संरक्षण मंत्रालय
24व्या कारगिल विजय दिवसाच्या स्मरणार्थ भारतीय सैन्याद्वारे नवी दिल्ली ते द्रास दरम्यान तिन्ही दलातील सर्व महिलांच्या मोटरसायकल रॅलीचे आयोजन
Posted On:
18 JUL 2023 3:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2023
1999 च्या कारगिल युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवून 24 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ आणि महिलांची अदम्य भावना अधोरेखित करण्यासाठी भारतीय सैन्याने तिन्ही दलातील सर्व महिलांसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक, दिल्ली ते कारगिल युद्ध स्मारक, द्रास (लडाख) दरम्यान नारी सशक्तिकरण महिला मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले. 18 जुलै 23 रोजी राष्ट्रीय युद्ध स्मारक, नवी दिल्ली येथून महिलांच्या मोटरसायकल रॅलीला लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. यावेळी आर्मी वाइव्हज वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्ष अर्चना पांडे उपस्थित होत्या. राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे रॅलीला रवाना करताना टीव्हीएस मोटर कंपनीचे व्यवसाय प्रमुख आणि इतर प्रायोजकांसह लष्करी आणि नागरी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी जमलेल्या मोठ्या जनसमुदायामुळे रॅलीतील सहभागींना प्रेरणा आणि उर्मी मिळाली.
तिन्ही दलातील एकूण 25 सदस्यीय संघात दोन वीर नारींचा समावेश आहे, त्यापैकी एक सेवारत अधिकारी आहे, तसेच 10 सेवारत भारतीय लष्करी महिला अधिकारी, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलातील प्रत्येकी एक महिला अधिकारी, भारतीय लष्कराच्या तीन महिला सैनिक आणि आठ सशस्त्र महिला सैनिकांचा यात समावेश आहे. हा चमू कारगिल युद्धातील सशस्त्र दलांच्या निर्णायक विजयाचा उत्सव साजरा करेल आणि राष्ट्रसेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करेल. रॅली एकूण अंदाजे 1000 किलोमीटरचे अंतर कापेल, ज्यामध्ये हा चमू हरियाणा, पंजाबचा मैदानी प्रदेश आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या उंच पर्वतीय खिंडीतून 25 जुलै 23 रोजी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकापर्यंत पोहोचेल. रॅलीदरम्यान, हा चमू राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, विविध शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थी, दिग्गज आणि वीर नारी यांच्याशी संवाद साधेल. या रॅलीसाठी भारतीय लष्कराने टीव्हीएस मोटर कंपनीसोबत भागीदारी केली असून सहभागी TVS Ronin मोटरसायकलवर स्वार होणार आहेत.
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी दृढनिश्चय, नारी शक्ती आणि राष्ट्र उभारणीत महिलांनी बजावलेली महत्त्वाची भूमिका अधोरेखित करणाऱ्या या आव्हानात्मक प्रवासासाठी संपूर्ण चमूचे कौतुक केले.
S.Kane/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1940442)
Visitor Counter : 158