उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राज्यसभा अध्यक्षांनी उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये पन्नास टक्के महिला सदस्यांचे नामनिर्देशन करून उचलले लिंगभाव समानतेचे ऐतिहासिक पाउल


पॅनलमधील चारही महिलांचा राज्यसभा सदस्यत्वाचा पहिलाच कार्यकाळ

एस फांगनॉन कोन्याक या उपाध्यक्षांच्या पॅनेलसाठी नामांकित झालेल्या नागालँडमधील पहिल्याच महिला

यंदाच्या पावसाळी अधिवेशनापासून राज्यसभा अध्यक्ष डिजिटल कार्यपद्धतीचा अवलंब करणार

Posted On: 20 JUL 2023 3:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 जुलै 2023

 

राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृहातील उपाध्यक्षांच्या पॅनेलसाठी चार महिला खासदारांचे नामांकन करून एक ऐतिहासिक पाउल उचलले आहे.

पॅनेलमध्ये नामनिर्देशित केलेल्या सर्व महिला सदस्यांचा राज्यसभेतील खासदारकीचा पहिलाच कार्यकाळ आहे, ही गोष्ट लक्षात घेण्याजोगी असून, एस. फांगनॉन कोन्याक या नागालँडमधून राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवडून आलेल्या पहिल्या महिला आहेत.

पावसाळी अधिवेशनापूर्वी पुनर्रचना करण्यात आलेल्या पॅनेलमध्ये एकूण आठ नावे असून, त्यापैकी निम्म्या महिला आहेत. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या इतिहासात उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये महिला सदस्यांना समान प्रतिनिधित्व देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

राज्यसभेच्या अध्यक्षांनी डिजिटल कार्यपद्धतीचा पूर्णतः अवलंब केला असून, ही आणखी एक उल्लेखनीय घडामोड आहे. राज्यसभेचे अध्यक्ष सभागृहाचे कामकाज, सभागृहातील उपस्थिती, निवेदन सादर करणाऱ्या सदस्यांचे तपशील आणि इतर संबंधित माहितीसाठी इलेक्ट्रॉनिक टॅब्लेटचा वापर करतील. 

 

उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये नामनिर्देशन झालेल्या महिला सदस्यांबाबतची माहिती पुढील प्रमाणे:

पी.टी. उषा:

  • त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले असून त्या एक प्रसिद्ध धावपटू आहेत. जुलै 2022 मध्ये त्यांना राज्यसभेवर नामनिर्देशित करण्यात आले होते.
  • त्या संरक्षण समिती, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाची सल्लागार समिती आणि नीतिशास्त्र समितीच्या सदस्य आहेत.

एस. फांगनॉन कोन्याक:

  • त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या आहेत. एप्रिल 2022 मध्ये नागालँडमधून राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवड झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत तर  संसदेच्या सभागृहात किंवा राज्य विधानसभेवर निवडून आलेल्या राज्यातील दुसऱ्या महिला आहेत.
  • त्या परिवहन, पर्यटन आणि संस्कृती समिती, ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाची सल्लागार समिती, महिला सक्षमीकरण समिती, सदन समिती आणि शिलाँगच्या ईशान्य इंदिरा गांधी प्रादेशिक आरोग्य आणि वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रशासकीय परिषदेच्या सदस्य आहेत.

डॉ. फौजिया खान:

  • त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आहेत.  एप्रिल 2020 मध्ये त्यांची  राज्यसभेवर निवड झाली होती.
  • त्या महिला सक्षमीकरण समिती, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण समिती, कायदा आणि न्याय मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या सदस्य आहेत.

सुलता देव:

  • त्या बिजू जनता दलातील आहेत. जुलै 2022 मध्ये त्यांची  राज्यसभेवर निवड झाली होती.
  • त्या उद्योग समिती, महिला सक्षमीकरण समिती, लाभाच्या पदासंबंधी संयुक्त समिती, खासदार स्थानिक क्षेत्र विकास योजना (MPLADS) समिती आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या सदस्य आहेत.

उपरोक्त महिला सदस्यांव्यतिरिक्त, व्ही विजयसाई रेड्डी, घनश्याम तिवारी, डॉ. एल. हनुमंथय्या आणि सुखेंदू शेखर रे यांनाही उपाध्यक्षांच्या पॅनेलमध्ये नामनिर्देशित करण्यात  आले आहे.

    

सुलता देव                 एस. फांगनॉन कोन्याक

   

पी.टी. उषा              डॉ. फौजिया खान

 

* * *

R.Aghor/Rajshree/Sushma/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1940996) Visitor Counter : 533