गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अहमदाबाद महानगरपालिका आणि साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी विकसित केलेल्या साबरमती रिव्हरफ्रंटवर स्वदेशात निर्मित 'अक्षर रिव्हर क्रूझ' चा केला प्रारंभ


साबरमती रिव्हरफ्रंट केवळ भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध

स्वदेशात निर्मित 'अक्षर रिव्हर क्रूझ' या रिव्हरफ्रंटशी संलग्न, ही रिव्हर क्रूझ अहमदाबादच्या लोकांसाठी तसेच पर्यटकांसाठी एक प्रमुख आकर्षण ठरेल

Posted On: 02 JUL 2023 2:31PM by PIB Mumbai


 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अहमदाबाद महानगरपालिका आणि साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी विकसित केलेल्या साबरमती रिव्हरफ्रंटवर - स्वदेशात निर्मित 'अक्षर रिव्हर क्रूझ'चा प्रारंभ केला.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001GJGW.jpg

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, या अक्षर रिव्हर क्रूझच्या रुपात गुजरात सरकार आणि महानगरपालिकेने अहमदाबाद शहरातील नागरिकांना आज एक नवीन भेट दिली आहे. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी भारतात पहिल्यांदाच रिव्हरफ्रंटची संकल्पना मांडली आणि त्याचे नियोजन केले. तसेच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच हा प्रकल्प विकसित होऊन पूर्णत्वास पोहोचला, असे शाह यांनी सांगितले. रिव्हरफ्रंट केवळ अहमदाबादमध्येच नाही तर संपूर्ण भारत आणि जगभरात लोकप्रिय असून पर्यटनाचे नवे आकर्षण केंद्र म्हणून उदयास आले आहे, असेही ते म्हणाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002OX9Y.jpg

रिव्हरफ्रंटमुळे केवळ पाण्याची पातळी वाढली असे नाही, तर हे स्थळ आता ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि तरुणांसह प्रत्येकासाठी विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे केंद्र म्हणून उदयास आले आहे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले. अहमदाबादमधील सर्व नागरिकांसाठी ही लक्झरी नदी-क्रूझ एक नवीन आकर्षण ठरेल, असे ते म्हणाले. अहमदाबाद महानगरपालिका आणि साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत ही क्रूझ विकसित केली आहे.

मेक इन इंडिया अंतर्गत 15 कोटी रुपये खर्चून बनवलेला दोन इंजिन असलेला हा भारतातील पहिलाच प्रवासी तराफा असून तो सलग दीड तास सुरक्षित प्रवास करू शकतो. हा 30 मीटर लांबीचा तराफा अहमदाबादमधील स्थानिक तसेच देशभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल, असे ते म्हणाले. याची प्रवासी क्षमता 165 प्रवाशांना नेण्याची असून यामध्ये एक उपाहारगृह आहे, जे निश्चितच लोकांना आकर्षित करेल, असे शाह यांनी सांगितले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003EPE6.jpg

प्रवाशांची सोय लक्षात घेऊन हा तराफा बांधण्यात आला असून त्यावर 180  जीवसुरक्षा जॅकेट्स आहेत, अग्नीपासून बचावाचे साहित्य आणि आणीबाणीच्या प्रसंगी वापरासाठी होड्या आहेत, असे अमित शाह यांनी सांगितले. गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी असताना नरेंद्र मोदी यांनी नेहमीच अहमदाबाद आणि गुजरातमधील पर्यटनाला प्राधान्य दिले. पर्यटन क्षेत्रात मोदी यांनी हाती घेतलेल्या उपक्रमांमुळे गुजरातसह त्यातील दोन मुख्य केंद्रे देशाच्या पर्यटन नकाशावर ठळक झाली, याकडे शाह यांनी लक्ष वेधले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध उपक्रमांची सुरुवात करून गुजरातच्या पर्यटनाला नवा आयाम दिला आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी भारताला प्रत्येक क्षेत्रात जगात पहिल्या स्थानावर आणण्यासाठी गेल्या नऊ वर्षांत केलेल्या प्रयत्नांचे फायदे आता दिसून येऊ लागले आहेत, असे शाह म्हणाले.

***

S.Patil/S.Patil/S.Mukhedkar/R.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936907) Visitor Counter : 157