पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी डेहराडून ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून केले रवाना


रेल्वेच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे केले लोकार्पण तसेच उत्तराखंड राज्याला 100 टक्के विद्युत कर्षण राज्य म्हणून केले घोषित

“दिल्ली-डेहराडून वंदे भारत एक्स्प्रेसमुळे नागरिकांना “प्रवासातील सुलभता” तसेच अधिक आरामदायक प्रवासाची सुनिश्चिती होईल”

“अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण आणि गरिबीशी लढा देण्याच्या बाबतीत भारत संपूर्ण जगासाठी आशेचा किरण ठरला आहे”

“हे दशक उत्तराखंडचे दशक असेल ”

“देवभूमी संपूर्ण विश्वाच्या अध्यात्मिक जाणीवेच्या केंद्रस्थानी असेल”

“उत्तराखंडसाठी विकासाच्या नवरत्नांवर सरकारचा भर आहे”

“दुहेरी इंजिन असलेले सरकार दुप्पट सामर्थ्य आणि दुप्पट वेगासह कार्यरत आहे”

“एकविसाव्या शतकातील भारत पायाभूत सुविधांच्या क्षमतांचा अधिकाधिक वापर करून विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचू शकतो”

“पर्वतमाला प्रकल्पामुळे येत्या काही दिवसांमध्ये या राज्याचा कायापालट घडेल ”

“योग्य हेतू, धोरण आणि समर्पणवृत्ती यातून विकासाला चालना मिळत आहे”

“आपला देश आता थांबणार नाही, देशाने आता प्रगतीचा वेग घेतला आहे. संपूर्ण देश वंदे भारतच्या वेगाने पुढे जात आहे आणि यापुढेही असाच प्रगती करेल”

Posted On: 25 MAY 2023 3:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 मे 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून डेहराडून ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला झेंडा दाखवून रवाना केले. तसेच त्यांनी रेल्वेच्या नव्याने विद्युतीकरण झालेल्या विभागांचे लोकार्पण देखील केले आणि उत्तराखंड राज्याला 100 टक्के विद्युत कर्षण राज्य म्हणून घोषित  केले.

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना,  डेहराडून ते दिल्ली दरम्यान धावणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस गाडी सुरु झाल्याबद्दल उत्तराखंड राज्यातील प्रत्येकाचे अभिनंदन केले आणि ते म्हणाले की या गाडीमुळे देशाची राजधानी देवभूमी उत्तराखंडाशी जोडली जाणार आहे. या दोन शहरांमधील प्रवासाला लागणारा वेळ आता आणखी कमी होणार असून या गाडीमध्ये प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सोयीमुळे या गाडीजाणे म्हणजे  एका सुखद प्रवासाचा अनुभव असेल.

जपान, पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांना नुकत्याच दिलेल्या भेटीबाबत सांगताना पंतप्रधान म्हणाले की जग आता भारताकडे आशेने पाहत आहे. “अर्थव्यवस्थेचे बळकटीकरण आणि गरिबीशी लढा देण्याच्या बाबतीत भारत संपूर्ण जगासाठी आशेचा किरण झाला आहे,” पंतप्रधान मोदी म्हणाले. कोरोना महामारीची परिस्थिती हाताळण्यातील भारताची हातोटी आणि जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात राबविण्याची क्षमता यांचा देखील उल्लेख त्यांनी यावेळी केला. जगभरातील लोक भारताला भेट देण्याबाबत उत्सुक असताना उत्तराखंड सारख्या सुंदर राज्यांनी त्याचा उपयोग करून घेतला पाहीजे यावर त्यांनी अधिक भर दिला. या संधीचा फायदा घेण्यासाठी देखील वंदे भारत गाडी उत्तराखंड राज्याला लाभदायक ठरणार आहे ही गोष्ट त्यांनी अधोरेखित केली.

पंतप्रधान मोदी यांनी केदारनाथला दिलेल्या भेटीचे स्मरण करतानाच  तेथे उत्स्फूर्तपणे व्यक्त केलेल्या “ हे दशक उत्तराखंड राज्याचे दशक असेल” या वाक्याचेही स्मरण केले. “देवभूमी संपूर्ण विश्वाच्या अध्यात्मिक जाणीवेच्या केंद्रस्थानी असेल” अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले की ही शक्यता प्रत्यक्षात साकार करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. चार धाम यात्रेला जाणाऱ्या भाविकांची संख्या सतत नवनवे विक्रम स्थापित करत आहे याचा त्यांनी उल्लेख केला. बाबा केदार यांचे दर्शन, हरिद्वारचा कुंभ/अर्ध कुंभ मेळा आणि कंवर यात्रा यासाठी येणाऱ्या भाविकांचाही त्यांनी उल्लेख केला.  पंतप्रधान म्हणाले की, एवढ्या मोठ्या संख्येने भाविक इतर कोणत्याही राज्याला भेट देत नाहीत, ही बाब एक वरदान आहे तसेच ते एक अत्यंत महत्त्वाचे कार्य देखील आहे. “हे ‘भगीरथ’ कार्य सोपे करण्यासाठी दुहेरी इंजिन असलेले सरकार दुप्पट सामर्थ्य आणि दुप्पट वेगासह कार्य करत आहे,” ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की विकासाची ‘नवरत्ने’ म्हणजेच नऊ  विशिष्ट प्रकल्पांवर सरकारचा भर आहे. ते म्हणाले की, पहिले रत्न म्हणजे केदारनाथ-बद्रीनाथ धाम येथे  1300 कोटी रुपये खर्चाचे पुनरुज्जीवन कार्य. दुसरे रत्न म्हणजे गौरीकुंड-केदारनाथ आणि गोविंद घाट-हेमकुंड साहिब येथील 2500 कोटी रुपये खर्चाचा  रोपवे प्रकल्प. तिसरे रत्न म्हणजे मानस खंड मंदिर माला कार्यक्रमाअंतर्गत कुमाऊच्या प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार. चौथे रत्न म्हणजे संपूर्ण राज्यात पर्यटकांसाठी घरगुती निवास अर्थात होमस्टे व्यवस्थेला प्रोत्साहन, त्या अंतर्गत राज्यातील 4000 हून अधिक  होम स्टेची नोंदणी करण्यात आली आहे. पाचवे रत्न म्हणजे पर्यावरण पर्यटनासाठीच्या 16 स्थळांचा विकास. सहावे रत्न म्हणजे उत्तराखंड राज्यातील आरोग्य सुविधांचा विस्तार. उधम सिंग नगर येथे एम्सचे सॅटेलाईट केंद्र सुरु होत आहे. सातवे रत्न म्हणजे 2000 कोटी रुपये खर्चाचा टेहरी तलाव विकास प्रकल्प. आठवे रत्न म्हणजे हरिद्वार-ऋषिकेश या स्थानाचा योग तसेच साहसी पर्यटन केंद्र म्हणून विकास आणि शेवटी नववे रत्न म्हणजे तानकपूर-बागेश्वर रेल्वे मार्ग.

पंतप्रधान म्हणाले की उत्तराखंड राज्याच्या पायाभूत सुविधा विकासाला नवी चालना देण्यासाठी ही नवरत्ने एकत्रित करण्यात आली आहेत. सुमारे 12,000 कोटी रुपये खर्चाच्या चार धाम परियोजनेचे काम वेगाने सुरु आहे अशी माहिती त्यांनी दिली. दिल्ली-डेहराडून द्रुतगती महामार्ग या  टप्प्यातील प्रवास अधिक जलद आणि सुखकर करेल. उत्तराखंड मधील रोपवे जोडणीबाबत देखील त्यांनी चर्चा केली. “पर्वतमाला प्रकल्पामुळे येत्या काही दिवसांमध्ये या राज्याचा कायापालट  होणार आहे,” ते म्हणाले. सुमारे 1600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्प येत्या 2 ते 3 वर्षांत पूर्ण होईल असे मत त्यांनी व्यक्त केले. या प्रकल्पामुळे, उत्तराखंड राज्यातील मोठ्या भागापर्यंत सुलभतेने पोहोचता येईल आणि तेथील गुंतवणूक, उद्योग क्षेत्र तसेच रोजगार यांना चालना मिळेल असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या सहाय्याने उत्तराखंड हे पर्यटन, साहसी पर्यटन, चित्रपटांचे चित्रीकरण आणि विवाह करण्‍यासाठी विशेष पसंतीचे स्थान म्हणून  उदयास येत आहे, असे   पंतप्रधानांनी  यावेळी नमूद केले.  ते म्हणाले की, राज्यातील प्रेक्षणीय स्थळे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करत असून, वंदे भारत एक्सप्रेस यासाठी खूप फायदेशीर ठरेल. ज्‍यावेळी लोक आपल्या परिवारातील सर्व सदस्यांबरोबर सहल करण्‍यासाठी, पर्यटनासाठी बाहेर पडतात, त्यावेळी  रेल्वेने प्रवास करण्यासाठी   पहिली पसंती दिली जाते, असे निरीक्षण नोंदवून  पंतप्रधान म्हणाले की,  आता वंदे भारत हळूहळू अशा मंडळींसाठी वाहतुकीचे प्रमुख साधन बनत आहे.

“21 व्या शतकातील भारत पायाभूत सुविधांची क्षमता वाढवून विकासाची आणखी उंची गाठू शकतो”, असे सांगून पंतप्रधानांनी टिप्पणी केली की,   भ्रष्टाचार आणि घराणेशाहीने व्यापलेली भूतकाळातील सरकारे,पायाभूत सुविधांचे महत्त्व समजू शकली नाहीत. पूर्वीच्या सरकारांनी भारतामध्ये  अति- वेगवान  गाड्या धावतील,  अशी मोठमोठी आश्वासने दिली होती, प्रत्यक्षात मात्र   रेल्वेचे जाळे, मानवविरहित फाटकांपासून मुक्त करण्यातही   या सरकारांना यश आले नाही, असे  पंतप्रधानांनी निरीक्षण नोंदवले.  तसेच रेल्वे मार्गांच्या विद्युतीकरणाची स्थिती आणखी वाईट होती, असेही ते म्हणाले. 2014 पर्यंत देशातील फक्त एक तृतीयांश रेल्वे मार्गिकांचे  विद्युतीकरण झाले होते, त्यामुळे वेगवान  धावणाऱ्या गाड्यांचा विचार करणेही आधी अशक्य होते, असे  पंतप्रधान मोदी म्हणाले.  "रेल्वेचा कायापालट करण्याचे सर्वांगीण काम 2014 नंतर सुरू झाले", असे सांगून ते म्हणाले,  देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वेचे स्वप्न साकार करण्याचे काम वेगात  असून सेमी-हाय-स्पीड ट्रेनसाठी संपूर्ण नेटवर्क तयार करण्याचे कामही सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. 2014 पूर्वी दरवर्षी सरासरी 600 किमी रेल्वे मार्गिकांचे विद्युतीकरण केले जात होते तर आज दरवर्षी 6 हजार किलोमीटर रेल्वे मार्गिकांचे विद्युतीकरण होत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. “आज देशातील 90 टक्क्यांहून अधिक रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण झाले आहे. उत्तराखंडमध्ये संपूर्ण रेल्वे नेटवर्कचे 100 टक्के विद्युतीकरण झाले आहे,” अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

पंतप्रधानांनी विकास कामाचे श्रेय योग्य हेतू, धोरण आणि समर्पण यांना दिले. 2014 च्या तुलनेत रेल्वे अर्थसंकल्पात झालेल्या वाढीचा थेट फायदा उत्तराखंडला झाला असल्याचे अधोरेखित करून पंतप्रधानांनी सांगितले की,   2014 पूर्वी 5 वर्षे  सरासरी अंदाजपत्रक  200 कोटी रुपयांपेक्षा कमी होते, तर आज रेल्वेचे अंदाजपत्रक  5 हजार कोटी रुपयांचे आहे, म्हणजे  थेट 25 पट वाढ.  पंतप्रधानांनी डोंगराळ राज्यात कनेक्टिव्हिटीच्या महत्त्वावर जोर दिला. या भागातले  लोक कनेक्टिव्हिटीच्या कमतरतेमुळे स्थलांतरित होत असत मात्र भावी  पिढ्यांना असा  त्रास होवू नये अशी सरकारची भूमिका असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपल्याला  सीमेवर सहजतेने  पोहोचण्यासाठी आधुनिक कनेक्टिव्हिटीचाही मोठा उपयोग होईल आणि राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सैनिकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये,  असे सरकारला वाटत असल्याचेही  त्यांनी नमूद केले.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की, डबल-इंजिन सरकार उत्तराखंडच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. जिथे उत्तराखंडचा वेगवान विकास भारताच्या जलद विकासालाही मदत करेल. “देश आता थांबणार नाही, देशाने आता गती  पकडली आहे. संपूर्ण देश वंदे भारत च्या वेगाने पुढे जात आहे आणि पुढे जात राहील”, असे   सांगितले.

 

पार्श्वभूमी

उत्तराखंडमध्ये सुरू होणारी  ही पहिली  वंदे भारत एक्सप्रेस आहे. जागतिक दर्जाच्या सुविधांसह, विशेषत: राज्यात प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी, आरामदायी प्रवासाचा  अनुभव घेण्‍याचे  नवीन युगाचा प्रारंभ या रेल्वेमुळे  होईल. वंदे भारत एक्सप्रेस स्वदेशी असून कवच तंत्रज्ञानासह प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. नवीन  वंदे भारत एक्सप्रेस डेहराडून ते दिल्ली हे अंतर 4.5 तासांत पूर्ण करेल.

सार्वजनिक वाहतुकीचे स्वच्छ साधन उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दूरदृष्टीला अनुसरत   भारतीय रेल्वे, देशातील रेल्वे मार्गांचे पूर्णपणे विद्युतीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. या दिशेने पुढे जाताना, पंतप्रधानांनी उत्तराखंडमधील नव्याने विद्युतीकरण केलेल्या रेल्वे मार्गिकांचे विभाग देशाला समर्पित केले. याबरोबर,  उत्तराखंड राज्यातील  संपूर्ण रेल्वे मार्गाचे  100% विद्युतीकरण  झाले आहे.  इलेक्ट्रीफाईड सेक्शनवर इलेक्ट्रिक ट्रॅक्शनने चालवल्या जाणार्‍या गाड्यांमुळे रेल्वे गाड्यांचा  वेग वाढेल आणि वाहतूक क्षमता वाढेल.

 

 

 

 

 

* * *

N.Chitale/Suvarna/Sanjana/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1927179) Visitor Counter : 184