गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

‘एक तारीख एक घंटा एक साथ’उपक्रम


स्वेच्छा स्वच्छता अभियानाने घडवला नवा विक्रम

स्वच्छ भारत अभियानाने 9 लाखांहून अधिक ठिकाणी श्रमदानाकरिता 8.75 कोटी लोकांना आणले एकत्र

Posted On: 03 OCT 2023 6:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2023

1 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता स्वच्छ भारताच्या प्रवासात नवा इतिहास रचला जात असल्याचे पहायला मिळाले. देशभरात भव्य  स्वच्छता मोहिमेत स्वेच्छेने श्रमदान करण्यासाठी कोट्यवधी नागरिकांनी पुढाकार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय फिटनेस इन्फ्लुएन्सर अंकित बैयनपुरिया यांच्यासोबत श्रमदानात सहभागी झाले. त्यांनी ट्विट केले, "आज, ज्याप्रमाणे देश स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करत आहे, अंकित बैयनपुरिया आणि मी देखील तेच केले!  स्वच्छतेच्या पलीकडे जाऊन आम्ही तंदुरुस्ती आणि निरामय आरोग्य यांची सांगड घातली. हे सर्व स्वच्छ आणि आरोग्यसंपन्न  भारतासाठी  आहे!

नागरिकांच्या नेतृत्वाखालील या भव्य  स्वच्छता मोहिमेत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश, गावे आणि शहरांमधून सहभाग दिसून आला आहे.  एकूण 9 लाखांहून अधिक ठिकाणी  सुमारे 8.75 कोटी लोक सहभागी झाले. रस्ते, महामार्ग आणि पथकर नाके, रेल्वेमार्ग  आणि स्थानके , आरोग्य संस्था, अंगणवाडी केंद्र, वारसा आणि पर्यटन स्थळे, निवासी वसाहती, जलाशय , प्रार्थनास्थळे, झोपडपट्ट्या, बाजार परिसर, विमानतळ आणि आसपासचा परिसर,प्राणीसंग्रहालय आणि वन्यजीव क्षेत्र, गौशाळा इ. ठिकाणी  स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

या दिवशी अनेक गोष्टी प्रथमच घडल्या. देशभरात भव्य स्वच्छता मोहिमेला चालना मिळाली, ज्यात पंचायत, नगरपालिका, जिल्हे आणि राज्याच्या सीमा ओलांडून  स्वच्छतेने सर्वांना एकत्र आणले.  स्थानिक राजकीय नेतृत्वासह अनेक राज्यपाल, मुख्यमंत्री, हजारो नागरी संस्था आणि जनतेसह सहभागी  झाले. जवान, नागरिक, एनसीसी, एनएसएस आणि एनवायके स्वयंसेवक, बचत गट , स्वयंसेवी संस्था , नागरी कल्याण संस्था , बाजार संघटना, उद्योग संस्था, धार्मिक नेते, प्रसिद्ध व्यक्ती , प्रभावशाली व्यक्ती , युट्युबर्स ,  कलाकार मंडळी या भव्य उपक्रमासाठी एकत्र आली.क्रेडाई, सीआयआय , फिक्की, असोचॅम , ब्रिटानिया , बजाज, आदित्य बिर्ला, अमेझॉन इत्यादींनीही यात सहभाग नोंदवला. चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन, रजनीकांत, इलयाराजा, भारतीय क्रिकेट संघाचे सदस्य आणि इतर अनेक मान्यवर सर्वांना एकत्र आणण्यासाठी या मोहिमेत सहभागी झाले.

केंद्र सरकारच्या मंत्रालयांतर्गत विविध संघटनांनी पुढाकार घेत अनोखे उपक्रम सादर केले. केंद्रीय मंत्रीही विविध ठिकाणी श्रमदानात सहभागी झाले. ‘संपूर्ण सरकार’ या  दृष्टिकोनामुळे एकाच वेळी लाखो ठिकाणी श्रमदान करणाऱ्या स्वयंसेवकांसाठी उत्तम सुविधा उपलब्ध होत्या.

सर्व ठिकाणी दिसून आलेल्या स्वच्छतेतून लोकांच्या या सामूहिक कृतीचा परिणाम नक्कीच जाणवला. स्वच्छ भारत अभियानाच्या  9 वर्षात, सामूहिक प्रयत्नांचे सामर्थ्य अधोरेखित करत  अनेक वेळा लोक एकत्र आले आहेत. स्वच्छ राष्ट्रासाठी एवढ्या मोठ्या संख्येने   एका तासासाठी एकत्र येऊन स्वेच्छेने योगदान देण्याचा लोकांचा हा प्रयत्न जगात एक प्रकारे अनोखा आहे.

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1963775) Visitor Counter : 108