पंतप्रधान कार्यालय

ओदिशामध्ये बालासोर येथे दिलेल्या भेटीनंतर पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

Posted On: 03 JUN 2023 7:03PM by PIB Mumbai

 

एक भयंकर दुर्घटना झाली. अतिशय वेदनादायी आहे, अनेक राज्यांच्या नागरिकांनी या प्रवासात खूप काही गमावलं आहे. ज्यांनी आपले प्राण गमावले, ही गोष्ट दुःखद आणि वेदनादायक असून मन अस्वस्थ करणारी आहे. 

ज्यांचे कुटुंबीय जखमी झाले आहेत, त्यांना उत्तम उपचार मिळावेत, यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही. ज्यांना आपण गमावलं आहे, त्यांना परत आणता येणार नाही, पण सरकार त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. सरकारच्या दृष्टीने ही दुर्घटना अत्यंत गंभीर असून, याबाबत सर्व प्रकारच्या चौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत आणि यामध्ये जो कोणी दोषी आढळून येईल, त्याला कठोर शासन होईल, त्याला माफी मिळणार नाही.

ओदिशा सरकारने, इथल्या प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी, ज्यांनी या परिस्थितीत आपल्याकडच्या उपलब्ध साधन सामुग्रीच्या मदतीने लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला, इथल्या नागरिकांची देखील मी मनापासून प्रशंसा करतो, कारण त्यांनी या संकटकाळी रक्त दान असो, की बचाव कार्यात मदत असो, जे काही त्यांना शक्य असेल, ते सर्व करण्याचा प्रयत्न केला. विशेषतः, इथल्या युवकांनी रात्रभर परिश्रम केले.

इथल्या नागरिकांना देखील मी आदरपूर्वक  नमन करतो, कारण त्यांच्या सहकार्यामुळेच मदत कार्याला वेग आणता आला. रेल्वे प्रशासनाने देखील आपली पूर्ण ताकद, संपूर्ण व्यवस्था पणाला लावून, बचाव कार्याला वेग यावा, लवकरात लवकर रेल्वे मार्ग कार्यान्वित व्हावा, आणि प्रवासी सेवा वेगाने  पूर्वपदावर यावी, या तिन्ही गोष्टींचा विचार करून सुनियोजित प्रयत्न केले आहेत .

मात्र या दुःखद प्रसंगी, दुर्घटना स्थळाला भेट देऊन मी तिथल्या परिस्थितीची पाहणी करून आलो, रुग्णालयात दाखल झालेल्या जखमी प्रवाशांची विचारपूस केली, हे किती वेदनादायी होतं, हे व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. पण, या दुःखद प्रसंगामधून लवकरात लवकर सावरण्याचं बळ परमेश्वर आपल्याला देवो. या दुर्घटनेमधून आपण बोध घेऊ, आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन आपल्या व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणू, असा मला विश्वास आहे. या दुःखद प्रसंगी अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांसाठी आपण सर्वांनी प्रार्थना करूया.

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1929684) Visitor Counter : 144