पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट


द्विपक्षीय संबंधांप्रती राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची दूरदृष्टी आणि वचनबध्दतेची पंतप्रधानांनी केली प्रशंसा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकेच्या ऐतिहासिक भेटीच्या फलनिष्पत्तीच्या अंमलबजावणीतील प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी केली प्रशंसा

गंभीर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावर एक व्यापक द्विपक्षीय पुढाकार ,संरक्षण, अंतराळ आणि इतर क्षेत्रांमधील शाश्वत प्रगतीचे उभय नेत्यांकडून कौतुक .

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे चांद्रयान-3 चे ऐतिहासिक लँडिंग केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी केले भारताचे अभिनंदन

दोन्ही नेत्यांनी जागतिक आणि परस्परहिताच्या प्रादेशिक मुद्द्यांवर केला विचारविनिमय.

भारताच्या जी २० अध्यक्षतेला अमेरिकेने दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे आभार मानले

Posted On: 08 SEP 2023 11:31PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ आर. बायडेन यांनी आज नवी दिल्लीत भेट घेतली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन पहिल्यांदाच भारताच्या दौऱ्यावर आले असून  नवी दिल्लीत होणाऱ्या जी २० शिखर परिषदेत ते सहभागी होत आहेत. 

सामायिक लोकशाही मूल्य, धोरणात्मक दृष्टिकोनातल्या वाढत्या अभिसरणाबद्दल आणि लोकांचे लोकांशी दृढ होत असलेले संबंध या घटकांवर आधारित असलेली भारत - अमेरिका यांच्यातील जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक बळकट  करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष  बायडेन यांच्या  दूरदृष्टी आणि वचनबध्दतेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

दोन्ही नेत्यांनी पंतप्रधानांच्या जून 2023 मध्ये झालेल्या ऐतिहासिक अमेरिका भेटीदरम्यान, भारत-अमेरिका ‘इनिशिएटिव्ह फॉर क्रिटीकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी(iCET) सह इतर विविध मुद्यांवर झालेल्या चर्चेच्या भविष्यवेधी आणि व्यापक फलनिष्पत्तीच्या अंमलबजावणीच्या प्रगतीची प्रशंसा केली.

संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, आरोग्य, संशोधन, नवोन्मेष, संस्कृती आणि दोन्ही देशांमधील जनतेचे परस्परसंबंध यांच्यासह द्विपक्षीय सहकार्याला मिळालेल्या चालनेतील सातत्याचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले. 

अध्यक्ष बायडेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेचे चांद्रयान-3च्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील ऐतिहासिक लँडिंगबद्दल अतिशय जिव्हाळ्याने अभिनंदन केले आणि दोन्ही देशांदरम्यान अंतराळ क्षेत्रातील वाढते सहकार्य अधोरेखित केले.

दोन्ही नेत्यांनी अनेक प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांबाबतही परस्परांशी विचारांची देवाणघेवाण केली. भारत-अमेरिका भागीदारी ही केवळ या दोन देशांच्या जनतेसाठीच नव्हे तर जागतिक कल्याणासाठी देखील फायदेशीर असल्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली.

भारताच्या जी20 अध्यक्षतेच्या यशस्वितेसाठी अमेरिकेकडून सातत्याने मिळालेल्या पाठबळाबद्दल पंतप्रधानांनी अध्यक्ष बायडेन यांचे आभार मानले.

****

Jaydevi/Bhakti/Shailesh/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1955725) Visitor Counter : 211