पंतप्रधान कार्यालय

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पंतप्रधानांचे भाषण

Posted On: 28 MAY 2023 3:41PM by PIB Mumbai

लोकसभेचे सभापती आदरणीय ओम बिर्लाजी, राज्यसभेचे उपसभापती हरिवंशजी, माननीय संसद सदस्य, सर्व जेष्ठ लोकप्रतिनिधी, विशेष अतिथी, इतर सर्व मान्यवर आणि माझ्या प्रिय देशावासियांनो!

देशाच्या विकास यात्रेत काही क्षण असे येतात, जे कायमचे अमर होतात, चिरंजीव ठरतात. काही तारखा काळाच्या ललाटावर इतिहासाची अमीट स्वाक्षरी बनून जातात. आज 28 मे 2023 चा हा दिवस असाच एक शुभ मुहूर्त आहे. देशाच्या स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्या निमित्त देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. या अमृत महोत्सवात भारतातील नागरिकांनी आपल्या लोकशाहीला, संसद भवनाच्या या नव्या वास्तुची भेट दिली आहे. आज सकाळीच संसद भवनाच्या परिसरात सर्वधर्मीयांची प्रार्थना झाली आहे. मी सर्व देशवासियांचे, भारतीय लोकशाहीच्या या सुवर्णक्षणा निमित्त खूप खूप अभिनंदन करतो.

मित्रहो,

संसद भवनाची ही नवीन वास्तू केवळ एक इमारत नाही. ही वास्तू 140 कोटी भारतीय नागरिकांच्या इच्छा- आशा-आकांक्षांचे आणि स्वप्नांचे प्रतिबिंब आहे. ही वास्तू म्हणजे संपूर्ण जगाला भारताच्या दृढनिश्चयाचा संदेश देणारे लोकशाहीचे मंदिर आहे. हे नवे संसद भवन नियोजनाला वास्तवाशी, धोरणाला अंमलबजावणीशी, इच्छाशक्तीला कृतीशी, संकल्पाला पूर्ततेशी जोडणारा महत्त्वाचा दुवा सिद्ध होईल. ही नवी वास्तू, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नांना साकार करण्याचे माध्यम ठरेल. ही नवी वास्तू, आत्मनिर्भर-स्वावलंबी भारताच्या सूर्योदयाची साक्षीदार ठरेल. ही नवी वास्तू, विकसित भारताचा संकल्प पूर्णत्वाला जात असलेला बघेल. ही नवी वास्तू, जुने आणि नवे यांच्या सहअस्तित्वाचा सुद्धा एक आदर्श आहे.

मित्रांनो,

नव्या वाटा चोखाळल्यानंतरच नवे वस्तुपाठ रचले जातात. आज नवा भारत नवीन लक्ष्ये समोर ठेवत आहे, नवे मार्ग चोखाळत आहे. नवा जोश आहे, नवा उत्साह आहे. नवी वाटचाल आहे, नवा विचार आहे. दिशा नवी आहे, दृष्टिकोन नवा आहे. संकल्प नवा आहे, विश्वास नवा आहे आणि आज पुन्हा एकदा संपूर्ण जग भारताकडे, भारताच्या दृढनिश्चयाकडे, भारतीय नागरिकांच्या मनस्वी वृत्ती-धडाडी कडे, भारतीयांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती कडे, आदरपूर्वक नजरेने आणि आशेचा किरण म्हणून पहात आहे. जेव्हा भारत प्रगती करतो, तेव्हा जगाची प्रगती होत असते. संसदेची ही नवी वास्तू भारताच्या विकासासह जगाच्या विकासाची सुद्धा हाक देईल.

मित्रहो,

आज या ऐतिहासिक प्रसंगी थोड्या वेळापूर्वी संसद भवनाच्या या नव्या वास्तुत, पवित्र अशा सेंगोल या राजदंडाची प्रतिष्ठापना सुद्धा झाली आहे. महान चोल साम्राज्याच्या या राजदंडाला, कर्तव्यभावनेचे, सेवावृत्तीचे, राष्ट्रवादाचे प्रतीक मानले जात होते. राजे महाराजे आणि अधिनम संतपीठाच्या महंतांच्या मार्गदर्शनाखाली हा राजदंड, सत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक बनले होते. तामिळनाडूतून खास इथे आलेले अधिनमचे महंत, आज सकाळी संसद भवनात आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते. मी त्यांना पुन्हा एकदा भावभक्तीने वंदन करतो. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली लोकसभेत या पवित्र राजदंडाची प्रतिष्ठापना केली आहे. गेल्या काही दिवसांत प्रसारमाध्यमांमध्ये, या राजदंडाच्या इतिहासाबाबत भरपूर माहिती समोर आली आहे. मी त्याबाबत जास्त खोलात जाऊ इच्छित नाही. मात्र मला हे ठामपणे वाटते की, या पवित्र राजदंडाची प्रतिष्ठा आपण त्याला पुन्हा मिळवून देऊ शकलो आहोत, त्याची शान-इभ्रत परत मिळवून देऊ शकलो आहोत, हे आपलं सद्भाग्य आहे. जेव्हा जेव्हा या नव्या संसदभवनात कामकाज सुरू होईल तेव्हा तेव्हा हा सेंगोल आपल्याला प्रेरणा देत राहील.

मित्रांनो,

भारत एक लोकशाही देशच नाही तर मदर ऑफ डेमोक्रसी सुद्धा आहे, लोकशाहीची जननी आहे. भारत, जागतिक लोकशाहीचा खूप मोठा आधार आहे. लोकशाही आपल्यासाठी फक्त एक व्यवस्था नाही, तर एक संस्कार आहे, एक विचार आहे, एक परंपरा आहे. आपले वेद आपल्याला सभा, बैठका आणि समित्या, या  लोकशाहीतील आदर्श व्यवस्था शिकवत आले आहेत. महाभारतासारख्या ग्रंथांमध्ये गण आणि लोकशाही व्यवस्थेचा उल्लेख आढळतो. आपण वैशाली साम्राज्या सारख्या लोकशाही राजवटीचा, प्रजासत्ताकाचा अनुभव घेतला आहे. भगवान बसवेश्वरांचा अनुभव मंडपम किंवा मंडप ही धर्मसंसद,  आपल्यासाठी अभिमानाची बाब  आहे. तामिळनाडूत मिळालेल्या इसवी सन 900 मधील शिलालेखाचे आज सुद्धा प्रत्येकाला नवल वाटते. आपली लोकशाहीच आपली प्रेरणा आहे, आपली राज्यघटनाच आपला संकल्प आहे. ही प्रेरणा, हा संकल्प यांचा सगळ्यात मोठा प्रतिनिधी जर कुणी असेल तर ती आपली संसद आहे आणि ही संसद देशाच्या अशा समृद्ध संस्कृतीचे प्रतिनिधित्व करते, तिचा जयघोष करते. शेते निपद्य-मानस्य चराति चरतो भगः चरैवेति, चरैवेति- चरैवेति॥ सांगायचे तात्पर्य असे की जो थांबला तो संपला, जो थांबतो त्याचे भाग्य सुद्धा थांबते. मात्र जो चालत राहतो, त्याचे भाग्य सुद्धा त्याच्यासोबत चालत राहते, नवनवीन शिखरे गाठते. आणि म्हणूनच- चालत रहा चालत रहा, सतत कार्यमग्न कार्यरत राहा! गुलामीच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर आपल्या भारताने खूप काही गमावून आपला नवा प्रवास सुरू केला होता. हा प्रवास कितीतरी चढ-उतार सोसत,  कितीतरी आव्हानांचा सामना करत, त्यावर मात करत, स्वातंत्र्याच्या अमृत काळात प्रवेश करता झाला आहे. स्वातंत्र्याचा हा अमृत काळ म्हणजे आपला वारसा जपत विकासाचे नवे परिमाण, नवे विस्तार घडवणारा अमृत काळ आहे.  स्वातंत्र्याचा हा अमृत काळ देशाला नवी दिशा देणारा अमृत काळ आहे.  स्वातंत्र्याचा हा अमृत काळ अनंत स्वप्ने आणि असंख्य आकांक्षा पूर्ण करणारा अमृत काळ आहे. या अमृतकाळाची साद आहे-

मुक्त मातृभूमीला नवीन मूल्यांची गरज आहे.

नव्या उत्सवासाठी नवचेतना हवी आहे.

मोकळे गीतगायन होत आहे, नवीन चाल नवी रागदारी हवी आहे.

नवे उत्सव साजरे करण्यासाठी  नवचेतना हवी आहे.

आणि म्हणून भारताचे भविष्य उज्ज्वल करणाऱ्या या कार्यस्थळाने देखील तितकेच नवे आणि आधुनिक असायला हवे.

मित्रांनो,

एक काळ असा होता की जेव्हा जगातील सर्वात समृद्ध आणि वैभवशाली देशांमध्ये भारताचा समावेश होता. भारतातील शहरांपासून राजमहालांपर्यंत, भारतातील मंदिरांपासून मूर्त्यांपर्यंत प्रत्येक जागी भारताची वास्तुकला भारताच्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञतेचा उद्घोष करत होती. सिंधू संस्कृतीमधील शहर नियोजनापासून मौर्यकाळातील स्तंभ आणि स्तुपांपर्यंत, चोल राज्यकर्त्यांनी उभारलेल्या भव्य मंदिरांपासून जलाशय आणि मोठमोठ्या बंधाऱ्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी भारताचे कौशल्य जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना चकित करत असे. मात्र शेकडो वर्षांच्या गुलामीने आपल्याकडून आपले हे वैभव हिसकावून घेतले. एक काळ असाही होता जेव्हा आपण इतर देशांमध्ये झालेल्या निर्मितीला पाहून दंग होऊन जात होतो. एकविसाव्या शतकातील नवा भारत, प्राचीन काळातील त्या गौरवशाली प्रवाहाला पुन्हा एकदा स्वतःकडे वळवून घेत आहे. आणि संसदेची ही नवी इमारत याच प्रयत्नाचे सजीव प्रतीक झाली आहे. नव्या संसद भवनाकडे पाहून आज प्रत्येक भारतीयाचे मन गौरवाने भरून गेले आहे. या इमारतीमध्ये वारसा देखील जपला आहे आणि वास्तुकला देखील दिसते आहे. त्यात कला आहे आणि कौशल्य देखील आहे. संस्कृती आहे तसेच संविधानाचे स्वर देखील त्यात घुमत आहेत.
तुम्ही पाहात आहात की लोकसभेतील अंतर्गत भाग येथे देखील दिसतो आहे. हा भाग राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरावर आधारित आहे हे तुम्ही पाहता आहात. राज्यसभेचा अंतर्गत भाग आपले राष्ट्रीय फूल असलेल्या कमळावर आधारित आहे तर संसदेच्या प्रांगणात आपला राष्ट्रीय वृक्ष वड देखील आहे. आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जे वैविध्य आहे ते देखील या नव्या भवनात सामावलेले आहे. या इमारतीच्या उभारणीत, राजस्थानातून आणलेले ग्रॅनाईट आणि बलुआ प्रकारचे दगड वापरण्यात आले आहेत. येथे जे लाकडी कोरीवकाम दिसते आहे ते महाराष्ट्रातून आणले आहे. येथील गालिचे उत्तरप्रदेशातील भदोही येथील कारागिरांनी स्वतःच्या हातांनी विणले आहेत. एक प्रकारे, या भवनातील कणाकणात आपल्याला ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या भावनेचे दर्शन घडते आहे.

मित्रांनो,

संसदेच्या जुन्या इमारतीमध्ये, स्वतःची कामे पूर्ण करणे सर्वांसाठी किती जिकीरीचे झाले होते हे आपण सर्वजण जाणतोच. तेथे तंत्रज्ञानाशी संबंधित समस्या होत्या, बैठक व्यवस्थेशी संबंधित आव्हाने होती. म्हणूनच देशाला एका नव्या संसद भवनाची गरज आहे अशी चर्चा गेल्या दीड दशकांच्या काळात वारंवार ऐकायला मिळत होती. आणि आपल्याला हा देखील विचार करावा लागेल की आगामी काळात जेव्हा संसदेच्या जागांची संख्या वाढेल, सदस्य संख्या वाढेल तेव्हा ते लोकप्रतिनिधी कुठे बसतील?
आणि म्हणून संसदेची नवी इमारत उभारली जावी ही काळाची मागणी होती. आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की ही भव्य इमारत आधुनिक सोयींनी पूर्णपणे सुसज्ज आहे. तुम्हाला दिसेल की दिवसाच्या या काळात देखील या सभागृहात सूर्यप्रकाश थेट पोहोचतो आहे. या भवनात विजेचा वापर कमीतकमी व्हावा, प्रत्येक ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त साधने असावी या बाबींकडे बारकाईने लक्ष देण्यात आले आहे.

मित्रांनो,

या नव्या संसद भवनाची उभारणी करणाऱ्या कामगारांच्या एका गटाला मी आज सकाळीच भेटलो. या संसद भवनाने सुमारे 60 हजार कामगारांना रोजगार देण्याचे देखील कार्य केले आहे. त्यांनी या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी स्वतःचा घाम गाळला आहे. त्यांच्या मेहनतीला समर्पित असलेली एक डिजिटल दालनदेखील या भवनात उभारण्यात आले आहे याचा मला अत्यंत आनंद होतो आहे. आणि अशी घटना जगात बहुधा पहिल्यांदाच घडली असेल. या कामगारांचे संसदेच्या उभारणीमधील योगदान देखील आता अमर झाले आहे.
 
मित्रांनो,

एखाद्या तज्ज्ञाने जर गेल्या नऊ वर्षांचे विश्लेषण केले तर त्याला दिसेल की ही नऊ वर्षे भारताच्या नवनिर्माणासाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी कार्य करण्याची होती. आज आपल्याला नव्या संसद भवनाच्या उभारणीचा अभिमान आहे तर त्याचसोबत मला गेल्या 9 वर्षांत गरिबांसाठी 4 कोटी घरे निर्माण केल्याचे देखील समाधान आहे. या भव्य इमारतीकडे पाहून आपण आपली मान उंचावत आहोत तेव्हा मला गेल्या 9 वर्षांमध्ये 11 कोटी शौचालये  तयार झाल्याबद्दल समाधान वाटते आहे कारण या शौचालयांनी देशातील महिलांच्या सन्मानाची जपणूक केली, त्यांचा मान वाढवला. आपण आज या संसद भवनातील सोयीसुविधांची चर्चा करत आहोत, त्याचवेळी मला हे आठवून आनंद होतो आहे की आपण गेल्या 9 वर्षांमध्ये देशातील गावांना जोडण्यासाठी 4 लाख किलोमीटरहून अधिक लांबीचे रस्ते देखील बांधले. संसद भवनाची नवी इमारत पर्यावरण स्नेही आहे याचा आनंद व्यक्त करतानाच आपण पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी 50 हजारांहून अधिक अमृत सरोवरांची निर्मिती केली हे आठवून मनाला समाधान वाटते आहे. आज येथे आपण नव्या संसद भवनातील लोकसभा आणि राज्यसभा पाहून उत्सव साजरा करतो आहोत आणि त्याच वेळी आपण देशात 30 हजारांहून अधिक पंचायत कार्यालये उभारली हे आठवून मला आनंद होतो आहे. म्हणजेच पंचायत कार्यालयांपासून संसद भवनापर्यंत आपली निष्ठा एकच आहे, आपली प्रेरणा एकच आहे-
देशाचा विकास, देशातील लोकांचा विकास.

मित्रहो,

तुम्हाला आठवत असेल, 15 ऑगस्टला मी लाल किल्ल्यावरून म्हणालो होतो, हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे. प्रत्येक देशाच्या इतिहासात एक वेळ अशी येते, जेव्हा देशाची जाणीव नव्याने जागृत होते. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी पंचवीस वर्ष, 1947 च्या आधी पंचवीस वर्षांचा काळ आठवा, स्वातंत्र्यापूर्वी पंचवीस वर्ष अशीच वेळ आली होती, जेव्हा गांधीजींच्या असहकार आंदोलनाने संपूर्ण देशात एक विश्वास जागा केला होता. गांधीजींनी प्रत्येक भारतीयाला स्वराज्याच्या ध्येयाने जोडलं होतं. हा तो काळ होता, जेव्हा प्रत्येक भारतीय स्वातंत्र्यासाठी लढत होता. त्याचा परिणाम आपण 1947 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या रूपात पाहिला. स्वातंत्र्याचा अमृत काळही भारताच्या इतिहासातला असाच एक टप्पा आहे. आजपासून पंचवीस वर्षांनी भारत आपल्या स्वातंत्र्याची शंभर वर्ष पूर्ण करेल. आपल्याकडेही पंचवीस वर्षांचा अमृत कालखंड आहे. या पंचवीस वर्षांमध्ये आपल्याला एकत्र येऊन भारताला विकसित राष्ट्र बनवायचं आहे. ध्येय मोठं आहे, उद्दिष्ट कठीणही आहे, पण आज प्रत्येक देशवासीयाला त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागील, नवीन प्रण करावे लागतील, संकल्प ठेवावे लागतील, वेगाने काम करावं लागेल. आणि इतिहास साक्षीदार आहे की आम्हा भारतीयांचा आत्मविश्वास केवळ भारतापुरता सीमित राहत नाही. आपल्या स्वातंत्र्यलढ्याने त्या काळी जगातल्या अनेक देशांमध्ये एक नवचैतन्य जागृत केलं होतं. आपल्या स्वातंत्र्यलढ्यामुळे भारताला तर स्वातंत्र्य मिळालंच, पण त्याच बरोबर अनेक देश स्वातंत्र्याच्या दिशेने पुढे निघाले. भारताच्या आत्मविश्वासाने इतर देशांमध्ये आत्मविश्वास जागवला. आणि म्हणूनच, भारतासारखा विविधतेने नटलेला देश, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा देश, मोठ्या आव्हानांशी झगडणारा देश, जेव्हा आत्मविश्वासाने पुढे जातो, तेव्हा त्यामधून जगातल्या अनेक देशांनाही प्रेरणा मिळते. भारताचं प्रत्येक यश, येणाऱ्या काळात जगाच्या वेगवेगळ्या भूभागात, वेगवेगळ्या देशांच्या यशाच्या रूपाने प्रेरणादायी ठरणार आहे. आज भारताने गरिबी झपाट्याने हटवली तर त्यामधून अनेक देशांनाही गरिबीतून बाहेर येण्याची प्रेरणा मिळते. भारताचा विकासाचा निर्धार इतर अनेक देशांची ताकद बनेल. त्यामुळे भारताची जबाबदारी मोठी आहे.

 

आणि मित्रहो,

यशाची पहिली अट म्हणजे, यशस्वी होण्याचा आत्मविश्वास. हे नवीन संसद भवन या आत्मविश्वासाला नव्या उंचीवर नेणार आहे. विकसित भारताच्या निर्मितीमध्ये तो आपल्या सर्वांसाठी एक नवीन प्रेरणा ठरेल. हे संसद भवन प्रत्येक भारतीयामध्ये कर्तव्य भावना जागी करेल. मला विश्वास आहे, या संसद भवनामध्ये जे लोकप्रतिनिधी बसतील, ते नवीन प्रेरणेसह, लोकशाहीला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करतील. आपल्याला ‘नेशन फर्स्ट’ च्या भावनेने पुढे जावं लागेल. इदं राष्ट्राय इदं न मम, आपल्याला कर्तव्य सर्वप्रथम समजावं लागेल- कर्तव्यमेव कर्तव्यं, अकर्तव्यं न कर्तव्यं, आपल्या वर्तनामधून आपल्याला आदर्श ठेवावा लागेल- यद्यदा-चरति श्रेष्ठः तत्तदेव इतरो जनः। आपल्याला सातत्त्याने स्वतःची प्रगती करावी लागेल-उद्धरेत् आत्मना आत्मानम्। आपल्याला स्वतःच्या दिशा स्वतः ठरवाव्या लागतील- अप्प दीपो भव:, आपल्याला स्वतःला कष्ट घ्यावे लागतील, त्रास सहन करावा लागेल- तपसों हि परम नास्ति, तपसा विन्दते महत। जनकल्याण हाच आपल्या जीवनाचा मंत्र बनवावा लागेल- लोकहितं मम करणीयम्, संसदेच्या या नव्या इमारतीत जेव्हा आपण आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू, तेव्हा देशवासीयांनाही नवी प्रेरणा मिळेल.

 

मित्रहो,

संसदेची ही नवीन वास्तू, जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला नवी ऊर्जा आणि नवी ताकद देईल. आपल्या श्रमिकांनी आपला घाम गाळून हे संसद भवन एवढं भव्य बनवलं आहे. आता आपल्या समर्पणाने ते अधिक दिव्य बनवण्याची जबाबदारी आपली, सर्व खासदारांची आहे. एक राष्ट्र म्हणून आपल्या सर्व 140 कोटी भारतीयांचा संकल्प हा या नव्या संसदेचा प्राण आहे. इथे घेतलेला प्रत्येक निर्णय आगामी शतकांची शोभा वाढवणार आहे. इथे घेतलेला प्रत्येक निर्णय, येणाऱ्या पिढ्यांना सबळ बनवेल. इथे घेतलेला प्रत्येक निर्णय, भारताच्या उज्ज्वल भविष्याचा आधारस्तंभ बनेल. गरीब, दलित, मागास, आदिवासी, दिव्यांग, समाजाच्या प्रत्येक वंचित कुटुंबाच्या सबलीकरणाचा, वंचितांच्या प्राधान्याचा मार्ग इथूनच जातो. या नवीन संसद भावनाची प्रत्येक वीट, प्रत्येक भिंत, याचा अणु-रेणू, गरिबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे. पुढल्या पंचवीस वर्षांमध्ये संसदेच्या या नव्या इमारतीत बनवले जाणारे नवे कायदे भारताला विकसित भारत बनवतील. या संसदेत बनवले जाणारे कायदे भारताला गरिबीतून बाहेर काढायला मदत करतील. या संसदेत बनलेले कायदे, देशातल्या तरुणांसाठी, महिलांसाठी नवीन संधी निर्माण करतील. मला विश्वास आहे की, संसदेची ही नवी इमारत, नव्या भारताच्या सृजनशीलतेचा आधारस्तंभ बनेल. एक समृद्ध सबळ आणि विकसित भारत, नितीमत्ता, न्याय, सत्य, मर्यादा आणि कर्तव्याच्या मार्गावर अधिक दृढपणे चालणारा भारत. संसद भवनाच्या नव्या वास्तूसाठी, मी पुन्हा एकदा सर्व भारतीयांचं खूप-खूप अभिनंदन करतो. धन्यवाद!

 ***

SRT/A.Save/S. Chitnis/R.Agashe/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1928062) Visitor Counter : 221