पंतप्रधान कार्यालय

जी20 आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी दिलेला व्हिडिओ संदेश

Posted On: 18 AUG 2023 3:35PM by PIB Mumbai

मान्यवर, 

स्त्री-पुरुषहो

नमस्कार!

भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने मी तुम्हा सर्वांचे भारतात आणि माझे गृह राज्य असलेल्या गुजरातमध्ये अतिशय जिव्हाळ्याने स्वागत करतो. तुमचे स्वागत करण्यासाठी माझ्यासोबत 2.4 दशलक्ष डॉक्टर्स, 3.5 दशलक्ष परिचारिका, 1.3 दशलक्ष निमवैद्यकीय कर्मचारी, 1.6 दशलक्ष फार्मासिस्ट्स आणि भारताच्या आरोग्य क्षेत्रातील इतर लक्षावधी लोक सहभागी आहेत.  

मित्रहो,

गांधीजींनी आरोग्य हा इतका महत्त्वाचा मुद्दा मानला की त्यांनी या विषयावर 'की टू हेल्थ' (आरोग्याची गुरुकिल्ली) या नावाचे पुस्तक लिहिले. निरोगी असणे म्हणजे मन आणि शरीर सुसूत्र आणि समतोल स्थितीत असणे म्हणजेच आरोग्य हा जीवनाचा मोठा पाया आहे, असे त्यांनी सांगितले होते. आपल्याकडे संस्कृतमध्ये एक श्लोक आहे:

''आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्'' 

याचा अर्थ आहे, “ आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे आणि चांगल्या आरोग्याने प्रत्येक काम पूर्ण करता येऊ शकते”

मित्रहो,

आपल्या निर्णयांच्या केंद्रस्थानी आरोग्य असायला हवे याची आठवण आपल्याला कोविड-19 महामारीने करून दिली आहे. औषधे आणि लस वितरण असो, किंवा आपल्या लोकांना मायदेशी परत आणणे असो, आपल्याला आंतरराष्ट्रीय सहकार्याचे मूल्य देखील या महामारीने दाखवून दिले आहे.

लस मैत्री उपक्रमांतर्गत, भारताने लसींच्या 300 दशलक्ष मात्रा 100 हून अधिक देशांमध्ये वितरित केल्या आहेत, यात ग्लोबल साऊथमधील अनेक देशांचा समावेश आहे. महामारीच्या काळात प्रतिरोधकक्षमता हा सर्वात मोठा धडा ठरला आहे. जागतिक आरोग्य प्रणालीसुद्धा प्रतिरोधक असल्या पाहिजेत. आपण आगामी काळातील संभाव्य आरोग्य आणीबाणीच्या प्रतिबंधासाठी, तयारीसाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी सज्ज असले पाहिजे. आजच्या काळातील एकमेकांशी जोडलेल्या जगात हे विशेष महत्वाचे आहे. महामारीच्या काळात आपण पाहिले आहे की, जगाच्या एका भागात निर्माण झालेल्या आरोग्य समस्या अत्यंत अल्प काळात जगाच्या इतर सर्व भागांवर परिणाम करू शकतात,

मित्रहो,

भारतात आम्ही समग्र आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा अवलंब करत आहोत. आम्ही आरोग्याच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करत असून, पारंपरिक औषध प्रणालींना प्रोत्साहन देत आहोत आणि सर्वांना किफायतशीर आरोग्यसेवा पुरवत आहोत. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा जागतिक महोत्सव हा सर्वांगीण आरोग्याच्या सार्वत्रिक इच्छेचा दाखला आहे. यावर्षी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. भारतात ज्याला भरडधान्य किंवा ‘श्री अन्न’ असे ओळखले जाते त्याचे अनेक आरोग्यविषयक फायदे आहेत. सर्वांगीण आरोग्य आणि निरोगीपणा प्रत्येकाची रोगप्रतिकारक्षमता वाढविण्यात मदत करू शकतात, असे आम्हाला वाटते. गुजरातमधील जामनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक औषध केंद्राची स्थापना हे या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आणि, जी 20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीच्या सोबतीने पारंपरिक औषधांवर आधारित जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक परिषद आयोजित केल्याने त्याच्या क्षमतेचा उपयोग करण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न होतील. पारंपरिक औषधांचे जागतिक भांडार तयार करण्याचा आमचा एकत्रित प्रयत्न असायला हवा.

मित्रहो,

आरोग्य आणि पर्यावरण यांचा जैविक संबंध आहे. स्वच्छ हवा, सुरक्षित पिण्याचे पाणी, पुरेसे पोषण आणि सुरक्षित निवारा हे आरोग्याचे प्रमुख घटक आहेत. हवामान आणि आरोग्यविषयक उपक्रमांचा प्रारंभ करण्यासाठी उचललेल्या पावलांबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) च्या धोक्याला तोंड देण्यासाठी उचललेली पावले देखील कौतुकास्पद आहेत. अँटी-मायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR) जागतिक सार्वजनिक आरोग्यासाठी आणि आतापर्यंतच्या औषधनिर्माण क्षेत्राच्या एकंदरीत प्रगतीसाठी एक गंभीर धोका आहे. जी 20 आरोग्य कार्यगटाने ''वन हेल्थ'' ला प्राधान्य दिल्याबद्दल मला आनंद झाला आहे. "एक पृथ्वी, एक आरोग्य" ही आमची दृष्टी संपूर्ण परिसंस्थेसाठी म्हणजेच मानव, प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणासाठी उत्तम आरोग्याची कल्पना करते. या एकात्मिक दृष्टिकोनातून कोणालाही मागे न ठेवण्याचा गांधीजींचा संदेश प्रसारित होतो.

मित्रहो,

आरोग्यविषयक उपक्रमांच्या यशात लोकसहभाग हा प्रमुख घटक आहे. कुष्ठरोग निर्मूलनाच्या आमच्या मोहिमेच्या यशामागील प्रमुख कारणांपैकी हे देखील एक कारण आहे. क्षयरोग निर्मूलनाचा आमचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम देखील लोकसहभागाला प्रोत्साहन देत आहे. आम्ही देशातील लोकांना ‘नि-क्षय मित्र’ किंवा ‘क्षयरोग निर्मूलनासाठी मित्र’ बनण्याचे आवाहन केले असून त्याअंतर्गत नागरिकांनी सुमारे 10 लाख रुग्ण दत्तक घेतले आहेत. आता आम्ही क्षयरोग निर्मूलनाच्या मार्गावर आगेकूच करत असून 2030 च्या जागतिक उद्दिष्टापेक्षा खूपच पुढे आहोत.

मित्रहो,

डिजिटल उपाययोजना आणि नवोन्मेष आमचे प्रयत्न न्याय्य आणि समावेशक बनवण्यासाठी अतिशय उपयुक्त साधने आहेत. दूर-दूरच्या रुग्णांना टेली-मेडिसिनद्वारे दर्जेदार सेवा मिळू शकते. भारताचे राष्ट्रीय व्यासपीठ ई-संजीवनीने आजपर्यंत 140 दशलक्ष टेलि-आरोग्य समुपदेशन केले आहे. भारताच्या COWIN व्यासपीठाने मानवी इतिहासातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. या मंचाने 2.2 अब्ज पेक्षा जास्त लस मात्रांचे वितरण आणि जागतिक स्तरावर सत्यापित करण्यायोग्य लसीकरण प्रमाणपत्रांची रिअल-टाइम उपलब्धता यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन केले. आपण लोकांच्या कल्याणासाठी आपले नवोन्मेष खुले करुया. आपण तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेची समान विभागणी करुया. या उपक्रमामुळे ग्लोबल साऊथ देशांमधील आरोग्य सेवांमध्ये असलेती तफावत भरून काढता येईल. यामुळे सार्वत्रिक आरोग्याच्या व्याप्तीचे आपले लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने ते आपल्याला आणखी एक पाऊल पुढे घेऊन जाईल.

मित्रहो,

मानवतेच्या कल्याणाची कामना करणाऱ्या प्राचीन भारतीय सुभाषिताने मी माझ्या भाषणाचा समारोप करतो.

“सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः” म्हणजेच सर्व लोक आनंदी राहू देत, सर्व जण आजारापासून मुक्त राहू देत. तुमच्या या चर्चांमध्ये तुम्हाला यश प्राप्त होऊ दे.

धन्यवाद!

***

ShilpaP/ShaieshP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1950370) Visitor Counter : 118