पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
‘मिशन लाईफ’ ला चालना देत जागतिक पर्यावरण दिन 2023 झाला साजरा
पंतप्रधानांनी उपस्थितांना व्हिडिओ संदेशाद्वारे केलेल्या मार्गदर्शनात ‘लाईफ’ वर दिला भर, परिसंस्था आणि पर्यावरण यांचे संरक्षण आणि संवर्धनासोबत आर्थिक विकासावर भारताचा भर असल्याचे केले अधोरेखित
जागतिक पर्यावरण दिवस कार्यक्रमात भूपेंद्र यादव यांनी देखील केले मार्गदर्शन
रामसर स्थळे आणि किनारपट्टी अधिवास आणि ठोस उत्पन्नासाठी खारफुटी उपक्रम(MISHTI) यांच्याशी संबंधित अमृत धरोहर अंमलबजावणी धोरणाचा केला प्रारंभ
Posted On:
05 JUN 2023 7:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जून 2023
भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ‘मिशन लाईफ’ ला चालना देत आज 5 जून 2023 रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. ‘लाईफ’ अर्थात पर्यावरणासाठी जीवनशैली ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लासगो येथे झालेल्या जागतिक नेत्यांच्या कॉप 26 शिखर परिषदेत मांडली होती, ज्यावेळी त्यांनी पर्यावरणस्नेही जीवनशैली आणि पद्धतींचा अंगिकार करण्यासाठी जागतिक प्रयत्नांचे पुनरुज्जीवन करण्याचे आग्रही आवाहन केले होते. ‘मिशन लाईफ’ चा एक भाग म्हणून पाणी वाचवा, ऊर्जा बचत करा, कचऱ्यात कपात करा, ई-कचरा कमी करा, एकल प्लॅस्टिकचा वापर कमी करा, शाश्वत अन्न प्रणालींचा अंगिकार आणि निरोगी जीवनशैलीचा अंगिकार अशा सात विविध संकल्पनांना अनुसरून वैयक्तिक आयुष्यातील 75 क्रियांची सर्वसमावेशक यादी तयार करण्यात आली आहे. मिशन लाईफच्या सात संकल्पनांपैकी एका संकल्पनेशी संलग्न असलेली ‘प्लॅस्टिक प्रदूषणावर तोडगा’ ही यावर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना आहे. “एकल वापराच्या प्लॅस्टिकला नाही म्हणा” असे ती सांगत आहे आणि अनेक ‘लाईफ’ कृतींच्या अंमलबजावणीशी देखील ती संलग्न आहे.
जागतिक पर्यावरण दिनी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. एकल वापराच्या प्लास्टिकपासून मुक्ती मिळविण्यासाठी 2018 पासून भारत दोन स्तरांवर काम करत आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली.एकीकडे एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणली असून दुसरीकडे प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करणे अनिवार्य केले आहे, अशी माहिती त्यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली.
हवामान बदलाला तोंड देण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी सध्याच्या गरजा आणि भविष्याचा दृष्टीकोन यामध्ये संतुलन राखत भारताने एक आराखडा तयार केला आहे आणि ग्रीन हायड्रोजन मिशन, नैसर्गिक शेतीचे प्रयत्न, हरित आणि स्वच्छ ऊर्जेवर भर देणाऱ्या उपक्रमांसारखे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल आणि कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांनी लाईफवर आधारित चित्रे आणि डिजिटल प्रदर्शनाची पाहणी केली आणि कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमात बोलताना यादव यांनी 2018 मध्ये साजऱ्या झालेल्या जागतिक पर्यावरण दिनी प्लॅस्टिकवर तोडगा काढण्यासाठी जागतिक पातळीवर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची आठवण करून दिली. पंतप्रधानांच्या कळकळीच्या आवाहनाला अनुसरून भारताने एकल वापराच्या प्लॅस्टिकचे उत्पादन, आयात, साठवणूक, वितरण, विक्री आणि 2022 मध्ये एकल वापराच्या प्लॅस्टिकचे जिन्नस ओळखून त्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. या निर्णयाला आणि त्याच्या अंमलबजावणीला केवळ स्थानिक पातळीवरच स्वीकृती मिळाली नसून जागतिक पातळीवर देखील त्याची प्रशंसा होत आहे. यावेळी त्यांनी इंडियन ऑईलच्या ‘अनबॉटल्ड’ या उपक्रमाचा उल्लेख केला. मिशन लाईफविषयी यादव यांनी सांगितले आणि विविध आंतरराष्ट्रीय निबंधांमध्ये त्याचा संदर्भ असल्याकडे लक्ष वेधले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा आघाडी आणि उद्योग संक्रमणासाठी नेतृत्व समूह या भारताने पुढाकार घेतलेल्या तीन आंतरराष्ट्रीय उपक्रमांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय बिग कॅट आघाडी हा उपक्रम देखील नुकताच सुरू करण्यात आला आह, असे त्यांनी नमूद केले.
5 जून, 2023 या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गेला महिनाभर चाललेल्या व्यापक जागरुकता मोहिमेदरम्यान हाती घेतलेल्या उपक्रमांच्या चित्रीकरणाचे सादरीकरण करण्यात आले.
मंत्रालयाच्या अमृत धरोहर आणि मिष्टी या दोन नवीन उपक्रमांशी संबंधित व्हिडिओ देखील यावेळी जारी करण्यात आले.
स्वांतत्र्याच्या 75 व्या वर्षात एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे रामसर स्थळे अर्थात आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या पाणथळ क्षेत्रांची संख्या 2014 मधील केवळ 26 वरून आता 75 झाली असून आता भारत हे आशिया खंडातील रामसर स्थळांचे दुसरे सर्वात मोठे माहेरघर बनले आहे. रामसर स्थळांच्या संवर्धनाचे महत्व लक्षात घेऊन रामसर स्थळांच्या अद्वितीय संवर्धन मूल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने या वर्षीच्या अर्थसंकल्पीय घोषणेचा एक भाग म्हणून अमृत धरोहर या उपक्रमाची घोषणा केली. पाणथळ जैवसंस्थेच्या संवर्धनात स्थानिक समुदायांच्या सहकार्यावर विशेष भर देत, अमृत धरोहरच्या अंमलबजावणीचा आराखडा आज जारी करण्यात आला. सामुदायिक सहभाग आणि संवर्धनातून समृद्धी या या मूलतत्वासाठी सरकारच्या वचनबद्धतेचे हे आणखी एक उदाहरण आहे.
मिष्टी: खारफुटीचे संवर्धन आणि खारफुटीच्या वाढीला चालना देण्यासाठी वर्ष 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात “किनारपट्टीवरील अधिवास आणि ठोस उत्पन्नासाठी खारफुटी उपक्रमा”ची घोषणा करण्यात आली. खारफुटी ही अद्वितीय, नैसर्गिक जैवसंस्था आहे ज्यामध्ये उच्च जैविक उत्पादकता आणि कार्बन शोषून घेण्याची क्षमता आहे, याशिवाय खारफुटी एक जैविक ढाल-रक्षक म्हणून देखील कार्य करते.
किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सक्रिय सहभागाने आज मिष्टी उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमामुळे (2023-2028) या पाच वर्षांमध्ये नऊ (9) किनारी राज्ये आणि चार (4) केंद्रशासित प्रदेशांमधील अंदाजे 540 चौरस किमी क्षेत्र व्यापेल. या उपक्रमाच्या माध्यमातून अंदाजे 4.5 दशलक्ष टन कार्बनचे कार्बन सिंक तयार होतील. याद्वारे निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक समुदायांसाठी उपजीविकेची संभाव्य क्षेत्रे देखील तयार होतील.
या अनुषंगाने आज देशातील एकूण 75 स्थळांवर खारफुटी लागवड आयोजित करण्यात आली .
यावेळी नीती आयोगातर्फे ग्लोबल कॉल फॉर आयडियाज आणि पेपर्सच्या विजेत्यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. केंद्रीय मंत्री यादव यांनी नीती आयोगाच्या ग्लोबल कॉल फॉर आयडियाज आणि पेपर्सच्या 5 विजेत्यांचा सत्कार केला.
याव्यतिरिक्त राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालय (NMNH) आणि संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरण कार्यक्रम (UNEP) , भारत यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 8 ते 12वी च्या शालेय विद्यार्थ्यांसाठी "आंतरशालेय चित्रकला स्पर्धा" आयोजित करण्यात आली होती. 25 राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांमधून एकूण 5,980 चित्रे प्राप्त झाली. या चित्रकला स्पर्धेतील 3 विजेत्यांचाही केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
नीती आयोगाने तयार केलेल्या थिंकिंग फॉर अवर प्लॅनेट, माइंडफुल लिव्हिंग आणि थॉट लीडरशिप फॉर लाईफ या तीन संग्रहांचे प्रकाशनही यादव यांच्या हस्ते झाले.
N.Chitale/Shailesh P/Bhakti/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1930031)
Visitor Counter : 223