पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी पाच वंदे भारत गाडयांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले

Posted On: 27 JUN 2023 10:01PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्थानक इथून पाच वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या पाच वंदे भारत गाड्या आहेत - भोपाळ (राणी कमलापती) - इंदूर वंदे भारत एक्सप्रेस; भोपाळ (राणी कमलापती) - जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस; रांची - पाटणा वंदे भारत एक्सप्रेस; धारवाड - बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस आणि गोवा (मडगाव) - मुंबई वंदे भारत एक्सप्रेस.

पंतप्रधानांनी राणी कमलापती - इंदूर वंदे भारत एक्स्प्रेसच्या पहिल्या डब्याची पाहणी केली. तसेच या गाडीतून प्रवास करणाऱ्या मुलांशी आणि गाडीच्या  कर्मचाऱ्यांशीही त्यांनी संवाद साधला.

पंतप्रधानांनी ट्विट केले:

"आज भोपाळ मध्ये पाच वंदे भारत गाडयांना एकाच वेळी हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्याचे सौभाग्य लाभले. देशभरात पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हीटी वेगाने विकसित करण्याप्रति आमचे सरकार किती कटिबद्ध आहे हे यातून दिसून येते."


भोपाळ (राणी कमलापती) - इंदूर वंदे भारत एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करणारे इंदूरचे खासदार शंकर लालवानी यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी मध्य प्रदेशच्या जनतेचे अभिनंदन केले आणि उज्जैनला जाणाऱ्या यात्रेकरूंचा प्रवास यामुळे अधिक सुलभ होईल असे सांगितले. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे :

"इंदूर -भोपाळ दरम्यान सुरु झालेल्या वंदे भारत गाडीबद्दल मध्य प्रदेशच्या लोकांचे खूप-खूप अभिनंदन. यामुळे त्यांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा आनंद घेता येईल तसेच धार्मिक शहर उज्जैनला भेट देणाऱ्या भाविकांचा प्रवासही सुखकर होईल."


भोपाळ (राणी कमलापती) - जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेसचे जबलपूर येथे स्वागत करणारे जबलपूरचे खासदार राकेश सिंह यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले की, या गाडीमुळे राजधानी भोपाळ आणि सांस्कृतिक राजधानी जबलपूर यांच्यात उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण होईल तसेच पर्यटनाला चालना मिळेल आणि यात्रेकरूंचा प्रवास सुखकर होईल.

"देशाची शान असलेल्या वंदे भारत गाडीमुळे मध्य प्रदेशची सांस्कृतिक राजधानी जबलपूर आणि राज्याची राजधानी भोपाळ दरम्यान कनेक्टिविटी वाढेल, त्याचबरोबर धार्मिक आणि पर्यटन स्थळांचा देखील वेगाने विकास होईल."

रांचीचे खासदार संजय सेठ यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रांची - पाटणा वंदे भारत एक्स्प्रेसमुळे खनिजांनी संपन्न झारखंड आणि बिहारच्या समृद्धीला मदत होईल.

 
"रांची-पाटणा दरम्यान सुरु करण्यात आलेली नवीन वंदे भारत गाडी केवळ लोकांचा प्रवास आरामदायी बनवणार नाही तर खनिजांनी संपन्न झारखंड आणि बिहारच्या आर्थिक प्रगतीतही उपयुक्त ठरेल. "

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा (मडगाव) - मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसबाबत केलेल्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले.

"वंदे भारत गाडीमुळे जास्तीत जास्त पर्यटकांना गोव्याचे निसर्गसौंदर्य अनुभवता येईल. तसेच कोकण किनारपट्टीच्या संपर्क व्यवस्थेतही सुधारणा होईल."

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी धारवाड - बंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास केला. जोशी यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले

"धारवाड-बंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेसमुळे संपूर्ण कर्नाटकातील कनेक्टिव्हिटी सुधारेल. तसेच राज्यातील व्यापार आणि पर्यटन देखील सुधारेल."

***

SonalT/SushamaKane/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1935824) Visitor Counter : 107