कृषी मंत्रालय

भूमीहीन शेतकऱ्यांचा विचार करून शाश्वत आणि समावेशक अन्न प्रणाली तयार करण्याचे मार्ग शोधा - पंतप्रधान नरेंद्र मोदी


जी - 20 देशांनी इतिहासात पहिल्यांदाच “ आऊटकम डॉक्युमेंट अँड चेयर्ज समरी” नावाच्या फलनिष्पत्ती दस्तावेजांना स्वीकृत केले

जी - 20 कृषीमंत्र्यांच्या बैठकीत विविध मुद्यांवर सर्वसहमती झाली, ही देखील पहिल्यांदाच घडलेली आणखी एक ऐतिहासिक घटना

Posted On: 17 JUN 2023 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 जून 2023

 

15 ते 17 जून 2023 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या जी - 20 कृषीमंत्र्यांच्या बैठकीत “ आऊटकम डॉक्युमेंट अँड चेयर्ज समरी” नावाच्या फलनिष्पत्ती दस्तावेजांना स्वीकृत करण्यात आले आहे. जी - 20 विकसनशील देशांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देत कृषी क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून विविध मुद्यांवर व्यापक विचारमंथनानंतर ही ऐतिहासिक सहमती झाली.

केंद्रीय कृषी सचिव मनोज आहुजा यांच्या स्वागतपर भाषणाने एका संपूर्ण सत्राद्वारे 16 जून 2023 रोजी या मंत्रिस्तरीय बैठकीला सुरुवात झाली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे बैठकीमध्ये मार्गदर्शन केले आणि सर्व मान्यवरांचे आणि विशेष प्रतिनिधींचे अतिशय जिव्हाळ्याने स्वागत केले. मानवी सभ्यतेच्या केंद्रस्थानी कृषी क्षेत्र असल्याची बाब अधोरेखित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या क्षेत्राला भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करून मानवतेच्या भवितव्यात सुधारणा करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन, जी-20 कृषीमंत्र्यांना केले.  

जी - 20 कृषीमंत्र्यांच्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चेसाठी अ) अन्न सुरक्षा आणि पोषणात वाढ करण्यासाठी कृषी विविधतेला प्रोत्साहन आणि सामाजिक सुरक्षा प्रणालीत सुधारणा ब) हवामान - अनुकूल तंत्रज्ञानाला अर्थपुरवठा आणि शाश्वत कृषी उत्पादनासाठी कृषी प्रणाली मॉडेलवर आधारित क्लायमेट-स्मार्ट दृष्टीकोनाचा अंगिकार  क) लहान आणि भूमीहीन शेतकरी, महिला आणि युवा वर्ग यांच्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करणे आणि समावेशक कृषी मूल्य साखळ्या आणि साखळ्यांची प्रतिरोधक्षमता आणि कार्यक्षमतेत वाढ करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी वाढत्या आर्थिक संधींचा वापर करणे ड) कृषी क्षेत्राचे परिवर्तन घडवण्यासाठी डिजिटायजेशनमध्ये सुधारणा करणाऱ्या डिजिटल तंत्रज्ञानाचा लाभ घेणे आणि डिजिटल सार्वजनिक वस्तूंचा एक भाग असलेल्या कृषी डेटा मंचाच्या प्रमाणीकरणावर भर देणे, या चार प्राधान्यक्रमांच्या क्षेत्रांवर भर दिला आहे.

2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष देखील आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भरड धान्ये/ श्री अन्न/ सुपरफूड्स ही आरोग्यासाठी उपयुक्त आहेत, इतकेच नाही तर ती उत्पन्नात विविधता निर्मितीला प्रोत्साहन देत शेतकऱ्यांना शाश्वत उपजीविका साध्य करण्यास मदत करत आहेत. प्राचीन भरडधान्ये आणि तृणधान्ये यांच्या लागवडीसंदर्भातील सर्वोत्तम पद्धती, संशोधन आणि तंत्रज्ञान यांची परस्पर देवाणघेवाण करण्याबाबतच्या भारताच्या वचनबद्धतेचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला.  

सध्याची जागतिक पुरवठा साखळी साथरोगामुळे विस्कळीत झाली असून भौगोलिक - राजकीय तणाव आणि हवामान बदलाच्या प्रभावामुळे त्यात आणखी भर पडलेली आहे. या बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी - 20 सदस्य राष्ट्रांना अशी कृषी पद्धती अवलंबण्याचे मार्ग शोधण्याचे आवाहन केले, ज्यामुळे मृदा आरोग्य, पिकांचे आरोग्य, आणि उत्पन्न वाढेल. तसेच संशोधन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपले शेतकरी सक्षम होतील.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी चर्चासत्रात मंत्री आणि शिष्टमंडळ प्रमुखांचे स्वागत केले. निती आयोगाचे सदस्य डॉ रमेश चंद, यांनी "जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण" या विषयावर सादरीकरण केले, ज्या मधून आजच्या काळातील आव्हाने आणि संभाव्य उपायांवर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, आयसीएआरच्या महासंचालिका शोभा करंदलाजे, डीएआरईचे सचिव डॉ. हिमांशू पाठक, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव  जे. एन. स्वेन यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी आणि G-20 देशांचे उच्चस्तरीय अधिकारी आणि आमंत्रित संस्थांचे प्रमुखही उपस्थित होते.

भारताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, 12-13 जानेवारी 2023 दरम्यान वर्चुअल व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिट 2023 चे आयोजन केल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत सामायिक केली. व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ समिट 2023 चे आयोजन “युनिटी ऑफ व्हॉइस, युनिटी ऑफ पर्पज" या संकल्पनेअंतर्गत करण्यात आले होते. G-20 परिषदेत प्रतिनिधित्व नसलेल्या विकसनशील देशांसोबत त्यांच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांबद्दल तसेच भारताने आपल्या जी - 20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांच्यासाठी काय साध्य करणे अपेक्षित आहे, याबाबत सल्लामसलत करणे, हे भारताचे उद्दिष्ट होते. विकसनशील देशांना G-20 प्रक्रियेत अधिक चांगल्या प्रकारे सहभागी करून घेणे आणि  G-20 परिषदेच्या माध्यमातून मानव-केंद्रित विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी चांगले परिणाम मिळावेत, याची खातरजमा करणे, ही यामागची कल्पना होती.

कृषी क्षेत्रातील भारताच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना, कृषीमंत्र्यांनी नमूद केले की, अन्न सुरक्षा आणि पोषणाबाबत भारताचा दृष्टीकोन "एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य" या भारताच्या G-20 अध्यक्षतेच्या भावनेशी सुसंगत आहे. शाश्वत विकासाची उद्दिष्ट्ये 2 साध्य करण्याच्या वचनबद्धतेचा अर्थात उपासमार संपवणे, तसेच अन्न आणि पोषण सुरक्षा प्राप्त करणे या गोष्टींचाही यावेळी पुनरुच्चार करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची, युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC COP-26) या परिषदेच्या वेळी  लाईफ“(LIFE) अर्थात पर्यावरणाशी सुसंगत जीवनशैली) हे अभियान सुरू करण्यामागची भूमिका, केंद्रीय कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केली. नैसर्गिक स्रोतांचा कार्यक्षम वापर आणि कार्बन उत्सर्जन कमी करणे हा या अभियानामागचा उद्देश असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

कृषी कार्य गटाची कार्यवाही यशस्वी आणि संस्मरणीय व्हावी, यासाठी  दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचे कृषिमंत्र्यांनी कौतुक केले. तसेच “आऊटकम डॉक्युमेंट अँड चेयर्ज समरी” या फलनिष्पत्ती दस्तावेजांतर्गत दख्खन उच्चस्तरीय तत्वे तसेच आंतरराष्ट्रीय भरडधान्य व इतर पारंपारिक धान्य वापरासंबंधी पुढाकार या दोन अहवालांचे स्वागत झाले. 

कृषी संबंधी अजेंडा मांडण्यात आणि त्याचा विस्तार करण्यात भारताने केलेल्या प्रयत्नांची सर्व G - 20 सदस्यांनी प्रशंसा केली आणि त्याबद्दल मनापासून कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

दख्खन उच्चस्तरीय तत्त्वांच्या माध्यमातून, कठीण परिस्थितीत देश आणि लोकसंख्येला सुलभतेने आणि मानवता वादी दृष्टिकोनातून सहाय्य करून जागतिक स्तरावरील अन्न असुरक्षेला प्रतिसाद मिळवण्याच्या जागतिक प्रयत्नांना बळकटी आणण्यासाठी तसेच त्यांना पूरक ठरण्याच्या दिशेने पोषक अन्नाची उपलब्धता आणि प्राप्ती यात वाढ, त्याचप्रमाणे अन्न सुरक्षा जाळे मजबूत करणे, त्यासंबंधीची धोरणे बळकट करणे आणि शाश्वत शेती व हवामाना संबंधीच्या धोरणांमध्ये लवचिकता तसेच सहयोग आणणे, एकात्म आरोग्य कल्पनेला प्रोत्साहन , डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आणि कृषी क्षेत्रात जबाबदार सार्वजनिक तसेच खाजगी गुंतवणुक वाढवणे यासाठी G - 20 पार पाडत असलेल्या सामूहिक जबाबदारीचे दर्शन यावेळी घडले. 

त्यापूर्वी इतर तीन महत्त्वाच्या बैठका इंदोर, चंद्रगड आणि वाराणसी येथे झाल्या. वाराणसी येथे झालेल्या G - 20 MACS बैठकीत, आंतरराष्ट्रीय भरडधान्य आणि इतर पारंपारिक धान्य संशोधन आरंभ – महर्षी  (MAHARISHI) या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

कृषी क्षेत्र विचारात घेता, आपल्या पृथ्वीचे भले करणे, कुटुंबात सुसंवाद निर्माण करणे आणि भवितव्य अधिक उज्वल करण्यासाठी आशा प्रदान करणे, या बाबींना G – 20 अध्यक्षपद भूषविणाऱ्या भारताचे प्राधान्य आहे.

 

* * *

M.Pange/Shailesh/Vikas/Vijaya/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1933072) Visitor Counter : 145