पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील नागापट्टिनम आणि श्रीलंकेतील कानकेसंथुराई, दरम्यानच्या फेरी सेवेच्या उदघाटन समारंभाला केले संबोधित.
भारत आणि श्रीलंका, राजनैतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने एका नवीन अध्यायाला सुरुवात करत आहे.
फेरी सेवांमुळे सर्व ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बंध झाले पुनरुज्जीवित
केवळ दोन शहरांना जोडणे म्हणजे संपर्क अर्थात कनेक्टिव्हिटी नव्हे तर यामुळे दोन देश अधिक जवळ येतात आणि दोन्ही राष्ट्रांमधील नागरिकांमधला जिव्हाळा वाढीस लागतो
प्रगती आणि विकासाकरता केलेली भागीदारी ही भारत आणि श्रीलंकेतील द्विपक्षीय संबंधांमधील एक मजबूत आधारस्तंभ आहे.
श्रीलंकेत भारताच्या साहाय्यानं सुरु केलेल्या प्रकल्पांनी लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे.
Posted On:
14 OCT 2023 8:58AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतातील नागापट्टिनम आणि श्रीलंकेतील कानकेसंथुराई, दरम्यानच्या फेरी सेवेच्या उदघाटन समारंभाला संबोधित केले.
भारत आणि श्रीलंका, राजनैतिक आणि आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने एका नवीन अध्यायाला सुरुवात करत असून नागापट्टिनम आणि श्रीलंकेतील कानकेसंथुराई, दरम्यानच्या फेरी सेवेच्या आरंभामुळे दोन्ही देशातील संबंध दृढ करण्याच्या दिशेने एक निर्णायक टप्पा गाठला गेला आहे, असे पंतप्रधान यावेळी आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना म्हणाले.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सांस्कृतिक, वाणिज्यिक आणि नागरी संस्कृतीचा सामायिक इतिहास अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की नागापट्टिनम आणि त्यालगतची अनेक शहरे श्रीलंकेसह इतर अनेक देशांबरोबरच्या सागरी व्यापारासाठी प्रसिद्ध तर आहेतच शिवाय प्राचीन तामिळ साहित्यामध्ये पुमपुहारचा उल्लेख एक मध्यवर्ती केंद्र म्हणून केलेला आढळतो. याशिवाय पट्टिनप्पलाई आणि मणिमेकलाई यांसारख्या संगम युगाच्या साहित्यात दोन्ही देशांमधील बोटी आणि जहाजांच्या आगमन - निर्गमनाचे वर्णन केलेले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच त्यांनी थोर कवी सुब्रमणिया भारती यांच्या 'सिंधू नदीं मिसाई' गीताचा देखील उल्लेख केला ज्यामध्ये भारत आणि श्रीलंकेतील सेतूचे वर्णन केले आहे. फेरी सेवांमुळे सर्व ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बंध पुनरुज्जीवित झाले असे त्यांनी सांगितले.
दोन्ही देशांनी कनेक्टिव्हिटी अर्थात संपर्काला केंद्रस्थानी ठेवून आर्थिक भागीदारीसाठी एका दूरदृष्टीपूर्ण दस्तावेजाचा संयुक्तपणे स्वीकार केला आहे, असे श्रीलंकेचे राष्ट्रपती विक्रमसिंघे यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान सांगितल्याचे पंतप्रधान म्हणाले. केवळ दोन शहरांना जोडणे म्हणजे संपर्क अर्थात कनेक्टिव्हिटी नव्हे तर यामुळे दोन देश अधिक जवळ येतात आणि दोन्ही राष्ट्रांमधील नागरिकांमधला जिव्हाळा वाढीस लागतो. संपर्कयंत्रणेमुळे व्यापार, पर्यटन आणि नागरिकांमधील आपसातले संबंध दृढ होतातच शिवाय दोन्ही राष्ट्रांमधील युवकांसाठी नवीन संधी उपलब्ध होतात, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी आपल्या 2015 मधील श्रीलंका भेटीचे स्मरण केले ज्यावेळी नवी दिल्ली आणि कोलंबो दरम्यान थेट विमानसेवेचा शुभारंभ करण्यात आला होता. श्रीलंकेतून कुशीनगर या तीर्थक्षेत्री आलेल्या पहिल्या विमानाचा आगमन सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला होता, जाफना आणि चेन्नई यांच्यातली थेट विमानसेवा 2019 मध्ये सुरु झाली होती, आणि नागपट्टिनम आणि कनकेसंथुराई दरम्यानच्या फेरी सेवेचा प्रारंभ हा या दिशेने गाठलेला एक महत्वाचा टप्पा आहे, असे ते म्हणाले.
संपर्कयंत्रणेमागील आमची दूरदृष्टी वाहतूक क्षेत्रापुरती मर्यादित नाही, तर भारत आणि श्रीलंका हे दोन्ही देश फिनटेक पासून ऊर्जा क्षेत्रापर्यंत विविध क्षेत्रांमध्ये नजीकचे सहकार्य करत आहेत, याचा त्यांनी उल्लेख केला. भारतामध्ये युपीआयच्या माध्यमातून डिजिटल देयके ही एक जनचळवळ आणि जीवनशैली झाली असून दोन्ही सरकारे युपीआय आणि लंका पे ला लिंक करून फिन-टेक क्षेत्रातील कनेक्टिव्हिटीवर काम करत असल्याची माहिती त्यांनी दिली. भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या विकासयात्रेसाठी ऊर्जा सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याने ऊर्जा सुरक्षा आणि विश्वासार्हता वाढवण्यासाठी दोन्ही देशांमधील ऊर्जा ग्रीड्स जोडण्यावरही त्यांनी भर दिला.
प्रगती आणि विकासाकरता केलेली भागीदारी ही भारत आणि श्रीलंकेतील द्विपक्षीय संबंधांमधील एक मजबूत आधारस्तंभ आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. विकासाचा लाभ प्रत्येकाला मिळावा आणि त्यापासून कोणीही वंचित राहू नये अशी आमची विचारसरणी आहे, श्रीलंकेत भारताच्या साहाय्यानं सुरु केलेल्या प्रकल्पांनी लोकांच्या जीवनाला स्पर्श केला आहे, असे ते म्हणाले. उत्तर प्रांतात गृहनिर्माण, पाणी, आरोग्य आणि उपजीविका विषयक अनेक प्रकल्प पूर्ण झाले असून कनकेसंथुराई बंदराच्या अद्ययावतीकरणासाठी सहकार्याचा हात पुढे करताना अतिशय आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. मग ते उत्तरेला दक्षिणेशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गाची निर्मिती असो, प्रतिष्ठेच्या जाफना सांस्कृतिक केंद्राचे बांधकाम असो संपूर्ण श्रीलंकेत आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे कार्य असो किंवा डिक ओया येथील मल्टी-स्पेशालिटी रुग्णालय असो, आम्ही सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास या तत्वाने मार्गक्रमण करत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.
भारताच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जी 20 शिखर परिषदेबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की भारताच्या वसुधैव कुटुंबकं या दृष्टीचे आंतरराष्ट्रीय समुदायाने स्वागत केले आहे. या तत्वाचाच एक भाग म्हणजे प्रगती आणि विकासाचे लाभ शेजारील राष्ट्रांशी देखील सामायिक करणे हा होय. जी 20 शिखर परिषदेदरम्यान झालेल्या मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर च्या स्थापनेमुळे त्या संपूर्ण प्रदेशात मोठा आर्थिक प्रभाव निश्चितच जाणवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दोन्ही देशांमधील बहुशाखीय संपर्क यंत्रणा मजबूत झाल्यास त्याचा लाभ श्रीलंकेतील नागरिकांना देखील होईल, असे ते म्हणाले. फेरी सेवेच्या यशस्वी आरंभाबद्दल पंतप्रधानांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती, तेथील सरकार आणि नागरिकांचे आभार मानले. रामेश्वरम आणि तलाईमन्नार दरम्यान फेरी सेवा पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने काम करण्याबाबतही त्यांनी सांगितले. दोन्ही राष्ट्रांमधील नागरिकांच्या परस्पर हितासाठी श्रीलंकेसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याकरता भारत वचनबद्ध आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
***
NikitaJ/BhaktiS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1967613)
Visitor Counter : 142
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam