सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
नशा मुक्त भारत अभियान - सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग आणि इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन ) यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी
सामंजस्य करार नशा मुक्त भारत अभियानचा संदेश सर्वांपर्यंत विशेषत: युवक , महिला आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यास मदत करेल: केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ वीरेंद्र कुमार
3.37 कोटींहून अधिक युवक , 2.26 कोटी महिला आणि 3.27 लाख शैक्षणिक संस्थांसह 10.71 कोटींहून अधिक लोक नशामुक्त भारत अभियानाचा भाग बनले आहेत: डॉ. वीरेंद्र कुमार
Posted On:
23 NOV 2023 6:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2023
सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागाने केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि इस्कॉनचे वरिष्ठ सदस्य यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्लीत नशा मुक्त भारत अभियानसाठी इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना (इस्कॉन) सोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार म्हणाले की, नशामुक्त भारत अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यासाठी धार्मिक/आध्यात्मिक संघटनांच्या सहकार्यामुळे अंमली पदार्थांप्रति सतर्क भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यास चालना मिळेल.
इस्कॉनसोबतच्या या सामंजस्य करारामुळे युवक , महिला, विद्यार्थी इत्यादींमध्ये नशामुक्त भारत अभियानाचा संदेश पोहोचवण्यास मदत होईल असे ते म्हणाले.
डॉ वीरेंद्र कुमार यांनी इस्कॉनला त्यांच्या सर्व बैठका आणि संमेलनांमध्ये नशामुक्त भारत अभियानाचा प्रचार करण्यास सांगितले. डॉ वीरेंद्र कुमार म्हणाले, आमचे मंत्रालय देशभरातील 550 हून अधिक स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून योग्य उपचार, प्रसिद्धी, समाजापर्यंत पोहोचणे आणि त्यांना जागरूक करण्यासाठी सातत्याने कार्यक्रम आयोजित करत आहे.
आमच्या मंत्रालयाने नवचेतना मॉड्यूल विकसित केले आहे, जे भारतातील शालेय विद्यार्थ्यांना जीवन कौशल्ये आणि अंमली पदार्थांचे सेवन न करण्यासंदर्भात जागरूक बनवतील आणि शिक्षित करतील, असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश केवळ शालेय मुलांमधील अंमली पदार्थ सेवनाचे प्रमाण कमी करणे हे नाही तर ते कायमचे थांबवणे हा आहे. त्याचबरोबर, नवचेतनवरील प्रशिक्षण सामग्रीचा 12 प्रादेशिक भाषांमध्ये अनुवाद केला जात आहे. शिक्षकांना मदत करण्यासाठी प्रत्येक मॉड्यूल दीक्षा पोर्टलवर ऑनलाइन अपलोडिंग साठी देखील उपलब्ध असेल, असे कुमार यांनी सांगितले.
मंत्रालयाने नवचेतना मॉड्यूलच्या माध्यमातून एका वर्षात देशातील 300 जिल्हे, 30,000 शाळा, 10 लाख शिक्षक आणि 2.4 कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. हे मॉड्यूल नशामुक्त भारत अभियानाच्या (एनएमबीए ) वाटचालीत मोठा बदल घडवून आणणारे ठरेल, असे डॉ. कुमार यांनी सांगितले.
तरुणांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने देशाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या मंत्रालयाने महत्त्वाकांक्षी नशा मुक्त भारत अभियानाची अंमलबजावणी सुरु केली आहे. यामध्ये उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था, विद्यापीठांचे परिसर तसेच शाळांचे परिसर यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. आतापर्यंत, 3.37 कोटी युवक, 2,26 कोटींहून अधिक स्त्रिया यांच्यासह 10.71 कोटी लोक आणि 3.27 लाखाहून अधिक शिक्षण संस्था नशा मुक्त भारत अभियानात सहभागी झाल्या आहेत.
अभियानातील आतापर्यंतची कामगिरी
a. आतापर्यंत प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळावर हाती घेतलेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून 10.71 कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे.
b. 8,000 तज्ञ स्वयंसेवकांची निवड करून त्यांना एनएमबीए जिल्ह्यांमध्ये अभियानाचे नेतृत्व करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
c. अभियानाच्या विविध कार्यक्रमांमध्ये 3.37 कोटींहून अधिक युवकांनी भाग घेतला असून ते त्यांच्या क्षेत्रात अंमली पदार्थ विरोधी जागृती करत आहेत. 4000 पेक्षा जास्त युवा मंडळे, एनवायकेएस आणि एनएसएस स्वयंसेवक आणि युथ क्लब्स देखील या अभियानाशी जोडले गेले आहेत.
d. अंगणवाडी आणि आशा ताई, एएनएमएस, महिला मंडळे आणि महिला बचत गटांच्या माध्यमातून काम करणाऱ्या 2.26 कोटींहून अधिक स्त्रिया समाजाच्या मोठ्या भागापर्यंत पोहोचून अभियानाचा संदेश देत आहेत.
e. फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या मंचांवर हँडल्स सुरु करून तसेच त्यावर रोजच्या ताज्या घडामोडी अपडेट करून या अभियानाची माहिती ऑनलाईन पद्धतीने पसरवण्यासाठी तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमे यांचा परिणामकारकरीत्या वापर करण्यात येत आहे.
f. अँड्रॉईड प्रणालीवर आधारित मोबाईल अॅप्लिकेशन विकसित करून जिल्हा आणि तज्ञ स्वयंसेवकांच्या मदतीने प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या ठिकाणी होणाऱ्या घडामोडींची माहिती वास्तव वेळेत अपलोड करून लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
g. सामान्य जनतेला सुलभतेने वापरता याव्या म्हणून व्यसनमुक्तीच्या सर्व सुविधांना जिओटॅग करण्यात आले आहे.
S.Kakade/Sushama/Sanjana/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979202)
Visitor Counter : 300