पंतप्रधान कार्यालय
गुजरातमधल्या मेहसाणा इथे विविध विकास कामांचा प्रारंभ करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन
Posted On:
30 OCT 2023 11:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर 2023
भारत माता की जय,
भारत माता की जय,
काय झाले, इतक्या मोठ्याने जयघोष करा की आपला आवाज अंबाजी यांच्यापर्यंत पोहोचेल.
भारत माता की जय,
भारत माता की जय,
व्यासपीठावर उपस्थित गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्रीमान भूपेन्द्र भाई, इतर मंत्री वर्ग, संसदेतले माझे सहकारी आणि गुजरात भाजपाचे अध्यक्ष भाई सी.आर.पाटील, इतर खासदार आणि आमदार वर्ग,तालुका पंचायत आणि जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने येथे आलेले माझे प्रिय गुजरातचे कुटुंबीय,
आपला खाखरिया टप्पा कसा आहे? सर्वप्रथम मी गुजरातचे मुख्यमंत्री जी आणि सरकारचा आभारी आहे की आपणा सर्वांना भेटण्याची संधी मला प्राप्त झाली आहे. शालेय जीवनातल्या अनेक मित्रांचे चेहरे मला दिसत होते, माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण होता. आपणा सर्वांना प्रत्यक्ष भेटून घरी आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. ज्या भूमीने आणि ज्या लोकांनी मला घडवले त्यांचे ऋण स्वीकारण्याची मला जेव्हा संधी मिळते, मनाला आनंद होतो. म्हणूनच आजची ही भेट म्हणजे माझ्यासाठी ऋण स्वीकारण्याची संधी आहे. आज 30 ऑक्टोबर आणि उद्या 31 ऑक्टोबर, आपणा सर्वांसाठी हे दोन्ही दिवस प्रेरणादायी दिवस आहेत. स्वातंत्र्य लढ्यात आदिवासींचे नेतृत्व करत इंग्रजांना सळो की पळो करून सोडणारे गोविंद गुरुजी यांची आज पुण्यतिथी आहे आणि उद्या सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. आपल्या पीढीने जगातला सर्वात उंच स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारून सरदार साहेबांप्रती खऱ्या अर्थाने सर्वोच्च आदर व्यक्त केला आहे. भावी पीढी सरदार साहेबांचा पुतळा पाहील तेव्हा त्यांची मान अभिमानाने उंचावेल. सरदार साहेबांच्या चरणाशी उभी राहिलेली व्यक्ती मान उंचावेल, मान खाली घालणार नाही, असे काम इथे झाले आहे. गुरु गोविंदजी यांचे अवघे जीवन भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्यात आणि आदिवासी समाजाच्या सेवेत व्यतीत झाले. सेवा आणि राष्ट्रभक्ती इतकी प्रखर होती की बलिदान करणाऱ्यांची परंपरा निर्माण केली आणि स्वतः बलिदानाचे प्रतिक बनले. गुरु गोविंद जी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ माझ्या सरकारने काही वर्षांपूर्वीपासून मध्य प्रदेश-गुजरात मधल्या मानगढ धाम आदिवासी भागात या कार्यक्रमाची सुरूवात केली होती. हा कार्यक्रम आता राष्ट्रीय स्तरावर मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो, याचा मला आनंद आहे.
माझ्या प्रिय कुटुंबीयांनो,
येथे येण्यापूर्वी अंबा मातेच्या चरणी आशीर्वाद घेण्याची संधी मला मिळाली, अंबा मातेचे तेज, अंबा मातेचे सुशोभित स्थान पाहून मला आनंद झाला. गेल्या आठवड्यात आपण साफ-सफाईचे काम केले असे ऐकले. खेरालु म्हणा की अंबाजी म्हणा, येथे स्वच्छता अभियानाचे आपण जे काम केले त्यासाठी मी आपले आणि सरकारमधल्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. अंबा मातेचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव कायम राहू दे, गब्बर पर्वताचा येथे जो विकास होत आहे, जी भव्यता दिसून येत आहे, काल मन की बात मध्येही मी याचा उल्लेख केला होता. खरोखरच अभूतपूर्व कार्य होत आहे. अंबे मातेचा आशीर्वाद आणि त्या बरोबरच आज सुमारे 6 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली आहे. हे सर्व प्रकल्प शेतकऱ्यांच्या कल्याणाला बळकटी देणार आहेत. संपूर्ण उत्तर गुजरातच्या विकासासाठी, देशासमवेत जोडण्यासाठी कनेक्टिव्हिटीचा उत्तम उपयोग आहे. आपल्या मेहसाणाच्या आजूबाजूला जे जिल्हे आहेत, पाटण असो, बनासकांठा असो, साबरकांठा असो, महिसागर, खेडा, अहमदाबाद, गांधीनगर असो हा विकासकामांचा खजिना आहे. इथल्या लोकांच्या सुखकर जीवनासाठीच्या वेगवान कामांचा थेट लाभ या भागाच्या विकासाला मिळणार आहे. विकास कामांसाठी गुजरातच्या लोकांचे खूप-खूप अभिनंदन करू इच्छितो.
माझ्या प्रिय कुटुंबीयांनो,
भारतातल्या विकासाची आज संपूर्ण जगात चर्चा होत आहे. होत आहे की नाही, जरा मोठ्याने बोला. आपण पाहिले असेल नुकतेच आपल्या भारताने चंद्रावर चंद्रयान पोहोचवले आहे. गावातल्या कधी शाळेतही न गेलेल्या 80-90 वर्षांच्या माणसालाही वाटतं की भारताने खूप मोठे काम केले आहे, भारत आता चंद्रावर पोहोचला आहे. जगातील कोणताच देश अद्याप तिथे पोहोचू शकलेला नाही, जिथे भारत पोहोचला. जी-20 ची जगभरात कदाचित इतकी चर्चा झाली नसेल जितकी भारतामुळे जी-20 ची चर्चा झाली. जी-20 माहीत नाही अशी कोणतीही व्यक्ती नसेल. क्रिकेटमध्ये 20-20 बाबत माहीत नसेल पण जी-20 ची माहिती असेल असे वातावरण निर्माण झाले. जी-20 मध्ये जगभरातले नेते भारताच्या कानाकोपऱ्यात गेले आणि समारोपाला दिल्लीमध्ये भारताचे वैभव आणि भारताच्या लोकांची क्षमता पाहिली, मित्रांनो, जग चकित झाले, जगभरातल्या नेत्यांमध्ये भारताबाबत कुतूहल जागृत झाले. भारताचे सामर्थ्य आणि क्षमतेचे दर्शन अवघ्या जगाला घडत आहे. भारतात आज एकाहून एक सरस अशा आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती होत आहे. रस्ते असोत, रेल्वे असो किंवा विमानतळ, आज भारताच्या कानाकोपऱ्यात, गुजरातच्या कानाकोपऱ्यात जितकी गुंतवणूक होत आहे पूर्वीच्या काळात याचा मागमूसही नव्हता मित्रांनो. आज इतक्या मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत,बंधू-भगिनींनो, आपण एक गोष्ट नक्कीच जाणता, जी मोठ-मोठी विकास कामे होत आहेत, धाडसी निर्णय घेतले जात आहेत आणि गुजरात ज्या वेगाने प्रगती करत आहे त्यामध्ये मागील काळात बळकट कार्य करण्यात आले आहे. आज पंतप्रधान आले आहेत, असे आपल्याला वाटले नसेल तर आपले नरेंद्रभाई आले आहेत, असे आपल्याला वाटले असेल. यापेक्षा आणखी चांगले काय असेल? या नरेंद्रईंना तुम्ही ओळखताच, की एकदा त्यांनी संकल्प घेतला की ते, तो पूर्णत्वाला नेणारच. आपण सर्व जण मला जाणताच. आज देशात जो झपाट्याने विकास होत आहे, आज जगभरात भारताचा डंका वाजत आहे, चर्चा होत आहे त्याच्या मागे कोणते सामर्थ्य आहे, या देशाच्या कोट्यवधी जनतेची ताकद आहे, ज्यांनी देशामध्ये स्थिर सरकारला कौल दिला. आपल्याला गुजरातचा अनुभव आहे. गुजरातमध्ये प्रदीर्घ काळ स्थिर सरकार असल्याने, पूर्ण बहुमत असलेले सरकार असल्याने आम्ही एकामागोमाग एक असे निर्णय घेऊ शकलो आणि त्याचा लाभही गुजरातला झाला आहे. जिथे संसाधनांची टंचाई आहे, तिथे आपली मुलगी लग्न करून पाठवायची असेल तर 100 वेळा विचार केला जातो. पाण्याच्या टंचाईने ग्रस्त असलेला हा भाग आज विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहे. त्यामागे हे सामर्थ्य आहे. एक काळ होता, एकच डेअरी, त्याशिवाय आमच्याकडे काहीच नव्हते. आज आपल्या चहू बाजूंना विकासाची नव-नवी क्षेत्रे आहेत. त्या काळात पिण्याच्या पाण्याची समस्या होती. सिंचनाद्वारे पाणीही नव्हते. जवळजवळ संपूर्ण उत्तर गुजरातचा मोठा भाग डार्क झोनमध्ये होता. पाणीही खोल गेले होते, हजार-बाराशे फुटाखाली कूपनलिकाही बंद पडतील, अशी स्थिती होती. वारंवार कूपनलिका घालावी लागत असे आणि वारंवार मोटारही बिघडत असे. अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असे, आता या सर्व समस्यांवर मात करून आपण बाहेर आलो आहोत.
शेतकरी पूर्वी फार कष्टाने एक पीक घेत असत. आज दोन-दोन, तीन-तीनची हमी मिळाली आहे मित्रांनो. अशा परिस्थितीत आम्ही उत्तर गुजरातचे जीवन बदलण्याचा संकल्प केला. उत्तर गुजरातला नवसंजीवनी देऊ, नदीचा विस्तार करु आणि आदिवासी भागाला नवसंजीवनी देऊ. त्यात एक महत्त्वाची गोष्ट करण्यात आली, संपर्क व्यवस्थेवर भर देण्यात आला. पाणीपुरवठा असो, पाटबंधारे असो, त्यावर भर दिला गेला. शेतीच्या विकासासाठी पूर्ण ताकद लावली. त्यामुळे आता गुजरात हळूहळू औद्योगिक विकासाकडे वाटचाल करत आहे. उत्तर गुजरातमधील लोकांना इथे रोजगार मिळावा हा आमचा उद्देश होता. नाहीतर मी शिकत असताना गावातल्या कुणाला विचारलं की तुम्ही काय करता तर ते म्हणत मी शिक्षक आहे. कुठे काम करता विचारलं तर सांगत मी कच्छमध्ये काम करतो. मोठ्या भागांतील खेड्यापाड्यांतून दोन-पाच शिक्षक गुजरातच्या किनारी भागात कुठेतरी कामाला जात असत. कारण येथे रोजगार नव्हता, आज उद्योगाचा झेंडा फडकत आहे. नर्मदा आणि माहीचे पाणी जे समुद्रात जायचे ते आता आपल्या शेतात पोहोचले आहे. नर्मदा मातेचे नाव घेतल्याने पावित्र्य प्राप्त होते, आज नर्मदा माता घराघरात पोहोचली आहे. आजच्या 20-25 वर्षांच्या तरुणांना कदाचित माहीत नसेल की त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या आयुष्यात किती त्रास सहन केला असेल. आज आपण असा गुजरात निर्माण केला आहे की त्यांना कोणताही त्रास होऊ नये. सुजलाम-सुफलाम् योजना… आणि आज मी उत्तर गुजरातमधील शेतकऱ्यांचा पुन्हा-पुन्हा आभारी आहे की त्यांनी एकाच वेळी सुजलाम-सुफलाम् योजनेसाठी जमीन दिली. जवळपास 500 किलोमीटरचे कालवे, एकही कोर्टकचेरी नाही. लोकांनी दिलेल्या जमिनीतून कच्चा कालवा झाला, पाणी पाझरु लागले आणि पाण्याची पातळी वाढू लागली. या भागातील जनतेला साबरमतीचे जास्तीत जास्त पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही सहा बंधारे बांधले, त्यासाठी आम्ही काम केले आणि आज एका बंधाऱ्याचे उद्घाटनही झाले आहे. आपल्या शेतकरी बांधवांना आणि शेकडो गावांना याचा मोठा फायदा होणार आहे.
माझ्या कुटुंबीयांनो,
या सिंचन योजनांचे काम तर झालेच आहे, परंतु गेल्या 20-22 वर्षांत उत्तर गुजरातमध्ये सिंचनाची व्याप्ती जवळपास अनेक पटींनी वाढली आहे. जेव्हा मी उत्तर गुजरातच्या लोकांना तुषार सिंचन करावे लागेल, असे सांगितले तेव्हा सगळे माझे खिल्ली उडवायचे, रागावायचे आणि म्हणायचे, साहेब, याने काय होणार? आज मला आनंद वाटतो की आता माझ्या उत्तर गुजरातमधील प्रत्येक जिल्ह्याने तुषार सिंचन, सूक्ष्म सिंचन आणि नवीन तंत्राचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे आणि यामुळे उत्तर गुजरातमधील शेतकऱ्यांची अनेक प्रकारची पिके घेण्याची शक्यता वाढली आहे. आज बनासकांठामधील सुमारे 70 टक्के क्षेत्र लघु सिंचनाखाली आले आहे. गुजरातच्या संपूर्ण कोरडवाहू प्रदेशाला सिंचन आणि नवीन तंत्रज्ञानाद्वारे मिळणाऱ्या मदतीचाही फायदा होत आहे. जिथे एकेकाळी शेतकरी अडचणीत जगायचा आणि कठीण परिस्थितीत पिके घ्यायचा, आज तो गहू, एरंड आणि हरभरा पिकवून अडचणीतून बाहेर पडला आहे आणि अनेक नवीन पिकांकडे वळला आहे. आणि रवी पिके घेण्यास सुरुवात केली आहे, आपल्या बडीशेप, जिरे आणि इसबगोलचा डंका तर सर्वत्र आहे, भाऊ. इसबगोल, तुम्हाला आठवत असेल, कोव्हिडनंतर जगात दोन गोष्टींची चर्चा झाली, एक म्हणजे आपली हळद आणि दुसरी आपली इसबगोल, आज जगभर त्याचीच चर्चा आहे. आज 90 टक्के इसबगोलची प्रक्रिया उत्तर गुजरातमध्ये केली जाते. परदेशातही इसबगोलचे गुणगान गायले जात आहे. लोकांमध्ये इसबगोलचा वापर वाढत आहे. आज उत्तर गुजरात फळे, भाजीपाला आणि बटाटे उत्पादनात प्रगती करत आहे. बटाटा असो, गाजर असो, आंबा, आवळा, डाळिंब, पेरू, लिंबू आणि काय नाही. एक काम मुळापासून केले तर पिढ्यांचे भले होईल, असे काम आम्ही केले आहे. आणि त्यामुळे आपण भव्य जीवन जगत आहोत. आणि उत्तर गुजरातचे बटाटे जगभर प्रसिद्ध होत आहेत. मी इथे होतो तेव्हा केंद्रातल्या कंपन्या विचारायला यायच्या, आज उत्तर गुजरातमध्ये निर्यात दर्जाच्या बटाट्याचे उत्पादन होऊ लागले आहे. फ्रेंच फ्राईज आणि त्याची उत्पादने आज परदेशात जाऊ लागली आहेत. आज दिसा येथील बटाटा आणि सेंद्रिय शेती हे त्याचे केंद्र म्हणून विकसित होत आहे. आणि त्याला विशेष मागणी आहे. बनासकांठामध्ये बटाटा प्रक्रिया करणारे मोठे कारखाने आहेत, यामुळे असा फायदा झाला की आपले बटाटे जेथे पिकतात, त्या वालुकामय जमिनीतून सोने काढू लागलो आहोत. महेसाणा येथे कृषी खाद्यान्न पार्क बांधण्यात आले, आता बनासकांठामध्येही मेगा फूड पार्क उभारण्याचे काम आम्ही पुढे नेत आहोत.
माझ्या कुटुंबीयांनो,
या उत्तर गुजरातमध्ये माझ्या आई-बहिणींना पूर्वी डोक्यावर पाण्याच्या घागरी घेऊन 5-10 किलोमीटर चालावे लागायचे. आज घरात नळातून पाणी येऊ लागले, माझ्या आई-बहिणींचे मला जे काही आशीर्वाद मिळाले आहेत, आणि मला नेहमीच माझ्या आई-बहिणींचा आशीर्वाद मिळाला आहे, आणि फक्त गुजरातमध्येच नाही, तर भारताच्या कानाकोपऱ्यातून मला आई-बहिणींचे आशीर्वाद मिळाले आहेत त्याची कल्पनाही करु शकत नाही कारण, पाण्यासारख्या मूलभूत सुविधा, स्वच्छतागृहासारख्या सुविधांमुळे जलक्रांती अभियान पुढे नेले आहे. भगिनींच्या नेतृत्वाखाली ही व्यवस्था विकसित झाली आहे. प्रत्येक घरात जलसंधारणाच्या मोहिमेवरही आम्ही भर दिला आहे. त्यामुळे गुजरातमधील घरोघरी पाणीपुरवठा करण्यात आला, भारतातील घराघरांत पाणी पोहोचवण्याचे काम सुरू आहे. हर घर जल अभियान असो, आदिवासी भाग असो, टेकड्या असो की छोट्या पर्वतरांगा असोत, कोट्यवधी लोकांचे जीवन बदलण्याचे काम झाले आहे.
माझ्या कुटुंबीयांनो,
दुग्धव्यवसायात माझ्या बहिणींचा मोठा सहभाग आहे, माझ्या आई-बहिणींच्या मेहनतीमुळेच माझ्या गुजरातमधील दुग्धव्यवसाय चालत आहेत, तसेच दुग्धव्यवसायाच्या विकासामुळे घरचे उत्पन्न स्थिर झाले आहे यामध्ये माझ्या माता भगिनींचे खूप मोठे योगदान आहे, असे मी म्हणू शकतो. काहीही झाले नसेल, पण 50 लाख कोटी रुपयांचा दुधाचा व्यवसाय त्या सहज करू शकतात, ही माझ्या आई-बहिणींची ताकद आहे. गेल्या वर्षी उत्तर गुजरातमध्ये शेकडो नवीन पशुवैद्यकीय रुग्णालये बांधली गेली आहेत, याचे कारण आपल्याला त्याची ताकद समजली आहे. आम्ही जनावरांचे चांगले आरोग्य सुनिश्चित करणे, सर्वोत्तम सेवा देणे आणि आपल्या जनावरांची दूध उत्पादकता वाढवण्यावर भर देत आहोत. आपण अशा प्रकारे पुढे जात आहोत की आपल्याला दोन जनावरांपासून मिळणारे दूध घेण्यासाठी चार जनावरे ठेवण्याची गरज नाही. गेल्या दोन दशकांत, आम्ही गुजरातमध्ये 800 हून अधिक नवीन ग्राम दुग्ध सहकारी संस्था स्थापन केल्या आहेत. आज बनास डेअरी असो, दूधसागर डेअरी असो, साबर डेअरी असो, तिचा अभूतपूर्व विस्तार होत आहे. आणि हे डेअरी प्रारुप पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक येतात. दुधासोबतच शेतकऱ्यांना इतर उत्पादन मिळावे यासाठी आम्ही मोठी प्रक्रिया केंद्रेही सुरू केली आहेत.
माझ्या कुटुंबीयांनो,
दुग्ध व्यवसाय क्षेत्रातील शेतकऱ्यांना हे ठाऊक आहे की जनावरे त्यांच्यासाठी किती मोठे धन आहे. आणि शेतकऱ्यांच्या पशुधनाचे रक्षण करण्यासाठी कोव्हिडच्या काळात या मोदीसाहेबांनी तुम्हाला लस मोफत पाठवली होती ना, प्रत्येकाचा जीव वाचवला होता ना. तुमच्या मुलाने हे काम केले आहे, आम्ही फक्त लोकांचेच नाही तर प्राण्यांचेही लसीकरण करत आहोत. जनावरांसाठी सुमारे 15 हजार कोटी रुपयांची मोफत लसीकरण मोहीम सुरू आहे. येथे शेतकरी आणि पशुपालक मोठ्या संख्येने आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या जनावरांना हे लसीकरण करून घ्यावे, ते त्यांच्या जीवनासाठी खूप उपयुक्त आहे. लसीकरण झाले पाहिजे, मित्रांनो, दूध तर विकले जातेच पण आता शेणाचाही व्यापार व्हायला हवा, त्यातूनही शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले पाहिजे, शेणसंपदेचे मोठे काम आम्ही करत आहोत, हे काम देशभर सुरू आहे.
आपल्या बनास डेअरीत तर आपण सीएनजी प्लांट देखील शेणापासून बनवायला सुरुवात केली आहे. आज सर्वत्र गोबरधन योजनेचे प्लांट लावले जात आहेत. बायोगॅस, बायो सीएनजी सुरू होत असून आता देशात मोठी जैव इंधन मोहीमही सुरू झाली आहे, आणि म्हणूनच, माझ्या शेतकऱ्यांच्या शेतातील पशुधनापासून निर्माण होणाऱ्या कचऱ्यामधूनही त्यांना उत्पन्न मिळावे, यावर काम सुरू आहे. शेणापासून वीज निर्मितीच्या दिशेनेही आपण वाटचाल करत आहोत.
माझ्या प्रिय कुटुंबीयांनो,
उत्तर गुजरातने आज विकासाची जी उंची गाठली आहे, त्यामागे या ठिकाणी दिवसरात्र सुरू असलेलेली विकास कामे आहेत. काही दशकांपूर्वी आपण असा विचार करायचो की उत्तर गुजरातमध्ये कोणताही उद्योग येऊ शकत नाही, पण आज पाहा, विरमगामपासूनचा संपूर्ण परिसर, मंडलपासून बहुचराजीपर्यंतचा परिसर इथपासून ते मेहसाणापर्यंत, उत्तर गुजरातच्या दिशेने आणि रांधनपूरपर्यंत विकासचा मार्ग विस्तारला आहे. फक्त कल्पना करा, संपूर्ण ऑटोमोबाईल उद्योग या क्षेत्रात विस्तारत आहे. मांडल असो, की बहुचराजी असो, संपूर्ण ऑटोमोबाईल उद्योग, या माझ्या उत्तर गुजरातच्या लोकांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत असे आणि आज, बाहेरचे लोक रोजगारासाठी उत्तर गुजरातमध्ये येऊ लागले आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दहा वर्षांच्या आत, आपण औद्योगिकीकरणाबरोबरच पुढे गेलो आहोत. आज उत्पन्न दुप्पट झाले आहे. अन्नप्रक्रीयेबरोबरच मेहसाणामध्ये औषधे आणि अभियांत्रिकी उद्योगाचाही विकास होऊ लागला आहे. बनासकांठा, साबरकांठा सिरॅमिक उद्योगाच्या दिशेने पुढे गेले आहेत. मी लहान असताना सरदारपूरच्या आजूबाजूची माती सिरॅमिकसाठी नेली जाते, असे ऐकायचो. आज त्याच ठिकाणी हा उद्योग सुरु आहे.
माझ्या प्रिय कुटुंबीयांनो,
आगामी काळात हरित हायड्रोजन च्या रूपातील एका सशक्त माध्यमाच्या सहाय्याने देश पुढे जाणार आहे. आणि त्यामध्ये उत्तर गुजरातचेही मोठे योगदान राहणार आहे. या ठिकाणी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत, आणि आता तर एक महत्वाचे सौर ऊर्जा केंद्र म्हणून या परिसराची ओळख निर्माण होऊ लागली आहे. मोढेरा मध्ये तर आपण पहिलेच, सूर्यग्राम आणि संपूर्ण उत्तर गुजरात सौर उर्जेच्या शक्तीने तेजस्वी रुपात प्रगती करणार आहे. सुरुवातीला पाडण आणि नंतर बनासकांठा येथे सौरऊर्जा प्रकल्प बांधण्यात आला आणि आता मोढेरा दिवसाचे 24 तास सौर उर्जेवर चालते. उत्तर गुजरातला सौर शक्तीचा फायदा मिळत आहे. सरकारच्या रुफटॉप सौर धोरणा द्वारे स्वतःच्या घराच्या छतावर मोफत वीज मिळवण्या बरोबर सरकारला जास्त वीज विकताही यावी, या दिशेने काम केले आहे. आधी वीज पैसे देऊनही मिळत नव्हती, तीच वीज आता गुजरातचे लोक विकू शकतील, या दिशेने आम्ही पुढे जात आहोत.
मित्रहो,
आज रेल्वेसाठीही खूप काम झाले आहे, गुजरातमध्ये आज 5 हजार कोटींहून अधिक प्रकल्प आले आहेत. मेहसाणा-अहमदाबाददरम्यानचा समर्पित कॉरिडॉर, हे खूप मोठे काम होणार आहे. त्याचा मोठा फायदा होणार आहे, त्याचे लोकार्पण झाले आहे. यामुळे पिपावाव, पोरबंदर, जामनगर या बंदरांशी संपर्क वाढून गुजरातच्या विकासाचा वेग वाढेल. शेतकरी, पशुपालक आणि उद्योग या सर्वांना त्याचा फायदा होणार असून, त्यामुळे येथे उद्योग क्षेत्राचा विस्तार होण्याची शक्यता आहे. उत्तर गुजरातमध्ये लॉजिस्टिक केंद्रे उभारायला, मोठी माल साठवणी क्षेत्रे तयार करायला मोठे बळ मिळणार आहे.
माझ्या कुटुंबीयांनो,
गेल्या 9 वर्षांत, पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरच्या कामाचा अंदाजे 2500 किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला आहे. प्रवासी रेल्वे गाडी असो किंवा मालवाहतूक गाडी असो, येथे सर्वांना मोठा फायदा होत असून शेवटच्या स्थानकापर्यंत याचा लाभ मिळावा, याची व्यवस्था करण्यात आली आहे. मालवाहतूक कॉरिडॉरचा फायदा असा आहे की आज जर ट्रक आणि टँकर कोणताही माल घेऊन रस्ता मार्गाने गेले, तर खूप वेळ लागतो आणि ते महागही पडते. आता त्यात फायदा होईल आणि वेगही वाढेल. या समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरमुळे मोठी वाहने आणि मालाने भरलेले ट्रक रेल्वेगाडीवर चढवले जाऊ शकतील. बनासमध्ये आपण पहिले असेल, की दूध घेऊन जाणारा ट्रक रेल्वे गाडीवर चढवून रेवाडी येथे नेला जातो. त्यामुळे वेळेची बचत होते, दूध खराब होत नाही आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढायला मदतही होते. या भागातील शेतकऱ्यांचे दुधाचे टँकर पालनपूर, हरियाणा, रेवाडी येथेही पोहोचले आहेत.
मित्रहो,
या ठिकाणी कडोसन रोड, बहुचराजी रेल्वे मार्ग आणि विरमगाम समखियानी रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण करण्यात आले आहे, त्यांना देखील या दळणवळण सुविधेचा फायदा होणार आहे, गाड्या अधिक वेगाने धावतील. मित्रांनो, उत्तर गुजरातमध्ये स्थलांतराची पूर्ण शक्यता आहे, तुम्ही पहा, काशी तुमच्या शेजारच्या वडनगरइतकीच महत्त्वाची आहे, एक काशी अविनाशी आहे, असा काळ नाही की काशीमध्ये लोक नव्हते, तिथे लोक होते. प्रत्येक युगात, काशीमध्ये लोक राहायचे. काशीनंतर वडनगरचही तसेच आहे. हेसुद्धा कधीच नष्ट झालेले नाही. हे सर्व उत्खननात आढळून आले आहे, येथे जगभरातून लोक पर्यटक म्हणून येणार आहेत, या पर्यटनाचा लाभ घेणे, हे आपले काम आहे. तरंगा टेकडी, राजस्थान आणि गुजरातला जोडणारा अंबाजी-आबू रोड रेल्वे मार्ग. मित्रांनो, हा रेल्वे मार्ग या क्षेत्राचे भाग्य बदलणार आहे, आपल्या इथून या मार्गाचा विस्तार होणार आहे. ब्रॉडगेज रेल्वेमार्ग इथून थेट दिल्लीला पोहोचणार आहे. हा प्रदेश संपूर्ण देशाशी जोडला जाणार आहे, त्यामुळे तरंगा, अंबाजी, धरोई ही सर्व पर्यटन स्थळे विकसित होणार आहेत. हा रेल्वे मार्ग या भागातील औद्योगिक विकास आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासात मोठी भूमिका बजावणार आहे. त्यामुळे अंबाजीपर्यंत रेल्वेद्वारे सर्वोत्तम दळणवळण सुविधा उपलब्ध होणार आहे. दिल्ली, मुंबई आणि देशभरातील भाविकांना येथे येणे-जाणे सोपे होणार आहे.
माझ्या कुटुंबीयांनो,
तुम्हाला लक्षात असेल, मी कच्छविषयी चर्चा करायचो. एक काळ असा होता की कच्छचे नावही कुणी घ्यायचे नाही आणि आज कच्छमधील रणोत्सव धोर्डोच्या भूमीत साजरा होत आहे. जगातील सर्वोत्तम ग्राम पर्यटनासाठी आपल्या धोर्डोला पसंती दिली जाते. अशाच प्रकारे आपल्या नडाबेटचे ही लवकरच मोठे नाव होणार आहे, त्यालाही आपल्याला पुढे न्यायचे आहे. माझे म्हणणे एवढेच आहे की, आज मी तुमच्यामध्ये आलो आहे, नवीन तरुण पीढीमध्ये आलो आहे, म्हणजे आपण आज गुजरातच्या उज्ज्वल भविष्यासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि गुजरातच्या कल्याणासाठी काम करत आहोत. गुजरातच्या उज्ज्वल भवितव्यासाठी, देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, ज्या मातीने मला मोठे केले, त्या माझ्याच मातीचा आशीर्वाद घेऊन, मी एका नव्या ताकदीने इथून बाहेर पडेन. मी पूर्वी करायचो त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त मेहनत करेन, पूर्वी करत होतो त्यापेक्षा जास्त वेगाने विकास कामे करेन, कारण हेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद, हीच माझी उर्जा, माझी शक्ती आहे. गुजरात आणि देशाचं एक स्वप्न आहे. 2047 मध्ये जेव्हा आपल्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील, तेव्हा हा देश विकसित देश असावा. जगातील मोठ-मोठ्या देशांच्या बरोबरीने असायला हवा, यासाठी आम्ही कामाचा विडा उचलला आहे. मी आज माझ्या भूमीतील सर्व वरीष्ठ, आप्तस्वकियांकडे आलो आहे, तुम्ही मला आशीर्वाद द्या की मी पूर्ण ताकदीने काम करेन, जास्तीतजास्त काम करेन, संपूर्ण समर्पणाने काम करेन, याच अपेक्षेने माझ्या बरोबर बोला,
भारत माता की जय,
भारत माता की जय,
भारत माती की जय।
मनःपूर्वक धन्यवाद!
(सूचना – पंतप्रधानांनी दिलेलं मूळ भाषण गुजराती भाषेत आहे. इथे त्याचा मराठी अनुवाद देण्यात आला आहे.)
* * *
H.Akude/Nilima/Vinayak/Rajashree/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1973369)
Visitor Counter : 162
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam