सांस्कृतिक मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि मेरी माटी मेरा देश अभियानाच्या समारोप समारंभात शूर वीरांना आदरांजली वाहणार


31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 20 हजारांहून अधिक प्रतिनिधी 8000 हून अधिक अमृत कलशांसह राजधानी दिल्लीमध्ये दाखल होणार

Posted On: 27 OCT 2023 6:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी 31 ऑक्टोबर 2023 रोजी विजय चौक/कर्तव्य पथ येथे मेरी माटी मेरा देश अभियानाच्या समारोप समारंभाला संबोधित करतील. हा कार्यक्रम मेरी माटी मेरा देश अभियानाच्या अमृत कलश यात्रेचा कळसाध्याय असेल, ज्यामध्ये देशाच्या 766 जिल्ह्यांमधील 7000 प्रभागांतील अमृत कलश यात्री उपस्थित राहतील. या कार्यक्रमाबरोबरच भारताच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करण्यासाठी 12 मार्च 2021 रोजी सुरू झालेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, या दोन वर्षांच्या प्रदीर्घ मोहिमेचीही पूर्तता होईल. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत, देशभरात दोन लाखांहून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, त्याला भरभरून लोकसहभाग लाभला.

या कार्यक्रमात मेरा युवा भारत (माझा भारत) या स्वायत्त संस्थेचा शुभारंभही केला जाईल, जी युवकांच्या नेतृत्वाखालील विकासावर सरकारचे लक्ष केंद्रित करण्यामध्ये आणि युवकांना विकासाचे "सक्रिय चालक" बनविण्यामध्ये सहाय्य करेल. युवकांना समुदायामध्ये बदल घडवणारा घटक, आणि राष्ट्र निर्माता बनण्यासाठी प्रेरित करणे, आणि त्यांना सरकार आणि नागरिकांमधील दुवा (युवा सेतू) बनून काम करायला प्रोत्साहन देणे, हे या स्वायत्त संस्थेचे उद्दिष्ट आहे.

मेरी माटी मेरा देश अभियानाच्या समापन सोहोळ्यासाठी 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 20 हजाराहून अधिक अमृत कलश यात्री 29 ऑक्टोबर रोजी राजधानीत पोहोचणार आहेत. 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी कर्तव्यपथ/विजय चौक येथे आयोजित दोन दिवसीय समापन सोहोळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी ते विशेष समर्पित रेल्वे गाड्या, बस आणि स्थानिक वाहतुक सेवा अशा विविध परिवहन माध्यमांतून कार्यक्रम स्थळी पोहोचतील. हे अमृत कलश यात्री गुडगावमधील धनचिरी शिबिर आणि दिल्लीतील राधा सोमी सत्संग बियास शिबिर, या दोन शिबिरांमध्ये वास्तव्य करतील.

30 ऑक्टोबर रोजी, सर्व राज्ये आपापले प्रभाग आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व करणारी माती त्यांच्या कलशातून एका विशाल अमृत कलशामध्ये एकत्र करतील, ज्यामधून एक भारत श्रेष्ठ भारताची भावना प्रतिबिंबित होईल. अमृत कलशामध्ये माती ओतण्याच्या समारंभाच्या वेळी प्रत्येक राज्याचे लोकप्रिय कलाप्रकार प्रदर्शित केले जातील. हा कार्यक्रम सकाळी 10.30 वाजता सुरू होणार असून रात्री उशिरापर्यंत चालेल.

31 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत सांस्कृतिक सादरीकरणांचा दिमाखदार कार्यक्रम आयोजित केला जाईल, जो सर्वांसाठी खुला असेल.

दुपारी 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत कलश यात्री आणि देशाला संबोधित करतील, ज्यांनी भारताला मोकळ्या आणि समृद्ध वातावरणात श्वास घेता यावा, यासाठी आपले प्राण अर्पण केले त्या शूर वीरांचे ते स्मरण करतील.

मेरी माटी मेरा देश अभियान

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, या दोन वर्षांच्या प्रदीर्घ महोत्सवाच्या समारोपाचा भाग म्हणून,मेरी माटी मेरा देश-माटी को नमन वीरों का वंदन हा भारताच्या मातीचा आणि शौर्याचा गौरवोत्सव आहे. या कार्यक्रमाला देशातील 766 जिल्ह्यांतील 7000 हून अधिक प्रभागांसह, मोठ्या प्रमाणात जन भागीदारी लाभली आहे. या मोहिमेच्या समापन सोहळ्यासाठी देशभरातून 8500 हून अधिक कलश 29 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे पोहोचतील. मेरी माटी मेरा देश अभियान दोन टप्प्यांमध्ये साजरे करण्यात आले. पहिल्या टप्प्यात स्वातंत्र्यसैनिक आणि सुरक्षा दलांसाठी शीला-फलक, पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, आणि वीरों का वंदन यासारख्या उपक्रमांचा समावेश होता, ज्यात शूर वीरांच्या बलिदानाचा सन्मान करण्यात आला.

अभियानाच्या पहिल्या टप्प्याला अफाट यश लाभले. यामध्ये 36 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2.33 लाख शिलाफलक उभारण्यात आले, जवळजवळ 4 कोटी पंचप्रण प्रतिज्ञा सेल्फी अपलोड करण्यात आल्या आणि देशभरात 2 लाखांहून अधिक वीरों का वंदन कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याशिवाय, वसुधा वंदन संकल्पने अंतर्गत 2.36 कोटींहून अधिक स्वदेशी रोपे लावण्यात आली आणि 2.63 लाख अमृत वाटिका तयार करण्यात आल्या.

मेरी माटी मेरा देश अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील घराघरा पर्यंत पोहोचण्यासाठी अमृत कलश यात्रा आयोजित करण्यात आल्या. संपूर्ण भारतातील ग्रामीण भागातील 6 लाखांहून अधिक गावांमधून आणि शहरी प्रभागांमधून माती आणि तांदूळ गोळा करण्यात आले. प्रत्येक गावातून गोळा केलेली माती प्रभाग स्तरावर एकत्र करण्यात आली आणि नंतर राज्याच्या राजधानीत आणली गेली आणि हजारो अमृत कलश यात्रींसह समारंभपूर्वक देशाच्या राजधानीमध्ये रवाना करण्यात आली.

 

S.Tupe/R Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1972125) Visitor Counter : 376