पंतप्रधान कार्यालय
राष्ट्रीय रोजगार मेळाव्यामध्ये पंतप्रधानांनी केले मार्गदर्शन
विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्यांना 70,000 पेक्षा जास्त नियुक्ती पत्रांचे वितरण
"सरकारकडून भर्ती करण्यासाठी आजच्यापेक्षा उत्तम वेळ असू शकत नाही"
"तुमचा एक छोटासा प्रयत्न एखाद्याच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो"
"बँकिंग क्षेत्र सर्वात बळकट मानल्या जाणाऱ्या देशांमध्ये आज भारत आहे"
"तोटा आणि अनुत्पादित मालमत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बँकांची चर्चा आता त्यांच्या विक्रमी नफ्यासाठी होत आहे"
"बँकिंग क्षेत्रातील लोकांनी मला किंवा माझ्या दृष्टिकोनाला कधीही निराश केले नाही"
“सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातून भारतातून गरिबी पूर्णपणे दूर केली जाऊ शकते आणि यामध्ये देशातील प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याची मोठी भूमिका आहे.
Posted On:
22 JUL 2023 12:01PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला मार्गदर्शन केले तसेच विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नव्याने भर्ती झालेल्या 70,000 पेक्षा जास्त जणांना नियुक्ती पत्रांचे वितरण केले. देशभरातून नियुक्त केलेले हे नवीन कर्मचारी महसूल, वित्तीय सेवा, टपाल , शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, संरक्षण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, जल संसाधन, कार्मिक आणि प्रशिक्षण तसेच गृह मंत्रालयासह सरकारची विविध मंत्रालये आणि विभागांमध्ये नियुक्त होतील. देशभरातील 44 ठिकाणी नियुक्तीपत्रांचे आज वितरण करण्यात आले, या सर्व ठिकाणांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
तरुणांच्या भर्तीसाठी हा केवळ एक संस्मरणीय दिवस नाही तर देशासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे कारण आजच्याच दिवशी 1947 मध्ये संविधान सभेने प्रथमच तिरंगा त्याच्या तत्कालीन विद्यमान स्वरूपात स्वीकारला होता, असे पंतप्रधानांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले. नव्याने भर्ती झालेल्यांना या महत्त्वाच्या दिवशी सरकारी सेवांसाठी त्यांचे नियुक्ती पत्र प्राप्त होत आहे, ही प्रेरणादायी बाब असून त्यांना देशाचे नाव उज्वल करण्यासाठी प्रोत्साहित करणारी बाब आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना विकसित भारताच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने योगदान देण्याची संधी मिळणे, हे नव्याने भर्ती झालेल्यांच्या कठोर परिश्रमाचे आणि दृढनिश्चयाचे फलित आहे, हे त्यांनी अधोरेखित केले. या महत्त्वपूर्ण प्रसंगी पंतप्रधानांनी भर्ती झालेल्यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन केले.
स्वातंत्र्याच्या अमृत काळाबद्दल बोलताना, भारताला ‘विकसित भारत’ बनवण्याचा संकल्प प्रत्येक नागरिकाने केला आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. अलिकडच्या वर्षांत जगाचा भारताप्रती असलेला विश्वास, महत्त्व आणि आकर्षण यांचा अधिकाधिक लाभ घेत पुढील 25 वर्षे नव्याने भर्ती झालेल्यांसाठी आणि राष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत, यावर त्यांनी भर दिला. 10 व्या क्रमांकावरून जगातील 5व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत झेप घेतल्याने आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये झालेल्या भारताच्या उदयावर त्यांनी प्रकाश टाकला. बहुतांश अर्थतज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे, भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक बनेल, याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. “जगातील अव्वल 3 अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होणे ही भारतासाठी एक महत्त्वाची कामगिरी असेल” असे सांगत, यामुळे प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि सामान्य नागरिकांच्या उत्पन्नातही वाढ होईल, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. नव्या अधिकाऱ्यांना अमृत काळात देशसेवा करण्याची सुवर्णसंधी मिळाली असल्याने सरकारकडून भर्तीसाठी आजच्यापेक्षा उत्तम वेळ असू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. देशाच्या लोकांची सेवा करणे आणि त्यांच्या समस्या सोडवणे तसेच जगणे अधिक सुलभ करणे आणि विकसित भारताच्या उद्दिष्टांशी स्वतःला संरेखित करणे, हे त्यांचे प्राधान्य असले पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली. तुमचा एक छोटासा प्रयत्न एखाद्याच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो”, असे सांगत जनता ही ईश्वराचे रूप असते आणि त्यांची सेवा करणे म्हणजे ईश्वराची सेवा करण्यासारखे आहे, असे पंतप्रधान म्हणाले. सर्वात मोठे समाधान प्राप्त करण्यासाठी नवीन नियुक्त झालेल्यांनी इतरांची सेवा करण्याच्या विश्वासाने काम केले पाहिजे, यावर पंतप्रधांनी भर दिला.
आजच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने ज्या क्षेत्रात नियुक्त्या झाल्या आहेत अशा बँकिंग क्षेताबद्दल बोलताना पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेच्या विस्तारात बँकिंग क्षेत्राच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. या क्षेत्राच्या गेल्या 9 वर्षांतील वाटचालीचा आढावा घेताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “जगात ज्या देशांतील बँकिंग क्षेत्र सशक्त आहे असे मानले जाते त्यामध्ये आज भारताचा समावेश झाला आहे.” भूतकाळात या क्षेत्रावर राजकीय स्वार्थीपणाच्या झालेल्या प्रभावाची त्यांनी चर्चा केली. पूर्वी एखाद्या सामर्थ्यवान व्यक्तीने फक्त फोन केला तरी कर्जांचे वितरण होत असे, त्या ‘फोन बँकिंग’ या चुकीच्या पद्धतीचा त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की अशा प्रकारे देण्यात आलेल्या कर्जांची कधीही परतफेड झाली नाही. अशा पद्धतीच्या घोटाळ्यांमुळे देशातील बँकिंग व्यवस्थेचा कणा मोडून पडला असे पंतप्रधानांनी सांगितले. ही परिस्थिती सुधारण्यासाठी 2014 नंतर हाती घेण्यात आलेल्या अनेक उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली. सरकारी बँकांच्या व्यवस्थापनाचे बळकटीकरण, व्यावसायिकतेवर अधिक भर आणि लहान लहान बँकांचे मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण अशा अनेक उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींचा विमा उतरवून, 99 टक्क्यापेक्षा अधिक ठेवी सुरक्षित करण्यात आल्यामुळे बँकिंग व्यवस्थेवरचा सामान्य जनतेचा विश्वास पुन्हा नव्याने वाढीस लागला. दिवाळखोरी संहितेसारख्या कायद्यांमुळे बँकांना तोट्यापासून संरक्षण देण्यात आले. तसेच स्वतःची मालमता जप्त करवून घेऊन ज्यांनी सरकारी मालमत्ता लुटली, त्यांच्यावरील पकड घट्ट केल्यामुळे तोट्यात असलेल्या आणि अधिक अनुत्पादित मालमत्ता असलेल्या बँका आता त्यांच्या विक्रमी नफ्यामुळे सर्वांच्या चर्चेचा विषय झाल्या आहेत.
बँकिंग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मेहनतीबद्दल पंतप्रधानांनी अभिमान व्यक्त केला. ते म्हणाले, “बँकिंग क्षेत्रातील व्यक्तींनी कधीच मला किंवा माझ्या स्वप्नांना निराश होऊ दिले नाही.” देशभरात 50 कोटी जन धन बँक खाती उघडून जन धन योजनेला प्रचंड यश मिळवून देणाऱ्या बँकिंग क्षेत्राच्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली. यामुळे साथरोगाच्या काळात कित्येक कोटी महिलांच्या खात्यात निधी हस्तांतरित करण्यात मोठी मदत होऊ शकली असे ते म्हणाले.
एमएसएमई क्षेत्राची स्थित सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल बोलताना पंतप्रधानांनी, उद्यमशील युवकांना विना हमी कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या मुद्रा योजनेचा उल्लेख केला. ही योजना यशस्वी केल्याबद्दल त्यांनी बँकिंग क्षेत्राचे कौतुक केले. त्याचप्रमाणे, जेव्हा सरकारने महिला स्वयं सहाय्यता बचत गटांना देण्यात येणारी कर्जाची रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी बँकिंग क्षेत्र सरकारच्या पाठीशी उभे राहिले तसेच बँकांनी एमएसएमई क्षेत्राला कर्ज दिल्यामुळे लहान उद्योगांना संरक्षण मिळून त्यात कार्यरत दीड कोटी लोकांचे रोजगार वाचू शकले अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेला भव्य यश मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधानांनी बँक कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानले. तसेच स्वनिधी योजनेच्या माध्यमातून 50 लाखाहून अधिक फिरत्या विक्रेत्यांना मदत करता आली. “मला खात्री आहे की तुम्ही सर्वजण आपापल्या नियुक्तीपत्रासोबतच बँकिंग क्षेत्राला गरिबांच्या सशक्तीकरणाचे साधन म्हणून योग्य पद्धतीने वापरण्यासाठीचे संकल्पपत्र देखील स्वीकाराल,” असे ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की नीती आयोगाने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की गेल्या 5 वर्षांत 13 कोटी भारतीय नागरिक दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले. या कामगिरीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीची दखल घेत, यासाठी राबविण्यात आलेल्या पक्की घरे, शौचालये आणि वीज जोडण्या यांच्यासंदर्भातील योजनांचा उल्लेखही त्यांनी केला. “जेव्हा या योजना गरीबांपर्यंत पोहोचल्या तेव्हा त्यांचे मनोधैर्य देखील वाढले. हे यश म्हणजे आपण सर्वांनी एकत्र येऊन भारतातून गरिबी हटविण्यासाठी प्रयत्न केले तर भारतातून गरीबीचे समूळ उच्चाटन होईल या तथ्याचे प्रतीक आहे. आणि देशातील प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याची यामध्ये फार मोठी भूमिका आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी यावेळी देशातील गरिबी कमी करण्यासाठी आणखी एका आयामावर भर दिला आणि तो म्हणजे नव्या रोजगार संधी निर्माण करणाऱ्या निओ-मध्यम वर्गाचा विस्तार. निओ-माध्यम वर्गाच्या वाढत्या मागण्या आणि आकांक्षा यांच्यामुळे उत्पादनाला चालना मिळत आहे. भारतातील कारखाने आणि उद्योगांमधील उत्पादनाला मिळालेल्या प्रोत्साहनाचा सर्वाधिक फायदा देशातील युवा वर्गाला मिळत आहे या मुद्द्यावर त्यांनी भर दिला. मोबाईल फोनची निर्यात, वर्ष 2023 च्या पहिल्या सहामाहीत विकल्या गेलेल्या कारची संख्या आणि विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या विक्रीचे विक्रमी प्रमाण असे अनेक नवे विक्रम भारत दररोज स्थापित करत आहे, याकडे देखील त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. “अशा सर्व उपक्रमांमुळे देशातील रोजगार तसेच रोजगाराच्या संधी यांना मोठी चालना मिळत आहे, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
संपूर्ण जग भारताच्या प्रतिभेवर लक्ष ठेवून आहे, असे पंतप्रधान म्हणाले. जगातील अनेक विकसित अर्थव्यवस्थांमध्ये सरासरी आयुर्मान वाढल्यामुळे श्रम करणाऱ्या लोकांच्या संख्येत होणारी घट या मुद्द्याकडेही पंतप्रधानांनी लक्ष वेधले. त्यामुळे भारतातील तरुणांनी मेहनत करण्याची तसेच आपली कौशल्ये आणि क्षमता वाढवण्याची हीच योग्य वेळ आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिभावंत, डॉक्टर्स आणि परिचारिकांची जागतिक स्तरावर मोठी मागणी अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की जगातील प्रत्येक देशात आणि प्रत्येक क्षेत्रात भारतीय प्रतिभेप्रती असणारा आदर निरंतर वाढत आहे. गेल्या 9 वर्षांत, सरकारने कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित केले असून पीएम कौशल विकास योजनेअंतर्गत सुमारे 1.5 कोटी तरुणांना प्रशिक्षित करण्यात आल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. भारतीय तरुणांना जागतिक संधींसाठी तयार करता यावे या हेतूने 30 स्किल इंडिया आंतरराष्ट्रीय केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी देशभरात नवीन वैद्यकीय महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि तांत्रिक संस्थांच्या उभारणीचा उल्लेख केला. आपल्या देशात 2014 पर्यंत केवळ 380 वैद्यकीय महाविद्यालये होती मात्र गेल्या 9 वर्षांत त्याची संख्या आता 700 पेक्षा जास्त झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. परिचारिका महाविद्यालयांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. “जागतिक मानके पूर्ण करणारी कौशल्ये भारतातील तरुणांसाठी रोजगाराच्या लाखो नवीन संधी निर्माण करतील”, असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
नियुक्त करण्यात आलेले सर्व जण अतिशय सकारात्मक वातावरणात सरकारी सेवेत रुजू होत आहेत. आणि, ही सकारात्मक विचारसरणी पुढे नेण्याची जबाबदारी आता त्यांच्या खांद्यावर आहे, असे पंतप्रधानांनी आपल्या भाषणाच्या समारोपात अधोरेखित केले. या सर्वांनी शिकण्याची आणि आत्म-विकासाची प्रक्रिया कायम सुरू ठेवावी, तसेच सरकारने तयार केलेल्या IGoT कर्मयोगी या ऑनलाइन शिक्षण व्यासपीठाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
पार्श्वभूमी
रोजगार मेळावा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. हा रोजगार मेळावा रोजगार निर्मिती आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी तसेच त्यांना राष्ट्रीय विकासात योगदान देता यावे यासाठी अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्याच्या कामात उत्प्रेरक म्हणून सहाय्यक ठरेल अशी अपेक्षा आहे.
नव्याने नियुक्त केलेल्या सर्वांना IGoT कर्मयोगी पोर्टलवरील ऑनलाइन मॉड्यूल कर्मयोगी प्रारंभद्वारे स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी देखील उपलब्ध आहे. या पोर्टलवर 400 हून अधिक ई-लर्निंग अभ्यासक्रम ‘कुठेही आणि कोणत्याही डिव्हाइसवर’ शिकता येतील अशा स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
***
M.Pange/S.Chavan/S.Chitnis/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1941701)
Visitor Counter : 163
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam