पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचा फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा दौरा


निर्गमनविषयक निवेदन

Posted On: 13 JUL 2023 5:53AM by PIB Mumbai

फ्रान्सचे राष्ट्रपती एमन्युएल मॅक्रॉन यांच्या आमंत्रणाला मान देऊन मी 13 आणि 14 जुलै या काळात फ्रान्सच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहे.
हा दौरा खासकरून वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण मी पॅरीस येथे होणाऱ्या फ्रेंच राष्ट्रीय दिन समारंभासाठी अर्थात बॅस्टाईल दिन सोहोळ्यासाठी सन्माननीय अतिथी म्हणून राष्ट्रपती मॅक्रॉन यांच्यासोबत उपस्थित असेन. तिन्ही भारतीय सेनादलांची पथके या बॅस्टाईल दिन संचलन कार्यक्रमात सहभागी होतील, तर भारतीय हवाई दलाची विमाने या प्रसंगी हवाई कसरती करतील.
हे वर्ष दोन्ही देशांच्या धोरणात्मक भागीदारीचे  रौप्य महोत्सवी वर्धापन वर्ष आहे. दृढ विश्वास आणि कटिबद्धता या मुल्यांमध्ये रुजलेले आपले दोन्ही देश संरक्षण,अंतराळ, नागरी अणु कार्यक्रम, नील अर्थव्यवस्था, व्यापार,गुंतवणूक, शिक्षण, संस्कृती आणि जनतेतील परस्पर संबंध या क्षेत्रांमध्ये एकमेकांशी सखोल सहकार्य करत आहेत. आपण प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांवर देखील एकत्रितपणे काम करत आहोत.
राष्ट्रपती मॅक्रॉन यांची भेट घेण्यासाठी तसेच त्यांच्यासोबत दीर्घकालीन आणि काळाच्या कसोटीवर खरी ठरलेली ही भागीदारी आगामी 25 वर्षांमध्ये आणखी पुढे घेऊन जाण्याबाबत विस्तृत प्रमाणात चर्चा करण्यासाठी मी उत्सुक आहे.वर्ष 2022 मधील माझ्या अधिकृत फ्रान्स भेटीनंतर राष्ट्रपती मॅक्रॉन यांना भेटण्याची संधी मला अनेकदा मिळाली, मे 2023 मध्ये  जपानमधील हिरोशिमा येथे झालेल्या जी-7 शिखर परिषदेच्या वेळी माझी त्यांच्याशी नुकतीच भेट झाली होती.
फ्रान्सच्या पंतप्रधान एलिसाबेथ बॉर्न, सिनेटचे अध्यक्ष गेरार्ड लार्चर आणि राष्ट्रीय सभेच्या अध्यक्ष याएल ब्राऊन-पिव्हेट यांच्यासह फ्रान्सच्या अनेक प्रमुख नेत्यांशी चर्चा करण्यासाठी देखील मी अत्यंत उत्सुक आहे.
या माझ्या फ्रान्स दौऱ्यात चैतन्यपूर्ण भारतीय समुदाय, दोन्ही देशांचे महत्त्वाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच फ्रान्समधील महत्त्वाच्या प्रमुख व्यक्ती यांची भेट घेण्याची संधी मला मिळणार आहे. माझ्या या फ्रान्स भेटीमुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीला नवा जोम मिळेल असा विश्वास मला वाटतो.
पॅरीसहून मी 15 जुलै रोजी संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकृत भेटीसाठी अबू धाबीला जाणार आहे. यावेळी अबुधाबीचे राज्यकर्ते आणि युएईचे राष्ट्रपती शेख मोहमद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेण्याबाबत मी आशावादी आहे.
भारत आणि युएई हे देश व्यापार, गुंतवणूक,उर्जा,अन्न सुरक्षा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शिक्षण, फिनटेक, संरक्षण क्षेत्र, सुरक्षा आणि नागरिकांचे परस्परांतील दृढ संबंध यांसारख्या विस्तृत श्रेणीतील क्षेत्रांमध्ये परस्परांशी जोडलेले आहेत. गेल्या वर्षी, राष्ट्रपती शेख मोहमद बिन झायेद अल नाह्यान आणि मी आपल्या भागीदारीच्या भविष्यावरील मार्गदर्शक आराखड्याबाबत संमती दर्शवली होती आणि आता आपल्या दोन्ही देशांतील संबंध आणखी दृढ कसे करता येतील यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा होण्याची मी वाट पाहत आहे.
यावर्षी काही काळानंतर युएईच्या यजमानपदात युएनएफसीसीसीच्या पक्षांच्या 28 व्या परिषदेचे आयोजन होणार आहे. उर्जा स्थित्यंतर सुलभ करण्यासाठी तसेच पॅरीस कराराची अंमलबजावणी करण्यासाठी हवामान विषयक उपक्रमांना वेग आणण्याच्या दृष्टीने जागतिक सहकार्य मजबूत करण्यासंदर्भात या परिषदेत दृष्टीकोनांची देवाणघेवाण करण्यासाठी देखील मी उत्सुक आहे.
माझ्या युएई दौऱ्यामुळे आपल्या दोन्ही देशांमधील व्यापक धोरणात्मक भागीदारीचा नवा अध्याय सुरु होईल असा विश्वास मला वाटतो.

***

JPS/Sanjana/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1939130) Visitor Counter : 156