गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी झारखंडमधील हजारीबाग येथे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 59 व्या स्थापना दिना निमित्त आयोजित समारंभाला संबोधित केले


देशाच्या सीमांचे रक्षण करणारे शूर सैनिक हाच देशाच्या विकासाचा पाया असल्याचे केंद्रीय मंत्री अमीत शाह यांचे गौरवोद्गार

पाकिस्तान आणि बांगलादेश बरोबरची संपूर्ण सीमा येत्या दोन वर्षांत कुंपण घालून सुरक्षित केली जाणार: गृह मंत्री अमित शाह

Posted On: 01 DEC 2023 4:03PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आज झारखंडमधील हजारीबाग येथे सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) 59 व्या स्थापना दिना निमित्त आयोजित समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले आणि उपस्थितांना त्यांनी संबोधित केले. अमित शाह यांनी यावेळी बॉर्डरमॅन’, या बीएसएफच्या वार्षिक मासिकाचे प्रकाशनही केले. यावेळी सीमा सुरक्षा दलाच्या महासंचालकांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, “जीवन पर्यन्त कर्तव्यही केवळ बीएसएफची घोषणाच नसून, आतापर्यंत 1,900 पेक्षा जास्त सीमा प्रहरींनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देऊन हे ब्रीद वाक्य पूर्ण केले आहे. ते म्हणाले की, लाखो सीमा प्रहरींनी त्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ अत्यंत कठीण परिस्थितीत कुटुंबापासून दूर राहून घालवला आहे.

ते म्हणाले की, देशाच्या सीमांचे रक्षण करणारी पहिली फळी म्हणून, बीएसएफने ज्या प्रकारे देशाच्या दुर्गम भागातील सीमा सुरक्षित केल्या आहेत, त्याबद्दल, सीमा सुरक्षा दलाच्या या शूर जवानांचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी देशाच्या एका सीमेवर एक सुरक्षा दल तैनात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. ते म्हणाले की, या निर्णयानुसार पाकिस्तान आणि बांग्लादेश बरोबरच्या अतिदुर्गम सीमांच्या रक्षणाची जबाबदारी सीमा सुरक्षा दलावर सोपवण्यात आली होती, आणि बीएसएफने ही जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली आहे. ते म्हणाले की, जम्मू-काश्मीरमधील बर्फाच्छादित प्रदेश असो, की ईशान्येकडील विशाल पर्वत रांगा, गुजरात आणि राजस्थानचे वाळवंट असो, गुजरातचा दलदलीचा प्रदेश असोकिंवा सुंदरबन आणि झारखंडचे घनदाट जंगल असो, बीएसएफने सदैव सतर्क राहून शत्रूचे दुष्ट हेतू हाणून पाडले आहेत. सीमा सुरक्षा दलाने संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्येही आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा आणि शौर्याचे नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. ज्या देशाच्या सीमा सुरक्षित नाहीत तो देश कधीच विकसित आणि समृद्ध होऊ शकत नाही, असे शाह म्हणाले.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे, आणि हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आपल्या शूर सैनिकांचा त्याग, समर्पण आणि शौर्याने देशाच्या सीमा सुरक्षित असतील.---------------------------------------- देशाच्या सीमांचे रक्षण करणारे शूर सैनिक हे देशाच्या विकासाचा भक्कम पाया आहेत असे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री शाह यांनी सांगितले की, सीमा सुरक्षा दलाचे शिपाई केवळ देशाच्या सीमांचे रक्षण करत नाहीत तर ते देशातील युवकांना शिस्तपालनाचा संदेश देखील देत असतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षांत देशाच्या सीमेवर 560 किलोमीटरचे कुंपण उभारुन घुसखोरी तसेच तस्करीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. येत्या दोन वर्षांच्या काळात पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या बाजूंच्या सीमा कुंपण घालून संपूर्णपणे सुरक्षित करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशाच्या 1100 किलोमीटरच्या सीमेवर फ्लडलाईट्स बसवण्यात आले असून 542 नव्या सीमावर्ती चौक्या तसेच 510 टेहळणी चौकी मनोरे उभारण्यात आले आहेत तसेच हरामी नाला भागात पहिल्यांदाच टेहळणी मनोऱ्याची उभारणी करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. सीमेवरील 637 चौक्यांना वीजपुरवठा सुरु करण्यात आला असून सुमारे 500 ठिकाणी पाणीपुरवठ्याची सोय करून देण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. याबरोबरच, सीमेवर पहारा देणाऱ्या सैनिकांची सोय व्हावी म्हणून 472 ठिकाणी सौर उर्जा संयंत्रे बसवण्यात आली आहेत अशी माहिती केंद्रीय मंत्र्यांनी दिली.

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की आपला देश डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादापासून संपूर्णपणे मुक्त असेल तो दिवस आता फार दूर नाही आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 10 वर्षांत या दिशेने सातत्याने प्रयत्न केले आहेत. मोदी सरकारच्या या प्रयत्नांचा परिणाम म्हणून या विचारसरणीशी संबंधित  हिंसेच्या घटना 52 टक्क्यांनी कमी झाल्या, अशा घटनांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण 70 टक्क्यांनी कमी झाले तर  डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादामुळे प्रभावित जिल्ह्यांची संख्या 96 वरुन कमी होऊन 45 झाली आहे अशी माहिती त्यांनी दिली. केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की आता डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादी वृत्तीचा अधिकाधिक संकोच होत आहे आणि आता केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल तसेच भारत-तिबेट सीमा पोलीस दल नवे धैर्य आणि नव्या धडाडीने या विचारसरणीवर अंतिम प्रहार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ते म्हणाले की, येत्या काही दिवसांत देशाला डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादापासून संपूर्णपणे मुक्त करण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध आहे. सुरक्षा विषयक पोकळी भरून काढण्यासाठी या भागांमध्ये 199 नव्या चौक्या सुरु करण्यात आल्या आहेत. नव्या चौक्या उभारून आणि गस्तीचे प्रमाण वाढवून डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादाचे सर्व स्रोत नियंत्रित करण्यात आले आहेत आणि याचा परिणाम म्हणून बुढा पहाड आणि चकरबंद यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना डाव्या विचारसरणीच्या कट्टरवादापासून संपूर्णपणे मुक्त करण्यात आपल्याला यश लाभले आहे. कोल्हन आणि झारखंडमधील काही भागात या विचारसरणीविरुद्धचा निर्णायक लढा अजूनही सुरूच असून आम्ही त्यात नक्कीच विजयी ठरू असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यावेळी व्यक्त केला.

***

S.Patil/R.Agashe/S.Chitnis/P.Kor

 

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1981641) Visitor Counter : 136