पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी यूट्यूब फॅनफेस्ट इंडिया 2023 मध्ये यूट्यूबर्सना केले संबोधित


“मी माझ्या यूट्यूब चॅनेलद्वारे देश आणि जगाशीही जोडलो गेलो आहे. माझ्याकडेही मोठ्या संख्येने सबस्क्राईबर्स आहेत”

"एकत्रितरित्या आपण आपल्या देशातील मोठ्या लोकसंख्येच्या जीवनात परिवर्तन घडवू शकतो"

"राष्ट्राला जागृत करा, यासाठी चळवळ सुरू करा"

"माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा"

Posted On: 27 SEP 2023 10:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 सप्‍टेंबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यूट्यूब फॅनफेस्ट इंडिया 2023 मध्ये यूट्यूबर्सच्या समुदायाला संबोधित केले. पंतप्रधानांनी देखील युट्यूबवर आपला 15 वर्षांचा प्रवास पूर्ण केला असून या कार्यक्रमात त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून जागतिक प्रभाव निर्माण करण्याचा आपला अनुभव सामाईक केला.

युट्यूब समुदायाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी त्यांचा 15 वर्षांचा युट्यूब प्रवास पूर्ण झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. आज आपण एक सहकारी युट्यूबर म्हणून येथे उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बोलताना  “15 वर्षांपासून”, यावर पंतप्रधानांनी भर दिला, “मी माझ्या यूट्यूब चॅनेलद्वारे देश आणि जगाशी देखील जोडला गेलो आहे. माझ्याकडेही मोठ्या संख्येने सब्स्क्रायबर्स  आहेत.”, असे पंतप्रधान म्हणाले.

5,000 निर्माते आणि महत्वाकांक्षी निर्मात्यांच्या मोठ्या समुदायाच्या उपस्थितीची नोंद घेऊन पंतप्रधानांनी गेमिंग, तंत्रज्ञान, फूड ब्लॉगिंग, ट्रॅव्हल ब्लॉगर्स आणि जीवनशैली इन्फल्युएंसर्स मधील निर्मात्यांचा उल्लेख केला.

आशय निर्मात्यांचा भारतातील लोकांवर होणारा प्रभाव पाहून पंतप्रधानांनी हा प्रभाव अधिक प्रभावी बनवण्याच्या संधीवर भर दिला आणि ते म्हणाले, "एकत्रितरित्या आपण आपल्या देशातील मोठ्या लोकसंख्येच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू शकतो." कोट्यवधी लोकांना सहजपणे शिकवून आणि महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगून आपण आणखी अनेक व्यक्तींना सक्षम आणि बळकट करण्यासाठी प्रयत्न करु शकतो याचा त्यांनी उल्लेख केला. "आपण त्यांना आपल्याशी जोडू शकतो", असे पंतप्रधान म्हणाले.

आपल्या  यूट्यूब चॅनेलवर हजारो व्हिडिओ आहेत हे लक्षात घेऊन पंतप्रधान म्हणाले की, परीक्षेचा ताण, अपेक्षा व्यवस्थापन आणि उत्पादकता यासारख्या विषयांवर त्यांनी आपल्या देशातील लाखो विद्यार्थ्यांशी यूट्यूबच्या माध्यमातून संवाद साधलेले व्हिडीओ त्यांच्यासाठी सर्वाधिक समाधान देणारे आहेत.

लोकचळवळ , जिथे जनतेची शक्तीच चळवळीच्या यशाचा आधार असते, या वस्तुस्थितीशी निगडीत असलेल्या विषयांवर बोलताना पंतप्रधानांनी सर्वप्रथम स्वच्छ भारत अभियानाचा उल्लेख केला आणि हे अभियान गेल्या नऊ वर्षांत सर्वांचा सहभाग असलेली एक मोठी मोहीम बनले असल्याचे त्यांनी सांगितले.

“लहान मुलांनी त्यामध्ये भावनिक शक्तीची भर घातली. सेलिब्रिटींनी त्याला नवी उंची दिली, देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी याला मिशनमध्ये रूपांतरित केले आणि तुमच्या सारख्या यु ट्युबर्सनी स्वच्छतेला अधिक ‘कूल’ बनवले” असे  ते पुढे म्हणाले. स्वच्छता ही भारताची ओळख बनेपर्यंत ही चळवळ थांबवू नका, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. “स्वच्छतेला तुमच्यापैकी प्रत्येकाने प्राधान्य द्यायलाच हवे”, यावर त्यांनी भर दिला.

दुसरे म्हणजे, पंतप्रधानांनी डिजिटल पेमेंटचा उल्लेख केला. युपीआय (UPI) च्या यशामुळे जगभरातील डिजिटल पेमेंटमध्ये भारताने मिळवलेला 46 टक्के वाटा लक्षात घेऊन, पंतप्रधानांनी यु ट्युबर समुदायाला आवाहन केले की, त्यांनी देशातील अधिकाधिक लोकांना डिजिटल पेमेंटचा वापर करण्यासाठी प्रेरित करावे, तसेच त्यांना आपल्या व्हिडिओद्वारे सोप्या भाषेत डिजिटल पेमेंट करायला शिकवावे.

तिसरी गोष्ट म्हणजे, पंतप्रधानांनी व्होकल फॉर लोकलचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आपल्या देशात अनेक उत्पादने स्थानिक स्तरावर तयार केली जातात आणि स्थानिक कारागिरांचे कौशल्य आश्चर्यकारक आहे. त्यांनी यु ट्युबर समुदायाला आवाहन केले की त्यांनी आपल्या व्हिडिओंद्वारे या कारागिरांना प्रोत्साहन द्यावे आणि भारताचे स्थानिक उत्पादन जागतिक स्तरावर न्यायला मदत करावी.

आपल्या मातीचा आणि भारतातील मजूर आणि कारागीरांच्या घामाचा गंध असलेली उत्पादने खरेदी करण्याचे भावनिक आवाहन करत पंतप्रधान म्हणाले की, “ खादी असो, हस्तकला असो, हातमाग वस्त्र असो किंवा इतर काहीही असो. देशाला जागे करा, चळवळ सुरू करा.”

युट्यूबर्सनी आपल्या व्हिडीओच्या प्रत्येक भागाच्या शेवटी एक प्रश्न विचारून लोकांना काहीतरी कृती करण्यासाठी प्रवृत्त करावे असे पंतप्रधानांनी सुचवले. “लोक काही उपक्रम अमलात आणून ते  तुमच्या बरोबर शेअर करू शकतील. अशा प्रकारे, तुमची लोकप्रियताही वाढेल, आणि लोक केवळ ऐकणार नाहीत, तर अनेक  उपक्रमांमध्ये सहभागी  होतील”,असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी समुदायाला संबोधित करताना आनंद व्यक्त केला आणि प्रत्येक युट्यूबर  आपल्या व्हिडिओच्या शेवटी जे म्हणतो, ते सांगून समारोप केला. “माझे चॅनेल सबस्क्राईब करा आणि माझे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा” असे सांगत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

* * *

S.Kane/Shraddha/Rajshree/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1961521) Visitor Counter : 139