पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जी-20 शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले निवेदन

Posted On: 09 SEP 2023 3:14PM by PIB Mumbai

 

मित्रांनो,

भारत विविध पंथ, आध्यात्म आणि परंपरांचे वैविध्य असलेला देश आहे. जगातील अनेक पंथांचा जन्म याच भूमीत झाला आहे आणि जगातील प्रत्येक धर्माला इथे सन्मान मिळाला आहे.

लोकशाहीची जननीह्या नात्याने, आमचा संवादावर आणि लोकशाही तत्वांवरचा विश्वास अनंत काळापासून अढळ आहे. आपले वैश्विक वर्तन, ‘वसुधैव कुटुंबकमम्हणजे संपूर्ण जग एकच कुटुंब आहेया मूलभूत तत्वावर आधारलेले आहे.

संपूर्ण जगाला एक कुटुंब म्हणून समजण्याचा आपला विचारच, प्रत्येक भरतीयाला, एक पृथ्वी या जबाबदारीच्या भावनेने जोडतो. आणि याच एक पृथ्वीतत्वानुसार, भारताने पर्यावरण अभियानासाठीची अनुरूप जीवनशैली असा उपक्रम सुरू केला. भारताच्या या उपक्रमामुळे आणि त्याला आपल्या सगळ्यांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे संपूर्ण जगभरात, हे वर्ष, हवामान सुरक्षेच्या तत्वाला अनुसरून आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षसाजरे केले जात आहे. याच विचारांचा धागा पकडून, भारताने, क्रॉप -26 मध्ये  हरित ग्रिड उपक्रम- एक सूर्य, एक जग, एक ग्रीडअसा उपक्रम सुरू केला आहे.

आज भारत अशा देशांमध्ये उभा आहे जिथे मोठ्या प्रमाणावर सौर क्रांती होत आहे. लाखो भारतीय शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती स्वीकारली आहे. मानवी आरोग्याबरोबरच माती आणि पृथ्वीच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी ही एक मोठी मोहीम आहे. हरित हायड्रोजन उत्पादनाला चालना देण्यासाठी आम्ही भारतात 'नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन' देखील सुरू केले आहे. भारताच्या  जी-20 अध्यक्षपदाच्या काळात, आम्ही जागतिक हायड्रोजन व्यवस्था तयार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.

 

मित्रांनो,

हवामान बदलाचे आव्हान लक्षात घेऊन ऊर्जा संक्रमण ही २१व्या शतकातील जगाची महत्त्वाची गरज आहे. सर्वसमावेशक ऊर्जा संक्रमणासाठी ट्रिलियन डॉलर्सची आवश्यकता आहे. साहजिकच, विकसित देश यामध्ये अत्यंत निर्णायक भूमिका बजावू शकतील.

विकसित देशांनी याबद्दल, यावर्षी 2023 मध्ये सकारात्मक पुढाकार घेतला आहे. विकसित देशांनी प्रथमच हवामान वित्तासाठी 100 अब्ज डॉलर्सची त्यांची वचनबद्धता पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, याचा भारताबरोबरच, ग्लोबल साउथच्या सर्व देशांना आनंद झाला आहे.

हरित विकास कराराचा स्वीकार करून जी-20 समूहाने शाश्वत तसेच हरित विकासाप्रती असलेल्या वचनबद्धतेची देखील खात्री दिली आहे.

 

मित्रांनो,

सामुहिक प्रयत्नांच्या प्रेरणेसह आज भारताला या जी-20 मंचावर काही सूचना मांडण्याची इच्छा आहे.

सर्व देशांनी इंधन मिश्रणाच्या विषयाबाबत एकत्र येऊन काम करणे ही आज काळाची गरज आहे. पेट्रोलमध्ये 20%पर्यंत इथेनॉलचे मिश्रण करण्याची पद्धत सुरु करण्यासाठी जागतिक पातळीवर उपक्रम सुरु करण्यात यावा असा आमचा प्रस्ताव आहे.

किंवा, त्याऐवजी, आणखी व्यापक जागतिक हितासाठी दुसरे एखादे इंधन मिश्रण विकसित करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो, हे मिश्रण असे असावे जे हवामानाच्या संरक्षणासाठी योगदान देईल तसेच ते स्थैर्यपूर्ण उर्जा पुरवठ्याची सुनिश्चिती करू शकेल.

यासंदर्भात, आज, आपण जागतिक जैवइंधन आघाडीची स्थापना करत आहोत. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी भारत तुम्हा सर्वांना आमंत्रित करत आहे.

 

मित्रांनो,

पर्यावरणाचा विचार करताना, कार्बनच्या साठ्यातील वाढीवर गेली अनेक दशके चर्चा होत आली आहे. कार्बन साठवण ही संकल्पना, आपण काय करायला नको यावर अधिक भर देते; तिचा दृष्टीकोन काहीसा नकारात्मक आहे.

परिणामी, कोणती सकारात्मक पावले उचलली पाहिजेत याकडे पुरेसे लक्ष देण्यात आलेले नाही. सकारात्मक उपक्रमांना देण्यात येणाऱ्या प्रोत्साहनाचा अभाव जाणवतो.

हरित साठवण ही संकल्पना आपल्याला पुढील दिशादर्शन करते. या सकारात्मक विचारसरणीला अधिक चालना देण्यासाठी, जी-20 समूहातील देशांनी हरित साठवण उपक्रमाच्या संदर्भात कार्या सुरु करावे अशी सूचना मी करतो.

 

मित्रांनो,

चांद्रयान या भारताच्या चंद्रविषयक मोहीमेला मिळालेल्या यशाबाबत तुम्हा सर्वांना माहिती असेलच. या मोहिमेतून हाती येणारी माहिती संपूर्ण मानवतेसाठी लाभदायक असेल. याच संकल्पनेसह, भारत आज पर्यावरण आणि हवामान यांच्या निरीक्षणार्थ जी-20 उपग्रह मोहीमसुरु करण्याचा प्रस्ताव मांडत आहे.

या मोहिमेतून प्राप्त होणारी हवामान तसेच ऋतूविषयक माहिती सर्व देशांशी, विशेषतः जगाच्या दक्षिणेकडील देशांशी सामायिक करण्यात येईल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी भारत सर्व जी-20 सदस्य देशांना आमंत्रित करत आहे.

 

मित्रांनो,

पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचे स्नेहमय स्वागत करतो आणि तुमचे अभिनंदन करतो.

आता मी तुमचे विचार जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे.

***

G.Chippalkatti/S.Thakur/R.Aghor/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1955829) Visitor Counter : 203