Posted On:
23 SEP 2023 3:10PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसी येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी केली. वाराणसीतील गंजरी, रजतलाब येथे सुमारे 450 कोटी रुपये खर्चून हे आधुनिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम विकसित केले जाईल आणि त्याचे क्षेत्रफळ 30 एकरपेक्षा जास्त असेल.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी वाराणसीला पुन्हा एकदा भेट देण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि या शहराला भेट देण्याचा आनंद शब्दांच्या पलीकडचा असल्याची भावना व्यक्त केली. गेल्या महिन्याच्या 23 तारखेला चांद्रयान चंद्रावर शिवशक्ती स्थानावर उतरले होते, त्यानंतर बरोबर एक महिन्यानंतर, त्याच तारखेला आपण काशीला भेट देत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. “शिवशक्तीचे एक स्थान चंद्रावर आहे, तर दुसरे स्थान काशी येथे आहे” असे सांगत पंतप्रधानांनी या महत्त्वपूर्ण यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.
माता विंध्यवासिनी धाम आणि काशी नगरीला जोडणाऱ्या मार्गावर या स्टेडियमचे स्थान असून माजी केंद्रीय मंत्री राज नारायण जी यांचे गाव मोतीकोट येथून जवळच असल्याचे सांगत त्यांनी या ठिकाणाचे महत्त्व नमूद केले.
भगवान महादेवाला समर्पित या आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या रचनेमुळे काशीतील नागरिकांमध्ये अभिमानाची भावना निर्माण झाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
ते म्हणाले की या स्टेडियममध्ये उत्कंठावर्धक क्रिकेट सामने पाहायला मिळतील तसेच युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्टेडियममध्ये प्रशिक्षण घेण्याची संधी मिळेल. याचा काशीच्या नागरिकांना मोठा लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले.
क्रिकेटच्या माध्यमातून जग भारताशी जोडले जात आहे आणि अनेक नवीन देश क्रिकेट खेळत असल्यामुळे सामन्यांची संख्या देखील वाढली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. हे आंतरराष्ट्रीय स्टेडियम येत्या काही वर्षांतील स्टेडियमची वाढती मागणी पूर्ण करेल असे ते म्हणाले. बीसीसीआयने दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.
अशा प्रकारच्या क्रीडा विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाचा केवळ खेळांवरच सकारात्मक परिणाम होत नाही तर प्रादेशिक अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होतो असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. अशा प्रकारच्या विकासामुळे मोठ्या संख्येने लोक त्या-त्या ठिकाणांना भेट देतात, ज्यामुळे त्या भागातील हॉटेल्स, उपाहारगृहे, रिक्षा आणि ऑटो ड्रायव्हर्स तसेच नाविक यांसारख्या क्षेत्रांना मोठा फायदा होतो असे त्यांनी नमूद केले. क्रीडा प्रशिक्षण आणि व्यवस्थापन संस्थांवरही याचा सकारात्मक परिणाम होत असून त्यामुळे युवकांसाठी क्रीडा संबंधित स्टार्टअप्समध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. फिजिओथेरपी अभ्यासक्रमांचा देखील त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की आगामी काळात वाराणसीमध्ये एक नवीन क्रीडा उद्योग आकाराला येण्याची शक्यता आहे.
पंतप्रधानांनी पालकांचा खेळाकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन अधोरेखित केला. “आता देशाची भावना – जो खेळेल तोच बहरेल (जो खेलेगा वो ही खिलेगा) अशी आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी शहडोलला नुकत्याच दिलेल्या भेटीचे स्मरण केले आणि त्या भेटीदरम्यान तिथल्या एका आदिवासी खेड्यातील तरुणांशी झालेला संवाद आणि तेथील ‘मिनी ब्राझील’बद्दलचा स्थानिक अभिमान तसेच तेथील युवकांच्या फुटबॉलबद्दलच्या नितांत प्रेमाचेही स्मरण केले.
काशीमध्ये क्रीडाक्षेत्रात झालेल्या बदलाचेही पंतप्रधानांनी वर्णन केले. काशीतील तरुणांना जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे पंतप्रधान म्हणाले. म्हणूनच या स्टेडियमसह सिग्रा स्टेडियमवर 400 कोटी रुपये खर्च करून 50 पेक्षा जास्त क्रीडाप्रकारांसाठी सुविधा विकसित केल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले. हे दिव्यांगांसाठी अनुकूल असेलले पहिले बहु-क्रीडा संकुल असेल, असे ते म्हणाले. नवीन बांधकामासोबतच जुन्या प्रणालींमध्येही सुधारणा करण्यात येत आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
भारताचे अलीकडचे क्रीडा जगतातील यश हे बदललेल्या दृष्टिकोनाचे फलित आहे, कारण आता खेळांना युवकांच्या फिटनेस, रोजगार आणि कारकिर्दीबरोबर जोडले गेले आहे, असे पंतप्रधान म्हणाले. 9 वर्षांपूर्वीच्या तुलनेत यंदाच्या क्रीडा अर्थसंकल्पात तिपटीने वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खेलो इंडियाच्या अर्थसंकल्पात सुमारे 70 टक्के वाढ झाली आहे. शाळेपासून ते ऑलिम्पिकच्या व्यासपीठापर्यंत एखाद्या संघातील सदस्याप्रमाणे सरकार खेळाडूंना सोबत घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी यावेळी मुलींचा वाढता सहभाग आणि 'टॉप्स' योजनेचा उल्लेख केला.
पंतप्रधानांनी जागतिक विद्यापीठ खेळांवर प्रकाश टाकला, जिथे भारताने या वर्षी अधिक पदके जिंकून इतिहास रचला आहे. यावर्षी भारताने यापूर्वीच्या एकूण सहभागाच्या काळात जिंकलेल्या पदकांच्या बेरजेपेक्षा जास्त पदके कमावली आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनाही पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक गावात, शहराच्या कानाकोपऱ्यात क्रीडा क्षमता असल्याचा स्वीकार केला आणि या प्रतिभावंतांचा शोध घेऊन त्यांचे कौशल्य विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला. “छोट्या शहरातून आणि खेड्यांमधून आलेले तरुण आज देशाची शान बनले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांच्यासाठी अधिकाधिक संधी निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला. जेथे स्थानिक प्रतिभा ओळखली जाते अशा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेचे पंतप्रधानांनी उदाहरण दिले आणि सरकार त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू बनविण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले. या प्रसंगी क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांच्या उपस्थितीबद्दल आदर व्यक्त करत त्यांना काशीबद्दल असलेल्या आपुलकीबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे आभार मानले.
“नवीन प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना सुधारण्यासाठी चांगले प्रशिक्षक तसेच चांगले प्रशिक्षण तितकेच महत्त्वाचे आहे”, यावर पंतप्रधानांनी भर दिला. म्हणूनच, ज्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत त्यांना प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारण्यास प्रोत्साहित केले जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत देशातील युवा विविध खेळ आणि क्रीडा प्रकारांशी जोडले गेले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
ते म्हणाले की नव्या पायाभूत सुविधा लहान नगरे आणि गावांतील खेळाडूंना नव्या संधी उपलब्ध करून देतील. खेलो इंडिया उपक्रमातून निर्माण झालेल्या पायाभूत सुविधा मुलींसाठी लाभदायक ठरत आहेत याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत खेळ हा अभ्यासक्रमाव्यतिरिक्त करण्याचा उपक्रम न राहता त्याला एका संपूर्णपणे स्वतंत्र विषयाचा दर्जा देण्यात आला आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. मणिपूर येथे पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले तसेच उत्तर प्रदेशात देखील क्रीडाविषयक पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत असे ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी गोरखपूर येथील क्रीडा महाविद्यालयाचा विस्तार तसेच मीरत येथे मेजर ध्यानचंद विद्यापीठाची स्थापना इत्यादी उपक्रमांचा देखील उल्लेख केला.
देशाचा नावलौकिक किती महत्त्वाचा असतो याकडे सर्वांचे लक्ष वेधून त्यांनी, “देशाच्या विकासासाठी क्रीडाविषयक पायाभूत सुविधांचा विस्तार अत्यंत आवश्यक आहे,” या मुद्द्यावर अधिक भर दिला. जगातील अनेक शहरे जागतिक पातळीवरील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी सुप्रसिध्द आहेत, याचा उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी भारतात अशा जागतिक स्पर्धांचे आयोजन करण्यास सक्षम असलेल्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर अधिक भर दिला. पंतप्रधान म्हणले की हे क्रीडागार अशा प्रकारच्या विकासाच्या निर्धाराचे साक्षीदार असेल आणि ही वास्तू केवळ विटा आणि सिमेंट वापरून केलेली रचना नसेल तर ती भारताच्या भविष्याचे प्रतीक देखील असेल.
काशी शहराच्या विकासासाठी तेथील नागरिक जे प्रयत्न करत आहेत, त्याबद्दल त्यांना देखील पंतप्रधानांनी श्रेय दिले. “तुमच्याशिवाय काशी शहरात काहीच प्रत्यक्षात साकार होऊ शकत नाही. तुमचे पाठबळ आणि आशीर्वादासह आपण काशीच्या विकासाचे नवनवे अध्याय लिहित राहू,” असे पंतप्रधान भाषणाच्या शेवटी म्हणाले.
उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआयचे सचिव जय शाह तसेच सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रवी शास्त्री, कपिल देव, दिलीप वेंगसरकर, मदन लाल, गुंडाप्पा विश्वनाथ आणि गोपाळ शर्मा अशा माजी क्रिकेटपटूंसह उत्तर प्रदेश सरकारमधील अनेक मंत्री आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
पार्श्वभूमी
वाराणसी येथे उभारण्यात येत असलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम म्हणजे देशात जागतिक दर्जाच्या क्रीडाविषयक पायाभूत सुविधा विकसित करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. वाराणसी येथील राजतलाव भागात गंजरी येथे सुमारे साडेचारशे कोटी रुपये खर्च करून 30 एकरांहून अधिक क्षेत्रावर हे आधुनिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयम विकसित करण्यात येत आहे. भगवान शंकरांपासून प्रेरणा घेऊन या स्टेडीयमची संकल्पित वास्तुरचना करण्यात येत असून यामध्ये चंद्रकोरीच्या आकाराची छतांची आच्छादने, त्रिशुळाच्या आकाराचे दिवे, घाटावरील पायऱ्यांच्या आकारावर आधारित आसन व्यवस्था आणि दर्शनी भागात बिल्वपत्राच्या आकाराचे धातूचे पत्रे अशा विविध रचना विकसित करण्यात येत आहेत. या स्टेडीयमची प्रेक्षक क्षमता 30,000 इतकी आहे.
***
M.Pange/S.Kane/S.Mukhedkar/S.Chitnis/P.Kor