राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या हस्ते भूमी सन्मान 2023 प्रदान

Posted On: 18 JUL 2023 3:27PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 जुलै 2023

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत, ‘भूमी सन्मान 2023’ प्रदान करण्यात आले.केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. सरकारच्या डिजिटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम(DILRMP) अंतर्गत, भूमी नोंदणीचे काम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या चमूसोबत, संबंधित राज्यांचे सचिव आणि जिल्हयाधिकाऱ्यांनी हे पुरस्कार स्वीकारले.

देशाच्या सर्वांगीण विकासासाठी, ग्रामीण विकासाला गती देणे आवश्यक आहे, असे मत राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केले. ग्रामीण भागांच्या विकासासाठी, भूमी दस्तऐवजांचे आधुनिकीकरण करणे ही मूलभूत आवश्यकता आहे, कारण, ग्रामीण भागातील बहुसंख्य लोक, उपजीविकेसाठी, भू संसाधनांवर अवलंबून असतात, असे त्या म्हणाल्या. ग्रामीण भागांच्या सर्वसमावेशक विकासासाठी एक व्यापक आणि एकात्मिक भूमी व्यवस्थापन प्रणाली अत्यंत महत्वाची ठरते, असे त्यांनी सांगितले. 

डिजिटलीकरणामुळे पारदर्शकता वाढते. भूमी दस्तऐवजांचे डिजिटलीकरण आणि आधुनिकीकरण, यांचा देशाच्या विकासावरही मोठा परिणाम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भूमी दस्तऐवजांचे डिजिटलीकरण करणे आणि त्यांना सरकारच्या विविध विभागांशी ऑनलाईन जोडणे, यामुळे, सर्वच विभागांना त्यांच्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अधिक योग्य प्रकारे करता येईल. तसेच, कधी, पूर किंवा आग लागणे अशा नैसर्गिक किंवा इतर आपत्तिकाळात कागदपत्रांचे नुकसान झाले किंवा ती गहाळ झाली, तर डिजिटल स्वरूपात ती उपलब्ध असतील, असेही राष्ट्रपती म्हणाल्या. 

डिजिटल इंडिया भूमी माहिती व्यवस्थापन प्रणालीअंतर्गत, एक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन क्रमांक देखील दिला जातो, जो आधार कार्डप्रमाणे उपयुक्त ठरतो, ही अतिशय समाधानकारक गोष्ट असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या. हा क्रमांक, जमिनीचा योग्य वापर करण्यास तसेच, नव्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी देखील वापरला जाऊ शकेल, असे राष्ट्रपती म्हणाल्या. ई-न्यायालयांशी, भूमी दस्तऐवज जोडणे आणि आणि त्याच्या डेटा बेसची नोंदणी याचेही अनेक फायदे आहेत, असे त्या म्हणाल्या. डिजिटलीकरणामुळे येणारी पारदर्शकता, जमिनीशी संबंधित सर्व अवैध आणि अनैतिक व्यवहारांना आळा घालणारी ठरेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

जमिनीशी संबंधित माहिती मुक्त आणि सहजपणे उपलब्ध झाल्यामुळे देखील, अनेक लाभ होऊ शकतील. डिजिटलीकरण आणि माहिती एकमेकांशी जोडल्यामुळे, लोकांचा आणि संस्थांचाही वेळ तसेच ऊर्जा वाचेल, जी इतर विकासकामांमध्ये वापरता येईल.

राष्ट्रपतींचे संपूर्ण भाषण ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.  

 

S.Kane/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1940449) Visitor Counter : 249