उपराष्ट्रपती कार्यालय
समाजाच्या परिवर्तनाचे आणि प्रगतीचे सर्वात प्रभावी साधन म्हणजे शिक्षण – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
दिब्रुगड विद्यापीठाच्या 21व्या दीक्षांत समारंभाला उपराष्ट्रपतींनी केले संबोधित
Posted On:
03 MAY 2023 4:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2023
समाजात समता, समानता आणि प्रगती घडवून आणण्यासाठी शिक्षण ही सर्वात प्रभावी आणि परिवर्तन करणारी यंत्रणा असल्याचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज सांगितले. सामाजिक परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी लोकशिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही असं ते म्हणाले.
आसाममधील दिब्रुगड विद्यापीठाच्या 21 व्या दीक्षांत समारंभात उपराष्ट्रपतींनी आज मार्गदर्शन केले. त्यावेळी ते बोलत होते. परिवर्तनाचे प्रतिनिधी बनून विद्यार्थ्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. “2047 मध्ये देश आपल्या स्वातंत्र्याची शताब्दी साजरी करेल तेव्हा तुम्हीच भारताचे निर्माते आणि योद्धे असाल,” असे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
स्पर्धा हा सर्वोत्तम गुरू आहे तर भय हा सगळ्यात मोठा शत्रू आहे, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनो मोठी स्वप्ने बघा आणि कधीही तणाव घेऊ नका असेही ते म्हणाले. स्वप्ने पहा पण फक्त स्वप्नाळू न राहता प्रत्यक्ष कार्य करा असे त्यांनी सांगितले. ईशान्येकडची आठ राज्ये देशासाठी अष्ट लक्ष्मी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. या आठ राज्यांच्या विकासाशिवाय आणि त्यांनी दिलेल्या योगदानाशिवाय भारताची प्रगती अपूर्ण असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले.
ईशान्य भागातील भाषिक वैविध्य आणि साहित्यिक परंपरा जपण्यासाठी दिब्रुगढ विद्यापीठाच्या कार्याची उपराष्ट्रपतींनी प्रशंसा केली. हजारो वर्षांपासून विकसित होत आलेल्या आपल्या भाषांचे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.
देशाच्या अमृत काळात त्याच्या मुख्य प्रवाहाच्या इतिहासविषयक कथनात ईशान्येकडील यशोगाथांचा समावेश केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. देशाच्या इतिहासात आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी ईशान्येकडील अज्ञात वीरांनी दिलेले योगदान प्रकाशात आणल्याबद्दल राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीइआरटी) आणि भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषद (आयसीएचआर) या संस्थांचे त्यांनी कौतुक केले.
ईशान्येकडच्या राज्यांत भौतिक,सामाजिक आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर सरकार भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडच्या या भागात अनेक संधी उपलब्ध असल्यामुळे या भागाची ओळख आता- अनेक संधी असलेली भूमी म्हणून होत आहे, असे ते म्हणाले. त्यांनी उदाहरणादाखल बोगीबील रेन-कम रोड ब्रिज, 375 रस्ते प्रकल्प, विमानतळांचे जाळे 9 वरून 17 पर्यंत वाढणे आणि ईशान्य भागात 190 नवीन शैक्षणिक संस्थांची स्थापना अशा विविध प्रकल्पांचा उल्लेख केला.
या भागात तरुणांना त्यांची क्रयशक्ती, ऊर्जा विधायकरीत्या वापरता यावी यासाठी नवीन मार्ग खुले झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1921678)