अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय
विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023 द्वारे उद्योग सहकार्य आणि गुंतवणुकीला चालना: एक उत्तुंग यश
Posted On:
06 NOV 2023 2:41PM by PIB Mumbai
अन्न प्रक्रिया उद्योजकता मंत्रालयाने आयोजित केलेल्या 'विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023' कार्यक्रमाचा समारोप 5 नोव्हेंबर रोजी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. समारोप सत्रात कार्यक्रमाच्या उत्तुंग यशाचा उल्लेख करताना राष्ट्रपतींनी भारताचा वैविध्यपूर्ण पाककला वारसा उलगडून दाखवण्यात आणि विविध उद्योगांमध्ये मजबूत भागीदारी वाढवण्यात या कार्यक्रमाची महत्वपूर्ण भूमिका विशद केली. वैश्विक पाककला केंद्र म्हणून देशाच्या क्षमतेवर त्यांनी भर दिला आणि जागतिक उपासमारीचा सामना करण्यासाठी खाद्यान्न वितरण वाढविण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन 3 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक लाखाहून अधिक स्वयंसहायता गटातील सदस्यांना बीज भांडवल सहाय्य वाटपाद्वारे करण्यात आले. भारताला 'विश्व खाद्य बास्केट' म्हणून सादर करण्याच्या आणि 2023 हे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे करण्याच्या कार्यक्रमाच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला. तंत्रज्ञान आणि स्टार्टअप दालन आणि खाऊ गल्लीचे कौतुक करून पंतप्रधानांनी भविष्यातील अर्थव्यवस्थेला आकार देण्यासाठी त्यांच्या भूमिकेवर जोर दिला. अन्न प्रक्रिया क्षेत्राला 'सनराईज क्षेत्र' म्हणून निवडून, नऊ वर्षांत 50,000 कोटी रुपयांहून अधिक थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मत्स्यपालन आणि पशुसंवर्धनासाठी प्रक्रिया पायाभूत सुविधांमध्ये हजारो कोटींच्या गुंतवणुकीवर भर देत त्यांनी पीएलआय योजना आणि कृषी-पायाभूत सुविधा निधी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांचा परिणाम अधोरेखित केला.
भारत सरकारची दहा मंत्रालये/विभाग, सहा कमोडिटी बोर्ड आणि 25 राज्यांच्या सहकार्याने आयोजित भव्य खाद्य महोत्सवाने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत हितधारकांचे लक्ष वेधून घेतले. या कार्यक्रमात 1208 प्रदर्शक, 14 देशाची दालने आणि 715 आंतरराष्ट्रीय खरेदीदार, 218 देशांतर्गत खरेदीदार आणि 97 कॉर्पोरेट लीडर्सचा उल्लेखनीय सहभाग होता. सात प्रदर्शन हॉलमध्ये 50,000 चौरस मीटरच्या विस्तृत क्षेत्रामध्ये पसरलेल्या या कार्यक्रमाने अन्न प्रक्रिया उद्योगातील अद्ययावत प्रगती दाखवण्यासाठी एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या कार्यक्रमात सात मंत्रिस्तरीय शिष्टमंडळांसह 14 देशांची शिष्टमंडळे सहभागी झाली होती. भागीदार देश म्हणून नेदरलँड्स आणि लक्ष्यीत देश म्हणून जपानच्या लक्षणीय सहभागामुळे कार्यक्रमाचे जागतिक आवाहन आणखी मजबूत झाले.
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री पशुपती कुमार पारस आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या सह-अध्यक्षतेने विश्व भारतीय खाद्य महोत्सव 2023 च्या उद्घाटनाच्या दिवशी एक प्रतिष्ठित सीईओ गोलमेज बैठक झाली. या महत्त्वपूर्ण मेळाव्याने अन्न प्रक्रिया आणि संबंधित क्षेत्रातील 70 हून अधिक आघाडीच्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एकत्र आणले.
गोलमेज परिषदे दरम्यानच्या प्रमुख चर्चांमध्ये व्यवसाय परिचालन , गुंतवणूक धोरणे, कच्चा माल संबंधी हितसंबंध आणि भारतीय अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या मूल्य साखळीतील विद्यमान तफावतीचे व्यापक परीक्षण समाविष्ट होते.
या परिषदे दरम्यान, पशुपती कुमार पारस यांनी सहा जी20 बैठकांमध्ये सहभाग घेतला. अन्न प्रक्रिया क्षेत्रातील जागतिक भागीदारीवर भर देत त्यांनी फिजी, मॉरिशसच्या मंत्र्यांशी चर्चा केली. त्यांनी यावेळी ग्रीस आणि लेबनॉनमधील मान्यवरांशी चर्चा केली आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी कार्यक्रमांच्या वचनबद्धतेवर प्रकाश टाकला. मॉरिशसमधील कृषी-उद्योग आणि अन्न सुरक्षा मंत्री आणि ऑस्ट्रेलियातील संसद सदस्य यांच्यासोबत झालेल्या चर्चेने कार्यक्रमाच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात आली आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर भर देण्यात आला.
तीन दिवसीय कार्यक्रमात संकल्पना आधारित, राज्य, सहयोगी मंत्रालये आणि देश आणि संघटना अशा 48 सत्रांचा समावेश होता. 16 संकल्पना आधारित सत्रांमध्ये आर्थिक सक्षमीकरण, गुणवत्ता हमी, यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानातील नवोन्मेष , ई-वाणिज्य आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील लॉजिस्टिक्स यासारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. याशिवाय, 12 राज्य-केंद्रित पॅनल चर्चा आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाह सहयोगी मंत्रालयांद्वारे संबंधित उद्योग आव्हानांवर मात करण्याच्या दृष्टीने 11 विशेष सत्रे आयोजित करण्यात आली होती. या सत्रांमध्ये गुजरात, केरळ आणि आंध्र प्रदेशमधील मंत्र्यांनी भाग घेतला.
या परिषदेत नेदरलँड्स आणि जपानच्या वतीने माहितीची देवाणघेवाण आणि सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी माहिती सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. याव्यतिरिक्त, नेदरलँड्स, अमेरिका - भारत धोरणात्मक भागीदारी मंच , ब्राझील आणि संयुक्त अरब अमिराती सोबतच्या यशस्वी केंद्रित बैठकांमध्ये भारताच्या अन्न प्रक्रिया क्षेत्रातील विकासाच्या संधी अधोरेखित करण्यात आल्या.
तंत्रज्ञान आणि शाश्वततेवर आधारित दालनाचा या कार्यक्रमाच्या ठळक वैशिष्ट्यांमध्ये समावेश होता. या दालनाच्या माध्यमातून, अधिक पर्यावरण स्नेही आणि लवचिक अन्न उत्पादन पद्धतींकडे वळण्याचा संकेत देणाऱ्या खाद्य उद्योगातील अत्याधुनिक नवोन्मेषावर प्रकाश टाकण्यात आला. ख्यातनाम शेफ रणवीर ब्रार यांनी सादर केलेला अनुभवांवर आधारित फूड स्ट्रीट हा भारताच्या समृद्ध पाककलेचा वारसा आणि वैविध्यपूर्ण प्रादेशिक पाककृतींचा विलक्षण अनुभव देणारे एक आनंददायक आकर्षण ठरले. शेफ सारा टॉड आणि शेफ कुणाल कपूर यांसारख्या प्रसिद्ध 200 शेफ्सनी स्वयंपाकाची प्रात्यक्षिके आयोजित करून सहभाग घेतला. या महोत्सवात आयसीसी 23, एक आंतरराष्ट्रीय पाककला स्पर्धा, भरडधान्यांपासून तयार केलेले पदार्थ आणि पास्ता बनवून दाखवणे यांसारख्या श्रेणींमध्ये उत्कृष्टतेचा गौरव करणारा मास्टरक्लास आणि पुरस्कार समारंभ देखील आयोजित करण्यात आला होता .
भरीव गुंतवणूक करारांसह या कार्यक्रमाचा समारोप झाला. 33,129 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी झाल्यामुळे भारताच्या अन्न प्रक्रिया क्षेत्राला चालना देण्यावर या परिषदेचा महत्त्वपूर्ण परिणाम अधोरेखित झाला. करारावर स्वाक्षऱ्या करणाऱ्यांमध्ये अमूल ,आयटीसी , मोंडेलेझ, केलॉग्स , एबी इंबेव्ह , आयबी समूह , बालाजी वेफर्स, आनंदा डेअरी, फर्टिस आणि बिकानेरवाला यांसारख्या कंपन्यांचा समावेश होता. या परिषदे दरम्यान ,आयोजित 15200 हून अधिक बी 2बी आणि बी 2जी बैठकांनी अर्थपूर्ण संवाद आणि भागीदारी वाढवली,यामुळे माहितीची देवाणघेवाण आणि उद्योग वाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले.
***
S.Patil/V.Joshi/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1975048)
Visitor Counter : 159