पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

ब्रिक्स-आफ्रिका आउटरिच आणि ब्रिक्स प्लस संवादादरम्यान पंतप्रधानांनी केलेले निवेदन

Posted On: 24 AUG 2023 6:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2023

महोदय,

  • आफ्रिकेच्या भूमीवर तुम्हा सर्व स्नेह्यांसमवेत उपस्थित राहून अतिशय आनंद होत आहे.
  • मी राष्ट्रपती रामाफोसा यांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी ब्रिक्स आउटरिच परिषदेमध्ये मला आफ्रिका, आशिया आणि लॅटिन अमेरिका मधील देशांशी विचार सामायिक करण्याची संधी दिली.
  • गेल्या दोन दिवसांत, ब्रिक्सच्या सर्व चर्चांमध्ये आपण ग्लोबल साउथ देशांचे प्राधान्यक्रम आणि समस्या यांवर अधिक भर दिला आहे.
  • आम्हाला असे वाटते की ब्रिक्स तर्फे या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे सध्याच्या काळात  आवश्यक आहे.
  • आम्ही ब्रिक्स मंचाचा विस्तार करण्याचा देखील निर्णय घेतला आहे.सर्व भागीदार देशांचे आम्ही स्वागत करतो.
  • जागतिक पातळीवरील संस्था आणि मंचांना अधिक प्रातिनिधिक आणि समावेशक स्वरूप देण्याच्या आमच्या प्रयत्नांच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे.

महोदय,

  • जेव्हा आम्ही ‘ग्लोबल साऊथ’ हा शब्द वापरतो तेव्हा तो केवळ राजकीय संज्ञा या अर्थाने वापरत नाही.
  • आपल्या सामायिक इतिहासात आपण वसाहतवाद आणि वर्णभेदाचा एकत्रितपणे विरोध केला आहे.
  • आफ्रिकेच्या भूमीवरच महात्मा गांधीजींनी अहिंसा आणि शांततापूर्ण प्रतिकार यासारख्या सामर्थ्यशाली संकल्पना विकसित केल्या, त्यांची पारख करून  घेतली आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांचा वापर केला.
  • त्यांची विचारपद्धती आणि विचारांनी नेल्सन मंडेला यांच्यासारख्या महान नेत्यांना प्रेरणा दिली.
  • इतिहासाच्या या मजबूत आधारावर आम्ही आपल्या आधुनिक संबंधांना नवे स्वरूप देत आहोत.

महोदय,

  • भारताने आफ्रिकेशी असलेल्या संबंधांना नेहमीच अधिक प्राधान्य दिले आहे.
  • उच्च-स्तरीय बैठकांसोबतच आम्ही आफ्रिकेत 16 नवे दूतावास सुरु केले आहेत.
  • भारत आज आफ्रिकेचा चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा व्यापारविषयक भागीदार आहे आणि पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा गुंतवणूकदार देश आहे.
  • सुदान, बुरुंडी आणि रवांडा मधील विद्युतनिर्मिती प्रकल्प असोत किंवा इथियोपिया आणि मलावी मधील साखर कारखाने
  • मोझांबिक, कोत दिव्वार आणि एस्वातिनीमधील तंत्रज्ञान पार्क्स असोत किंवा टांझानिया आणि युगांडा मध्ये भारतीय विद्यापीठांतर्फे सुरु करण्यात आलेली केंद्र असोत,
  • भारताने आफ्रिकेतील देशांची क्षमता बांधणी  आणि पायाभूत सुविधा विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे.
  • वर्ष 2063 च्या ध्येयधोरणाअंतर्गत आफ्रिकेला भविष्यातील जागतिक उर्जाकेंद्र बनवण्याच्या प्रवासात भारत एक विश्वसनीय आणि जवळचा भागीदार आहे.
  • आफ्रिकेतील डिजिटल दरी कमी करण्यासाठी आम्ही टेली-एज्युकेशन आणि टेली-मेडिसिन या क्षेत्रांमध्ये पंधरा हजारांहून अधिक शिष्यवृत्ती दिल्या आहेत.
  • आम्ही नायजेरिया, इथियोपिया आणि टांझानिया या भागात संरक्षण अकादमी आणि महाविद्यालयांची स्थापना केली आहे.
  • बोत्सवाना, नामिबिया, युगांडा, लेसोथो, झाम्बिया, मॉरीशस, सेशेल्स आणि टांझानिया येथे प्रशिक्षण देण्याच्या हेतूने पथके तैनात केली आहेत.
  • सुमारे 4400 भारतीय शांतीदूत, ज्यांच्यात महिलांचा देखील समावेश आहेत, ते आफ्रिकेत शांतता आणि स्थैर्य निर्माण करण्यासाठी योगदान देत आहेत.
  • दहशतवाद आणि पायरसी यांच्या विरोधातील लढाईत देखील आम्ही आफ्रिकी देशांसोबत एकत्र येऊन काम करत आहोत.
  • कोविड महामारीच्या कठीण काळात आम्ही अनेक देशांना खाद्य पदार्थ आणि लसीचा पुरवठा केला आहे.
  • आता आम्ही आफ्रिकेतील देशांसमवेत कोविड आणि इतर लसींच्या संयुक्त निर्मितीसाठी देखील काम करत आहोत.
  • मोझांबिक आणि मलावी मधील चक्रीवादळ असो किंवा मादागास्कर येथे आलेले पूर, भारत सर्वप्रथम प्रतिसाद देणारा देश म्हणून नेहमीच आफ्रिकेच्या खांद्याला खांदा भिडवून उभा आहे.

महोदय,

  • लॅटिन अमेरिकेपासून मध्य आशियापर्यंत
  • पश्चिम आशियापासून आग्नेय आशियापर्यंत,
  • हिंद-प्रशांत परिसरापासून हिंद-अटलांटिक पर्यंत,
  • भारत सर्व देशांना एका कुटुंबाच्या रुपात संकल्पित करतो.
  • वसुधैव कुटुंबकम म्हणजेच संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे ही संकल्पना म्हणजे हजारो वर्षांपासून आमच्या जीवनशैलीचा पाया राहिला आहे.
  • आमच्या जी-20 अध्यक्षतेचा देखील हाच गुरुमंत्र आहे.
  • ग्लोबल साउथ  देशांच्या समस्यांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करण्यासाठी आम्ही तीन आफ्रिकी देशांना तसेच अनेक विकसनशील देशांना अतिथी देश म्हणून आमंत्रित केले आहे.
  • आफ्रिकी महासंघाला जी-20 समूहाची स्थायी सदस्यता देण्याचा प्रस्ताव देखील भारताने मांडला आहे.

महोदय,

  • मला वाटते की ब्रिक्स आणि आज उपस्थित असलेले सर्व देश मिळून अधिकार विकेंद्रित  जगाला बळकट करण्यात मदत करू शकतील.
  • जागतिक संस्थेला प्रातिनिधिक बनवण्यासाठी आणि समर्पक रूप देण्यासाठी त्यांच्या सुधारणांना गती देता येईल.
  • दहशतवादाला विरोध, पर्यावरणाचे संरक्षण, हवामानविषयक उपक्रम, सायबर सुरक्षा, अन्न आणि आरोग्य सुरक्षा, उर्जा सुरक्षितता, लवचिक पुरवठा साखळीची निर्मिती हे आमचे सामायिक हिताचे विषय आहेत. सहयोगी संबंधाच्या अमर्याद शक्यता आहेत.
  • मी तुम्हा सर्वांना आंतरराष्ट्रीय सौर आघाडी; एक सूर्य,एक जग,एक ग्रीड; आपत्तीप्रती लवचिक  पायाभूत सुविधांसाठी आघाडी; एक पृथ्वी, एक आरोग्य, बिग कॅट आघाडी, पारंपरिक औषधांसाठीचे जागतिक केंद्र यांसारख्या आमच्या आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो.
  • भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यंत्रणेशी स्वतःला जोडून घेण्यासाठी, आपापल्या विकासासाठी त्यांचा लाभ  घेण्यासाठी मी तुम्हा सर्वांना आमंत्रण देतो.
  • आम्हाला आमचे अनुभव आणि क्षमता तुम्हा सर्वांशी सामायिक करण्यात आनंद आहे.
  • आपल्या एकत्रित प्रयत्नांमुळे आपल्याला सर्व आव्हानांचा एकत्रितपणे सामना करण्यासाठी एक नवा आत्मविश्वास मिळेल असा विश्वास मला वाटतो.
  • मी पुन्हा एकदा या प्रसंगी तुम्हा सर्वांचे, विशेषतः राष्ट्रपती रामाफोसा यांचे आभार मानतो.

धन्यवाद.

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1951780) Visitor Counter : 113