पंतप्रधान कार्यालय
वॉशिंग्टन डीसीमध्ये ‘भारत-अमेरिका: भविष्यासाठी कौशल्यप्राप्ती’ या विषयावर आधारित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले निवेदन
Posted On:
22 JUN 2023 11:32PM by PIB Mumbai
फर्स्ट लेडी, डॉ.जिल बायडेन,
डॉ.पंचनाथन,
श्री. मेहरोत्रा,
डॉ.विल्यम्स,
स्त्रीपुरुषहो,
माझ्या प्रिय तरुण मित्रांनो,
आज वॉशिंग्टनमध्ये आल्यानंतर अनेक तरुण आणि सर्जनशील व्यक्तींना भेटण्याची संधी मला मिळाली आहे याचा मला अत्यंत आनंद झाला आहे. भारत विविध प्रकल्पांसाठी नॅशनल सायन्स फौंडेशनशी सहयोगी संबंध प्रस्थापित करत असल्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
डॉ.बायडेन,
तुमचे जीवन, तुमचे प्रयत्न आणि तुम्हांला मिळालेले यश हे प्रत्येकासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेत. आपल्या सध्याच्या आणि भविष्यातील पिढीसाठी अधिक उत्तम भविष्याची सुनिश्चिती करणे ही आपली सामुहिक जबाबदारी आहे.
अशा उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण, कौशल्य आणि नवोन्मेष अत्यंत आवश्यक आहेत आणि याच दिशेने आम्ही भारतात अनेक प्रयत्न सुरु केले आहेत. आम्ही शाळांमध्ये सुमारे 10,000 अटल टिंकरिंग प्रयोगशाळा स्थापन केल्या आहेत जेथे मुलांना विविध प्रकारच्या नवोन्मेषाचा शोध घेण्यासाठी अनेक प्रकारच्या सोयी सुविधांची तरतूद केली आहे. हे दशक “तंत्रज्ञानाचे दशक” म्हणजेच टेकेड म्हणून घडवणे हा आमचा उद्देश आहे.
मित्रांनो,
भारत आणि अमेरिका यांच्यातील विकासाला मिळालेली चालना कायम राखण्यासाठी प्रतिभेचा प्रवाह निर्माण करण्याची गरज आहे. अमेरिकेमध्ये प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आणि आधुनिक तंत्रज्ञान आहे तर भारताकडे जगातील सर्वाधिक प्रमाणात तरुण मनुष्यबळ आहे. म्हणूनच, मला असा विश्वास वाटतो की भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारी शाश्वत तसेच समावेशक जागतिक विकासासाठी प्रेरक शक्ती ठरेल. अमेरिकेमध्ये समुदाय महाविद्यालयांद्वारे जी महत्त्वाची भूमिका पार पाडली जात आहे त्याबद्दल मी तुम्हां सर्वांचे अत्यंत मनापासून अभिनंदन करतो.
मित्रांनो,
शिक्षण तसेच संशोधन क्षेत्रात भारत आणि अमेरिकेदरम्यान असलेल्या परस्पर सहकारी संबंधांबाबत मला तुमच्यासमोर काही विचार मांडायचे आहेत. या सहयोगी उपक्रमांमध्ये सरकार, उद्योग क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, शिक्षक तसेच विद्यार्थी यांना सहभागी करून घेणे आवश्यक आहे. या संदर्भात आपण भारत-अमेरिका शिक्षक विनिमय कार्यक्रम सुरु करण्याबाबत विचार करू शकतो.
जगभरात पसरलेल्या वैज्ञानिकांशी आणि उद्योजकांशी असलेले संबंध सुधारण्यासाठी आम्ही वर्ष 2015 मध्ये शैक्षणिक नेटवर्कबाबतचा जागतिक उपक्रम (जीआयएएन) सुरु केला. तुम्हांला हे सांगताना मला अत्यंत आनंद होतो आहे की या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही अमेरिकेतील साडेसातशे विषय शिक्षकांचे भारतात यशस्वीरित्या स्वागत केले. अमेरिकेतील शिक्षण तसेच संशोधन क्षेत्राशी संबंधित असलेल्या कार्यरत तसेच निवृत्त व्यक्तींना मी अशी विनंती करू इच्छितो की त्यांनी त्यांचा सुट्टीचा काळ, विशेषतः हिवाळी सुट्टी भारतात व्यतीत करण्याचा जरुर विचार करावा. असे केल्याने, ते भारताबाबत अधिकाधिक गोष्टी तर जाणून घेऊ शकतीलच, पण त्याचबरोबर भारतातील नव्या पिढीसोबत त्यांचे ज्ञान सामायिक करु शकतील.
तुम्ही हे देखील जाणताच की, तरुण वर्गामध्ये सर्जनशीलता आणि नवोन्मेष याबद्दल
\ अत्यंत आश्चर्यकारक अशी चेतना दिसून येते. मला वाटते की, आपल्या दोन्ही देशांनी एकत्र येऊन विविध विषयांवर आधारित हॅकेथॉन आयोजित करायला हवेत. यातून आपल्याला केवळ सध्याच्या विविध समस्यांवरच उत्तरे मिळतील असे नव्हे तर त्यातून भविष्यासाठी नव्या कल्पनांची निर्मिती देखील होईल. तसेच आपण व्यावसायिक कौशल्यविषयक पात्रतेला परस्परमान्यता देण्याची पद्धत सुरु करण्याचा विचार करू शकतो.
मित्रांनो,
विद्यार्थी विनिमय कार्यक्रमाअंतर्गत अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी भारतात येऊन येथील विविध अनुभव तसेच नव्या गोष्टींचा शोध घेतलेला बघायला मला अत्यंत आवडेल. मला अशी आशा आणि विश्वास वाटतो की जेव्हा “नवाजो नेशन” चा विद्यार्थी भारतात नागालँड येथे बसून त्याच्या मित्रांच्या सहयोगाने एखादी संकल्पना आणि एखादा प्रकल्प सह-विकसित करेल तो दिवस फार दूर नाही. मला इतक्या मोठ्या प्रमाणात संकल्पना सुचवल्याबद्दल मी या दोन तरुण व्यक्तींचा अगदी मनापासून आभारी आहे.
मी पुन्हा एकदा फर्स्ट लेडी, डॉ.जिल बायडेन यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच मी नॅशनल सायन्स फौंडेशनचे आभार मानतो आणि तुम्ही सर्वांनी येथे उपस्थित राहिल्याबद्दल तुमचे देखील आभार मानतो.
धन्यवाद!
***
JPS/Sanjana/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1945304)
Visitor Counter : 110
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam