पंतप्रधान कार्यालय
संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधानांचे निवेदन
Posted On:
18 SEP 2023 11:23AM by PIB Mumbai
नमस्कार मित्रांनो,
चांद्र मोहिमेचे यश, चंद्रयान-3 आपला तिरंगा फडकवत आहे. शिवशक्ती पॉईंट नवे प्रेरणा केंद्र बनले आहे, तिरंगा पॉईंट आपला अभिमान वाढवत आहे. जगभरात जेव्हा अशी कामगिरी केली जाते तेव्हा त्याला आधुनिकता, विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी जोडून त्याकडे पाहिले जाते. आणि जेव्हा हे सामर्थ्य जगासमोर येते, तेव्हा भारतासाठी अनेक शक्यता, अनेक संधी आपल्या दारात येऊन उभ्या राहतात. जी -20 चे अभूतपूर्व यश, जगभरातील नेत्यांचे 60 हून अधिक ठिकाणी स्वागत, विचारमंथन आणि संघराज्य रचनेचा खऱ्या अर्थाने जिवंत अनुभव भारताची विविधता, भारताची वैशिष्ट्ये, जी -20 आपल्या विविधतेचा उत्सव बनला. आणि आपण जी -20 मध्ये ग्लोबल साउथचा आवाज बनल्याचा भारताला नेहमीच अभिमान असेल. आफ्रिकन संघाला मिळालेले स्थायी सदस्यत्व आणि जी -20 मध्ये एकमताने जारी झालेले घोषणापत्र या सर्व गोष्टी भारताच्या उज्ज्वल भविष्याचे संकेत देत आहेत.
काल यशोभूमी या आंतरराष्ट्रीय परिषद केंद्राचे राष्ट्रार्पण करण्यात आले. काल विश्वकर्मा जयंती होती, देशातील पारंपरिक कौटुंबिक कौशल्ये असलेल्या विश्वकर्मा समुदायाला प्रशिक्षण, आर्थिक व्यवस्थापन, आधुनिक साधने देऊन नव्या प्रकारचे हे विश्वकर्माचे सामर्थ्य भारताला विकासाच्या प्रवासात पुढे वाटचाल करण्यासाठी आपले योगदान देऊ शकते. भारताचा अभिमान वाढवणारे असे विविध प्रकारचे उत्सवी वातावरण, उत्साहाचे वातावरण, उल्हासाचे वातावरण आणि संपूर्ण देशात एक नवा आत्मविश्वास आपण सर्वजण अनुभवत आहोत. त्याचवेळी संसदेचे हे अधिवेशन, या पार्श्वभूमीवर संसदेचे हे अधिवेशन, हे अधिवेशन छोटे असले तरी काळाच्या दृष्टीने खूप मोठे आहे. हे ऐतिहासिक निर्णयांचे अधिवेशन आहे. या सत्राचे एक वैशिष्ट्य म्हणजे आता 75 वर्षांचा प्रवास नव्या टप्प्यावरून पुढे सुरू होत आहे. या टप्प्यावरचा 75 वर्षांचा प्रवास हा खूप प्रेरणादायी क्षण होता आणि आता तो प्रवास एका नव्या टप्प्यावरून पुढे नेत असताना, नवा संकल्प, नवी ऊर्जा, नव्या आत्मविश्वासासह 2047 च्या काळात या देशाला विकसित देश बनवायचेच आहे. त्यासाठी लागणारे सर्व निर्णय या नव्या संसद भवनात घेतले जाणार आहेत. आणि म्हणूनच संसदेचे हे सत्र अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे, मी सर्व आदरणीय खासदारांना आवाहन करतो की, अधिवेशन छोटे आहे, व्यथा मांडण्यासाठी खूप वेळ असतो तो कायमच असेल पण जल्लोषाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात जास्तीत जास्त वेळ त्यांनी या अधिवेशनात द्यावा. आयुष्यात असे काही क्षण असतात जे आपल्याला उत्साहाने भारून टाकतात, विश्वास निर्माण करतात, मी या छोट्या सत्राकडे त्या दृष्टीने पाहतो. मला आशा आहे की, जुन्या वाईट गोष्टींना मागे टाकून आपण चांगल्या गोष्टींसह नवीन सभागृहात प्रवेश करू आणि नवीन सभागृहात उत्तम गोष्टींचे मूल्य वाढवण्यात कोणतीही कसर सोडणार नाही, ही शपथ सर्व खासदारांनी घ्यावी. हा एक महत्वपूर्ण क्षण आहे.
उद्या गणेश चतुर्थीचा पवित्र सण आहे. गणेशजींना विघ्नहर्ता मानले जाते, आता भारताच्या विकासाच्या प्रवासात कोणतीही विघ्न येणार नाहीत. भारत सगळी स्वप्ने, सगळे संकल्प निर्विघ्नतेने पूर्ण करेल आणि म्हणूनच गणेश चतुर्थीच्या दिवशी हा नवा आरंभ नव्या भारताच्या सर्व स्वप्नांचे मूर्त स्वरूप बनेल, म्हणूनच हे सत्र छोटे असले तरी अत्यंत मोलाचे आहे.
***
Sonal T/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1958413)
Visitor Counter : 135
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam