माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारच्या 9 वर्षांवरील राष्ट्रीय परिसंवादात “भारतः जोमदार  वाटचाल” या संकल्पनेवर सविस्तर पॅनेल चर्चेचे आयोजन


व्यवसायांना निर्णायक नेतृत्वाची गरज आहे आणि प्रदीर्घ काळानंतर जागतिक नेते म्हणून ओळखले जाणारे आणि भारताला एक विकसित देश बनवण्याचा निर्धार असलेले एक नेते आपल्याला लाभले आहेत- सुनील भारती मित्तल

Posted On: 27 MAY 2023 6:26PM by PIB Mumbai

 

केंद्र सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 9 वर्षे- सेवा, सुशासन, गरीब कल्याण या संकल्पनेवर नवी दिल्लीत विज्ञान भवनात एका राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन केले. या परिसंवादाचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णायक नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रात केलेली कामगिरी आणि  देशाचा जलदगतीने विकास करण्यासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी सरकारकडून सातत्याने होत असलेले प्रयत्न याबाबत चर्चा करण्यासाठी नामवंत पॅनेलिस्टच्या सहभागाने वेगवेगळ्या विषयांवरील तीन सत्रांचे आयोजन करण्यात आले. 'भारतः जोमदार वाटचाल' या विषयावर पहिले सत्र आयोजित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारताचे एक प्रमुख जागतिक नेतृत्व  या रुपात कशा प्रकारे उल्लेखनीय परिवर्तन झाले आहे यावर या सत्रामध्ये विचारमंथन झाले.

नामवंत पत्रकार नीतीन गोखले यांनी या सत्राचे सूत्रसंचालन केले आणि या सत्रामध्ये भारती एंटरप्रायजेसचे संस्थापक अध्यक्ष सुनील मित्तल, अपोलो हॉस्पिटलच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक संगीता रेड्डी, नॅसकॉम अध्यक्ष देबजानी घोष, आयएमएफ इंडियाचे माजी कार्यकारी संचालक सुरजीत भल्ला, स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्रुप चीफ आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष, इंडियन विमेन इन्स्टिट्युशनल लीग (IWIL) इंडियाच्या संस्थापक आणि अध्यक्ष दीपा सायाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर या सत्रात सहभागी झाले.

भारताने एका अशा परिवर्तनाच्या मार्गावर वाटचाल सुरू केली आहे जी  अनेक दशके पाहायला मिळाली नव्हती असे सांगून  जागतिक पातळीवर भारताची पत वाढल्याचे गोखले यांनी सत्राची सुरवात करताना सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सुशासनाविषयी बोलताना सुनील भारती मित्तल म्हणाले की गेल्या काही वर्षातील फरक आपण सर्वांनीच अनुभवला आहे आणि पाहिला आहे. व्यवसायांना निर्णायक नेतृत्वाची गरज आहे आणि प्रदीर्घ काळानंतर जागतिक नेते म्हणून ओळखले जाणारे आणि भारताला एक विकसित देश बनवण्याचा निर्धार असलेले एक नेते आपल्याला लाभले आहेत, असे त्यांनी सांगितले. दूरसंवाद क्षेत्राविषयी बोलताना ते म्हणाले की भारतामध्ये अतिशय वेगवान 5G सुरू झाले आहे आणि मार्च 2024 पर्यंत भारतात देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात 5G  असेल. ते पुढे म्हणाले की  सरकारने  देशात सुधारणा करण्यासाठी आणि जनतेच्या फायद्यासाठी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा पुरेपूर वापर केला आहे.

अपोलो हॉस्पिटलच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक संगीता रेड्डी यांनी कोविड महामारीविरोधातील संघर्षात भारताने कशा प्रकारे विस्तृत आणि प्रभावी योजना तयार केली याची माहिती दिली.

आयएमएफ इंडियाचे माजी कार्यकारी संचालक सुरजित भल्ला याच मुद्याला पुढे नेत म्हणाले की सर्वांनाच धक्का देणाऱ्या कोविडच्या काळात आणि आजच्या काळात जगातील सर्वोत्तम कामगिरी करणारी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा उदय झाला आहे. दारिद्र्य निर्मूलनासंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की कोविडच्या दुष्परिणामांमुळे तळागाळातल्या जनतेला अडचणींना तोंड द्यावे लागू नये हे सुनिश्चित करून सरकारची संपूर्ण प्रक्रिया तयार करण्यात आली होती.

नॅसकॉमच्या अध्यक्ष देबजानी घोष यांनी सांगितले की 2008 मध्ये केवळ 17% भारतीयांची बँक खाती होती आणि एका अभ्यासात असे सांगण्यात आले होते की भारताला 80% व्याप्तीसाठी 46 वर्षे लागतील, पण भारताने केवळ 7 वर्षात हे लक्ष्य साध्य केले. त्या म्हणाल्या की जॅम ट्रिनिटी कार्यक्रमाने आम्हाला तळागाळाच्या स्तरापर्यंत बँकिंग क्षेत्र नेता आले.

इंडियन विमेन इन्स्टिट्युशनल लीग (IWIL) इंडियाच्या संस्थापक आणि अध्यक्ष दीपा सायाल यांनी सांगितले की इतक्या वेगाने माझा देश परिवर्तन करत असल्याचा मला अभिमान आहे आणि सरकार ज्या वेगाने आणि ज्या  प्रमाणात हे परिवर्तन करत आहे ते प्रशंसेला पात्र आहे आणि अतिशय परिपूर्ण आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्रुप चीफ आर्थिक सल्लागार सौम्य कांती घोष यांनी महत्त्वाच्या आकडेवारीविषयी माहिती दिली. संपूर्ण मानवजातीसाठी सर्वात मोठा विध्वंस घडवणारी कोविड महामारी होती, मात्र गेल्या वर्षी आपला नॉमिनल जीडीपी 37 ट्रिलियनने विस्तारला, असे त्यांनी सांगितले. आपल्या सेवांची निर्यात गेल्या 7 वर्षात दुप्पट झाली आहे, असे ते म्हणाले. या सर्व आकडेवारीचा विचार केला तर ते एका अशा भारताकडे निर्देश करत आहे जो समावेशक आहे आणि अतिशय जास्त वेगाने विस्तार करत आहे, असे त्यांनी सांगितले.

या सत्राच्या समारोपाच्यावेळी सर्वांनी येत्या 5-10 वर्षातला  भारत याविषयी भाष्य केले.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1927777) Visitor Counter : 226