पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

शिर्डी इथे विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन, उद्घाटन आणि लोकार्पण करताना पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 26 OCT 2023 6:52PM by PIB Mumbai

छत्रपति परिवार नमस्कार.

महाराष्ट्राचे राज्यपाल श्रीमान रमेश बैस जी, इथले कार्यकुशल मुख्यमंत्री श्रीमान एकनाथ शिंदे जी, उप-मुख्यमंत्री देवेंद्र जी, अजित जी, केंद्र  आणि  राज्य सरकारचा  मंत्रीवर्ग, खासदार, आमदार आणि आम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी  मोठ्या संख्येने  आलेले माझे कुटुंबीय !

शिर्डीच्या या पावन भूमीला माझे  कोटी कोटी नमन! पाच वर्षांपूर्वी या पवित्र मंदिराला शंभर वर्ष पूर्ण झाली तेव्हा मला साई दर्शनाची संधी मिळाली होती. आज इथे साईबाबांच्या  आशीर्वादाने साडेसात हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमी पूजन आणि लोकार्पण झाले आहे. महाराष्ट्राला पाच दशकांपासून ज्या निळवंडे धरणाची प्रतीक्षा होती.... ते कामही पूर्ण झाले आहे, मला आत्ता जल पूजन करण्याचे भाग्य लाभले आहे. आज मंदिराशी संबंधित ज्या प्रकल्पांचे लोकार्पण झाले आहे त्याचे भूमिपूजन करण्याची संधीही मला मिळाली होती.दर्शन रांग प्रकल्प पूर्ण झाल्याने देश-विदेशातल्या भाविकांची मोठी सोय होईल.

मित्रांनो,

आज सकाळीच एक दुःखद बातमी मिळाली, देशाचे अनमोल रत्न, वारकरी संप्रदायाचे वैभव, हरी भक्त, बाबामहाराज सातारकर वैकुंठवासी झाल्याची. कीर्तन, प्रवचन यांच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधनाचे केलेलं कार्य भावी पिढ्यांना शतकानुशतके प्रेरणा देईल. सोपी आणि रसाळ वाणी, त्यांची शैली लोकांना मुग्ध करत असे. त्यांच्या ‘जय जय रामकृष्ण हरी’ भजनाचा अद्भुत प्रभाव आपण पाहिला आहे. बाबामहाराज सातारकर जी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

माझ्या कुटुंबियांनो,

देशातून गरीबीचे उच्चाटन व्हावे, गरीबातल्या गरीब कुटुंबाला पुढे येण्याची संधी मिळावी हाच खरा सामाजिक न्याय आहे.सबका साथ,सबका विकास हा मंत्र घेऊन आमचे सरकार वाटचाल करत आहे. गरीब कल्याणाला आमच्या दुहेरी इंजिन सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. आज देशाची अर्थव्यवस्था विस्तारत असताना गरीब कल्याणासाठीच्या सरकारच्या निधीतही वाढ करण्यात येत आहे.

आज महाराष्ट्रात 1 कोटी 10 लाख आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात येत आहेत.सर्व कार्ड धारकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळण्याची खात्री आहे. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत गरिबांना मोफत उपचार देण्यासाठी देशाने 70 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. गरिबांना मोफत अन्नधान्य योजनेवरही देशाने 4 लाख कोटीहून जास्त खर्च केला आहे. गरिबांसाठी घरे उभारण्याकरिता सरकारने 4 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. 2014 च्या पूर्वीच्या 10 वर्षांच्या तुलनेत हा आकडा सुमारे सहापट अधिक आहे. हर घर जल साठी आतापर्यंत सुमारे 2 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत फेरीवाले,पदपथावर दुकान असलेल्यांना हजारो रुपयांची मदत मिळत आहे.

सरकारने नुकतीच आणखी एक नवी योजना सुरु केली आहे- पीएम विश्वकर्मा योजना. या योजनेतून सुतार,सोनार,कुंभार,मूर्तिकार अशा लाखो कुटुंबांना पहिल्यांदाच सरकार कडून मदत सुनिश्चित झाली आहे. या योजनेवरही 13 हजार कोटी रुपयांहून जास्त खर्च केला जात आहे. आत्ता मी  जे इतके आकडे सांगितले आहेत, लाखो-करोडो रुपयांचे आकडे सांगत आहे, 2014 पूर्वीही आपण आकडे ऐकत होतात मात्र ते आकडे कशाचे असत तर इतक्या लाखाचा भ्रष्टाचार,  इतक्या कोटीचा भ्रष्टाचार, इतक्या लाख-कोटीचा घोटाळा. आता काय असते तर इतके लाख - कोटी रुपये या कामासाठी खर्च केले, इतके लाख - कोटी रुपये या कामासाठी खर्च केले.

माझ्या कुटुंबियांनो,

आजच्या कार्यक्रमात इतक्या मोठ्या संख्येने आपले शेतकरी बांधव उपस्थित आहेत. आपल्या शेतकरी समाजाला संदेश देण्यासाठी ‘धरती करे पुकार’ अशी उत्तम नाटिका आत्ताच आपल्या समोर सादर करणाऱ्या  सर्व कन्यांचे मी खूप-खूप अभिनंदन करतो. यातला संदेश आपण नक्कीच घ्याल.या सर्व कन्यांचे मी खूप-खूप अभिनंदन करतो.

माझ्या कुटुंबियांनो,

यापूर्वी शेतकऱ्यांची कोणी दखल घेत नसे.माझ्या शेतकरी बांधवांसाठी आम्ही पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली. याद्वारे देशभरातल्या कोट्यवधी छोट्या शेतकऱ्यांना 2 लाख 60 हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत.महाराष्ट्रातल्या छोट्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 26 हजार कोटी रुपये हस्तांतरित झाले आहेत.महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरु केली आहे याचा मला आनंद आहे. याअंतर्गत महाराष्ट्रातल्या शेतकरी कुटुंबांना 6 हजार रुपये अतिरिक्त दिले जातील. म्हणजे आता इथल्या छोट्या शेतकऱ्यांना सन्मान निधीचे 12 हजार रुपये मिळतील.

माझ्या  कुटुंबियांनो,

शेतकऱ्यांच्या नावावर मतांचे राजकारण करणाऱ्यांनी पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तुम्हाला तरसवले आहे.  आज निळवंडे प्रकल्पाचे जलपूजन करण्यात आले. याला 1970 मध्ये मंजूरी मिळाली होती. 1970 मध्ये.  विचार करा, हा प्रकल्प पाच दशकांपासून प्रलंबित होता. आमचे सरकार आल्यावर यावर वेगाने काम झाले. आता डाव्या कालव्यातून लोकांना पाणी मिळण्यास सुरुवात झाली असून लवकरच उजवा कालवाही सुरू होणार आहे. बळीराजा जल संजीवनी योजनाही राज्यातील दुष्काळग्रस्त भागांसाठी वरदान ठरत आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले महाराष्ट्रातील आणखी 26 सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार काम करत आहे. याचा आपल्या शेतकऱ्यांना आणि दुष्काळग्रस्त भागाला मोठा फायदा होणार आहे.  पण आज जेव्हा या धरणातून पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे, तेव्हा माझ्या सर्व शेतकरी बंधू-भगिनींना माझी प्रार्थना आहे, हे पाणी परमात्म्याचा प्रसाद आहे, पाण्याचा एक थेंबही वाया जाता कामा नये - प्रत्येक थेंब अधिक पीक. जे काही आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याचा आपण उपयोग करायला हवा.

माझ्या कुटुंबियांनो,

खरेपणाने आम्ही शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहोत.  मात्र महाराष्ट्रात, काही लोकांनी शेतकऱ्यांच्या नावावर फक्त आणि फक्त राजकारणच केले आहे. महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ नेते अनेक वर्षे केंद्र सरकारमध्ये कृषिमंत्री होते. मी त्यांचा वैयक्तिक पातळीवर आदरही करतो. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?  त्यांच्या 7 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी देशभरातील शेतकर्‍यांकडून केवळ 3.5 लाख कोटी रुपयांचे धान्य हमीभावाने (एमएसपीवर) खरेदी केले, हा आकडा लक्षात ठेवा, 7 वर्षात.  तर आमच्या सरकारने 7 वर्षांच्या याच कालावधीत 13.5 लाख कोटी रुपये हमीभावाच्या (एमएसपीच्या) रूपात शेतकऱ्यांना दिले आहेत. 2014 पूर्वी शेतकऱ्यांकडून केवळ 500-600 कोटी रुपयांच्या डाळी आणि तेलबियांची हमीभावाने खरेदी केली जात होती.  तर आमच्या सरकारने डाळी आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1 लाख 15 हजार कोटींहून अधिक रक्कम जमा केली आहे. ते कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना पैशासाठीही मध्यस्थांवर अवलंबून राहावे लागत होते. अनेक महिने शेतकऱ्यांना मोबदला मिळत नसे. आमच्या सरकारने हमीभावाचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था केली आहे.

मित्रांनो,

नुकताच रब्बी पिकांसाठी एमएसपी जाहीर करण्यात आला आहे.  हरभऱ्याच्या एमएसपीमध्ये 105 रुपयांनी, गहू आणि करडईच्या एमएसपीमध्ये 150 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याचा महाराष्ट्रातील आमच्या शेतकरी बांधवांना खूप फायदा होईल.  ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचीही आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत.  उसाचा भाव 315 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. गेल्या 9 वर्षांत सुमारे 70 हजार कोटी रुपयांचे इथेनॉल खरेदी करण्यात आले आहे  हा पैसा ऊस शेतकऱ्यांपर्यंतही पोहोचला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळावेत, यासाठी साखर कारखाने आणि सहकारी संस्थांना हजारो कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.

माझ्या कुटुंबियांनो,

आमचे सरकार सहकार चळवळ मजबूत करण्याचेही काम करत आहे.  देशभरात 2 लाखांहून अधिक सहकारी संस्था स्थापन होत आहेत. देशातील शेतकऱ्यांना अधिकाधिक साठवणूक आणि शीतगृहाची सुविधा मिळावी, यासाठी सहकारी संस्था आणि पीएसीएस यांना मदत केली जात आहे.  एफपीओ म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यमातून लहान शेतकऱ्यांचे संघटन केले जात आहे.  सरकारच्या प्रयत्नांमुळे आत्तापर्यंत देशभरात 7500 हून अधिक एफपीओ तयार झाले आहेत.

माझ्या कुटुंबियांनो,

महाराष्ट्र हे अपार सामर्थ्य आणि अगणित शक्यतांचे केंद्र राहिले आहे.  जितक्या वेगाने महाराष्ट्राचा विकास होईल तितक्याच वेगाने भारत विकसित होईल. काही महिन्यांपूर्वी मला मुंबई आणि शिर्डीला जोडणाऱ्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याची संधी मिळाली. महाराष्ट्रात रेल्वेच्या विस्ताराची ही प्रक्रिया सातत्याने सुरूच आहे. जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग सुरू झाल्याने मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील वाहतूक सुलभ होणार आहे.  त्याचप्रमाणे सोलापूर ते बोरगाव या चौपदरी रस्त्याच्या बांधकामामुळे संपूर्ण कोकण विभागाची संपर्क व्यवस्था सुधारेल. याचा फायदा केवळ उद्योगांनाच होणार नाही, तर ऊस, द्राक्ष, हळद उत्पादक शेतकऱ्यांनाही फायदा होणार आहे. ही संपर्क व्यवस्था केवळ वाहतुकीसाठीच नव्हे तर प्रगती आणि सामाजिक विकासासाठी एक नवीन मार्ग तयार करेल. पुन्हा एकदा, तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्यासाठी आलात, मी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार  व्यक्त करतो आणि या आपण सगळे एकत्र येऊन, 2047 मध्ये, जेव्हा आपण स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण करू, तेव्हा भारताला जगामध्ये 'विकसित भारत' म्हणून ओळखले जाईल हा संकल्प घेऊन मार्गस्थ होऊ या.

 खूप खूप धन्यवाद.

***

NM/ Nilima C/ Vinayak Ghode/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1971921) Visitor Counter : 145