पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’(106 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

Posted On: 29 OCT 2023 11:52AM by PIB Mumbai

माझ्या प्रिय कुटुंबियांनो, नमस्कार ! ‘मन की बात’ मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. हा भाग, देशभरात सर्वत्र सणांचा उत्साह असताना होत आहे. आपणा सर्वांना येणाऱ्या सर्व सणांसाठी खूप खूप शुभेच्छा!

मित्रांनो, 

सणांच्या या उत्साहातच मला ‘मन की बात’ची सुरुवात दिल्लीच्या एका बातमीनं करायची आहे. या महिन्याच्या सुरुवातीला गांधी जयंतीनिमित्त दिल्लीत खादीची विक्रमी विक्री झाली. इथे कॅनॉट प्लेस या ठिकाणी, एकाच खादीच्या दुकानात, लोकांनी एकाच दिवसात दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त सामानाची खरेदी केली. या महिन्यात सुरू असलेल्या खादी महोत्सवानं पुन्हा एकदा विक्रीचे सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. तुम्हाला आणखी एक गोष्ट जाणून घेऊन खूप बरं वाटेल. दहा वर्षांपूर्वी देशात खादी उत्पादनांची विक्री ३० हजार कोटींपेक्षा कमी होती, आता ती वाढून सुमारे सव्वा लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. खादीची विक्री वाढली याचा अर्थ असा होतो की त्याचा फायदा शहरापासून खेड्यापर्यंत, समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचतो. आपले विणकर, हस्तकला कारागीर, आपले शेतकरी, आयुर्वेदिक वनस्पती लावणारे कुटीर उद्योग, सर्वांनाच या विक्रीचा लाभ मिळत आहे, आणि हीच 'वोकल फॉर लोकल' मोहिमेची, स्थानिक उत्पादनांच्या आग्रहाची ताकद आहे आणि याला हळूहळू तुम्हा सर्व देशबांधवांचा प्रतिसाद सुद्धा वाढत आहे.

मित्रांनो, 

आज मला तुमच्या कडे आणखी एक विनंती पुन्हा करायची आहे आणि ती अगदी खूप आग्रहानं करायची आहे. आपण जेव्हा जेव्हा पर्यटनाला जाल, तीर्थयात्रेला जाल, तेव्हा तेव्हा तिथल्या स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या वस्तू, नक्की खरेदी करा. तुम्ही तुमच्या प्रवासाच्या एकूण बजेटमध्ये, खर्चाच्या नियोजनामध्ये, स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला महत्त्वाचं प्राधान्य द्या. तुमचं बजेट 10 टक्के असो, 20 टक्के असो, तुम्ही त्यातून स्थानिक उत्पादनांचीच खरेदी करा, त्या त्या ठिकाणीच खरेदी करा. 

मित्रहो,

दरवेळेप्रमाणेच याही वेळी आपल्या सण-उत्सवात आपलं प्राधान्य, आपला आग्रह, 'स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचाच राहू देत. आपलं स्वप्न आहे 'आत्मनिर्भर भारत', स्वावलंबी भारत आणि आपण सर्वजण मिळून ते स्वप्न पूर्ण करूया. यावेळेस अशाच उत्पादनानं घर सजवून टाका, ज्यात माझ्या कुणा देशबांधवाच्या घामाचा सुगंध आहे, माझ्या देशाच्या युवक-युवतीची गुणवत्ता ठासून भरली आहे, ज्या उत्पादनानं माझ्या देशवासीयांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. नेहमीच्या आयुष्यातली कुठलीही गरज असो, ती गरज आपण स्थानिक उत्पादनानच पूर्ण करू. मात्र, तुम्हाला आणखी एका गोष्टीचा बारकाईनं विचार करावा लागेल. 'व्होकल फॉर लोकल' ही भावना केवळ सणासुदीच्या खरेदीपुरती मर्यादित नाही… आणि मी कुठेतरी पाहिलं आहे…लोक दिवाळीचे दिवे खरेदी करतात आणि नंतर समाज माध्यमावर, 'व्होकल फॉर लोकल' अशी टिप्पणी टाकतात. नाही मित्रांनो…ही तर फक्त सुरुवात आहे. आपल्याला खूप पुढे जायचं आहे, जीवनातली प्रत्येक गरज स्थानिक उत्पादनानच पूर्ण करायची आहे….आपल्या देशात, आता, सर्व काही उपलब्ध आहे. हा दृष्टीकोन फक्त लहान दुकानदार आणि रस्त्यावरील विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करण्यापुरता मर्यादित नाही. आज भारत जगातलं सर्वात मोठं भव्य उत्पादन केंद्र बनत आहे. अनेक मोठमोठे ब्रँड, नामांकित उत्पादक, त्यांची उत्पादनं इथे तयार करत आहेत. जर आपण ती उत्पादनं स्वीकारली, तर मेक इन इंडियाला चालना मिळते, आणि हा सुद्धा एक प्रकारे लोकल साठी व्होकलच, स्थानिक उत्पादनांसाठीचा आग्रहच असतो.आणि हो, अशी उत्पादनं खरेदी करताना, UPI डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे व्यवहार करण्याचा आग्रह करा… आपल्या जीवनात ही सवय लावून घ्या आणि त्या उत्पादनासह किंवा त्या कारागिरासह आपलं सेल्फी छायाचित्र, नमो अॅप वर टाकून माझ्यापर्यंत पोहोचवा आणि ते सुद्धा भारतातच बनवलेल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून! मी यापैकी काही छायाचित्रं, काही टिप्पण्या समाजमाध्यमांवर टाकेन, जेणेकरून इतर लोकांनाही 'व्होकल फॉर लोकल'साठी प्रेरणा मिळेल. 

मित्रांनो,

आपण जेव्हा भारतात तयार झालेल्या, भारतीयांनीच बनवलेल्या उत्पादनांनी आपली दिवाळी साजरी कराल, आपल्या कुटुंबाची प्रत्येक छोटी मोठी गरज स्थानिक उत्पादनानं पूर्ण कराल, तेव्हा दिवाळीचा झगमगाट तर आणखी जास्त वाढेलच वाढेल, शिवाय त्या कारागिरांच्या आयुष्यात एक नवी दिवाळी येईल, जीवनातली एक नवी पहाट उगवेल, त्यांचं जीवन शानदार बनेल! भारताला स्वावलंबी बनवा, नेहमी मेक इन इंडिया निवडत जा… यामुळे आपल्या सोबतच आपल्या कोट्यवधी देशवासीयांची दिवाळी बहारदार होईल, चैतन्यपूर्ण होईल, उजळून निघेल, मनोरंजक होईल.

माझ्या प्रिय देशावासीयानो,

31 ऑक्टोबर हा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप विशेष असतो. याच दिवशी आपण लोहपुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांची जयंती साजरी करतो. आपण भारतवासीय कितीतरी कारणांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देत असतो आणि श्रद्धेनं त्यांना वंदन करत असतो. यातलं सगळ्यात मोठं कारण आहे… देशातल्या 580 हून जास्त संस्थानांचं, भारतात विलीनीकरण करण्यात त्यांनी बजावलेली अतुलनीय भूमिका! आपल्या सर्वांनाच हे माहित आहे… प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोबरला गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात एकतेच्या पुतळ्याजवळ, एकता दिवसाशी निगडीत मुख्य कार्यक्रम होत असतो. या खेपेस या कार्यक्रमा व्यतिरिक्त दिल्लीत कर्तव्यपथावर, एक खूपच विशेष कार्यक्रम होणार आहे. आपल्याला आठवत असेल… मी, गेल्या काही दिवसात, देशातल्या प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून माती जमा करण्याचा आग्रह केला होता. प्रत्येक घरातून माती संकलित केल्यानंतर ती कलशात भरली गेली आणि मग अमृत कलश यात्रा निघाल्या. देशाच्या कानाकोपऱ्यातून एकत्र केलेली ही माती, या हजारो अमृत कलश यात्रा, आता दिल्लीत पोहोचत आहेत. इथे दिल्लीत ही सर्व माती, एका विशाल अशा भारत कलशात एकत्र केली जाईल आणि याच पवित्र मातीतून दिल्लीत अमृत वाटिका उभारली जाईल. अमृतवाटिकेच्या माध्यमातून ही माती, देशाच्या राजधानीच्या हृदयस्थानी, अमृत महोत्सवाचा एक भव्य वारसा म्हणून कायम अस्तित्वात राहील. 31 ऑक्टोबरलाच, देशात गेल्या अडीच वर्षापासून सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप होईल. आपण सर्वांनी मिळून या महोत्सवाला, जगातल्या सर्वात दीर्घकाळ चालणाऱ्या महोत्सवापैकी एक बनवून टाकलं. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान असो किंवा प्रत्येक घरात तिरंगा ही मोहीम असो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात लोकांनी आपल्या स्थानिक इतिहासाला एक नवी ओळख मिळवून दिली आहे. याच महोत्सवा दरम्यान सामुदायिक सेवेचं सुद्धा एक अनोखं उदाहरण पाहायला मिळालं आहे.

मित्रहो,

आज मी आपल्याला एक आणखी आनंदाची बातमी सांगणार आहे….विशेष करून माझ्या नवतरुण मुला-मुलींना, ज्यांच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याचा ध्यास आहे, स्वप्न आहेत, संकल्प आहेत. आनंदाची ही बातमी देशवासीयांसाठी तर आहेच आहे….. माझ्या नवतरुण मित्रांनो… आपल्यासाठी विशेष आहे. दोन दिवसानंतरच 31 ऑक्टोबरला, एक खूप मोठ्या राष्ट्रव्यापी संघटनेचा पाया रचला जाणार आहे आणि तो सुद्धा सरदार साहेबांच्या जयंतीदिनी! या संघटनेचं नाव आहे…माझा तरुण भारत…माय भारत! माय भारत संघटना, भारताच्या युवा वर्गाला राष्ट्र निर्मितीच्या विविध कार्यक्रमांमध्ये आपली सक्रीय भूमिका बजावण्याची संधी मिळवून देईल. हा, विकसित भारताच्या निर्मितीत, भारताच्या युवाशक्तीची एकजूट घडवून आणण्याचा एक अनोखा प्रयत्न आहे. 'माझा युवा भारत' या संघटनेचं संकेतस्थळ…. माय भारत सुद्धा सुरू होणार आहे. मी युवा वर्गाला विनंती करतो, पुन्हा पुन्हा विनंती करतो… की आपण सर्व… माझ्या देशाचे नवतरुण-तरुणी, आपण सर्व माझ्या देशाचे पुत्र आणि कन्या, 'माय भारत डॉट जीओव्ही डॉट इन' वर नोंदणी करा आणि विविध कार्यक्रमांसाठी तयार राहा. 31 ऑक्टोबर रोजी माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजींची पुण्यतिथी सुद्धा आहे. मी त्यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

माझ्या कुटुंबियांनो,

आपलं साहित्य, लिटरेचर, 'एक भारत श्रेष्ठ भारत' या भावनेला आणखी बळकट करण्याच्या सगळ्यात उत्तम अशा माध्यमांपैकी एक माध्यम आहे. मी आपल्याला तामिळनाडूच्या गौरवपूर्ण वारशाशी निगडीत अशा दोन खूपच प्रेरक उपक्रमांची माहिती देऊ इच्छितो. मला प्रसिद्ध तमिळ लेखिका भगिनी शिवशंकरीजी यांच्याबाबत जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी एक उपक्रम राबवला आहे ….नीट इंडिया, थ्रू लिटरेचर! म्हणजे याचा अर्थ असा आहे की साहित्याच्या माध्यमातून देशाला एका धाग्यात गुंफणं आणि जोडणं! त्या या प्रकल्पावर गेल्या सोळा वर्षांपासून काम करत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी 18 भारतीय भाषांमधल्या साहित्याचा अनुवाद केला आहे. त्यांनी कितीतरी वेळा, कन्याकुमारीपासून काश्मीर पर्यंत आणि इंफाळपासून जैसलमेर पर्यंत, देशभर भेटी दिल्या आहेत, जेणेकरून वेगवेगळ्या राज्यांमधले लेखक आणि कवींशी त्यांना संवाद साधता येईल. शिवशंकरीजींनी वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या भेटी, पर्यटन समालोचनासह, पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर आणल्या आहेत. हे पुस्तक तमिळ आणि इंग्रजी, दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. हा उपक्रम, ही लेखन गाथा, चार मोठ्या खंडात उपलब्ध आहे आणि प्रत्येक खंड भारताच्या वेगवेगळ्या भागाला समर्पित आहे. मला त्यांच्या या दृढनिश्चयाचा खूप अभिमान वाटतो.

मित्रहो,

कन्याकुमारीच्या, थिरू ए के पेरुमलजी यांचं काम सुद्धा खूप प्रेरणादायक आहे. त्यांनी, तामिळनाडूची कथाकथनाची परंपरा संरक्षित करण्याचं, जोपासण्याचं प्रशंसनीय काम केलं आहे. ते गेल्या 40 वर्षांपासून आपला हा वसा चालवत आहेत. त्यासाठी ते तामिळनाडूच्या वेगवेगळ्या भागांमध्ये प्रवास करतात आणि त्या त्या भागातले लोककलांचे विविध प्रकार शोधून काढून त्याबद्दल पुस्तकात लिहितात. तुम्हाला हे जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की त्यांनी आतापर्यंत अशी जवळजवळ शंभर पुस्तकं लिहिली आहेत. त्याशिवाय पेरूमलजी यांना आणखी एक छंद आहे. तामिळनाडूच्या मंदिर संस्कृती बद्दल संशोधन करणं त्यांना खूप आवडतं. त्यांनी, लेदर पपेट्स या कळसुत्री बाहुल्यांच्या प्रकारावर सुद्धा खूप संशोधन केलं आहे आणि या संशोधनाचा लाभ तिथल्या स्थानिक लोककलावंतांना होत आहे. शिवशंकरीजी आणि ए.के. पेरूमलजी यांचे हे प्रयत्न प्रत्येकासाठी एक आदर्श उदाहरण आहेत, वस्तुपाठ आहे. आपल्या संस्कृती रक्षणाच्या अशा प्रत्येक प्रयत्नांचा भारताला अभिमान आहे, जे आपली राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासोबतच, देशाचं नाव, देशाचा मान, सर्वच वाढवत असतात.

माझ्या कुटुंबियांनो,

येत्या 15 नोव्हेंबरला संपूर्ण देश, आदिवासी गौरव दिन साजरा करेल. हा विशेष दिवस, भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीशी निगडीत आहे. भगवान बिरसा मुंडा आपल्या सर्वांच्याच हृदयात वसले आहेत. निस्सीम साहस काय असतं आणि आपल्या दृढनिश्चयावर कायम राहणं कशाला म्हणतात, हे आपण त्यांच्या जीवनातून शिकू शकतो. त्यांनी परदेशी राजवट कधीही स्वीकारली नाही. कुठल्याही प्रकारच्या अन्यायाला थारा नसेल असा समाज त्यांना अभिप्रेत होता. प्रत्येक व्यक्तीला सन्मान आणि समानतेचं जीवन लाभावं अशी त्यांची इच्छा होती. भगवान बिरसा मुंडा यांनी पर्यावरण पूरक, निसर्गाशी मैत्रीपूर्वक जीवन जगण्यावर नेहमी भर दिला. आपण आजही पाहतो की आपले आदिवासी बंधू-भगिनी निसर्गाची देखभाल आणि संरक्षण करण्यासाठी सर्व प्रकारे कसे समर्पित आयुष्य जगत असतात! आपल्या सर्वांसाठी, आपल्या आदिवासी बंधू-भगिनींचं हे काम खूप प्रेरणादायक आहे.

मित्रांनो,

उद्या म्हणजेच 30 ऑक्टोबरला गोविंदगुरु जी यांची पुण्यतिथी सुद्धा आहे. आपल्या गुजरात आणि राजस्थानच्या आदिवासी आणि वंचित समाजाच्या जीवनात, गोविंदगुरु जी यांचं महत्त्व खूपच विशेष असं आहे. गोविंदगुरुजीं ना सुद्धा मी आपली श्रद्धांजली अर्पण करतो. नोव्हेंबर महिन्यात आपण मानगढ नरसंहाराचा स्मृतिदिन सुद्धा पाळतो. मी त्या नरसंहारात हुतात्मा झालेल्या, भारतमातेच्या सर्व लेकरांना वंदन करतो.

मित्रांनो, भारताला आदिवासी शूरवीरांचा समृद्ध इतिहास आहे. याच भारतभूमीवर थोर तिलका मांझी यांनी अन्यायाविरुद्ध रणशिंग फुंकले होते. याच भूमीतून सिद्धो-कान्हूंनी समतेचा आवाज बुलंद केला. तंट्या भिल्ल हा योद्धा आपल्या मातीत जन्माला आला याचा आम्हाला अभिमान आहे. बिकट काळात आपल्या लोकांच्या पाठी उभे राहणाऱ्या शहीद वीर नारायण सिंह यांचे आम्ही श्रद्धापूर्वक स्मरण करतो. शूर रामजी गोंड असोत, शूर गुंडाधुर असोत, भीमा नायक असोत, त्यांचे शौर्य आजही आपल्याला प्रेरणा देते. अल्लुरी सीताराम राजू यांनी आदिवासी बंधू-भगिनींमध्ये जी जागृती केली त्याचे देश आजही स्मरण करतो. ईशान्येतील किआंग नोबांग आणि राणी गैडिनलिऊ यांसारख्या स्वातंत्र्यसैनिकांकडूनही आम्हाला खूप प्रेरणा मिळते. आदिवासी समाजातूनच देशाला राजमोहिनी देवी, राणी कमलापती यांसारख्या वीरांगना मिळाल्या. आदिवासी समाजाला प्रेरणा देणार्‍या राणी दुर्गावतीजींची 500 वी जयंती देश सध्या साजरी करत आहे. मला आशा आहे की देशातील अधिकाधिक तरूण त्यांच्या भागातील आदिवासी व्यक्तिमत्त्वांबद्दल माहिती जाणून त्यांच्यापासून प्रेरणा घेतील. देशाचा स्वाभिमान आणि प्रगती शिरोधार्य मानणाऱ्या आपल्या आदिवासी समाजाबद्दल देश कृतज्ञ आहे. 

माझ्या प्रिय देशबांधवांनो, सणासुदीच्या या काळात देशात क्रीडा क्षेत्राचा झेंडाही फडकत आहे. अलीकडेच आशियाई खेळांनंतर पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारतीय खेळाडूंनी अभूतपूर्व यश मिळवले आहे. या खेळांमध्ये भारताने 111 पदके पटकावून नवा इतिहास रचला आहे. पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे मी खूप खूप अभिनंदन करतो. मित्रांनो, विशेष ऑलिम्पिक जागतिक उन्हाळी खेळांकडेही मला तुमचे लक्ष वेधायचे आहे. बर्लिनमध्ये याचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा गतिमंद खेळाडूंची अद्भुत क्षमता समोर आणते. या स्पर्धेत भारतीय संघाने 75 सुवर्ण पदकांसह 200 पदके जिंकली. रोलर स्केटिंग असो, बीच व्हॉलीबॉल असो, फुटबॉल असो की लॉन टेनिस असो, भारतीय खेळाडूंनी पदकांचा वर्षाव केला.

या पदकविजेत्यांचा जीवन प्रवास खूप प्रेरणादायी आहे. हरियाणाच्या रणवीर सैनीने गोल्फमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. लहानपणापासूनच ऑटिझमने त्रस्त असलेल्या रणवीरसाठी कोणतेही आव्हान गोल्फची आवड कमी करू शकले नाही. त्याची आई तर म्हणते की आज कुटुंबातील प्रत्येकजण गोल्फपटू झाला आहे. पुद्दुचेरीच्या 16 वर्षीय टी-विशालने चार पदके जिंकली. गोव्याच्या सिया सरोदे यांनी पॉवरलिफ्टिंगमध्ये 2 सुवर्ण पदकांसह चार पदके पटकावली. वयाच्या 9 व्या वर्षी मातृछत्र हरपल्यानंतरही त्या निराश झाल्या नाहीत. छत्तीसगडच्या दुर्ग येथील रहिवासी असलेल्या अनुराग प्रसादने पॉवरलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले आहे. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आहे झारखंडच्या इंदू प्रकाशची, जिने सायकलिंगमध्ये दोन पदके पटकावली आहेत. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या इंदूने आपल्या यशासमोर गरिबीला कधीही अडसर बनू दिले नाही. मला विश्वास आहे की या खेळांमधील भारतीय खेळाडूंचे यश अध्ययन अक्षमतेचा सामना करत असलेल्या इतर मुलांना आणि कुटुंबांना देखील प्रेरणा देईल. माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की, तुम्ही तुमच्या गावातील, तुमच्या गावाच्या आजूबाजूच्या भागातील अशा मुलांकडे कुटुंबासह जावे, ज्यांनी या खेळात भाग घेतला आहे किंवा विजयी झाले आहेत. त्यांचे अभिनंदन करा. आणि त्या मुलांसोबत काही क्षण घालवा. तुम्हाला एक नवीन अनुभव मिळेल. त्यांच्यातल्या दैवी शक्तीची अनुभूती घेण्याची संधी तुम्हालाही मिळेल. नक्की जा.

माझ्या सुहृदांनो, तुम्ही सर्वांनी गुजरातच्या तीर्थक्षेत्र अंबाजी मंदिराबद्दल ऐकले असेलच. हे एक महत्त्वाचे शक्तीपीठ आहे, जिथे देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने अंबा मातेच्या दर्शनासाठी येतात. येथे गब्बर पर्वताच्या वाटेवर तुम्हाला विविध प्रकारच्या योग मुद्रा आणि आसनांच्या मूर्ती दिसतील. या मूर्तींचे वैशिष्ट्य काय आहे माहीत आहे का? खरं तर ही रद्दीसामानापासून बनवलेली शिल्पे आहेत, एका प्रकारे भंगारापासून बनवलेली आहेत आणि ती अतिशय अद्भुत आहेत.

म्हणजे जुन्या वापरलेल्या आणि भंगारात टाकलेल्या वस्तूंपासून या मूर्ती बनवल्या गेल्या आहेत. अंबाजी शक्तीपीठातील देवी मातेच्या दर्शनासोबतच या मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनल्या आहेत. या प्रयत्नाला मिळालेले यश पाहून माझ्याही मनात एक कल्पना येत आहे. आपल्या देशात असे अनेक लोक आहेत जे कचऱ्यापासून अशा कलाकृती बनवू शकतात. त्यामुळे मी गुजरात सरकारला एक स्पर्धा भरवून अशा लोकांना आमंत्रित करण्याची विनंती करतो. हा प्रयत्न, गब्बर पर्वताचे आकर्षण वाढवण्याबरोबरच देशभरातील ‘वेस्ट टू वेल्थ’ मोहिमेसाठी लोकांना प्रेरित करेल.

मित्रांनो, जेव्हा जेव्हा स्वच्छ भारत आणि 'वेस्ट टू वेल्थ'चा मुद्दा येतो तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून आपल्याला असंख्य उदाहरणे पाहायला मिळतात. आसाममधील कामरूप महानगर जिल्ह्यातील अक्षर फोरम नावाची शाळा मुलांमध्ये शाश्वत विकासाची मूल्ये, संस्कार रुजवण्याचे रुजविण्याचे काम सातत्याने करत आहे. येथे शिकणारे विद्यार्थी दर आठवड्याला प्लॅस्टिक कचरा गोळा करतात, ज्याचा वापर विटा, आणि किचेन यांसारख्या पर्यावरणपूरक वस्तू बनवण्यासाठी केला जातो. याठिकाणी विद्यार्थ्यांना प्लास्टिक कचर्‍याचा पुनर्वापर आणि वस्तू बनवण्यास शिकवले जाते. लहान वयातच पर्यावरणाप्रती असलेली ही जाणीव या मुलांना देशाचे कर्तव्यदक्ष नागरिक बनवण्यास खूप मदत करेल.

माझ्या सुहृदांनो, आज जीवनाचे असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे आपण स्त्री शक्तीचे सामर्थ्य अजमावू शकत नाही. या काळात, तिच्या कर्तृत्वाचे सर्वत्र कौतुक होत असताना, भक्तीचे सामर्थ्य दाखविणाऱ्या एका महिला संताचेही स्मरण आपल्याला करावे लागेल, ज्यांचे नाव इतिहासाच्या सोनेरी पानांमध्ये कोरले गेले आहे. यंदा देशभरात संत मीराबाई यांची 525 वी जयंती साजरी होत आहे. अनेक कारणांमुळे देशभरातील लोकांसाठी त्या एक प्रेरणादायी शक्ती ठरल्या आहेत. कुणाला संगीताची आवड असेल तर संगीताप्रती समर्पणाचे त्या उत्तम उदाहरण आहेत. कोणी कविताप्रेमी असेल, तर भक्तीरसात तल्लीन झालेली मीराबाईंची भजने त्याला वेगळाच आनंद देतात. जर कोणी दैवी शक्तीवर विश्वास ठेवत असेल, तर मीराबाईचे श्रीकृष्णामध्ये लीन होणे त्याच्यासाठी मोठी प्रेरणा ठरू शकते. मीराबाई संत रविदासांना आपले गुरू मानत. त्या म्हणायच्या देखील -

गुरु मिलिया रैदास, दीन्ही ज्ञान की गुटकी |

मीराबाई आजही देशातील माता, भगिनी आणि मुलींसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. त्या काळातही त्यांनी त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज ऐकला आणि पुराणमतवादी विचारांच्या विरोधात उभ्या ठाकल्या. एक संत म्हणूनही त्या आपल्या सर्वांना प्रेरणा देतात. देशावर अनेक प्रकारची आक्रमणं होत असताना भारतीय समाज आणि संस्कृती सक्षम करण्यासाठी त्या पुढे आल्या. साधेपणात किती सामर्थ्य आहे हे मीराबाईंच्या चरित्रातून लक्षात येते. मी संत मीराबाईंना नमन करतो.

माझ्या प्रिय सुहृदांनो, यावेळी 'मन की बात'मध्ये एवढेच. तुमच्यासोबतचा प्रत्येक संवाद मला नवीन ऊर्जा देतो. आशा आणि सकारात्मकतेशी संबंधित शेकडो कथा तुमच्या संदेशांद्वारे माझ्यापर्यंत पोहोचत आहेत. आत्मनिर्भर भारत मोहिमेवर भर देण्याची मी तुम्हाला पुन्हा विनंती करतो. स्थानिक उत्पादने खरेदी करा, लोकल फॉर व्होकल व्हा. ज्याप्रमाणे तुम्ही तुमची घरे स्वच्छ ठेवता, तसाच तुमचा परिसर आणि शहर स्वच्छ ठेवा आणि तुम्हाला माहिती आहे की, 31 ऑक्टोबर हा सरदार साहेबांचा जयंती दिवस देश एकता दिवस म्हणून साजरा करतो, देशात अनेक ठिकाणी एकता दौड चे आयोजन केले जाते. तुम्हीही 31 ऑक्टोबर रोजी एकता दौड कार्यक्रमाचे आयोजन करा. तुम्हीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन एकतेचा संकल्प दृढ करा. मी पुन्हा एकदा आगामी सणांसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वजण तुमच्या कुटुंबासोबत आनंद साजरा करा, निरोगी राहा, आनंदी राहा, हीच माझी कामना आहे. आणि हो, दिवाळीच्या वेळी कुठे आगीची घटना घडेल अशी चूक करू नये. जर एखाद्याच्या जीवाला धोका असेल तर तुम्ही त्याला सांभाळा, स्वतःचीही काळजी घ्या आणि संपूर्ण परिसराची देखील काळजी घ्या. खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद.

***

AIRMumbai/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1972762) Visitor Counter : 162