभूमी, निश्चितच आपल्यासाठी गुंतवणुकीची अनेक दारे उघडणार आहे. आज भारत, विकास आणि वारशाचा जो मंत्र घेऊन पुढे जातो आहे. त्याचे अगदी स्पष्ट आणि प्रखर उदाहरण उत्तराखंड आहे.
मित्रांनो,
आपण सगळे व्यावसायिक जगतातील दिग्गज लोक आहात. आणि व्यावसायिक जगतातले जे लोक असतात, ते आपल्या कामाचे SWOT विश्लेषण करतात. आपल्या कंपनीची ताकद काय आहे, दुबळी बाजू काय आहे, संधी काय आहेत आणि आव्हाने कोणती आहेत, या सगळ्यांचा अभ्यास आणि आकलन करून आपण त्यानुसार आपली पुढची रणनीती ठरवतो. एक राष्ट्र म्हणून आज आपण भारताचेही असेच स्वॉट विश्लेषण केले तर आपल्याला काय आढळेल? आपल्याला चारी बाजूंना, आकांक्षा (aspirations), आशा (hope), आत्मविश्वास (self-confidence), नवोन्मेष (innovation) आणि संधी (opportunity) हेच दिसेल. आज आपल्याला देशात धोरणांना प्रत्यक्षात उतरवणारे प्रशासन दिसेल. आज आपल्याला राजकीय स्थैर्य असावे यासाठी देशबांधवांचा आग्रह दिसेल.
आकांक्षीत भारताला आज अस्थिरता नको आहे. त्याला स्थिर सरकार हवे आहे. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत देखील आपण हेच पहिले आहे. आणि उत्तराखंडच्या लोकांनी तर हे पहिलेच करून दाखवले आहे. जनतेने स्थिर आणि मजबूत सरकारांसाठी जनादेश दिला आहे. जनता ने सुप्रशासनासाठी मते दिली आहेत. प्रशासनाच्या आधीच्या कामांच्या बळावर मतदान केले. आज भारत आणि भारतीयांकडे जग ज्या अपेक्षेने आणि सन्मानाने बघत आहे. आणि आता सर्व उद्योग जगतातील लोकांनी याचा उल्लेखही केला. प्रत्येक भारतीय एक जबाबदारी म्हणून याकडे बघत आहे. प्रत्येक भारतीयाला असे वाटते की विकसित भारताची निर्मिती त्याची आपली जबाबदारी आहे. प्रत्येक देशबांधवाची जबाबदारी आहे. याच आत्मविश्वासाचा परिणाम आहे, की कोरोना महामारीच्या काळात किंवा युद्धातील संकट असतांनाही भारत अत्यंत वेगाने विकसित होत आहे. आपण पाहिले आहे, की कोरोनाची लस असो किंवा मग आर्थिक धोरणे, भारताने आपली धोरणे आपल्या सामर्थ्यावर विश्वास दर्शवला आहे. त्याच कारणाने भारत, आता इतर मोठ्या अर्थव्यवस्थाच्या तुलनेत, वेगळ्या स्वरूपात दिसतो आहे. राष्ट्रीय स्तरावर भारताच्या या मजबुतीचा फायदा, उत्तराखंड सह देशातील अनेक राज्यांना होत आहे.
मित्रांनो,
अशा परिस्थितीत, उतराखंड, यासाठी देखील विशेष आणि स्वाभाविक ठरले आहे, कारण इथे दुहेरी इंजिनाचे सरकार आहे. उत्तराखंड मधील दुहेरी इंजिनाच्या सरकारचे प्रयत्न सगळीकडे दिसत आहेत. राज्य सरकार आपल्या बाजूने सगळी जमिनीवरची परिस्थिती समजून घेत, अत्यंत वेगाने काम करत आहे. त्याशिवाय, भारत सरकारच्या योजना, आमची विकासाची दृष्टी, देखील इथले सरकार तेवढ्याच वेगाने प्रत्यक्षात उतरवण्याचे काम करत आहे. आपण बघा, आज भारत सरकार 21 व्या शतकातील आधुनिक संपर्कव्यवस्थेच्या पायाभूत सुविधांमध्ये उत्तराखंड सरकार अभूतपूर्व गुंतवणूक करत आहे. केंद्र सरकारच्या या सगळ्या प्रयत्नांदरम्यान, राज्य सरकारे देखील छोटी शहरे, गांव आणि वस्त्यांना जोडण्यासाठी पूर्ण शक्तिनिशी काम करत आहे.
आज उत्तराखंडमधील ग्रामीण रस्ते असोत किंवा चारधाम महामार्ग, काम अभूतपूर्व गतीने सुरू आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा दिल्ली-डेहराडून द्रुतगती मार्गामुळे दिल्ली आणि डेहराडूनमधील अंतर अडीच तास असणार आहे. डेहराडून आणि पंतनगर विमानतळांच्या विस्तारामुळे हवाई संपर्क मजबूत होईल. इथले सरकार राज्यात हेली-टॅक्सी सेवा विस्तारत आहे. ऋषिकेश-कर्णप्रयाग हा रेल्वे मार्ग इथली रेल्वे जोडणी मजबूत करणार आहे. आधुनिक संपर्कव्यवस्थेमुळे केवळ जीवन सुलभ झाले नाही तर व्यवसायही सुलभ होत आहे. यामुळे कृषी असो किंवा पर्यटन, प्रत्येक क्षेत्रासाठी नव्या संधी खुल्या होत आहेत. लॉजिस्टिक्स, स्टोरेज, टूर-ट्रॅव्हल आणि आदरातिथ्य असो, येथे नवीन मार्ग तयार केले जात आहेत. आणि प्रत्येक नवीन मार्ग प्रत्येक गुंतवणूकदारासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आला आहे.
आम्ही आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम राबवला, आता आकांक्षीत तालुका कार्यक्रम राबवत आहोत. अशी गावे, असे भाग जे विकासाच्या प्रत्येक पैलूमध्ये मागे होते, त्यांना पुढे आणले जात आहे. म्हणजे प्रत्येक गुंतवणूकदारासाठी उत्तराखंडमध्ये खूप जास्त अशी वापररहित क्षमता आहे जिचा तुम्ही जास्तीत जास्त लाभ घेऊ शकता. 
मित्रहो,
डबल इंजिन सरकारच्या प्राधान्यक्रमांचा उत्तराखंडला कशा प्रकारे डबल फायदा मिळत आहे, याचे एक उदाहरण पर्यटन क्षेत्र देखील आहे. आज भारत पाहण्यासाठी, भारतीयांमध्ये आणि परदेशी नागरिक या दोघांमध्येही अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळत आहे. आम्ही संपूर्ण देशभरात थीम बेस्ड टूरिज्म सर्किट तयार करत आहोत. भारताचा निसर्ग आणि वारसा या दोघांचाही जगाला परिचय करून द्यावा, असा हा प्रयत्न आहे. या अभियानात उत्तराखंड, पर्यटनाचा एक सशक्त ब्रांड बनून उदयाला येणार आहे. येथे निसर्ग, संस्कृती, वारसा सर्व काही आहे. येथे योग, आयुर्वेद, तीर्थ, एडवेंचर स्पोर्ट्स अशा प्रत्येक प्रकारच्या शक्यता आहेत. याच शक्यतांची चाचपणी करणे आणि त्यांचे संधींमध्ये रुपांतर करणे, हा तुमच्या सारख्या सहकाऱ्यांचा प्राधान्यक्रम नक्कीच असला पाहिजे. आणि मी तर आणखी एक गोष्ट सांगेन कदाचित येथे जे लोक आले आहेत त्यांना चांगले वाटेल, वाईट वाटेल. पण या ठिकाणी काही लोक असे आहेत ज्यांच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत तर मला माझे म्हणणे पोहोचवायचे आहेच परंतु त्यांच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत देखील पोहोचवायचे आहे जे येथे नाही आहेत. विशेषतः देशातील धनिक शेठजींना, श्रीमंत लोकांना मला सांगायचे आहे.लखपती-करोडपतींना सांगायचे आहे. आपल्याकडे असे समजले जाते, सांगितले जाते, जे विवाह होतात ना, त्या जोड्या ईश्वर तयार करत असतो. ईश्वर ठरवत असतो या जोड्या. मला हेच समजत नाही जर जोड्या ईश्वर तयार करत असेल तर मग ती जोडी आपल्या जीवनाचा प्रवास ईश्वराच्या चरणी येण्याऐवजी परदेशात जाऊन का करत असते. आणि माझी तर अशी इच्छा आहे माझ्या देशातील तरुणाईने मेक इन इंडिया जशी आहे ना, तशा प्रकारची एक चळवळ राबवली पाहिजे, वेडिंग इन इंडिया. विवाह भारतात करा. जगातील इतर देशांमध्ये विवाह करायचा हे आपल्याकडील धनिक शेठजींची फॅशन झाली आहे. येथे अनेक लोक बसले असतील आता मान खाली घालून पाहात असतील. आणि माझी तर अशी इच्छा आहे, तुम्ही काही गुंतवणूक करू शकाल , न करू शकाल, सोडून द्या. असे होऊ शकते की सर्वांनाच नाही जमणार. कमीत कमी आगामी 5 वर्षात तुमच्या कुटुंबातील एक डेस्टीनेशन विवाह उत्तराखंडमध्ये करा. जर एका वर्षात पाच हजार विवाह देखील येथे होऊ लागले ना तर नव्या पायाभूत सुविधा उभ्या राहतील, जगासाठी हे खूप मोठे वेडिंग डेस्टिनेशन तयार होईल. भारताकडे इतकी ताकद आहे की एकत्रितपणे हे ठरवले की हे करायचे आहे तर ते होणारच आहे बरं का. इतके सामर्थ्य आहे. 
मित्रहो, 
बदलत्या काळात, आज भारतात देखील परिवर्तनाचे वेगवान वारे वाहात आहेत. गेल्या 10 वर्षात एका आकांक्षीत भारताची निर्मिती झाली आहे. देशाच्या लोकसंख्येचा एक खूप मोठा भाग होता जो अभावात होता, वंचित होता, तो असुविधांशी जोडलेला होता, आता मात्र तो सर्व अडचणींमधून बाहेर पडून सर्व सुविधांसोबत जोडला जाऊ लागला आहे. सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे पाच वर्षात साडे तेरा कोटींपेक्षा जास्त लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. या कोट्यवधी लोकांनी अर्थव्यवस्थेला एक नवी गती दिली आहे. आज भारतात Consumption based economy म्हणजेच उपभोग/वापर आधारित अर्थव्यवस्था अतिशय वेगाने आगेकूच करत आहे. एकीकडे आज नव मध्यमवर्ग आहे, जो गरिबीतून बाहेर पडला आहे, जो नुकताच गरिबीतून बाहेर आला आहे तो आपल्या गरजांवर जास्त खर्च करू लागला आहे. दुसरीकडे मध्यमवर्ग आहे जो आपल्या आकांक्षांच्या पूर्ततेवर, आपल्या आवडीच्या गोष्टींवर देखील जास्त खर्च करत आहे. म्हणूनच आपल्याला भारताच्या मध्यमवर्गाची क्षमता लक्षात घेतली पाहिजे. उत्तराखंडमध्ये समाजाची ही शक्ती देखील तुमच्या साठी खूप मोठी बाजारपेठ तयार करत आहे.
मित्रहो, 
हाऊस ऑफ हिमालय ब्रांड लॉन्च केल्याबद्दल मीं आज उत्तराखंड सरकारला खूप खूप शुभेच्छा देतो. हा उत्तराखंडच्या स्थानिक उत्पादनांना परदेशी बाजारपेठांमध्ये प्रस्थापित करण्याचा अतिशय अभिनव प्रयत्न आहे. हा आपली Vocal for Local आणि Local for Global ची संकल्पना आणखी बळकट करत आहे. यामुळे उत्तराखंडच्या स्थानिक उत्पादनांना परदेशी बाजारपेठांमध्ये ओळख मिळेल, नवीन स्थान मिळेल. भारतात तर प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात अशी उत्पादने आहेत जी स्थानिक आहेत, पण त्यांच्यात ग्लोबल बनण्याच्या संभावना आहेत. मी नेहमीच पाहतो की परदेशात अनेकदा मातीच्या भांड्यांना देखील विशेष बनवून सादर केले जाते, ही मातीची भांडी तिथे खूप जास्त किमतीत मिळतात. भारतात तर आपले विश्वकर्मा सहकारी अशी अनेक उत्तमोत्तम उत्पादने पारंपरिक स्वरुपात बनवत असतात. आपल्याला स्थानिक उत्पादनांचे अशा प्रकारचे महत्त्व देखील ओळखले पाहिजे आणि त्यांच्यासाठी जागतिक बाजारपेठांची चाचपणी केली पाहिजे आणि यासाठी तुम्ही हा जो हाऊस ऑफ हिमालय ब्रांड घेऊन आला आहात तो माझ्यासाठी व्यक्तिगत रूपात एक आनंदाचा विषय आहे. या ठिकाणी खूप कमी लोक असतील ज्यांना कदाचित माझ्या एका संकल्पाच्या विषयी माहीत असेल. कारण माझे काही संकल्प असे असतात, त्यामध्ये तुम्हाला थेट फायदा कदाचित दिसत नसेल पण त्यात खूप जास्त ताकद आहे. माझा एक संकल्प आहे, आगामी काळात या देशातील दोन कोटी ग्रामीण महिलांना लखपती बनवण्यासाठी मी लखपती दीदी अभियान चालवले आहे. दोन कोटी लखपती दीदी बनवणे कदाचित अवघड काम असू शकेल. पण मी मनामध्ये संकल्प केला आहे. हा जो हाऊस ऑफ हिमालय ब्रांड आहे ना त्याने माझे दोन कोटी लखपती दीदी बनवण्याचे काम आहे ना ते वेगाने पुढे जाईल आणि यासाठी देखील मी आभार मानत आहे.
मित्रांनो,
तुम्ही देखील एका व्यवसायाच्या रुपात, येथील वेगवेगळ्या जिल्ह्यातील अशी उत्पादने निवडली पाहीजेत. आपल्या भगिनींचे बचत गट असावेत, शेतकरी उत्पादक कंपन्या असाव्यात, त्यांच्या सोबतीने नव्या शक्यतांचा शोध घ्यावा. ‘ स्थानिक उत्पादनांना जागतिक बनवण्यासाठी ही एक अद्भुत भागीदारी ठरु शकते.
मित्रांनो,
यावेळी लाल किल्ल्यावरून बोलताना मी सांगितले होते की, विकसित भारताच्या निर्मितीसाठी नॅशनल कॅरेक्टर - राष्ट्रीय चरित्र सशक्त करणे गरजेचे आहे. आपण जे काही करु ते जगात सर्वश्रेष्ठ असावे. आपल्या मानकाचे जगाकडून पालन केले जावे. आपली उत्पादने शुन्य परिणाम - शुन्य दोष सिद्धांतावर आधारित असावीत. निर्यात अभिमुख उत्पादन कसे वाढेल, आपल्याला आता याकडे लक्ष केंद्रित करावे लागेल. केंद्र सरकारने पीएलआय सारखे एक महत्वाकांक्षी अभियान चालविले आहे. यामध्ये महत्वपूर्ण क्षेत्रासाठी एक प्रणाली बनवण्याचा संकल्प स्पष्ट दिसून येतो. यामध्ये तुमच्यासारख्या सोबत्यांची खूप मोठी भूमिका आहे. स्थानिक पुरवठा साखळीला, आपल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना मजबूत करण्याची ही वेळ आहे, त्यामध्ये गुंतवणूक करण्याची वेळ आहे.
आपण दुसऱ्या देशावर कमीत कमी निर्भर राहू, अशी पुरवठा साखळी आपल्याला भारतात विकसित करायची आहे. एखाद्या जागी जर एखादी वस्तू कमी किमतीत उपलब्ध असेल तर ती तिथूनच आयात करायची, या जुन्या मानसिकतेतूनही आपल्याला बाहेर पडायचे आहे. या मानसिकतेमुळे आपण खूप मोठे नुकसान झेलले आहे. तुम्ही सर्व उद्योजकांनी भारतातच क्षमता निर्मितीवर देखील तितकाच भर दिला पाहिजे. जितका भर आपण निर्यात वाढवण्यावर देत आहोत तितकेच अधिक लक्ष आपण आयात घटवण्यावरही दिले पाहिजे. आपण दरवर्षी पंधरा लाख कोटी रुपयांची पेट्रोलियम उत्पादने आयात करतो. कोळसा प्रधान देश असून देखील आपण चार लाख कोटी रुपयांचा कोळसा दरवर्षी आयात करतो. मागच्या दहा वर्षात देशात डाळी आणि तेल बियांची आयात कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. जर भारत डाळ उत्पादनाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर झाला, तर हे पैसे देशातील शेतकऱ्यांकडेच जातील.
मित्रांनो,
आज जेव्हा आपण पोषणाबाबत बोलतो, आणि मला तर हे पाहायला मिळते की जेव्हा कधी कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबात जेवणासाठी जावे तेव्हा त्यांच्या डायनिंग टेबलवर वेगवेगळ्या पदार्थांचे पॅकेट पडलेले असतात, हे पॅकेट परदेशातून आलेले असतात आणि या पॅक्ड फुडची फॅशन खूप वाढत असल्याचे मी पाहत आहे. आणि या पॅकेटवर केवळ ‘मोठ्या प्रमाणात प्रथिने’ असे लिहिले की आपल्या देशात यांचे सेवन सुरू. ‘विपुल प्रमाणात लोह’ असे लिहिले की त्याचेही भक्षण सुरू, कोणीही याची सत्यता पडताळून पाहत नाही, चौकशी करत नाही, बस! लिहीलेले दिसले आणि मेड इन आमका देश असा ठप्पा दिसला की सेवन सुरू. अरे, आपल्या देशात भरड धान्य आणि इतर प्रकारचे अनेक धान्य प्रकार आहेत जे यापेक्षा खूप अधिक प्रमाणात पोषक आहेत. आपल्या शेतकऱ्यांची मेहनत पाण्यात जायला नको. इथे उत्तराखंडमध्ये, अशाच आयुष क्षेत्राशी संबंधित, जैविक पद्धतीने उत्पादित फळे आणि भाज्यांपासून तयार उत्पादनांसाठी अनेक संधी आहेत. यामुळे शेतकरी आणि उद्योजक, या दोघांसाठीही नव्या संधीची कवाडे उघडू शकतात. पॅक्ड अन्न पदार्थांच्या बाजारपेठेतही आपल्या छोट्या कंपन्याना, आपल्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचवण्याच्या कामात मला वाटते की तुम्हा सर्वांनी आपली भूमिका निभावली पाहिजे.
मित्रांनो,
भारतासाठी, भारताच्या कंपन्यांसाठी, भारतीय गुंतवणूकदारांसाठी हा एक अभूतपूर्व काळ आहे असे मी मानतो. येत्या काही वर्षात भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे. आणि मी देशवासीयांना हा खात्री देतो की माझ्या तिसऱ्या कार्यकाळात जगातील सर्वोच्च तीन राष्ट्रांमध्ये भारताचा नक्कीच समावेश असेल. स्थिर सरकार, समर्थनात्मक धोरण प्रणाली, सुधारणेपासून परिवर्तनाची मानसिकता आणि विकसित होण्याचा आत्मविश्वास असा संयोग पहिल्यांदाच निर्माण झाला आहे. म्हणूनच मी म्हणतो की हीच वेळ आहे, योग्य वेळ आहे. ही भारताची वेळ आहे. उत्तराखंडची साथ देऊन स्वतःचा विकास करा आणि उत्तराखंडच्या विकासात देखील जरूर सहभागी व्हा असे मी आपल्याला आवाहन करतो. आणि मी नेहमीच हे सांगतो की आपल्या इथे एक समज तयार झाला आहे. पहाडी भागातील तरुणाई आणि पाणी पहाडी भागाच्या कामी येत नाही. येथील तरुणाई रोजगाराच्या शोधात स्थलांतर करते तर पाणी इतर भागात वाहून जाते. पण आता मोदीने निश्चय केला आहे की पहाडी भागातील तरुणाई पहाडाच्याच कामी येईल आणि पहाडी भागातील पाणी देखील पहाडाच्याच कामी येईल. इतक्या साऱ्या संधी पाहून मी हा संकल्प करू शकतो की आपल्या देशाचा कानाकोपरा सामर्थ्याने उभा राहू शकतो, नव्या ऊर्जेने उभा राहू शकतो. आणि म्हणूनच, तुम्ही सर्व मित्रांनी या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, या धोरणांचा फायदा घ्यावा अशी माझी इच्छा आहे. सरकार धोरणांची निर्मिती करते, ही धोरणे पारदर्शक असतात, प्रत्येकासाठी खुली असतात. ज्याच्यामध्ये क्षमता आहे त्याने मैदानात उतरावे आणि या धोरणांचा लाभ घ्यावा. आणि मी तुम्हाला खात्री देतो की जे आश्वासन आम्ही देतो त्याच्या पूर्ततेसाठी सज्ज उभे राहतो. तुम्ही सर्वजण या महत्त्वपूर्ण प्रसंगी उपस्थित राहिलात, उत्तराखंडचा माझ्यावर विशेष अधिकार आहे आणि जसे अनेकांनी सांगितले की माझ्या जीवनाचा एक पैलू तयार करण्यात या भूमीचे खूप मोठे योगदान आहे. हे ऋण फेडण्याची जर कुठली संधी मिळत असेल तर त्याचा आनंद काही औरच असतो. आणि म्हणूनच मी आपल्याला निमंत्रित करतो की या आणि या पवित्र भूमीची माती मस्तकी लावून प्रगतीचा मार्ग धरा. आपल्या विकास यात्रेत कधीही कोणताही अडथळा येणार नाही, हा या भूमीचा आशीर्वाद आहे. खूप खूप धन्यवाद. खूप सार्‍या शुभेच्छा! 
***
JPS/RA/SP/SM/DY
 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1984369) Visitor Counter : 61