गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी नवी दिल्ली येथे ‘भारताचे लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली पुष्पांजली


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ‘एकता दौड ’ला दाखवला हिरवा झेंडा आणि लोकांना राष्ट्रीय एकतेची दिली शपथ

Posted On: 31 OCT 2023 2:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2023

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह आणि दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी नवी दिल्ली येथे ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली वाहिली.

दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियम येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित ‘एकता दौड’ला केंद्रीय गृहमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, अजय कुमार मिश्रा आणि निशीथ प्रामाणिक उपस्थित होते. अमित शहा यांनी उपस्थित लोकांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली.

  

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, आज आपल्या देशाचे पहिले गृहमंत्री आणि भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 148 वी जयंती आहे आणि  2014 पासून संपूर्ण देश दरवर्षी हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करत आहे. स्वातंत्र्यानंतर इंग्रज भारताचे तुकडे करून निघून गेले होते आणि त्यावेळी भारताचे ‘लोहपुरुष’ सरदार वल्लभभाई पटेल यांनी काही दिवसांतच 550 हून अधिक संस्थानांना एकत्र करून भारतमातेचा आजचा नकाशा तयार करण्याचे मोठे कार्य केले. शाह म्हणाले की, सरदार पटेल यांचा दृढ निश्चय, राष्ट्राप्रती कर्तव्यनिष्ठा आणि पोलादासारखे कणखर इरादे यामुळेच आज भारत स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर जगासमोर सन्मानाने उभा आहे.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की काश्मीरपासून लक्षद्वीपपर्यंत पसरलेला हा विस्तृत देश एकतेच्या सूत्रात बांधण्यात सरदार पटेल यांनी दिलेले योगदान अविस्मरणीय आहे आणि हा देश त्यांचे हे ऋण कधीच फेडू शकणार नाही. आणि म्हणूनच केवडिया येथे जगातील सर्वात उंच पुतळा उभारुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल यांना योग्य तो सन्मान दिला असे त्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की आज ‘रन फॉर युनिटी’ तसेच ‘राष्ट्रीय एकता दिवस शपथग्रहण’ या उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण देश स्वतःला देशाची एकता आणि अखंडता यांच्याप्रती समर्पित करत आहे.

अमित शाह म्हणाले की आजचा राष्ट्रीय एकता दिवस ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे कारण ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’नंतर सुरु झालेल्या ‘अमृत काळा’तील हा पहिलाच राष्ट्रीय एकता दिवस आहे. ते म्हणाले की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’च्या काळात, पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना असे आवाहन केले आहे की स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची 75 वर्षे आणि 100 वर्षे यांच्या दरम्यान असणारा 25 वर्षांचा कालावधी हा आपल्यासाठी ‘संकल्प से सिद्धी’ म्हणजेच निर्धारातून उद्दिष्टे प्राप्त करण्याचा काळ आहे.

  

केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की देशाच्या स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीच्या वेळी आपला देश प्रत्येक क्षेत्रात जगात अव्वल असेल अशा प्रकारे देशाची उभारणी करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनी केली पाहिजे. देशातील 130 कोटी जनतेने ही प्रतिज्ञा घेतली पाहिजे आणि या निश्चयांची पूर्तता करण्यासाठीचे एकत्रित प्रयत्न राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त घेतलेल्या शपथेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. “आपण सर्वजण एकत्रितपणे येत्या 25 वर्षांमध्ये भारताला जगात पहिल्या क्रमांकावर नेण्याचा निर्धार करूया आणि सरदार पटेल यांचे स्वप्न साकार करण्यासाठी समर्पित वृत्तीने काम करूया,” असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले.

 

* * *

S.Tupe/Sushma/Sanjana/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1973342) Visitor Counter : 169