गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी गुजरातमधील द्वारका इथे राष्ट्रीय सागरी पोलीस प्रशिक्षण संस्थेच्या 470 कोटी रुपयांच्या कायमस्वरूपी शैक्षणिक आवाराच्या इमारतीची  केली पायाभरणी


“नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या सीमांची सुरक्षा मजबूत झाली असून नागरिकांना सुरक्षित वाटत आहे”

“नुकतेच, भारतीय नौदल आणि अंमली पदार्थ नियंत्रण मंडळाच्या मदतीने भारताच्या गुप्तचर संस्थांनी केरळच्या किनारपट्टीवरून 12000 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ पकडले आहेत.”

“मागील सरकारच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात एकूण 680 कोटी रुपयांचे अंमली  पदार्थ जप्त करण्यात आले, पण आता भारतीय सुरक्षा यंत्रणांनी एकाच वेळी 12,000 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. यावरून आमच्या तपास यंत्रणेशी संबंधित संस्था किती तत्परतेने काम करत आहेत हे दिसून येते.”

Posted On: 20 MAY 2023 6:39PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह  यांनी आज गुजरात मधील द्वारका येथील राष्ट्रीय सागरी पोलीस प्रशिक्षण संस्थेच्या 470 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या कायमस्वरूपी शैक्षणिक आवाराच्या इमारतीची पायाभरणी केली.यावेळी केंद्रीय गृहसचिव आणि सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, किनारपट्टीची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी 450 एकरपेक्षा जास्त जागेवर आज राष्ट्रीय सागरी पोलीस प्रशिक्षण संस्थेचे काम सुरू करण्यात आले आहे.  ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाची आणि देशाच्या सीमांची सुरक्षा मजबूत झाली असून देशातील नागरिकांना आता सुरक्षित वाटत आहे. शाह  म्हणाले की, सीमेवरील सुरक्षा बळकट करण्यासाठी आपल्या सीमा रक्षकांच्या राहण्याच्या आणि कामाच्या सुविधांमध्ये सुधारणा होणे, त्यांना अत्याधुनिक उपकरणे मिळणे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने या तिन्ही क्षेत्रात कोणतीही  कमतरता ठेवली नाही आणि आपल्या सुरक्षा दलांना सर्व प्रकारच्या सुविधा आणि अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे, असे ही ते म्हणाले.

भारतीय नौदल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB), अर्थात अंमली  पदार्थ नियंत्रण संस्थेने, भारताच्या गुप्तचर संस्थांच्या मदतीने केरळच्या किनारपट्टीजवळच्या समुद्रात 12,000 कोटी रुपये किमतीचे अंमली  पदार्थ जप्त केले आहेत, अशी माहिती अमित शाह यांनी दिली.  ते म्हणाले की, मागील सरकारच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात रु. 680 कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. पण, भारतीय सुरक्षा संस्थांनी आता एकाच मालवाहू जहाजावरून  12,000 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ ताब्यात घेतले आहेत. यामधून आपल्या सुरक्षा संस्थांची आजची सज्जता दिसून येते, असे त्यांनी सांगितले.

देशाच्या सीमा सुरक्षित नसतील, तर विकासाला अर्थ नाही, असे गृहमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या, तरच देश सुरक्षित राहू शकतो. गृहमंत्री शाह म्हणाले की, भारताला 15,000 किमी लांबीची जमिनीवरील सीमा आणि 7,516 किमी लांबीची सागरी सीमा लाभली आहे. ते म्हणाले की 7,516 किमी लांबीच्या सागरी सीमेपैकी 5,422 किमी ही मुख्य भूभागाची सीमा आहे आणि 2,000 किमी पेक्षा जास्त बेटांची सीमा आहे. 1,382 बेटे, 3,337 किनारी गावे, 11 प्रमुख बंदरे, 241 लहान बंदरे आणि 135 आस्थापना आहेत, ज्यामध्ये अंतराळ, संरक्षण, अणुऊर्जा, पेट्रोलियम, नौवहन इत्यादी संस्थांचा समावेश आहे. ते म्हणाले की, या सर्व सुरक्षा जवानांसाठी पूर्वी कोणतीही विशेष प्रशिक्षण व्यवस्था नव्हती, मात्र, 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर, प्रत्येक किनारपट्टी पोलिस स्थानक, सीमा सुरक्षा दल आणि तटरक्षक दलातील जवानांकडून सुसंगत प्रतिसादाची गरज निर्माण झाली.

सागरी किनारपट्टीच्या सुरक्षा दलाच्या प्रशिक्षणाची नियोजनबद्ध व्यवस्था केली, तरच हे शक्य आहे, असे शाह  म्हणाले. ते म्हणाले की 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय तटरक्षक पोलीस अकादमीला मान्यता दिली, आणि भगवान श्री कृष्ण यांच्या शहरात त्याची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. ते म्हणाले की द्वारका म्हणजे देशाचे प्रवेशद्वार आणि त्या काळी भगवान श्रीकृष्ण मथुरेहून या ठिकाणी आले आणि त्यांनी आपल्या सागरी सीमेवर एक मोठे व्यापार केंद्र उभारले. अमित शाह म्हणाले की, संपूर्ण देशात किनारपट्टी पोलिस कर्मचार्‍यांची एकूण संख्या सुमारे 12,000 आहे, आणि ही अकादमी पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर या ठिकाणी वर्षाला 3,000 लोकांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था होईल.

***

R.Aghor/G.Deoda/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1925981) Visitor Counter : 145