पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला केले संबोधित


विविध सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 71,000 जणांना नियुक्ती पत्रांचे वाटप

"रोजगार मेळाव्यातून सरकारची तरुणांप्रती असलेली बांधिलकी दिसून येते"

"सरकारने, गेल्या 9 वर्षांत भरती प्रक्रियेला प्राधान्य देत ती जलद,पारदर्शक आणि निःपक्षपाती केली आहे"

"रोजगाराच्या शक्यता लक्षात घेऊन सरकारी धोरणे आखली जात आहेत "

"सरकारने 9 वर्षांत सुमारे 34 लाख कोटी रुपये भांडवली खर्चावर खर्च केले आहेत आणि या वर्षीही भांडवली खर्चासाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे "

"देशात उत्पादनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती यावर आत्मनिर्भर भारत मोहीम आधारित आहे "

Posted On: 16 MAY 2023 2:44PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय रोजगार मेळाव्याला संबोधित केले. तसेच विविध सरकारी विभाग आणि संघटनांमध्ये नव्याने भरती झालेल्या सुमारे 71,000 जणांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. पंतप्रधानांनी यावेळी भरती झालेल्या सर्वांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या. गुजरातसारख्या राज्यांमध्ये नुकतेच झालेले रोजगार मेळावे आणि आसाममधील आगामी मेळाव्याचा उल्लेखही केला. केंद्र आणि भाजपशासित राज्यांतील हे मेळावे सरकारची तरुणांप्रती असलेली बांधिलकी दर्शवतात असे ते म्हणाले. गेल्या 9 वर्षात, सरकारने भरती प्रक्रिया जलद, पारदर्शक आणि निःपक्षपाती करून तिला प्राधान्य दिले आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.  भरती प्रक्रियेतील अडचणींची आठवण त्यांनी करुन दिली. कर्मचारी निवड मंडळाला आधी नवीन भरती करण्यासाठी सुमारे 15-18 महिने लागत असत तर आता फक्त 6-8 महिने लागतात हे पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले. भरतीची प्रक्रिया पूर्वी खूपच किचकट होती असे त्यांनी अधोरेखित केले. अर्ज प्राप्त करण्यापासून ते टपालाद्वारे ते सादर करणे यात वेळ जायचा. आता ती प्रक्रीया ऑनलाइन करून सुलभ केली आहे. कागदपत्रांच्या स्वयं-प्रमाणीकरणाची तरतूद देखील केली आहे. गट क आणि गट ड साठीच्या मुलाखती देखील रद्द केल्या आहेत असेही पंतप्रधानांनी सांगितले.

संपूर्ण प्रक्रियेतून घराणेशाहीचे झालेले उच्चाटन हा याचा सर्वात मोठा फायदा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी आजच्या तारखेचे महत्त्वही अधोरेखित केले. 9 वर्षांपूर्वी याच तारखेला, 16 मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले होते. त्या दिवसाच्या उत्साहाचे स्मरण करून पंतप्रधान म्हणाले की, सबका साथ, सबका विकास या उमेदीने सुरू झालेला प्रवास विकसित भारतासाठी कार्यरत आहे. आज सिक्कीमचा स्थापना दिवस असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले. या 9 वर्षांमध्ये रोजगाराच्या शक्यता लक्षात घेऊन सरकारी धोरणे बनवण्यात आली. आधुनिक पायाभूत सुविधा, ग्रामीण भागाला प्रोत्साहन असो किंवा जीवनाच्या मूलभूत गरजांचा विस्तार या क्षेत्रातील उपक्रम असोत भारत सरकारचे प्रत्येक धोरण तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या 9 वर्षांत सरकारने भांडवली खर्च आणि मूलभूत सुविधांवर सुमारे 34 लाख कोटी रुपये खर्च केल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.  यंदाच्या अर्थसंकल्पातही भांडवली खर्चासाठी 10 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या रकमेमुळे नवीन महामार्ग, नवीन विमानतळे, नवीन रेल्वे मार्ग, पूल इत्यादी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. यामुळे देशात अनेक नवीन रोजगार निर्माण होत आहेत, असे ते म्हणाले. स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा विचार करता आज भारताचा वेग आणि व्याप्ती अभूतपूर्व आहे. गेल्या 7 दशकातील 20 हजार किमीच्या तुलनेत गेल्या 9 वर्षात 40 हजार किमी रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाल्याची माहिती त्यांनी दिली. देशातील मेट्रो रेल्वेच्या जाळ्याचा संदर्भ देत, 2014 पूर्वी केवळ 600 मीटर मेट्रो मार्ग टाकण्यात आले होते तर आज अंदाजे 6 किमी मेट्रो रेल्वे मार्ग टाकले जात आहेत असे पंतप्रधानांनी सांगितले.

2014 पूर्वी देशात 4 लाख किलोमीटर पेक्षा कमी ग्रामीण रस्ते होते , आता आज  7.25 लाख किलोमीटर लांबीचे रस्ते झाले आहेत.  देशातील विमानतळांची संख्या देखील 2014 मधील 74 वरून जवळपास 150 वर गेली आहे. त्याचप्रमाणे गेल्या 9 वर्षात गरिबांसाठी बांधण्यात आलेल्या घरांमुळे लक्षणीय रोजगार निर्मिती झाली. गावांमधील  5 लाख सामान्य सेवा केंद्रे ग्रामीण भागात रोजगार प्रदान करत आहेत. गावांमध्ये 30 हजारांहून अधिक पंचायत भवनांची निर्मिती करण्यात आली असून 9 कोटी कुटुंबांना पाईपद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.हे सर्व उपक्रम मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.  परदेशी गुंतवणूक असो की भारताची निर्यात, देशात रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या अगणित संधी निर्माण करत आहेत.

गेल्या नऊ वर्षात देशातील युवावर्गासाठी नवनवीन क्षेत्रांचा उदय झाल्याने नोकऱ्यांच्या स्वरूपात देखील विलक्षण बदल झाले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

केंद्र सरकार या नवीन क्षेत्रांना अविरत पाठिंबा देत आहे याचा पुनरुच्चार करून पंतप्रधानांनी देशाने अनुभवलेल्या स्टार्ट अप क्रांतीचा दाखला दिला. देशातील स्टार्ट अप्सची संख्या  2014 मधील 100 वरून 1 लाख वर पोहोचली आहे ज्यामुळे 10 लाखांहून अधिक युवकांना रोजगार मिळाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

लोकांचे जीवन पूर्वीपेक्षा अधिक सुखकर करणारा तंत्रज्ञान विषयक  विकास अधोरेखित करताना पंतप्रधानांनी ऍप आधारित टॅक्सी सेवांचे उदारहरण दिले, ज्या आता शहरातील लोकांच्या जीवनवाहिनी बनल्या आहेत, कार्यक्षम ऑनलाईन पुरवठा यंत्रणांमुळे रोजगारात वाढ झाली आहे, ड्रोन क्षेत्राला दिलेल्या प्रोत्साहनामुळे कीटकनाशकांच्या फवारणीपासून औषधे पोहोचवण्यापर्यंत मदत झाली आहे, शहरी गॅस वितरण प्रणालीचा विस्तार होत असून त्याची व्याप्ती 60 वरून 600 शहरांवर गेली आहे.

गेल्या 9 वर्षात केंद्र सरकारने मुद्रा योजनेच्या माध्यमातून वितरित केलेल्या  23 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक कर्जामुळे नागरिकांना नवीन व्यवसाय सुरु करता आले, टॅक्सी विकत घेता आल्या किंवा त्यांच्या सध्याच्या व्यवसायाचा विस्तार करता आला. मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळाल्यामुळे जवळपास 8-9 कोटी नागरिक पहिल्यांदाच उद्योजक बनले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. "आत्मनिर्भर भारत मोहीम देशात उत्पादनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती यावर आधारित आहे" असे पंतप्रधान म्हणाले. केंद्र सरकार पीएलआय योजनेंतर्गत उत्पादनासाठी सुमारे २ लाख कोटी रुपयांची मदत पुरवत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

देशात उच्च शिक्षण संस्था आणि कौशल्य विकास संस्था अत्यंत वेगाने विकसित होत आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. 2014 आणि 2022 मध्ये देशात दरवर्षी नवीन भारतीय तंत्रज्ञान संस्था, आय आय टी आणि भारतीय व्यवस्थापन संस्था, आय आय एम उदयाला येत आहेत, दर आठवड्याला एका विद्यापीठाचे उदघाटन होत आहे आणि गेल्या 9 वर्षांत सरासरी दररोज दोन महाविद्यालये कार्यरत झाली आहेत, असे त्यांनी सांगितले.  2014 पूर्वी देशात जवळपास 720 विद्यापीठे होती, आता या संख्येत मोठी वाढ होऊन ती 1100 झाली आहे, असे ते म्हणाले. देशातील वैद्यकीय शिक्षणाविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की देशात 7 दशकांमध्ये केवळ 7 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, एम्स होत्या, तर गेल्या 9 वर्षात सरकारने 15 नवीन एम्स विकसित केल्या आहेत. देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या 400 वरून 700 वर गेली आहे आणि एमबीबीएस आणि एमडीच्या जागांची संख्या सुमारे 80 हजारांवरून 1 लाख 70 हजारांहून अधिक झाली आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी विकास प्रक्रियेतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे स्थान अधोरेखित केले."गेल्या 9 वर्षात दररोज एक आयटीआय स्थापन होत आहे". देशाच्या आवश्यकतेनुसार  15 हजार आयटीआयमध्ये नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात येत असून पंतप्रधान कौशल विकास योजनेंतर्गत 1.25 कोटींहून अधिक तरुणांना कौशल्य प्रदान करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

कर्मचारी भविष्य निधी संघटनेचे (ईपीएफओ)उदाहरण देत पंतप्रधानांनी सांगितले, की 2018-19 नंतर सुमारे 4.5 कोटी नव्या कार्यालयीन स्वरुपाच्या (औपचारिक) नोकऱ्या निर्माण करण्यात आल्या असून ईपीएफओच्या वेतनपटानुसार या औपचारिक स्वरुपाच्या नोकऱ्यांमध्ये स्थिर वाढ झाली असल्याचे त्यातून दिसून येते.त्याचसोबत  स्वयंरोजगाराच्या संधीही सातत्याने वाढत आहेत.

भारतात उद्योग आणि गुंतवणूक करण्यासाठी जागतिक स्तरावर अभूतपूर्व सकारात्मकता असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले. वॉलमार्टच्या प्रमुख कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतच्या (सीईओ) नुकत्याच झालेल्या भेटीचे स्मरण करून देत; भारतातून 80 हजार कोटी रुपयांच्या मालाची निर्यात करण्याबाबत सीईओंनी दर्शविलेल्या  विश्वासाबद्दल पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. मालवाहतूक आणि साखळी पुरवठा क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. भारतातून 8 हजार कोटी रुपयांची उत्पादने निर्यात करण्याचे उद्दिष्ट असल्याचा विश्वास, सिस्कोचे प्रमुख कार्यकारी अधिकारी यांनी पंतप्रधानांशी झालेल्या भेटीत व्यक्त केला होता,तसेच आणि ॲपलचे (Apple) चे प्रमुख कार्यकारी अधिकारी यांनी भारतातील मोबाईल उत्पादन उद्योगाविषयी विश्वास व्यक्त केला होता, याशिवाय एनएक्सपी या सेमीकंडक्टर कंपनीचे उच्च कार्यकारी अधिकारी यांनी देखील भारतात सेमीकंडक्टर इकोसिस्टम तयार करण्याची क्षमता आहे असे सांगत त्याबाबत सकारात्मकता दर्शविली होती,याचे पंतप्रधानांनी यावेळी स्मरण करून दिले.फॉक्सकॉननेही हजारो कोटींची गुंतवणूक सुरू केली आहे,असे पंतप्रधान म्हणाले.

पुढील आठवड्यात जगातील आघाडीच्या कंपन्यांच्या सीईओंसोबत होणाऱ्या पंतप्रधानांच्या नियोजित बैठकींचीही माहिती त्यांनी दिली आणि ते म्हणाले की हे सर्वजण भारतात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहेत.अशा प्रयत्नांमुळे भारतातील विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत,असे पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केले.

आपल्या भाषणाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी नव्याने भरती झालेल्या कर्मचाऱ्यांकडे निर्देश करत,देशात सुरू असलेल्या विकासाच्या या महायज्ञातील, या नवनियुक्तांची भूमिका अधोरेखित केली आणि पुढील 25 वर्षात विकसित भारताचे संकल्प साकार करायचे आहेत,असे आवाहन पंतप्रधानांनी त्यांना केले. पंतप्रधानांनी त्यांना या संधीचा पुरेपूर वापर करण्याचे आदेश दिले यासाठी आणि कर्मयोगी प्रारंभ या ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रमाद्वारे (iGoT ) सरकार कर्मचाऱ्यांच्या कौशल्य विकासावर भर देत असल्याचे नमूद केले.

पार्श्वभूमी

केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये आज देशभरात 45 ठिकाणी रोजगार मेळा आयोजित करण्यात आला होता,ज्यातून नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली;राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांनी या  उपक्रमाला भरघोस पाठिंबा दिला. देशभरातून निवडलेले नवनियुक्त कर्मचारी, ग्रामीण टपाल सेवक, टपाल निरीक्षक, कमर्शियल-कम-तिकीट कर्मचारी , कनिष्ठ कर्मचारी -सह-टंकलेखक, कनिष्ठ लेखा कर्मचारी, ट्रॅक मेंटेनर, सहाय्यक विभाग अधिकारी,निम्न विभाग कर्मचारी, उपविभागीय अधिकारी,कर सहाय्यक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, निरीक्षक, नर्सिंग अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, फायरमन, सहाय्यक लेखाधिकारी, सहाय्यक लेखा परीक्षण अधिकारी, विभागीय लेखापाल, लेखापाल, हवालदार, मुख्य पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, मुख्याध्यापक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, सहाय्यक निबंधक , सहाय्यक प्राध्यापक अशा विविध जागांवर/पदांवर रुजू होतील.

हा रोजगार मेळावा, रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे. असा रोजगार मेळावा पुढील रोजगार निर्मितीच्या गतीमानतेचे निदर्शक म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागासाठी अर्थपूर्ण प्रकारे सहभागी होण्याची संधी प्रदान करेल, अशी अपेक्षा आहे.

नवनियुक्त कर्मचाऱ्यांना विविध सरकारी विभागांसाठी सर्व ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम कर्मयोगी प्रारंभ द्वारे ( (iGoT ) स्वतःला प्रशिक्षित करण्याची संधी देखील मिळणार आहे.

 

 

 

S.Bedekar/Vinayak/Bhakti/Sampada/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1924479) Visitor Counter : 200