गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हरियाणातील गुरुग्राम येथे 13 जुलै 2023 रोजी “ एनएफटी, एआय आणि मेटाव्हर्सच्या युगात गुन्हे आणि सुरक्षाविषयक जी20 परिषदे”च्या उद्घाटन सत्राला करणार संबोधित


भारतातील 7 प्रमुख शैक्षणिक संस्थामधून सायबर स्वयंसेवकांच्या तुकड्यांना गृहमंत्री करणार रवाना, अमित शाह एका प्रदर्शनाचे करणार उद्घाटन आणि परिषदेच्या पदकांचे करणार अनावरण

Posted On: 11 JUL 2023 7:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2023

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हरयाणामध्ये गुरुग्राम येथे 13 जुलै 2023 रोजी एनएफटी, एआय आणि मेटाव्हर्सच्या युगात गुन्हे आणि सुरक्षाविषयक जी20 परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहेत. भारतातील 7 प्रमुख शैक्षणिक संस्थामधून सायबर स्वयंसेवकांच्या तुकड्यांना देखील गृहमंत्री रवाना करणार आहेत. विशेषत्वाने निवड करण्यात आलेले हे स्वयंसेवक समाजामध्ये सायबर जागरुकता निर्माण करण्याचे काम करतील तसेच संगणकावरील धोकादायक मजकूर ओळखण्याचे आणि त्याची माहिती कळवण्याचे आणि समाजाला सायबर सुरक्षित बनवण्यासाठी तांत्रिक सहाय्य घेण्याचे मार्गदर्शन करतील. यावेळी अमित शाह एका प्रदर्शनाचे उद्घाटन करतील आणि परिषदेच्या पदकांचे अनावरण करतील. जी20 देश, विशेष निमंत्रित 9 देश, आंतरराष्ट्रीय संघटना आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी आणि भारत आणि जगभरातील विषयतज्ञ यांचा समावेश असलेले 900 पेक्षा जास्त प्रतिनिधी 13-14 जुलै 2023 रोजी होणाऱ्या या दोन दिवसीय परिषदेत सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सुरक्षित भारताची उभारणी करणे, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांपैकी एक आहे. सुरक्षित सायबरस्पेसची निर्मिती करणे आणि सायबरसुरक्षाविषयक चिंतांना प्राधान्य देणे यासाठी एक जागतिक भागीदारी निर्माण करण्याची संधी या परिषदेमुळे मिळणार आहे. सायबर सुरक्षा आणि नॉन फंगिबल टोकन्स (NFT), आर्टिफिशियल इंटेलिजन्स(AI) आणि मेटाव्हर्स सारख्या नव्या आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याच्या उपाययोजना यावर या परिषदेतील विचारविनिमयाचा भर असेल. 

सायबर सुरक्षा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरक्षिततेशी संबंधित बाबींचा एक अत्यावश्यक पैलू बनला असून त्यावर  आर्थिक आणि भू-राजकीय गुंतागुंतीमुळे पुरेसे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. जी 20 मंचावर सायबर सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने  महत्त्वपूर्ण माहिती विषयक पायाभूत सुविधा आणि डिजिटल सार्वजनिक मंचाची  सुरक्षा आणि अखंडता सुनिश्चित करण्यात सकारात्मक योगदान देऊ शकते. जी 20 मंचावर सायबर सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांना  प्रतिबंध यावरील  चर्चांमुळे माहितीचा आदानप्रदान आराखडा विकसित करण्यात मदत होईल.

कायदेविषयक क्षेत्र ,शैक्षणिक, प्रशिक्षण संस्था, आर्थिक मध्यस्थ, फिनटेक, समाज माध्यम मध्यस्थ, माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान, सायबर न्याय वैद्यक , नियामक, स्टार्टअप्स, ओव्हर द टॉप (ओटीटी ) सेवा प्रदाते, ई-वाणिज्य  कंपन्या यांचे प्रतिनिधित्व करणारे जागतिक कीर्तीचे सायबर तज्ञ आणि अतिथी वक्ते आणि अन्य मान्यवर या  परिषदेत सहभागी होतील. सर्व केंद्रीय मंत्रालये, संघटना आणि संस्थांचे  प्रतिनिधी तसेच सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, प्रशासक आणि पोलीस महासंचालक देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत.

13 जुलै 2023 रोजी पूर्ण सत्राने या  परिषदेला प्रारंभ   होईल आणि त्यानंतर उद्घाटन सत्र होईल. दोन दिवसीय परिषदेदरम्यान खालील विषयांवर 6 तांत्रिक सत्रे होतील:

  1. इंटरनेट प्रशासन  - राष्ट्रीय उत्तरदायित्व आणि जागतिक समानता
  2. डिजिटायझेशनच्या अभूतपूर्व वाढीच्या अनुषंगाने  डीपीआय सुरक्षित करणे: रचना  , स्थापत्य , धोरणे आणि सज्जता
  3. एक्सटेंडेड रिऍलिटी , मेटाव्हर्स आणि डिजिटल स्वामित्व भविष्य- कायदेशीर आणि नियामक चौकट
  4. कृत्रिम बुद्धिमत्ता  : आव्हाने संधी आणि जबाबदारीने  वापर
  5. कनेक्टिंग  डॉट्स : क्रिप्टो करन्सी आणि डार्कनेटची आव्हाने
  6. आयसिटीचा गुन्हेगारी वापर: आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी रूपरेषा  विकसित करणे

या परिषदेबरोबरच, आयसीटी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था/उद्योगांच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उत्पादने आणि सेवा दर्शविणारी प्रदर्शने आयोजित करण्यात आली आहेत. 14 जुलै रोजी समारोप  सत्राने  या परिषदेची सांगता होणार असून  केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री  अश्विनी वैष्णव या सत्राला संबोधित करतील.

S.Kane/S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1938778) Visitor Counter : 187