पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या, 27 जून रोजी मध्य प्रदेश राज्याला देणार भेट


राणी कमलापती रेल्वे स्थानक येथे पंतप्रधानांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून पाच वंदे भारत एक्स्प्रेस होणार रवाना

भोपाळ (राणी कमलापती)-इंदोर, भोपाळ (राणी कमलापती)-जबलपूर, रांची-पटना, धारवाड-बेंगळूरू आणि गोवा (मडगाव)-मुंबई या मार्गांवर वंदे भारत एक्स्प्रेस सुरु करण्यात येणार

गोवा, बिहार आणि झारखंड या राज्यांना प्रथमच मिळणार वंदे भारत रेल्वे गाड्यांची सुविधा

या गाड्या प्रवाशांना जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव देतील आणि पर्यटनाला चालना देतील

Posted On: 26 JUN 2023 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 जून 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 27 जून 2023 रोजी मध्य प्रदेशाच्या भेटीवर जाणार आहेत.

सकाळी साडेदहाच्या सुमारास पंतप्रधान राणी कमलापती रेल्वे स्थानकावर पोहोचतील आणि पाच वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. या पाच वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या पुढीलप्रमाणे आहेत: या पाच वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या पुढीलप्रमाणे आहेत: भोपाळ (राणी कमलापती) ते इंदोर वंदे भारत एक्स्प्रेस, भोपाळ (राणी कमलापती) ते जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस, रांची ते पटना वंदे भारत एक्स्प्रेस, धारवाड ते बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेस आणि गोवा (मडगाव) ते मुंबई  वंदे भारत एक्स्प्रेस.

भोपाळ (राणी कमलापती) ते इंदोर वंदे भारत एक्स्प्रेस ही गाडी मध्य प्रदेशातील दोन महत्त्वाच्या शहरांच्या दरम्यानचा प्रवास अधिक सुलभ आणि जलदगतीने करण्याची सुविधा देईल. तसेच ही गाडी या प्रदेशातील सांस्कृतिकदृष्ट्या, पर्यटन दृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांमधील प्रवास सुविधेत सुधारणा घडवून आणेल.

भोपाळ (राणी कमलापती)-जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी जबलपूरच्या महाकौशल भागाला मध्य प्रदेशाच्या मध्यवर्ती भागाशी (भोपाळ) जोडेल. तसेच या भागातील पर्यटनस्थळांना यामुळे फायदा होणार आहे.

रांची-पटना वंदे भारत एक्स्प्रेस ही झारखंड तसेच बिहार या राज्यांसाठी सुरु होणारी पहिलीच वंदे भारत गाडी आहे. पटना आणि रांची या शहरांच्या जोडणीत सुधारणा करणारी ही गाडी पर्यटक, विद्यार्थी तसेच व्यापाऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे.

धारवाड-बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेस ही गाडी कर्नाटकातील धारवाड, हुबळी आणि दावणगिरी या महत्त्वाच्या शहरांना बेंगळूरू या कर्नाटक राज्याच्या राजधानीच्या शहराशी जोडेल. या भागातील पर्यटक, विद्यार्थी, उद्योजक इत्यादींना या गाडीमुळे खूप फायदा होईल.

गोवा (मडगाव) -मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही गोव्यासाठीची पहिलीच वंदे भारत एक्स्प्रेस असणार आहे. ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्याचे मडगाव रेल्वे स्थानक यांच्या दरम्यान धावेल तसेच गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातील पर्यटनाला देखील चालना देईल.

 

* * *

S.Tupe/S.Chitnis/S.Mukhedkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1935362) Visitor Counter : 172