पंतप्रधान कार्यालय

ओडिशातील काही रेल्वे प्रकल्पांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

Posted On: 18 MAY 2023 2:41PM by PIB Mumbai

 

जय जगन्नाथ!

ओदिशाचे राज्यपाल श्री गणेशी लाल जी, मुख्यमंत्री श्री नवीन पटनायक जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, धर्मेंद्र प्रधान जी, बिश्वेश्वर टुडू जी, इतर सर्व मान्यवर आणि पश्चिम बंगाल तसेच ओदिशामधील माझ्या सर्व बंधू-भगिनींनो!

ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या लोकांना आज वंदे भारत रेल्वेगाडीची भेट मिळते आहे. वंदे भारत रेल्वेगाडी ही, आधुनिक भारत आणि महत्वाकांक्षी भारतीय अशा दोघांचे प्रतीक ठरते आहे. आज जेव्हा वंदे भारत रेल्वेगाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करते तेव्हा त्यातून भारताचा वेग दिसून येतो आणि भारताची प्रगतीही दिसून येते.

वंदे भारतचा हा वेग आणि प्रगती आता बंगाल आणि ओदिशामध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासाचा अनुभवही बदलेल आणि विकासाचा अर्थही बदलेल. आता कोलकात्याहून दर्शन घेण्यासाठी पुरी येथे जायचे असो किंवा काही कामानिमित्त पुरीहून कोलकाता येथे जायचे असो, या प्रवासासाठी फक्त साडेसहा तास लागतील. त्यामुळे वेळही वाचेल, व्यापार आणि व्यवसायही वाढेल, त्याचबरोबर युवा वर्गासाठी नवीन संधीही निर्माण होतील. याबद्दल मी ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या जनतेचे अभिनंदन करतो.

 

मित्रहो,

जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्या कुटुंबासह दूरचा प्रवास करायचा असतो, तेव्हा रेल्वे ही त्याची पहिली पसंती असते, प्राधान्य असते. आज ओदिशाच्या रेल्वे विकासासाठी आणखीही अनेक मोठी कामे झाली आहेत. पुरी आणि कटक रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणाची पायाभरणी असो, रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण असो किंवा ओदिशामधील रेल्वे मार्गांचे 100% विद्युतीकरण असो, या सर्व कामांबद्दल मी ओदिशाच्या जनतेचे अभिनंदन करतो.

 

मित्रहो,

हा काळ स्वातंत्र्याचा अमृत काळ आहे, भारताची एकात्मता आणखी मजबूत करण्याची हीच वेळ आहे. एकता जितकी जास्त असेल तितकी भारताची सामूहिक शक्ती सर्वोच्च शिखर गाठेल. या वंदे भारत गाड्याही याच भावनेचे प्रतिबिंब आहेत. या अमृत काळात वंदे भारत गाड्यासुद्धा विकासाचे इंजिन ठरत आहेत आणि 'एक भारत, श्रेष्ठ भारत' या भावनेला पुढे घेऊन जात आहेत.

भारतीय रेल्वे सर्वांना परस्परांशी जोडते, त्यांना एका धाग्यात गुंफते. वंदे भारत रेल्वेगाडीही याच मार्गावर पुढे जाईल. ही वंदे भारत रेल्वेगाडी हावडा आणि पुरी, बंगाल आणि ओदिशामधील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करेल. आज देशातील विविध राज्यांमध्ये अशा सुमारे 15 वंदे भारत गाड्या धावत आहेत. या आधुनिक गाड्या देशाच्या अर्थव्यवस्थेलाही चालना देत आहेत.

 

मित्रहो,

गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अत्यंत बिकट जागतिक परिस्थितीतही विकासाचा वेग कायम राखला आहे. या विकासात प्रत्येक राज्याचा सहभाग आहे, प्रत्येक राज्याला बरोबर घेऊन देश पुढे जात आहे, हे त्यामागचे एक मोठे कारण आहे. एक काळ असा होता की कोणतेही नवे तंत्रज्ञान आले किंवा नवी सुविधा आली की ती फक्त दिल्ली किंवा काही मोठ्या शहरांपुरतीच मर्यादित असायची. आजचा भारत मात्र ही जुनी विचारसरणी मागे टाकून पुढे जात आहे.

आजचा नवा भारत स्वतः तंत्रज्ञान तयार करतो आहे आणि नवीन सुविधा वेगाने देशाच्या कानाकोपऱ्यात नेतो आहे. ही वंदे भारत रेल्वेगाडी भारताने स्वतः तयार केली आहे. आज भारत 5G तंत्रज्ञान स्वतः विकसित करत आहे आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यात घेऊन जातो आहे.

कोरोनासारख्या साथरोगासाठी स्वदेशी लस तयार करून भारताने अवघ्या जगाला चकित केले होते आणि या सर्व प्रयत्नांमध्ये समान गोष्ट अशी की या सर्व सुविधा कोणत्याही एका शहरापुरत्या किंवा राज्यापुरत्या मर्यादित न राहता प्रत्येकापर्यंत पोहोचल्या, वेगाने पोहोचल्या. आमच्या या वंदे भारत रेल्वेगाड्याही आता उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्याला स्पर्श करतात.

 

बंधु आणि भगिनींनो,

'सबका साथ, सबका विकास' या धोरणाचा सर्वात मोठा फायदा आज देशातील अशा राज्यांना होतो आहे, जी विकासाच्या शर्यतीत मागे पडली होती. गेल्या 8-9 वर्षांमध्ये ओदिशातील रेल्वे प्रकल्पांच्या बजेटमध्ये भरघोस वाढ झाली आहे. 2014 पूर्वीच्या 10 वर्षांमध्ये, येथे दरवर्षी सरासरी 20 किलोमीटर अंतराच्या रेल्वे लाईन टाकल्या जात होत्या. तर 2022-23 मध्ये, म्हणजे अवघ्या एका वर्षात येथे सुमारे 120 किलोमीटर अंतराच्या नवीन रेल्वे लाईन टाकण्यात आल्या आहेत.

2014 पूर्वीच्या 10 वर्षांत ओदिशामध्ये 20 किमीपेक्षा कमी रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यात आले होते. गेल्या वर्षी ही आकडेवारीही जवळपास 300 किमीपर्यंत वाढली आहे. सुमारे 300 किमी लांबीचा खोरधा-बोलांगीर प्रकल्प अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, हे ओदिशामधील लोकांना माहिती आहे. आज या प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे. हरिदासपूर-पारादीप नवीन रेल्वे मार्ग असो किंवा टिटलागड-रायपूर मार्गाचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण असो, ओदीशातील लोक जी कामे होण्याची वाट वर्षानुवर्षे पाहत होते, ती कामे आता पूर्ण होत आहेत.

ओदिशा आज, देशातील रेल्वेजाळ्याचे विद्युतीकरण शंभर टक्के पूर्ण झालेल्या राज्यांपैकी एक राज्य आहे. पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा रेल्वेच्या जाळ्याचे विद्युतीकरण शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी वेगाने काम सुरू आहे. यामुळे रेल्वे गाड्यांचा वेग वाढला आहेच आणि मालगाड्यांच्या प्रवासाला लागणारा वेळ सुद्धा कमी झाला आहे. ओदिशा हे राज्य खनिज संपत्तीचे मोठे भांडार असल्यामुळे, मोठे केंद्र असल्यामुळे रेल्वेच्या विद्युतीकरणाचा या राज्याला आणखी फायदा मिळेल. यामुळे राज्यातील औद्योगिक विकासाला गती मिळण्यासोबतच इंधन म्हणून डिझेलच्या वापरामुळे होणाऱ्या प्रदूषणापासूनही मुक्ती मिळेल.

 

मित्रहो,

पायाभूत सुविधांच्या निर्मितीला  एक वेगळा पैलू सुद्धा आहे आणि या पैलूवर हवी तेवढी जास्त चर्चा होत नाही. पायाभूत सुविधांमुळे लोकांचे फक्त जीवनच सुकर होत नाही, तर यामुळे समाज सुद्धा सक्षम आणि सबळ होतो. जिथे पायाभूत सुविधांचा अभाव असतो तिथे लोकांचा विकास खुंटतो. जिथे पायाभूत सुविधांचा विकास होतो तिथे लोकांचाही विकास वेगाने होतो.

आपल्याला हे माहितीच आहे की प्रधानमंत्री सौभाग्य योजने अंतर्गत भारत सरकारने अडीच कोटींहून जास्त घरांना वीज जोडण्या विनामूल्य पुरवल्या आहेत. यामध्ये ओदिशातील सुमारे 25 लाख आणि बंगालमधील सव्वा सात लाख घरांचा समावेश आहे. आता आपण जरा विचार करा, जर अशी ही एखादी योजना सुरू झाली नसती, तर काय झालं असते? 21व्या शतकात आजही अडीच कोटी घरातील मुलांना अंधारात अभ्यास करणे, अंधारात आयुष्य कंठणे भाग पडले असते. ही कुटुंबे, वीजेमुळे मिळणाऱ्या आधुनिक संपर्क व्यवस्था आणि इतर सर्व सुविधांपासून वंचित राहिली असती.

 

मित्रांनो,

आज आपण विमानतळांची संख्या 75 पासून जवळजवळ दीडशे पर्यंत वाढल्याचा नेहमी अभिमानाने उल्लेख  करत असतो. हे भारताचे एक मोठे यश आहे, मात्र यामागे असलेला विचार या यशाला आणखी द्विगुणीत करतो. कधीकाळी विमान प्रवास हा खूप मोठ्या स्वप्नापुरताच मर्यादीत राहिलेला माणूस सुद्धा आज विमानाने प्रवास करू शकतो. देशातील सर्वसामान्य माणूस सुद्धा विमान प्रवासाचे आपले अनुभव सगळ्यांना सांगत असल्याची कितीतरी छायाचित्रे, टिप्पण्या आपण सर्वांनी समाज माध्यमांवर पाहिल्या असतील. जेव्हा या मंडळींची मुले-मुली, त्यांना पहिल्यांदा विमानाचा प्रवास घडवतात, तेव्हा त्यांना होत असलेल्या आनंदाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही.

 

मित्रहो,

पायाभूत सुविधांशी निगडीत भारताची ही कामगिरीसुद्धा आज अभ्यासाचा विषय आहे. आपण जेव्हा पायाभूत सुविधांच्या निर्मिती करता दहा लाख कोटी रुपयांची तरतूद करतो तेव्हा त्यातून लाखो रोजगार सुद्धा निर्माण होतात. जेव्हा आपण, रेल्वे आणि रस्ते महामार्गांसारख्या दळणवळण व्यवस्थेने, विविध प्रदेश एकमेकांशी जोडतो तेव्हा त्याचा परिणाम केवळ प्रवासाच्या सुविधेपर्यंतच मर्यादीत राहत नाही, तर त्यामुळे शेतकरी आणि उद्योजकांना नवनव्या बाजारपेठा उपलब्ध होतात, पर्यटकांना पर्यटन स्थळी सहजपणे कमी वेळात पोहोचता येते. विद्यार्थ्यांना, त्यांची आवडती महाविद्यालये निवडता येतात. याच विचाराने आज भारत आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर विक्रमी गुंतवणूक करत आहे.

 

मित्रांनो,

भारत आज, लोकसेवा हीच परमेश्वराची सेवा या सांस्कृतिक विचारसरणीने पुढे वाटचाल करत आहे. आपल्या अध्यात्मिक परंपरेने, व्यवस्थेने, शतकानुशतके हे विचार पोसले आहेत, रुजवले आहेत. जगन्नाथ पुरी सारखी तीर्थक्षेत्रे, जगन्नाथ मंदिरासारखी पवित्र देवस्थाने, या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आहेत, मूळ केंद्र आहेत. भगवान जगन्नाथाच्या महाप्रसादाच्या माध्यमातून शतकानुशतके कितीतरी गरिबांना जेवण मिळत आले आहे. याच भावनेने आज देश, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना राबवत आहे,  80 कोटी लोकांना विनामूल्य शिधा देत आहे. आज एखाद्या गरीब व्यक्तीला उपचारांची आवश्यकता असेल तर त्यांना आयुष्मान पत्रिकेद्वारे पाच लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचार मिळू शकत आहेत. कोट्यवधी गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून पक्की घरे मिळाली आहेत. घरामध्ये उज्वला योजनेअंतर्गत मिळणारे गॅस सिलेंडर असो वा जलजीवन मिशनच्या अंतर्गत होणारा पाणीपुरवठा असो, इतकी वर्षे फक्त वाट बघत राहणेच नशीबी आलेल्या गरिबांनाही या सर्व मौल्यवान सुविधा आता मिळत आहेत.

 

मित्रहो,

भारताचा जलद गतीने विकास साधण्यासाठी, भारतातील राज्यांचा संतुलित विकास होणे सुद्धा तेवढेच आवश्यक आहे. देशातील कुठलेही राज्य साधनसंपत्तीच्या अभावामुळे विकासाच्या शर्यतीत मागे पडता कामा नये, हाच आज देशाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच 15 व्या वित्त आयोगात, ओदिशा आणि पश्चिम बंगाल सारख्या राज्यांसाठी आधीच्या तुलनेत अतिरिक्त तरतुदींची शिफारस करण्यात आली आहे. ओदिशा सारख्या राज्याला तर एवढ्या विशाल अशा समृद्ध नैसर्गिक साधन संपत्तीचे वरदान लाभले आहे. मात्र यापूर्वी राबवल्या गेलेल्या चुकीच्या धोरणांमुळे, राज्यांना आपल्याच साधनसंपत्ती पासून वंचित रहावे लागत होते. आम्ही खनिज संपत्तीचे महत्त्व लक्षात घेऊन खाणकामाच्या धोरणामध्ये सुधारणा केली आहे. यामुळे आज, खनिज संपत्ती लाभलेल्या सर्व राज्यांना मिळणाऱ्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. जीएसटी अर्थात वस्तू सेवा कर लागू झाल्यापासून, कराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नातही खूप वाढ झाली आहे. ही साधनसंपत्ती आज राज्याच्या विकासासाठी कामी येत आहे, गावे, गावातील गरीब यांच्या सेवेसाठी कामी येत आहे. ओदिशाला नैसर्गिक संकटांचा यशस्वीपणे सामना करता यावा यावर केंद्र सरकार पूर्ण लक्ष पुरवत आहे. आमच्या सरकारने ओदिशाला आपत्ती व्यवस्थापन आणि एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) साठी आठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा निधी दिला आहे. यामुळे वादळे आली की त्या संकट काळात, जन आणि धन म्हणजेच लोक आणि संपत्ती या दोहोंचा बचाव करण्यात मदत मिळाली आहे.

 

मित्रांनो,

ओदिशा, पश्चिम बंगाल आणि संपूर्ण देशाच्या विकासाचा वेग, येणाऱ्या काळात आणखी वाढेल, असा मला विश्वास आहे. भगवान जगन्नाथ, काली माता यांच्या कृपेनेच आपण विकसित नवभारताचे उद्दिष्ट नक्की गाठू! याच सदिच्छेसह आपणा सर्वांचे खूप खूप आभार!! पुन्हा एकदा सर्वांना जय जगन्नाथ!!!

***

S.Tupe/M.Pange/A.Save/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1925460) Visitor Counter : 100