अंतराळ विभाग
भारताने अंतराळ क्षेत्रात अल्पावधीतच 140 पेक्षा जास्त अंतराळ स्टार्टअप्स सुरू करून मजबूत पाऊल उचलले आहे आणि संपूर्ण जगाने भारताचे हे यश मान्य करायला सुरुवात केली आहे : डॉ जितेंद्र सिंह
अंतराळातील शोधासाठी जागतिक सहकार्य आणि युती अत्यावश्यक आहे : डॉ जितेंद्र सिंह
अंतराळ अर्थव्यवस्थेसाठी खाजगी क्षेत्राचा सहभाग निर्णायक : डॉ जितेंद्र सिंह
Posted On:
06 JUL 2023 4:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 जुलै 2023
भारताने अल्पावधीतच 140 हून अधिक अंतराळ स्टार्टअप्स सुरू करून मजबूत पाऊल उचलले आहे आणि संपूर्ण जगाने भारताची क्षमता आणि अंतराळ तंत्रज्ञानातील संधी या उपलब्धीऔची प्रशंसा करण्यास सुरुवात केली आहे, असे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे सांगितले.
डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली येथे जी 20 देशांच्या अंतराळ अर्थव्यवस्था नेत्यांच्या बैठकीच्या (SELM) चौथ्या बैठकीच्या उद्घाटन सत्राला संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते. भारताच्या अंतराळ क्षेत्राने गेल्या काही वर्षात जी यशाची झेप घेतली आहे त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते, कारण त्यांनी भारताचे अंतराळ क्षेत्र खाजगी कंपन्यांसाठी खुले केले, असेही डॉ. सिंह यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात, अंतराळाशी संबंधित करारांचा अजेंडा प्रमुख घटक होता, असे त्यांनी सांगितले. अंतराळ तंत्रज्ञानात अग्रेसर असल्याचा दावा करणारे देश देखील त्यांच्या अंतराळाशी संबंधित क्रियाकलापांमध्ये मूल्यवर्धन करण्यासाठी आज भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहेत, हेच या करारातून स्पष्ट होत असल्याचे मंत्री महोदयांनी निदर्शनास आणून दिले.
अंतराळ अर्थव्यवस्थेसाठी खाजगी क्षेत्रांची उदयोन्मुख भूमिका "महत्वपूर्ण" असल्याचे डॉ जितेंद्र सिंग यांनी खाजगी क्षेत्राचे कौतुक करताना सांगितले.
अंतराळात नवनवे शोध घेण्याच्या मानवाच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी जागतिक सहकार्य आणि आघाड्या अत्यावश्यक आहेत, असे डॉ जितेंद्र सिंह म्हणाले. जागतिक अर्थव्यवस्थेतील अंतराळ अर्थव्यवस्थेचा वाटा वाढवण्यासाठी अंतराळात संशोधन करणाऱ्या जबाबदार राष्ट्रांची युती ही काळाची गरज आहे, असे ते म्हणाले.
"अंतराळ तंत्रज्ञानामुळे अर्थव्यवस्थेच्या विविध स्तंभांना एकाच छत्राखाली एकत्रित केले जात असल्याने या क्षेत्रात केलेल्या गुंतवणुकीचा देश आणि अर्थव्यवस्थांच्या सर्वांगीण विकासावर गुणात्मक प्रभाव पडेल, असेही ते म्हणाले. नजीकच्या काही दशकात अंतराळ अर्थव्यवस्था पुढील ट्रिलियन-डॉलर क्षेत्र असेल असे एका अभ्यासानुसार स्पष्ट झाले आहे, असे ते म्हणाले. अर्थव्यवस्थेतील अंतराळाचे महत्त्व लक्षात घेऊन, भारताने आपली अंतराळ अर्थव्यवस्था खुली करण्यासाठी तसेच आपली अंतराळ अर्थव्यवस्था एकात्मिक करण्यासाठी आणि या क्षेत्रात इतर देशांशी संबंध विकसित करण्यासाठी विविध उपाय योजले आहेत,” असे त्यांनी सांगितले.
जी 20 देशांच्या अंतराळ अर्थव्यवस्थेच्या नेत्यांच्या बैठकीमुळे पृथ्वीवर वास्तविक आणि सकारात्मक परिणाम साधण्यासाठी अंतराळ तंत्रज्ञानाच्या वापरावर एक केंद्राभिमुखता निर्माण होईल, अशी आशा अंतराळ आणि तंत्रज्ञान मंत्र्यांनी जगभरातील खाजगी भागीदार आणि थिंक टँकचे स्वागत करताना व्यक्त केली.
राष्ट्रीय अंतराळ संस्थांचे प्रमुख, जी- 20 च्या अंतराळ उद्योगांचे नेते, जी-20 राष्ट्रांचे वरिष्ठ नेते, आमंत्रित देशांचे प्रतिनिधी आणि इतर मान्यवर या दोन दिवसीय बैठकीत सहभागी होत आहेत.
Jaydevi PS/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937765)
Visitor Counter : 191