संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त लखनौमध्ये संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'एकता दौड’ कार्यक्रम


राष्ट्रीय एकता दिवस म्हणजे भारताची एकता आणि अखंडतेची प्रतिज्ञा घेण्याची संधी आहे : राजनाथ सिंह

पंतप्रधान मोदी यांनी प्रारंभ केलेल्या मेरा युवा भारत अभियानात सहभागी होण्याचे संरक्षणमंत्र्यांचे तरुणांना आवाहन

Posted On: 31 OCT 2023 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2023

 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2023 रोजी  उत्तर प्रदेशातील लखनौ येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) वतीने आयोजित ‘एकता दौड’ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भूषवले. सरदार वल्लभभाई पटेल प्रतिमा, हजरतगंज येथून सुरुवात झालेल्या या 1.5 किमी अंतराच्या एकता दौडचा केडी सिंह बाबू स्टेडियमवर समारोप झाला.  शालेय विद्यार्थी, एनसीसी छात्रसैनिक, खेळाडू आणि उत्साही धावपटू आणि एचएएलचे कर्मचारी यांच्यासह हजारो लोक या दौडमध्ये  सहभागी झाले होते.

राजनाथ सिंह यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि यावेळी उपस्थित लोकांना ‘राष्ट्रीय एकता दिनाची' शपथ दिली.  राष्ट्रीय एकता दिन हा स्वातंत्र्य चळवळीत आणि राष्ट्र उभारणीत योगदान देणाऱ्यांचे महान व्यक्तींचे स्मरण करण्यासाठी एक संधी आहे, असे, राजनाथ सिंह यांनी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. राष्ट्रीय एकता दिन आपल्याला राष्ट्राच्या एकात्मतेची शपथ घेण्याची आणि ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उभारणीसाठी कार्य करण्याची संधी देतो,  असे ते म्हणाले.

स्वातंत्र्योत्तर राष्ट्र उभारणीत सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान संरक्षण मंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले.भारतीय प्रजासत्ताकासोबत संस्थानांचे एकीकरण सुनिश्चित करण्याच्या त्यांच्या दूरदृष्टीचे  आणि मुत्सद्दी कौशल्यांबद्दल आणि भारतीय नागरी सेवांची पोलादी चौकट तयार करण्यासह त्यांच्या इतर योगदानाबद्दल संरक्षणमंत्र्यांनी गौरोवोद्गार काढले.  “सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांमुळे भारताची एकता आणि अखंडता सुनिश्चित झाली. 2014 मध्ये आमचे सरकार सत्तेवर येईपर्यंत आणि त्यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन  म्हणून साजरी करण्याचा निर्णय घेईपर्यंत त्यांच्या योगदानाला  योग्य श्रेय दिले गेले नाही,” असे संरक्षण मंत्री म्हणाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात येत असलेल्या ‘मेरा युवा भारत अभियाना’बद्दल राजनाथ सिंह म्हणाले की, या उपक्रमामुळे तरुणांना पुढे येण्याची आणि राष्ट्र उभारणीच्या प्रयत्नात भाग घेण्याची संधी मिळेल.  या कार्यक्रमासाठी पुढे येऊन राष्ट्रीय एकता  आणि अखंडतेसाठी  काम करण्याचे आवाहन त्यांनी  केले.

गुजरातमधील केवडिया येथे सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात मोठा पुतळा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' उभारण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराची संरक्षण मंत्र्यांनी प्रशंसा केली. सरदार वल्लभभाई पटेल हे भारताच्या एकात्मतेचे प्रतीक आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पुढे नेण्यासाठी त्यांचे प्रयत्न तरुणांसाठी प्रेरणादायी आहेत, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

 

* * *

S.Patil/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1973364) Visitor Counter : 172