रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भोपाळमधील राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले


राणी कमलापती - जबलपूर, राणी कमलापती-इंदूर, गोवा (मडगाव)-मुंबई, रांची-पाटणा आणि धारवाड-बंगळुरू दरम्यान सुरू करण्यात आलेल्या या वंदे भारत रेल्वेगाड्या मध्य प्रदेश, गोवा, झारखंड, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या राजधानींना जोडत आहेत

आता देशात एकूण 23 वंदे भारत गाड्या धावत आहेत

सध्याच्या मार्गांवरील सर्वात जलद गाड्यांच्या तुलनेत या गाड्या प्रवासाच्या वेळेत मोठी बचत करत आहेत

वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव देतील आणि पर्यटनाला चालना देतील

Posted On: 27 JUN 2023 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2023

 

भारतीय रेल्वेच्या इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक दिवस असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधील राणी कमलापती स्थानक इथून पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाडयांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, केंद्रीय रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव, लोकप्रतिनिधी आणि विशेष अतिथी उपस्थित होते.

आरामदायी आणि उत्तम रेल्वे प्रवासाच्या नव्या युगाची सुरुवात करत राणी कमलापती-जबलपूर, राणी कमलापती-इंदूर, गोवा (मडगाव)-मुंबई, रांची-पाटणा आणि धारवाड-बंगळुरू दरम्यान पाच नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. आज हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आलेल्या या वंदे भारत गाड्या राज्यांची  राजधानी आणि इतर शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारतील, प्रवासाचा वेळ कमी करतील आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देतील. ह्या वंदे भारत गाड्या नव्या भारताचा – विकसित भारताचा संदेश देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवत आहेत.  

रानी कमलापती-जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस

रानी कमलापती – जबलपूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन राणी कमलापती रेल्वे स्थानकावरून निघेल आणि त्याच दिवशी नरसिंगपूर, पिपरिया आणि नर्मदापुरम रेल्वे स्थानकावर थांबे घेऊन जबलपूर स्थानकावर पोहोचेल.

वंदे भारत रेल्वेगाडी   सुरू झाल्यामुळे मध्यप्रदेशची सांस्कृतिक राजधानी जबलपूर, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आणि जवळपासची धार्मिक आणि पर्यटन स्थळांमधील संपर्क वाढेल तसेच या भागाचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.

रानी कमलापती - इंदूर वंदे भारत एक्सप्रेस

भोपाळ – इंदूर वंदे भारत एक्सप्रेस भोपाळ रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि त्याच दिवशी उज्जैन रेल्वे स्थानकावर थांबून इंदूर स्थानकावर पोहोचेल. रानी कमलापती ते इंदूर दरम्यान वंदे भारत  रेल्वेगाडी चालवण्यामुळे प्रवास सुलभ आणि जलद  होईल आणि या प्रदेशांची संस्कृती, पर्यटन आणि तीर्थक्षेत्रे यांना जोडण्यासाठी, ही गाडी एक महत्त्वाचे माध्यम बनेल. वंदे भारत एक्सप्रेस सुखद आणि उत्तम रेल्वे प्रवाचाही देखील अनुभव देईल.

गोवा (मडगाव) - मुंबई वंदे भारत एक्सप्रेस

गोवा (मडगाव)- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस  रेल्वेगाडी छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावरून सुटेल आणि दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम रेल्वे स्थानकांवर थांबे घेऊन त्याच दिवशी मडगाव स्थानकात पोहोचेल.

अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसमुळे कोकणातील लोकांना वेगवान आणि आरामदायी प्रवास करण्याचे साधन उपलब्ध होणार आहे.

त्यामुळे परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. या मार्गावरील नवीन वंदे भारत रेल्वेगाडीमुळे पर्यटकांना पुरवल्या जाणाऱ्या सेवासुविधांना नवा आयाम मिळेल, अशी अपेक्षा आहे.

रांची-पाटणा वंदे भारत एक्सप्रेस

रांची- पाटणा नवी वंदे भारत एक्सप्रेस  रेल्वेगाडी पाटणा येथून निघेल आणि त्याच दिवशी गया, कोडरमा, हजारीबाग, बरकाकाना आणि मेसरा रेल्वे स्थानकांवर थांबे घेऊन रांची स्थानकात पोहोचेल.

विपुल प्रमाणात खनिज संपत्तीचे वरदान मिळालेले रांची हे खनिज आधारित उद्योगांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. पाटणाशी जलद कनेक्टिव्हिटीसाठी ही  रेल्वेगाडी स्थानिक व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरेल.

धारवाड-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस

धारवाड-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस  केएसआर बेंगळुरू शहरातून निघेल आणि त्याच दिवशी यशवंतपूर, दावणगिरी आणि हुबळी रेल्वे स्थानकांवर थांबे घेऊन धारवाडला पोहोचेल.

कर्नाटकात धारवाड - बेंगळुरू वंदे भारत रेल्वेगाडी विद्या काशी धारवाड, वैनिज्य नगरी हुबळी आणि बेंगळुरूला जोडेल. ही वंदे भारत रेल्वेगाडी उत्तर कर्नाटक ते दक्षिण कर्नाटक जोडेल.

वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या अनेक उत्कृष्ट सुविधा देतात. त्यामुळे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो. या गाड्यांमध्ये असलेल्या 'कवच' तंत्रज्ञानामुळे प्रवाशांना प्रगत, अद्ययावत आणि अत्याधुनिक सुरक्षा मिळते.  प्रगत अत्याधुनिक सस्पेन्शन सिस्टीममुळे प्रवास अधिक सुरळीत, सुरक्षित आणि सुखकर होण्याची ग्वाही मिळते.

पॉवर कार्समुळे रेल्वेकडून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होते आणि ब्रेक लावण्याच्या प्रगत प्रणालीमुळे सुमारे 30% विजेची बचत होते.  भारतीय रेल्वेला पर्यावरण रक्षण करता येईल अशी या रेल्वेगाड्यांची  रचना करण्यात आली आहे.

 

* * *

S.Kakade/Sushma/Radhika/Prajna/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai




(Release ID: 1935650) Visitor Counter : 135