इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील गांधीनगर येथे सेमीकॉन इंडीया 2023 चे उद्घाटन


दुसऱ्या सेमीकॉन इंडिया मध्ये उद्योग, शैक्षणिक संस्था आणि सरकारमधील जागतिक प्रमुखांनी घेतला भाग

Posted On: 29 JUL 2023 9:29AM by PIB Mumbai

भारत, इलेक्ट्रॉनिक्सवर भर देऊन तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करत आहे. क्रांतीचा एक भाग असलेले, सेमीकंडक्टर अर्थात अर्धसंवाहक एक महत्वाची भूमिका बजावत आहेत. संवाद, संरक्षण, वाहन उद्योग आणि संगणकीय उपकरणांसह जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये याचा उपयोग केला जात आहे.  देशाच्या प्रगतीचा महत्त्वाचा स्तंभ असलेल्या 'इलेक्ट्रॉनिक्स'ला बळकट करत, 'आत्मनिर्भर भारताच्या ध्येयदृष्टीला बळकटी देत, आपली मूल्य साखळी व्यापक आणि सखोल करण्यासाठी तसेच जागतिक दर्जाची सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था उपलब्ध करण्यासाठी भारत सज्ज आहे.

सेमीकंडक्टरच्या संरचना आणि उत्पादनाचे केंद्र म्हणून भारताला जगापुढे प्रदर्शित करण्यासाठी, गेल्या वर्षी बेंगळुरू येथे सेमीकॉन इंडिया 2022 परिषद आयोजित करण्यात आली होती. त्याला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर, इंडिया सेमीकंडक्टर मिशनने गुजरातमधील गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे ‘भारताच्या सेमीकंडक्टर परिसंस्थेस चालना’ या संकल्पनेवर, सेमीकॉन इंडिया 2023 परिषद आयोजित केली. या परिषदेत 23 हून अधिक देशांतील 8,000 पेक्षा अधिक मान्यवर सहभागी झाले.  सेमीकॉन इंडिया 2023 मध्ये मायक्रॉन टेक्नॉलॉजी, अप्लाइड मटेरियल्स, फॉक्सकॉन, कॅडेन्स, एएमडी आणि सेमी  सारख्या औद्योगिक संघटना यांच्यासह प्रमुख जागतिक कंपन्यांमधील उद्योगांचे प्रमुख यात  सहभागी झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या तीन दिवसीय सेमीकॉन इंडिया 2023 चे उद्घाटन झाले. लोकांच्या दैनंदिन जीवनात सेमीकंडक्टरची असलेली भूमिका आणि सेमीकॉन कार्यक्रमाअंतर्गत सेमीकंडक्टर उत्पादन परिसंस्था तयार करण्यासाठी भारत कसा कटिबद्ध आहे यावर पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भर दिला.  केन्द्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान, दळणवळण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, विशेषतः सेमीकंडक्टर्सवर लक्ष केंद्रित करून भारतातील प्रत्येक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यात माननीय पंतप्रधानांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. गुजरातचे माननीय मुख्यमंत्री  भूपेंद्र पटेल यांनीही सभेला संबोधित केले. विशेषत: इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर्सच्या उत्पादनाबद्दल माननीय पंतप्रधानांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाची त्यांनी प्रशंसा केली.

विविध जागतिक उद्योग प्रमुखांनी “भारताच्या  सेमीकंडक्टर परिसंस्थेला चालना” या विषयावर बीजभाषण केले.  मायक्रॉनच्या वतीने संजय मेहरोत्रा ​​यांनी आपली भूमिका मांडली. भारतातील उत्पादन परिसंस्था बळकट आणि व्यापक करण्याच्या महत्त्वपूर्ण संधींवर त्यांनी प्रकाश टाकला. मायक्रॉन ही सेमीकंडक्टर उद्योगातील एक प्रमुख कंपनी असून भारताच्या सेमीकंडक्टर प्रवासाचा एक भाग असल्याचा तिला अभिमान आहे असे ते म्हणाले. केडन्सचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देवगण यांनीही आपले मत मांडले. भक्कम सरकारी पाठबळ आणि पुढाकार, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिभावंत, बहुराष्ट्रीय कंपन्यांची उपस्थिती आणि सध्या चालू असलेले डिजिटल इंडिया परिवर्तन ही भारताच्या सेमीकंडक्टर उद्योगाची प्रमुख सामर्थ्यस्थळे असल्याचे ते म्हणाले.

कृत्रिम बुद्धिमत्ता, स्वच्छ ऊर्जा उपक्रम, क्लाउड कंप्यूटिंग, प्रगत डेटा निर्मिती आणि हस्तांतरण प्रणालीद्वारे डिजिटल परिवर्तन यासारख्या घटकांमुळे सेमीकंडक्टर उद्योगाची भरभराट होत आहे असे अप्लाइड मटेरिअल्सचे अध्यक्ष, एसपीजी, प्रबू राजा म्हणाले. फ्लॅश मेमरी आणि अत्यावश्यक साठवणूक पायाभूत सुविधेमधील अग्रगण्य कंपनी, वेस्टर्न डिजिटलचे अध्यक्ष शिवा शिवराम यांनीही आपले मत मांडले. भारतात सेमीकंडक्टर पुरवठा साखळी उभारण्यासाठी बौद्धिक संपदा निर्मिती आवश्यक आहे असे ते म्हणाले.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतासाठी असलेली त्याची प्रचंड क्षमतासंधी याबाबत एएमडीचे सीटीओ, मार्क पेपरमास्टर यांनी   सांगितले. एएमडी या क्षेत्रात सक्रियपणे नावीन्य आणत आहे. एएमडीसाठी जगातील सर्वात मोठे संरचना केंद्र म्हणून भारताला स्थापित करण्यासाठी पुढील 5 वर्षांमध्ये भारतात 400 दशलक्ष अमेरीकी डॉलर्स गुंतवणूक एएमडी करत आहे असे त्यांनी सांगितले.  फॉक्सकॉनचे मुख्य धोरण अधिकारी एस.वाय. चियांग यांनी दुपटीच्या वेगाने वाढणाऱ्या (मूरच्या कायद्याच्या) युगातील आव्हाने आणि संधी यावर भाष्य केले. सेमीकंडक्टर उद्योगात प्रणाली संरचना आणि विभाजन, पॅकेजिंग आणि पीसीबी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणि IoT सारख्या अनुप्रयोगांच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी त्यांनी उदयोन्मुख आवश्यकतांकडे लक्ष वेधले.

याव्यतिरिक्त, सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले परिसंस्थेचा समावेश असलेल्या विविध समर्पक संकल्पनांवर चर्चा करण्यात आली.  डॉ.मनीष हुडा, एससीएल;  विवेक शर्मा, एसटीमायक्रॉइलेक्ट्रॉनिक्स (STMicroelectronics);  डॉ. यी शी चँग, तंत्रज्ञान राजदूत, आयसीईए;  रोहित गिरधर, इन्फिनॉन टेक्नॉलॉजीज;  श्रीराम रामकृष्णन, व्यवसाय प्रमुख, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड;  दर्शन हिरानंदानी, हिरानंदानी समूह यांनी भारतात कंपाऊंड सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीच्या फायद्यांविषयी चर्चा केली. ईलेक्ट्रिक वाहनांसाठी सिलिकॉन कार्बाइडला प्राधान्य देण्याचे आणि प्रणाली संरचना तसेच गॅलियम नायट्राइड संशोधनावर लक्ष केंद्रित करण्याचे वक्त्यांनी यावेळी सुचवले.

डॉ. जी. राजेश्वरन, ग्रँटवुड टेक्नॉलॉजीज;  सूरज रेंगाराजन, अप्लाइड मटेरियल्स;  डॉ. वाय.जे. चेन, सीईओ, वेदांत डिस्प्ले लिमिटेड;  अचिंत्य भौमिक, अध्यक्ष, एसआयडी; अजित आरस, ईव्हीपी, शार्प, या उद्योगातील तज्ज्ञांनी डिस्प्ले उत्पादनावरील चर्चेत भाग घेतला. डिस्प्ले क्षेत्राच्या वाढीचा मार्ग, उत्पादन क्षेत्रातील अर्थव्यवस्था, एलसीडी आणि ओएलईडी असेंब्ली याबाबत  समजून घेण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला.

इन्वेस्ट इंडियाचे एमडी आणि सीईओ निवृत्ती राय यांनी शाश्वत सेमीकंडक्टर उत्पादन, भारतातील गुंतवणुकीच्या संधी आणि भारत, शाश्वतता उद्दिष्टांना स्पर्धात्मक फायद्यात कसे बदलू शकतो याबद्दल भूमिका मांडली.  अजित मनोचा, सेमी;  सिरिल पॅट्रिक फर्नांडिस, सीटीओ आणि एमडी, एएफटी;  अजय साहनी, माजी सचिव, मेटी (MeitY);   नीलकंठ मिश्रा, मुख्य अर्थतज्ज्ञ, अॅक्सिस बँक;  सुनीत शुक्ला, आयएफसीआय आणि के. मुकुंदन, एनआयआयएफ या तज्ज्ञांनी “आयएसएम: भारतातत सेमीकंडक्टर गुंतवणूक आकर्षित करणे” या विषयावरील चर्चेत भाग घेतला. प्रस्तावांबाबत तांत्रिक-आर्थिक अपेक्षांवर जोर देण्याच्या भारत सरकारच्या दृष्टिकोनाबद्दल त्यांनी चर्चा केली. भारत सेमीकंडक्टर मिशन (आयएसएम) द्वारे भविष्यातील प्रस्तावांचे मूल्यमापन करण्यासाठी, व्यवसाय योजना आणि अंमलबजावणी योजनेची व्यवहार्यता मार्गदर्शक तत्त्वे म्हणून काम करेल असे त्यांनी अधोरेखित केले.

जागतिक सेमीकंडक्टर क्षेत्राच्या विकासात भारताची मोठी भूमिका असून, सेमीकॉन इंडिया 2023 ने, यातील सहभागींना भारतातील सेमीकंडक्टर परिसंस्थेला आकार देणाऱ्या विविध पैलूंवर विचारमंथन करण्यासाठी एक व्यासपीठ देऊ केले आहे.

****

MI/VG/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1943924) Visitor Counter : 99