ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारतर्फे एनसीसीएफ, नाफेड,केंद्रीय भांडार  तसेच राज्य सहकारी संस्थांच्या माध्यमातून 25 रुपये किलो दराने कांदाविक्रीची धडाक्याने सुरुवात


केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने ई-विक्री, ई-नाम लिलाव आणि घाऊक विक्रीच्या माध्यमातून विकण्यासाठी 5.06 लाख टन कांदा खरेदी केला

Posted On: 04 NOV 2023 2:04PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली 04 नोव्हेंबर 2023 

खरीपाचा कांदा बाजारात येण्यास उशीर होत असल्याकारणाने बाजारात गेल्या काही काळात कांद्याच्या दरात होत असलेल्या वाढीपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सरकारने राखीव साठ्यातील कांद्याची 25 रुपये किलो या अनुदानित दराने किरकोळ विक्री करण्यास धडाक्याने सुरुवात केली आहे.देशांतर्गत ग्राहकांसाठी कांद्याची उपलब्धता आणि किफायतशीरपणा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने सरकारने 29 ऑक्टोबर 2023 पासून कांद्याचे किमान निर्यात मूल्य  800 अमेरिकी डॉलर्स प्रती मेट्रिक टन ठेवणे, राखीव साठ्यामध्ये 2 लाख टन कांद्याची भर, 5.06 लाख टन कांद्याची याआधीच केलेली खरेदी आणि किरकोळ विक्री, ई-नाम लिलाव तसेच  ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून घाऊक बाजारात सुरु केलेली मोठ्या प्रमाणातील विक्री असे उपक्रम याआधीच राबवण्यास सुरुवात केली आहे.

केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाने एनसीसीएफ तर्फे संचालित किरकोळ विक्री दुकाने आणि मोबाईल व्हॅन, नाफेड, केंद्रीय भांडार आणि इतर राज्य नियंत्रित सहकारी संस्थांच्या माध्यमातून 25 रुपये किलो दराने कांद्याची जोमदार विक्री सुरु केली आहे. नाफेडने 2 नोव्हेंबर पर्यंत देशाच्या 21 राज्यांतील 55 शहरांमध्ये दुकाने आणि मोबाईल व्हॅन यांचा समावेश असलेली 329 किरकोळ विक्री केंद्रे उभारली आहे. त्याचप्रमाणे, एनसीसीएफने 20 राज्यांतील 54 शहरांमध्ये 457 किरकोळ विक्री केंद्रे स्थापन केली आहेत. त्याच धर्तीवर, केंद्रीय भांडारतर्फे देखील 3 नोव्हेंबर 2023 पासून त्यांच्या किरकोळ विक्री केंद्रांमध्ये कांद्याची किरकोळ विक्री सुरु केली आहे तर सफल मदर डेरी देखील या आठवड्याच्या शेवटी कांदा विक्रीला सुरुवात करणार आहे. 

रबी आणि खरीप पिकांच्या दरम्यान कांद्याच्या दरातील हंगामी चढउतारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नंतर योग्य वेळी आणि लक्ष्यित पद्धतीने कांदा विक्रीसाठी काढता यावा म्हणून केंद्रसरकार रबी कांद्याची खरेदी करून त्याचा राखीव साठा ठेवत असते. या वर्षी कांद्याचा राखीव साठा 7 लाख मेट्रिक टन पर्यंत वाढवण्यात आला. वर्ष 2022-23 मध्ये हा साठा केवळ अडीच लाख मेट्रिक टन इतका होता. आतापर्यंत 5.06 लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली असून 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीची प्रक्रिया सुरु आहे.

सरकारच्या सक्रिय उपाययोजनांचा परिणाम आता दिसू लागला असून  28 ऑक्टोबर 2023 रोजी लासलगाव बाजारात 4,800 रुपये क्विंटल पर्यंत पोहोचलेला कांद्याचा भाव आता 24 टक्क्याच्या घसरणीसह 3,650 रुपये क्विंटल झाला आहे. येत्या आठवड्यामध्ये कांद्याचे  किरकोळ बाजारातले दरही खाली येतील  अशी अपेक्षा आहे.

बहुतांश भारतीय घरांमध्ये डाळी हा पोषणाचा महत्त्वाचा स्त्रोत मानला जातो. सर्वसामान्यांसाठी किफायतशीरडाळींची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सरकारने एक किलोच्या पॅकसाठी 60 रुपये प्रतिकिलो तर 30 किलोच्या पॅकसाठी 55 रुपये किलो असे अनुदानित दर असलेल्या भारत डाळ या उपक्रमाची सुरुवात केली.नाफेड, एनसीसीएफ, केंद्रीय भांडार, सफल आणि तेलंगणा तसेच महाराष्ट्र या राज्यांतील राज्य सरकार नियंत्रित सहकारी संस्थांच्या माध्यमातून सामान्य नागरिक, लष्कर, सीएपीएफ आणि कल्याणकारी योजनांसाठी भारत डाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे.

येत्या काही दिवसांमध्ये भारत डाळीचा पुरवठा वाढवण्यात येणार असून त्यामुळे संपूर्ण देशातील ग्राहकांसाठी 4 लाख टनांहून अधिक भारत डाळ उपलब्ध होणार आहे.

***

N.Chitale/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1974702) Visitor Counter : 158