रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेने युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट/इंडिया (USAID/India) सोबत केला सामंजस्य करार


या सामंजस्य करारामध्ये स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता संबंधी उपायांवर यूएसएआईडी/इंडिया सोबत सहकार्याचा समावेश आहे

मिशन निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी भारतीय रेल्वेचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचा हा प्रयत्न आहे

Posted On: 23 JUN 2023 9:49AM by PIB Mumbai

 

2030 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याच्या दिशेने भारतीय रेल्वे सक्रियपणे काम करत आहे. यासाठी भारतीय रेल्वेने धोरणात्मक बहुआयामी दृष्टीकोन ठेवला आहे.

कार्बन फूटप्रिंट कमी करण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, भारतीय रेल्वे अनेक उपक्रम हाती घेत आहे. याच अनुषंगाने, 14 जून 2023 रोजी भारतीय रेल्वे, भारत सरकार आणि युनायटेड स्टेट्स एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट/इंडिया (USAID/India) यांच्यात नवीकरणीय ऊर्जा आणि ऊर्जा कार्यक्षमता यावरील सहकार्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार लाहोटी यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर नवीन गुलाटी, सदस्य (ट्रॅक्शन आणि रोलिंग स्टॉक), रेल्वे बोर्ड, भारतीय रेल्वे आणि  इसाबेल कोलमन, उपप्रशासक, USAID यांनी स्वाक्षरी केली.

USAID ही अमेरिकन सरकारची एक संस्था आहे जी आंतरराष्ट्रीय विकासाला मदत करते आणि आर्थिक विकास, कृषी आणि व्यापार, स्वच्छ ऊर्जा, हवामान बदलाची तीव्रता कमी करणे आणि त्याचे परिणाम ओळखून आवश्यक बदल करणे, जागतिक आरोग्य, लोकशाही आणि संघर्ष रोखणे आणि व्यवस्थापन आणि मानवतावादी सहाय्य आदी बाबींना समर्थन देऊन मिशनची उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करते.

सामंजस्य कराराच्या माध्यमातून भारतीय रेल्वेला तांत्रिक सहाय्य आणि मदत पुरवली जाईल. सामंजस्य करारामध्ये खालील क्षेत्रांचा समावेश आहे मात्र ते तेवढ्यापुरते मर्यादित नाही:-

1. भारतीय रेल्वेसाठी स्वच्छ ऊर्जेसह दीर्घकालीन ऊर्जा नियोजन.

2. भारतीय रेल्वेच्या इमारतींसाठी ऊर्जा कार्यक्षमता धोरण आणि कृती आराखडा विकसित करणे

3. भारतीय रेल्वेचे निव्वळ-शून्य उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वच्छ ऊर्जा खरेदीचे नियोजन.

4. नियामक आणि अंमलबजावणीतील अडथळे दूर करण्यासाठी तांत्रिक सहाय्य.

5. व्यवस्थेला अनुकूल तसेच नवीकरणीय ऊर्जेची मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यासाठी बोली रचना आणि बोली व्यवस्थापन सहाय्य

6. ई-मोबिलिटीला प्रोत्साहन देण्यात भारतीय रेल्वेला मदत करणे.

7. क्षेत्र भेटी आणि अभ्यास दौऱ्यांसह (देशांतर्गत/आंतरराष्ट्रीय) नमूद करण्यात आलेल्या क्षेत्रांमध्ये कार्यक्रम, परिषदा आणि क्षमता-निर्मिती कार्यक्रम एकत्रितपणे आयोजित करणे

भारतीय रेल्वेला 2030 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी USAID, इंडियासोबत भारतीय रेल्वेचे सहकार्य मोठी मदत करेल.

***

S.Tupe/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1934735) Visitor Counter : 118