पंतप्रधान कार्यालय

जी-20 सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधानांचे मार्गदर्शन


“काशीला ज्ञान, कर्तव्य आणि सत्य यांचा खजिना मानले जाते आणि खरोखरच ती भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक राजधानी आहे”

“आम्हा भारतीयांना आमच्या चिरंतन आणि विविधतेच्या वारशाचा अभिमान आहे. आमच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाला देखील अतिशय जास्त महत्त्व देतो.”

“युगे युगीन भारत’ हे राष्ट्रीय संग्रहालय पूर्ण झाल्यावर भारताचा 5000 वर्षांचा इतिहास आणि संस्कृती उलगडून दाखवणारे जगातील सर्वात मोठे संग्रहालय ठरेल”

“अमूर्त वारसा हा केवळ भौतिक मूल्यापुरता मर्यादित नाही तर तो देशाचा इतिहास आणि ओळख आहे”

“आर्थिक वृद्धी आणि विविधतेसाठी वारसा ही एक बहुमोल मालमत्ता आहे आणि भारताच्या ‘विकास भी विरासत भी’ या मंत्रातून तो ध्वनित होत आहे.

“भारताचा राष्ट्रीय डिजिटल जिल्हा संग्रह, स्वातंत्र्य संग्रामातील गाथांचा नव्याने शोध घेण्यासाठी मदत करत आहे”

“सांस्कृतिक कार्यगट ‘कल्चर, क्रिएटिव्हिटी, कॉमर्स आणि कोलॅबोरेशन’ या चार ‘सी’ चे महत्त्व प्रतिबिंबित करत आहे”

Posted On: 26 AUG 2023 10:01AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी येथे जी-20 सांस्कृतिक मंत्र्यांच्या बैठकीत व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. काशी म्हणूनही ओळखल्या जाणाऱ्या वाराणसीमध्ये पंतप्रधानांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि आपला लोकसभा मतदारसंघ असलेल्या शहरात ही बैठक होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. काशी हे सर्वाधिक प्राचीन शहरांपैकी एक असल्याचे सांगत, भगवान  बुद्धांनी आपले पहिले प्रवचन ज्या ठिकाणी दिले त्या सारनाथच्या  जवळ हे शहर असल्याचा उल्लेख केला. काशीला ज्ञान, कर्तव्य आणि सत्य यांचा खजिना मानले जाते आणि खरोखरच ती भारताची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक राजधानी आहे, पंतप्रधान म्हणाले. गंगा आरती कार्यक्रम पाहण्यासाठी येणाऱ्या पाहुण्यांनी सारनाथला देखील भेट द्यावी आणि काशीमधील आमच्या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा असे पंतप्रधानांनी सुचवले.

आपल्या संस्कृतीमध्ये एकजूट करण्याची आणि विविधता असलेली पार्श्वभूमी आणि दृष्टीकोन यांचे आकलन करण्याची असलेली क्षमता त्यांनी अधोरेखित केली आणि जी-20 सांस्कृतिक मंत्र्यांच्या कार्यगटाचे काम समस्त मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आम्हा भारतीयांना आमच्या चिरंतन आणि विविधतेच्या वारशाचा अभिमान आहे. आमच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाला देखील अतिशय जास्त महत्त्व देतो, भारत आपल्या वारशांचे जतन करण्यासाठी आणि त्यांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी अतिशय झटत असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधानांनी सांगितले.  देशाच्या सांस्कृतिक मालमत्ता आणि कलाकारांचे राष्ट्रीय पातळीबरोबरच ग्रामीण पातळीवर देखील मॅपिंग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताच्या संस्कृतीचा गौरव करण्यासाठी अनेक केंद्रांची उभारणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आणि देशाच्या विविध भागात भारताच्या आदिवासी समुदायाच्या सचेतन संस्कृतीचे दर्शन घडवणारी अनेक संग्रहालये उभारण्यात येत असल्याचे  उदाहरण दिले. नवी दिल्ली येथील पंतप्रधान संग्रहालयाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की भारताच्या लोकशाही वारशाचे दर्शन घडवण्याचा हा एक प्रयत्न आहे. यावेळी त्यांनी

युगे युगीन भारतहे राष्ट्रीय संग्रहालय पूर्ण झाल्यावर भारताचा 5000 वर्षांचा इतिहास आणि संस्कृती उलगडून दाखवणारे जगातील सर्वात मोठे संग्रहालय ठरेल, असे सांगितले.

सांस्कृतिक मालमत्तेची पुनर्स्थापना करण्याच्या महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी कार्यगटाच्या प्रयत्नांचे स्वागत केले आणि मूर्त वारसा केवळ भौतिक मूल्याचा नसून तो राष्ट्राचा इतिहास आणि ओळखदेखील असल्याचे सांगितले. प्रत्येकाला आपला सांस्कृतिक वारसा असण्याचा आणि सांस्कृतिक वारशापर्यंत पोहोचण्याचा अधिकार आहे. असे पंतप्रधान म्हणाले. वर्ष 2014 पासून, भारताने अशा शेकडो कलाकृती परत आणल्या आहेत ज्या आपल्या प्राचीन संस्कृतीचे  वैभव दर्शवतात, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.   जिवंत वारसा आणि 'लाईफकरिता  (LiFE-पर्यावरणासाठी जीवनशैली ) संस्कृतीयामधील योगदानाचेही पंतप्रधानांनी कौतुक केले. पंतप्रधान म्हणाले, शेवटी सांस्कृतिक वारसा हा केवळ दगडात कोरलेला नसतो, तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या परंपरा, चालीरीती आणि सण हादेखील सांस्कृतिक वारसा असतो. कार्यगटाच्या प्रयत्नांमुळे शाश्वत पद्धती आणि जीवनशैलीला चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

आर्थिक विकास आणि वैविध्यकरण यासाठी  वारसा ही महत्त्वाची संपत्ती आहे आणि विकास भी विरासत भीम्हणजेच विकास आणि वारसा दोन्ही पुढे नेण्याच्या भारताच्या मंत्रात त्याचा प्रतिध्वनी आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. "भारताला त्याच्या 2,000 वर्षांच्या जुन्या हस्तकला वारशाचा, सुमारे 3,000 वैशिष्ट्यपूर्ण  कला आणि हस्तकलांचा अभिमान वाटतो", पंतप्रधान म्हणाले. भारतीय हस्तकलेचे वेगळेपण दर्शवताना आत्मनिर्भरतेला चालना देणाऱ्या  'एक जिल्हा, एक उत्पादनया उपक्रमावर त्यांनी  प्रकाश टाकला.  सांस्कृतिक आणि सर्जनशील उद्योगांना चालना देण्याच्या दिशेने जी 20 राष्ट्रांच्या प्रयत्नांना खूप महत्त्व आहे कारण ते सर्वसमावेशक आर्थिक विकास सुलभ करतील आणि सर्जनशीलता व नवोन्मेषाला पाठबळ  देतील, असे त्यांनी सांगितले. येत्या महिन्यात, भारत 1.8 अब्ज डॉलर्सच्या प्रारंभिक परिव्ययासह पीएम विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ करणार असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. पारंपारिक कारागिरांना पाठबळ देणारी, एक परिसंस्था तयार करेलआणि  त्यांना त्यांच्या कलाकुसरीत भरभराट करण्यास सक्षम करेल, तसेच  भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यात योगदान देईल, असे त्यांनी सांगितले.

संस्कृती संवर्धनासाठी तंत्रज्ञान हे महत्त्वाचे सहयोगी आहे हे लक्षात घेऊन पंतप्रधानांनी भारताच्या राष्ट्रीय डिजिटल जिल्हा भांडाराचा उल्लेख केला जो स्वातंत्र्यलढ्याच्या कथा पुन्हा शोधण्यात मदत करत आहे. सांस्कृतिक महत्त्वाची ठिकाणे पर्यटकांसाठी अधिक अनुकूल बनवण्याबरोबरच सांस्कृतिक महत्त्वाच्या ठिकाणांचे अधिक चांगले जतन करण्यासाठी भारताच्या तंत्रज्ञानाच्या वापरावर त्यांनी भर दिला.

भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला की जी 20 संस्कृती मंत्र्यांच्या कार्यगटाने कल्चर युनाइट्स ऑलमोहीम सुरू केली असून ती  'वसुधैव कुटुंबकम - एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' या भावनेशी तादात्म्य साधणारी आहे. मूर्त परिणामांसह जी 20 कृती आराखडा तयार करण्यात कार्यगटाच्या  महत्त्वाच्या भूमिकेचेही त्यांनी कौतुक केले. तुमचे कार्य चार C - Culture, Creativity, Commerce and Collaboration अर्थात संस्कृती, सर्जनशीलता, वाणिज्य आणि सहयोग यांचे महत्त्व प्रतिबिंबित करते. हे आपल्याला दयाळू, सर्वसमावेशक आणि शांततापूर्ण भविष्य घडवण्यासाठी संस्कृतीच्या सामर्थ्याचा उपयोग करण्यास सक्षम करेल, असे सांगून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

***

S.Thakur/S.Patil/S.Kakde/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1952432) Visitor Counter : 103